बुधवार, २३ जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

मोती तेरावा 

विश्वगर्भ 

               सृष्टी अस्तित्वात कशी येते ? परमात्म्याचे अस्तित्व असते. जेव्हा तो निर्मितीचा संकल्प करतो तेव्हा तो स्वतःला पुरुष आणि प्रकृति असे दोन भागात विभागते. पुरुष आणि प्रकृति म्हणजे परमेश्वराचे नर आणि नारी तत्व होय. दोन्ही सत्य आहे, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत  पुरुष पिता आणि प्रकृति माता आहे. भगवद् गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात,
" माझी महद् ब्रम्हरूप मूळ प्रकृति संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदायरूप गर्भाची स्थपणा करतो त्या जड-चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते." 
              पुरुष आणि प्रकृति पासून सर्व जीवांची उत्पत्ती होते. प्रकृति, मूळ प्रकृति वा महामाया ह्या नावांनेही ओळखली जाते. ज्यांना प्रकृतिची कृपा प्राप्त होते, त्यांच्यासाठी ती ज्ञान प्रकट करून त्यांना मायेच्या बेड्यातून मुक्त करेल. ज्यांना प्रकृति तत्वाचा बोध झाला आहे ते जीवनभर आनंदामध्ये राहू शकतील, ज्यांना त्याचा बोध झाला नसेल त्यांच्या वाट्याला दुःख येईल.  
              सर्वात प्रथम आपण परमेश्वराला धरून ठेवले पाहिजे. त्याच्या प्रती असलेल्या प्रेमाची व्याप्ती वाढवली पाहिजे आणि समस्त विश्व परमेश्वराचेच रूप आहे हे जाणून घेतले पाहिजे. विश्व परमेश्वराहून वेगळे नाही.  जे ते दोन्ही एक मानून त्याची भक्ती करतात त्यांना इथेच याक्षणी मुक्ती मिळेल. निर्मिती पुर्णम आहे, परमेश्वर आहे. ती परमेश्वरापासून वेगळी नाही परंतु आपण काय करतो ? हे माझे आहे असे म्हणून आपण भिंती उभ्या करतो आणि ह्या सुंदर विश्वाचे विभाजन करतो. ही माझी पत्नी, मुले, माझा देश, माझी जमीन, माझी मालमत्ता असे विभाजन करतो. अशा तऱ्हेने माझे ,माझे, माझे म्हणत छोटे छोटे भाग पाडून भिंती उभ्या करतो. आनंद गमावून आपण आसक्ती, लालसा, क्रोध आणि वासना ह्यांच्या जाळ्यात अडकतो.  
               येथे आपल्या मालकीचे काहीही नाही, सर्व परमेश्वराचे आहे, ह्या भावनेने आपण आपली कर्तव्ये बजावली पाहिजेत तर आपल्याला शांती, आनंद आणि ज्ञान लाभेल. हे विश्व सर्वसत्ताधीश परमेश्वराच्या मालकीचे आहे. आपल्या कर्म करण्याच्या पद्धतीनुसार आपल्याला वेतन मिळेल जर आपण त्या परमेश्वराशी जवळीक साधली, त्याला प्रसन्न करून घेऊन त्याचे प्रेम संपादित केले तर तो आपल्याला मुक्तीचे सर्वोत्तम पारितोषिक देईल. ह्या उलट जर आपण मालमत्तेवर आपली मालकी आणि हक्क प्रस्थापित करू लागलो. स्वयंकेंद्रित वृत्तीने स्वैर वागू लागलो तर पुन्हा त्या भवसागरात फेकून दिले जाऊ हे नक्की ! ह्या विश्वामध्ये कसे जीवन जगावे हे जाणण्यासाठी प्रकृति तत्व समजून घेणे आवश्यक आहे. 
               युगानुयुगे विश्वाने केवळ परमेश्वराच्या नरतत्वाची, पुरुषाची भक्ती केली आहे. त्याचे निर्मितीचे अंग म्हणजे प्रकृति उपेक्षित राहिली. कोणीही परमेश्वराची दुसरी बाजू म्हणजेच विश्व विचारात घेतले नाही तथापि साई अवतार लोकांना प्रकृतिविषयी ज्ञात करून देत आहे. 
                जेव्हा ज्ञान आचरणात आणले जाते तेव्हा लोकांना खरे ज्ञान प्राप्त होते व त्याचे फायदे मिळतात. आजच्या आधुनिक जगात वैज्ञानिक तत्व जाणून घेण्यासाठी प्रयोगशाळेत प्रयोग केले जातात. प्रात्यक्षिकाद्वारे इच्छित ज्ञानाचा लाभ होतो. पुरुष आणि प्रकृती तत्वाचे निदर्शन करण्यासाठी स्वामींनी आणि मी जन्म घेतला आहे. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या Beyond The Upanishads ह्या पुस्तकातून 

जय साईराम 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा