गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" आत्म दर्शन म्हणजेच आत्मसाक्षात्कार. "

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                 माझ्या दहावीच्या वर्गशिक्षिका कु. नल्लया यांची मी लाडकी विद्यार्थिनी होते. माझ्या अकरावीच्या शिक्षिका सौ. देवानै या आमच्या एकमेव विवाहित शिक्षिका, बाकी सर्व शिक्षकांनी लग्न न करता शिक्षकी पेशाला वाहून घेतले होते. 
               माझी आजी मला सुट्टीत घरी घेऊन येत असे. माझे वडील आणि माझी आजी मला दर महिन्याला येऊन भेटत. ते माझ्यासाठी खाऊ आणत आणि आम्ही तिघं तो दिवस आनंदात घालवत असू. शाळेचे प्रत्येक सत्र संपले की मला घरी घेऊन जाण्यासाठी आजी सकाळी लवकरच शाळेत येऊन थांबत असे. ती येईल का नाही, अशी भीती मला वाटू नये, यासाठी ती हा खटाटोप करे. 
                माझ्या भित्र्या स्वभावामुळे मी कधी इतरांमध्ये मिसळले नाही. सर्वजण माझ्याकडे दुर्लक्ष करीत. आजही तेच घडत आहे. स्वामींचे भक्त माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत. 
                मी वर्गातील हुशार विद्यार्थिनी होते. फक्त खेळाचा तास सोडून बाकी सर्व विषय मला आवडत. विशेष करून हिंदी आणि गणित या सक्तीच्या विषयात माझे प्राविण्य होते. माझे वडील तुरुंगात हिंदी शिकले व त्यांनी मला हिंदी शिकवले. खेळाच्या तासाला मी माझा एकुलता एक आवडीचा ' रिंग बॉल ' हा खेळ खेळत असे. शिक्षक मला ५० दोरीच्या उड्या मारण्यास सांगत. मी थोड्याशाच उड्या मारत असे आणि माझी मैत्रीण ५० उड्या मारल्याचे लिहून टाकत असे ! 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम
     
 
 

रविवार, २४ एप्रिल, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " दिव्यत्व आपला खरा स्वभाव आहे, हे सत्य जाणून, कोणत्याही गोष्टीने संभ्रमित न होणे हे ज्ञानाचे सौंदर्य आहे. "

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                  माझ्या आजीने डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी मला शाळेतून काढून घरी नेण्यास सांगितले. घरी आल्यावर माझी तब्येत सुधारली आणि माझ्या आईने पाचवीच्या परीक्षेसाठी घरीच अभ्यास करून घेतला. नंतर मी सहावीच्या वर्गात पुन्हा शाळेत दाखल झाले. 
                 सहावीला शिकणाऱ्या वडक्कमपट्टीच्या मीना नावाच्या एका शिक्षिकेला मी ओळखत होते. मला त्यांच्या वर्गात घातले. माझे चांगले मार्कस् पाहून आमच्या वसतिगृहाच्या वॉर्डनना मी त्यांच्या वर्गात यावे असे वाटले. मला तिथे जाण्याची भीती वाटली आणि मी माझ्या गावातील शिक्षिकेजवळ राहणे पसंत केले. 
                 वॉर्डनच्या वर्गात जाण्याचे नाकारल्यामुळे मी त्यांची नावडती विद्यार्थिनी झाले. त्या शालेय प्रार्थनांच्या संचालिका असल्यामुळे ' तुझा आवाज चांगला नाही. तू गाणे म्हणायचे नाहीस ' असा हुकूम  सोडून त्यांनी मला मागे उभे केले. 
                अजूनही माझ्यात हा न्यूनगंड घर करून राहिलाय, इतरांसमोर भजन गाताना आजही मला भीती वाटते. 
                माझी चुलत बहिण सरोजिनी माझ्याच शाळेत शिकत होती. तिने मला खूप मदत केली. ती माझ्याहून पाच वर्षांनी मोठी होती. ती नेहमी माझे कुरळे केस विंचरून वेणी घालून देई. त्यामुळे मला तिचा खूप आधार वाटत असे. दोन वर्षांनी तिने शाळा सोडली आणि मी पुन्हा एकटी पडले. तोपर्यंत मी लहान मुलांचे वसतिगृह सोडून मोठ्या मुलांच्या वसतिगृहात राहायला आले. इथली मुले वयाने मोठी असल्याने समजूतदार होती त्यामुळे मला त्यांचा तितकासा त्रास होत नसे. 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, २१ एप्रिल, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
 
सुविचार

               " प्रेम निस्वार्थ, निरपेक्ष आणि शुद्ध असावे , त्यामध्ये जराही अमंगलतेचा अंश नसावा . "

प्रकरण दुसरे

अंकुर पुढे सुरु

                सुट्टीत घरी गेले की आईला आणि आजीला हे सांगून मी अधिकच रडत असे. मी माझ्या वडिलांच्या देशहितवादी तत्वांचे अनुसरण केले पाहिजे, असे सांगून त्या माझी समजूत घालत असत.
                  शाळेमध्ये मला खूप अशक्तपणा आला. झोपण्याच्या हॉलचा जिना चढून जाणेही मला कठीण होऊ लागले. इतर मुलांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे मला चिंतारोग जडला आणि तो वाढतच गेला. मी प्रथम पाचवीत प्रवेश घेतला तेव्हा हे सर्व घडले. जिना चढावा लागू नये म्हणून मला शिक्षकांनी खाली झोपण्यास सांगितले. तळमजल्यावर चार खोल्या होत्या, एक वॉर्डनची  , दोन शिक्षकांसाठी व एक कोठीची खोली. मला त्यांनी कोठीच्या खोलीत झोपण्यास सांगितले. मला इतरांपासून तोडल्यामुळे मी एकटी पडले. इतर मुले कोठीच्या खोलीत येऊन आनंदाने खाऊ खात आणि मी मात्र मागे नुसती उभी राहून त्यांच्याकडे पहात असे. रात्री मला खूप भीती वाटत असे. मग मी माझा बिस्तरा त्या खोलीत झोपणाऱ्या स्वयंपाकीणबाईच्या जवळ सरकवून घेत असे. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम
                
           

रविवार, १७ एप्रिल, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " जन्माआधी भाव अवकाशामध्ये निराकार अवस्थेमध्ये भरून राहिलेले असतात व ते योग्य पात्र, वेळ, स्थान आणि मातापिता यांचा शोध घेतात. एकदा का भावनांना योग्य ते पात्र मिळाले की आत्मनिवासी परमेश्वर त्यामध्ये प्रवेश करतो."

प्रकरण दोन 

अंकुर

" मी कृष्णाखेरीज अन्य कोणाशीही विवाह करणार नाही."

                 आमच्या गावात फक्त पाचवीपर्यंत शाळा असल्यामुळे दहाव्या वर्षी शिक्षण संपत असे. पुढील शिक्षणासाठी मुलांना शहरात पाठवले जाई. मी पाचवीत गेले तेव्हा माझे वडील तुरुंगात होते. मला मदुराईच्या शाळेत घालण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांना माझ्या आईला मदत करण्यास सांगितले. मी OCPM हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मला होस्टेलमध्ये रहावे लागले. यापूर्वी मी घरापासून दूर कधीच राहिले नव्हते. या नव्या विश्वात मला फार एकाकी वाटू लागले. 
                 ज्युनियर होस्टेलमध्ये मुले, माझ्या जाड्याभरड्या गोणपाट्यासारख्या खादीच्या कपड्यांकडे पाहून मला चिडवत असत. ते म्हणत, " अच्छा, तू त्या पंचा नेसणाऱ्या गांधींची अनुयायी आहेस नाही का !" त्यामुळे माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला. मुलांनी चिडवले की मी रडत असे. धोब्याकडून कपडे आले की मुले माझे कपडे धरून ओरडत, " हा जुना गोणपाट कोणाचा ? अरे हा तर त्या रडूबाईचा !" 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

                " विवेक बुद्धी हा आपला आतील आवाज आहे. जेव्हा आपण चूक करतो तेव्हा तो आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. हा सत्य आणि सचोटीचा आवाज आहे."

प्रकरण एक 

बीज पुढे सुरु

३० ऑगस्ट १९७९ 
                 कान्हा, तू माझे आश्रयस्थान आहेस. हे प्रभू, मी तुला शरण आलोय. माझ्यावर कृपा करा आणि तुमच्या चरणांशी घेऊन जा. महात्मा गांधींप्रमाणे मृत्युसमयी माझ्याही मनात तुमचाच विचार असो. हे  वैकुंठवासा, श्रीमन नारायणा, श्रीरंगा, श्रीकृष्णा, श्रीनिवासा, हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे, श्रीश्रीपती, श्री महाविष्णू या नराला नारायण बनवा आणि या यःकश्चित जीवाचा उद्धार करा. हे आंडाळमाते, मला तुमची चरणसेवा, उत्कट भक्ती करण्याची संधी द्या आणि आत्मज्ञान, परमभक्ती व स्थितप्रज्ञता प्रदान करून माझ्यावर कृपा करा. तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात. तुमच्या चरणी माझे सादर प्रणाम !
                 महात्मा गांधींनी " हे राम " म्हणत अखेरचा श्वास घेतला, माझ्या वडीलांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी " ॐ नमो नारायणाय " चे नामस्मरण केले. 
                ईश्वराचा ध्यास घेतलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला. माझ्या पूर्वजांनी केलेल्या आर्त पुकारामुळे ह्या कुटुंबात माझा जन्म झाला. ह्याच कारणामुळे माझ्या मनात आंडाळप्रमाणे भगवंताशी विवाह करून त्यांच्याशी एक होण्याची इच्छा निर्माण झाली. माझ्या आजोबांनी ' माझा पुन्हा गर्भात प्रवेश न होवो ' अशी  आंडाळदेवीची प्रार्थना केल्यामुळे मी त्यांच्या वंशात जन्मले. मी स्वामींना सांगितले, " सर्वांचा जन्म विश्वगर्भातून आपल्या पोटी व्हायला हवा." 
               अशी होती परिस्थिती माझ्या जन्माच्या वेळची आणि माझ्या बालपणीची. 

प्रकरण एक समाप्त 

जय साईराम

रविवार, १० एप्रिल, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " एखाद्या जन्मापासून मृत्युपर्यंत उमटलेले भावच मनावर उमटलेले दीर्घ ठसे बनतात. " 

प्रकरण एक 

बीज पुढे सुरु

२४ एप्रिल १९५३ 
                 मला अमरत्वाचा वर देण्याची कृपा करा. तुम्ही ब्रम्ह आहात. तुम्ही म्हणता तुमच्यामध्ये सत्य वा असत्य काही नाही. तुमच्या अनादीकालीन रूपाचे या भक्ताला दर्शन घडवा. हे आदि नारायणा, केवळ तुम्हीच माझे आश्रयस्थान आहा. 
२३ मे १९५३
                 हे तेजोमया, या यःकच्शित जीवाला तुमच्या सुवर्ण चरणांशी घेऊन जाण्याची कृपा करा. मला तुमची प्राप्ती होवो. मला झालेल्या जन्ममृत्यु रोगाचे निवारण करा अशी मी तुमच्याकडे प्रार्थना करतो. अन्यथा या रोगाचे निवारण कोण करणार ? या पापी जीवाचा याच जन्मात उद्धार करा. तुमच्यापर्यंत पोहचणाऱ्या मार्गावर माझी पावले पडू देत. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मला मुक्त करा. मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही असा वर द्या. हे परब्रम्हा, केवळ तू माझे आश्रयस्थान आहेस. 
२ सप्टेंबर १९७९ 
                  हे श्रीरंगनाथा, प्रभुवरा, तुम्ही आमचे कुलदैवत आहात. हे ईक्ष्वाकु कुलोत्पन्ना ! या भक्ताच्या हाकेस प्रतिसाद द्या ना. हे पुरुषोत्तमा, विश्वंभरा मला ' काय ?' म्हणून विचारणार नाही का ? मला आत्मज्ञान द्या. मला तुमच्या दिव्य चरणांशी आसरा द्या. काळ सरत आहे. मृत्यूसमयी माझ्या मनात केवळ तुमचाच विचार असू दे. हे वैकुंठवासा, श्रीरंगा, शरणम्. 
रामाचा ईक्ष्वाकु वंश, हाच आमचाही वंश आहे; असे स्वामींनी सांगितले. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम
 

गुरुवार, ७ एप्रिल, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यांसाठी वेदांचा उपयोग एवढाच असतो जेवढा एखाद्या पाण्यानी तुडुंब भरलेल्या ठिकाणी असलेल्या छोट्याशा सरोवराचा ! "

प्रकरण एक 

बीज पुढे सुरु 

                    माझ्या आजोबांमध्ये तमिळ संत रामान्नुज यांचे गुरु श्री आळवार यांचा अंश आहे . अशा वंशामध्ये माझा जन्म झाला . 
                    आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब होतं. माझी पणजी , आजी , वडील , आई , काका सगळे एकत्र रहात होते . आमच्याकडे सतत पै पाहुण्यांची वर्दळ अ. नोकरचाकर असूनही सर्वजण घरकामास हातभार लावत. माझे आई वडील हे आमच्या घरातील एकमेव दाम्पत्य ! ते सुद्धा फार थोड्या काळासाठी एकत्र राहिले. प्रत्येकजण आपआपल्या विश्वात रममाण असे . मात्र प्रत्येकाचे विश्व परमेश्वराशी निगडित होते . माझ्या लग्नानंतर मी आणि माझे पती आमच्या मुलांसह या घरात राहिलो . 
                 आमच्या कुटुंबातील प्रत्येक जीव किती आर्ततेने देवासाठी तळमळत असे, रडत असे हे त्यांनी लिहिलेल्या डाय-यांमधून आणि काव्यांमधून व्यक्त झाले आहे. त्यांच्या जीवनातून त्यांची खरी वृत्ती दिसून येते, माझ्या वडिलांच्या डायरीतील काही उतारे मी खाली देत आहे. 
८ फेब्रुवारी १९५३
                 कान्हा, तू वायू, अग्नी आणि वरुण आहेस. सर्व देवताही तूच आहेस. तू परब्रम्ह आहेस. मी तुला प्रणाम करतो. सर्व देवतांमध्ये तुला पाहण्याची व तुझ्यामध्ये सर्व देवतांना पाहण्याची दृष्टी मला प्रदान कर. कान्हा, या यःकच्शित जीवाचा उद्धार कर. हे नीलवर्ण प्रभूवरा, केवळ तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणम्. शरणम्.

उर्वरित मजकुर पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, ३ एप्रिल, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " आत्मा म्हणजे काय ? ते शुद्ध चैतन्य आहे. जो अविनाशी, अजन्मा, अमर आहे. "

प्रकरण एक 

बीज पुढे सुरु 

                    गावातील बहुतेक सर्वजण वैष्णव होते. प्रत्येक कुटुंबाचा एक गुरु असे, एक ब्राम्हण पुरोहित. हे गुरु श्रीरंगम किंवा श्री विलिपुत्तूर येथे राहणारे असत. उत्तरेकडील बनारसमध्ये ज्याप्रमाणे भक्त त्यांचे अखेरचे दिवस ईश्वरचिंतनात व्यतीत करतात, त्याप्रमाणे ही स्थाने म्हणजे दक्षिणेकडचे बनारसच होय. माझ्या पूर्वजांनी ह्या पुरोहितांना राहण्यासाठी श्रीरंग विलास मंदिर बांधले. हे पुरोहित आमच्या गावी येत आणि मंगलविधी पार पाडत. यातील सर्वात महत्वाचा ' मुद्रा कार्यक्रम ' होय. भक्तांच्या खांद्यावर शंख आणि चक्र यांची मुद्रा ठसवणे. या मुद्रा म्हणजे भक्ताच्या संपूर्ण शरणागतीचे प्रतिक ! 
                   दरवर्षी आमच्या गावात कृष्णाष्टमीचा सोहळा अत्यंत उत्साहाने साजरा केला जात असे व रामनवमीला अखंड रामनामाचा जप केला जात असे. माझे वडील आमच्या समाजाचा आधारस्तंभ होते. दरवर्षी ते गांधी जयंती उत्सवही साजरा करत. त्या दिवशी गावातील स्त्रिया आमच्या घराच्या व्हरांड्यात येत आणि चरखा यज्ञामध्ये सहभागी होत. दुपारी हरिजनांना अन्नदान केले जात असे. 
                 आमचं गाव छोटसं होतं. गावातील वडीलधारी माणसे आमच्या घरापुढील व्हरांड्यात जमत. माझे काका रामायणाचे वाचन करत आणि त्यावर विवेचन करत. त्यांना या महाकाव्याविषयी अत्यंत प्रेम होते. त्यांनी ' सचित्र रामायण ' तयार केले होते. माझ्या वडिलांचे पूर्वज आळवार हे प्रसिद्ध कवी होते. २०० वर्षांपूर्वी त्यांनी अनेक भक्तीरचना लिहून प्रकाशित केल्या. त्यातील एक भक्तीरचना … 

हे आंडाळदेवी, हा जन्म नको मज 
कृपा करोनी मुक्ती दे मज 
गर्भातच सुरु होती जीवाचे क्लेश 
शृंखलाबद्ध , जणु बंदीवान 
दशा जीवाची वाघुळासमान
नको नको हे काही नको मज ! 
पुनःपुन्हा गर्भातील जीवन नको मज ! 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम