शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

श्री वसंत साईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने  
रत्न - १ 

           परमेश्वराच्या अनुसंधानात राहणे सोपे आहे का? जेव्हा आपण परमेश्वरामध्ये राहतो तेव्हा तो सुद्धा आपल्यामध्ये वास करतो. मनुष्याने दिवसाचे २४ तास निरंतर त्याच्या चिंतनात घालवले पाहिजेत, त्याच्याविषयी बोलले पाहिजे,त्याचे गुणगान केले पाहिजे.आपली पंचेंद्रिये त्याच्याठायी लीन झाली पाहिजेत -डोळ्यांनी केवळ परमेश्वरालाच  पाहिले पाहिजे, कानांनी केवळ त्याचाच आवाज ऐकला पाहिजे, जिभेने केवळ त्याच्याविषयी बोलले पाहिजे. जर पाचही इंद्रिये ईश्वराभिमुख केली तर ती भौतिक विषयांमध्ये बुडून जाणार नाहीत 
          आपण सर्वत्र परमेश्वराला कसे पाहू शकतो?
आपल्या चर्मचक्षूंनी आपण त्याला पाहू शकत नाही त्यासाठी आपल्या अंत:करणात त्याच्याप्रती उत्कट भक्ती असायला हवी आणि दिव्य दृष्टी व प्रेमचक्षु प्रदान करणारे ज्ञान असायला हवे. जेव्हा आपण प्रेमदृष्टीने सर्वत्र पाहु  तेव्हा आपल्याला सर्वत्र परमेश्वर दिसेल. हा 'ईशावास्यमिदं सर्वं' चा अर्थ आहे.
जेव्हा आपण सर्वत्र आणि सर्वांमधील परमेश्वरास जाणू शकू तेव्हा आपणही तोच आहोत, सर्वत्र आहोत आणि सर्वव्यापी आहोत हे  ज्ञान उदयास येईल.
आपण स्वतःला सर्वांपासून वेगळे कसे करू शकतो? असे करणे पाप आहे.जर परमेश्वराचे अस्तित्व नाही असे कोणतेही स्थान नाही तर मग आपण कोठे आहोत?आपले अस्तित्व नाही! नाही!नाही! मग कोणाचे अस्तित्व आहे, केवळ त्या एकमेव आद्वितीय परमेश्वराचे.
          जेव्हा 'मी' अस्तित्वात नाही तेव्हा 'माझे' चा प्रश्न येतोच कुठे? कोण माझा पती, माझी पत्नी, माझी मुले, माझे घर, माझा पैसा? जर मी नाहीच आहे तर मी 'माझे' म्हणूच कसे शकेन? एकदा आपल्याला हे परम ज्ञान प्राप्त झाले की आपले अस्तित्व परमेश्वरातच आहे हे आपल्याला ज्ञात होईल. जीवनमुक्त अवस्थेत असणारे अशा तऱ्हेने जीवन जगतात. कोणत्याही गोष्टीने अस्वस्थ होता कामा नया. आपण सदैव शांत राहीले पाहिजे.

श्री वसंतसाई अम्मा

साईराम, आज पासून प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला आपण Blog वर एक नवीन सदर ' रत्न ' ह्या नावाने सादर करत आहोत. आज पहिले रत्न -१ प्रकाशित केले आहे. 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा