सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
आंतरिक लढा
 
भगवद्गीतेतील सोळाव्या अध्यायामध्ये देव आणि असुरांमधील लढ्याविषयी सांगितले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक मनुष्यामध्ये सद्गुण आणि दुर्गुण या दोन्ही मध्ये संघर्ष पेटलेला असतो. हा लढा सूक्ष्म पातळीवर सुरू असतो. महाभारताचे युद्ध हे प्रत्यक्ष, स्थूल पातळीवर घडले. आंतरिक लढ्यामध्ये नेहमी होणारा दुर्गुणांचा विजय मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये ढकलतो. आपल्या गतजन्मातील अनेक नकारात्मक गुणांमुळे आपण जन्म घेतला आहे. ही वस्तुस्थिती आहे की आपण शुद्धता प्राप्त केलेली नाही हे आपण घेतलेल्या जन्मामुळे सिद्ध होते.
 मनुष्यामध्ये उद्भवणारा प्रत्येक भाव त्याचे जीवन निर्धारित करतो. या जीवनातील भावांद्वारे त्याचा पुढील जन्म निर्मित केला जातो. मनुष्याचा मनामध्ये सतत सद्गुण आणि दुर्गुणांमध्ये संघर्ष सुरू असतो. मनुष्याने आपल्या मनामध्ये वाईट विचारांना बिलकुल थारा देऊ नये. त्याने सदैव विनयशील असायला हवे.
या संघर्षाचा शेवट कधी होणार हे कोण जाणतो? मनुष्य जन्म घेतो आणि मृत्यू पावतो. या जन्ममृत्यूचा चक्रातून मुक्त होणे सोपे नाही.
लक्षावधी जन्म घेतल्यानंतर एखादा स्वतःला या जन्म मृत्यूचा चक्रातून मुक्त करू शकतो.
अनेक वर्षांपूर्वी माझ्या मनात एक विलक्षण विचार आला, " मी सर्वांना मुक्त का करू नये? " प्रत्येकाला मोक्षप्राप्ती व्हावी अशी माझी इच्छा होती. अशा प्रकारे वैश्विक मुक्तीसाठी माझे तप सुरू झाले. माझे तप, हे ध्येय निश्चित प्राप्त करेल. मी सर्वांमधील संस्कार नष्ट करून त्यांना माझ्यासारखे बनवेन.
प्रत्येकामध्ये दुर्गुणांचा वास असतो. ते नष्ट करणे म्हणजे महाभारताचे युद्ध नव्हे तर ते एक महावैश्विक युद्ध आहे. माझा तपोबलाद्वारे मी एक नूतन विश्वाची निर्मिती करेल जेथे सर्वांमध्ये, माझे गुण म्हणजेच परमेश्वराप्रति विशुद्ध प्रेम असेल.
श्री वसंतसाई अम्मा

संदर्भ - वरील उतारा श्री वसंत साई अम्मांच्या 'शिवसूत्र' या पुस्तकातील तिसऱ्या प्रकरणामधून घेतला आहे.

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा