रविवार, २३ एप्रिल, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - १६ जानेवारी 
" केवळ भगवतभक्ती म्हणजेच प्रेम. बाकी सर्व आसक्ती आहे."

         प्रेम म्हणजे काय? केवळ भगवंतावरील प्रेम म्हणजे भक्ती. आपलं पती - पत्नी, आई - वडील, बहीण - भाऊ या सर्वांप्रती असलेलं प्रेम काही खरं नसतं, ती आसक्ती असते. भगवंतावरील निर्व्याज प्रेम ही शुद्ध भक्ती आहे. कौटुंबिक जिव्हाळा म्हणजे निव्वळ आसक्तीच. भक्ती म्हणजे अतिशय शुद्ध आणि पवित्र प्रेम.  प्रेम भक्ती ही फक्त आणि फक्त भगवंताशी जोडलेली असते. अनेक जण म्हणतात, 'माझा भगवंताप्रती असलेला भक्तीभाव प्रेमभक्तीचा आहे.'  अनेक जण भगवंतावर प्रेम करतात. परंतु ते शुद्ध प्रेम नसतं. ते भौतिक पातळीवरचं प्रेम करतात. असे अनेक भक्त आहेत आणि त्यांच्या बद्दल मी 'चमत्कार माया' ह्या पुस्तकात लिहिलंय. एक व्यक्ती म्हणाली,'स्वामींना माझ्या बोटाला स्पर्श करायची इच्छा असते.' हे तिच्या कामभावनेचं प्रतिबिंब आहे. अशा पद्धतीनं त्या व्यक्ती स्वामींशी स्वतःस जोडायचा प्रयत्न करतात. ही शुद्ध भक्ती नाहीये. भक्तीचे नऊ मार्ग आहेत. त्यातील कुठलाही एक मार्ग निवडून तुम्ही त्या मार्गावरून वाटचाल करू शकता. कृपा करून भगवंताप्रती भौतिक प्रेम आणि काम वासना ठेवू नका. प्रेमभक्ती म्हणजेच   मधुरभक्ती अत्यंत शुद्ध आणि पवित्र भक्ती असते. जयदेव, गौरांग, मीरा अशा महान भक्तांनी ही भक्ती केली. त्यांनी दाखवून दिलं की, ही भक्ती देह भावाच्या पलीकडील आहे.त्यांची भक्ती भावदेहातील होती. त्यांच्या दृष्टीनं अंतर्यामी भगवंत पुरुष आणि ते स्वतः स्त्री होते. ह्या भावाद्वारे त्यांनी भगवंतावर प्रेमाचा वर्षाव केला. ही प्रेमभक्ती आहे. 
       माझं प्रेम केवळ भगवान सत्य साईंकरिताच आहे. माझ्या भक्तीनं बदल्यात कसलीही अपेक्षा केली नाही. मी भगवंतावर ६३ वर्षं प्रेम वर्षाव केला. अखेरीस त्यांनी सांगितलं, 'तू राधा आहेस,दुर्गा आहेस' आणि बरंच काही.
        आजतागायत मी स्वामींना आई मानले  आणि लहान मूल जसं आईकडे त्याचे भाव व्यक्त करेल तसेच मी केले. स्वामी माझ्याशी बोलायला लागल्यानंतरच मी मधुर भक्तीचा मार्ग स्वीकारला. स्वामींनीच मला सांगितलं की मी मातृभाव भक्ती न करता मधुर भक्ती करावी.स्वामींनी मला अनेक अवस्था प्रदान केल्या,पण मी सर्वच्या सर्व दूर सारल्या. माझ्या तपाची  फळं मी जसजशी दूर सारत गेले तसतशी माझ्या तपाची शक्ती वाढत गेली. असं झाल्यामुळं मी वैश्विक मुक्ती मागू शकले. माझ्या एकाग्र भक्तीमुळे स्वामी प्रसन्न झाले, माझी इच्छा  पूर्ण करण्यास तयार झाले. आणि त्यांनी सर्वांची कर्मं आपल्या देहावर घेतली. हे सर्व माझं स्वार्थरहित निरपेक्ष प्रेम दर्शवतं. मला माझ्यासाठी काहीही नकोय,त्यामुळे भगवान माझ्या भक्तीचा ऋणी होतो,आणि माझ्या भक्तीचं ऋण फेडण्यासाठी अजून एक जन्म घेतो. ह्या ऋणामुळेच त्यांचं नाव प्रेमसाई होतं आणि माझं प्रेमा. हे सत्य,निर्मल,पवित्र प्रेम आहे. 
        लौकिक प्रेम म्हणजे निव्वळ आसक्ती असते, कारण तिथे बदल्यात काही ना काही अपेक्षा असते. मुलांनी त्यांच्या वंशाचं नाव उज्ज्वल करावं असं त्यांच्या पालकांना वाटत असतं. त्यांना नाव, प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा हवी असते. हे आशाआकांक्षानी भरलेल्या लौकिक जगाचं स्वरूप आहे. नवऱ्यानं आपल्यासाठी दागिने करावेत आणि इतर मौज मजा करावी असं बायकोला वाटत असतं . ह्या सर्व नातेसंबंधांमध्ये अपेक्षा आहे.खरं तर दुसऱ्याकडून काय मिळेल यांवरच ही नाती अवलंबून असतात.

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा