रविवार, १८ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " जेव्हा प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पित केले जाते तेव्हा त्याचा योग होतो ."
कर्मयोग उपाय 

          माझ्या ' योगसूत्र ' या पुस्तकात मी आपल्या रोजच्या साध्या कृती आणि गोष्टी योगामध्ये परिवर्तन करण्याचे सोपे मार्ग सांगितले आहेत.सर्वांमध्ये फक्त परमेश्वरच वास करीत आहे हे सत्य एकदा जाणलंत की तुम्ही सगळ्या गोष्टी परमेश्वरशी जोडण्यांतील आनंद अनुभवाल. दरवाजा, एक सामान्य दरवाजाच मानलात तर त्यातून काहीच आनंद मिळणार नाही, पण तीच वस्तू परमेश्वराशी जोडण्यासाठी असून असा विचार कराल की ' हा मोक्षाचा दरवाजा आहे', तर मग तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही प्रत्येक व्यक्ती, वस्तू किंवा घटना परमेश्वराशी जोडू शकता. मी लहानपणी आमच्या खोलीतील प्रत्येक वस्तू परमेश्वराशी जोडत असे. दिवाणखान्यातील खांब हा प्रल्हादाला वाचवण्यासाठी प्रकट होणाऱ्या नृसिंहावताराचा खांब होत असे. खोलीच्या मध्यभागी असणारा झोपाळा हा राधाकृष्णासाठी असे. अशाप्रकारे मी सर्वकाही परमेश्वरासाठी जोडण्याची स्वतःला सवय लावून घेतली. 
         तुम्ही अगदी रोजची घरगुती कामं दिव्यत्वाशी जोडलीत, तर तुम्हाला अवजड कामाचेसुद्धा ओझे वाटणार नाही. ' स्वयंपाक करणे' ह्या कर्माचा योग्य कसा होतो याविषयी मी ' साई गीता प्रवचनम् ' या पुस्तकात लिहिले आहे. स्टोव्ह पेटवताना मी विचार करत असे की ' हा स्टोव्ह यज्ञकुंड आहे आन स्वयंपाक नैवेद्य आहे' हे अन्न ग्रहण करणाऱ्या सर्वांमध्ये सात्विक गुण येवोत अशी मी प्रार्थना करीत असे. अशाप्रकारे, सर्व कर्मांचा योग होऊ शकतो.   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

गुरुवार, १५ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" खरा आनंद आत्मसाक्षात्कारामध्ये प्रतिबिंबित होते. "
कर्मयोग उपाय
 
          आरशात पाहताना जर आपल्याला चेहऱ्यावर काळा डाग दिसला तर स्वतःशीच आरशाचे आभार मानून ,' धन्यवाद ! मी जर अशीच बाहेर गेले असते तर माझा चेहरा पाहून सर्वजण मला हसले असते. ' असे पुटपुटत तोंड धुतो. आपण ' शीs आरसा ! माझा चेहरा इतका सुंदर असताना तू हा काय डाग दाखवतो आहेस ?' असे ओरडून आरसा फोडत नाही. 
           त्याचप्रमाणे, जे आपले दुर्गुण दाखवतात, त्यांच्यावर आपण रागवता कामा नये, उलट त्यांचे आभार मानावेत. ' तुमचे मन शुद्ध करा, स्वतःमध्ये बदल घडवून आणा.' कुठल्याही घटना, माणसे किंवा गोष्टीत गुंतून भावनांच्या आहारी जाऊ नका. इच्छा हेच भावनांच्या उत्पत्तीचं मूळ कारण आहे. आपलं मन कुठल्याही इच्छांमध्ये गुंतू न देण्याविषयी आपण जागरूक राहायला हवे.  

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ११ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" निर्मल हृदय स्वछ आरशासारखे प्रतिबिंबित होते. "
कर्मयोग - उपाय 

          सर्व नाती फसवी आहेत. फक्त परमेश्वर श्वाश्वत आहे. तोच आपला खराखुरा नातलग आहे. त्यालाच आपला समजून कर्म करीत राहणं हाच कर्मयोग आहे. 'मी कर्ता आहे ' या भावनेने केलेल्या कर्माचे पाश होतात, परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने केलेल्या कर्माचा योग होतो. अशाप्रकारे, भावना हेच बंधन किंवा मुक्तीचे कारण असते. 
           कर्म हा मनाचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. एकांतात मन शांत असल्यासारखे वाटते. जेव्हा आपण इतरांबरोबर काम करतो, उदा. कुटुंबात, शाळेत, नोकरीच्या ठिकाणी अथवा आश्रमात, तेव्हा लपलेले भाव उफाळून वर येतात. समोरचा माणूस आपल्या मताशी सहमत झाला नाही तर क्रोध आणि नाराजी उद्भवते. अशावेळी एकांतात अनुभवलेली शांती कुठे जाते ?

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 


शुक्रवार, ९ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

श्री वसंतसाईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने

रत्न - ५


ओम श्री साई वसंत साईसाय नमः

       या मंत्राचा जन्म २३ मे १९९८ रोजी झाला. स्वामींनी स्वतः हा मंत्र लिहिला. हा शिवशक्ती मंत्र आहे, जो शक्तीचे परमेश्वराशी ऐक्य घडवून आणतो. मनुष्य सामना करत असलेल्या मन, देह, आणि आत्मा अशा तिहेरी व्याधीच्या निवारणासाठी हा मंत्र रामबाण उपाय आहे. 'प्रेम निवारण साई' या पुस्तकामध्ये या मंत्राने अनेक व्याधींचे कसे निवारण झाले  याविषयी मी लिहिले आहे. त्यामध्ये मी थोडीफार उदाहरणे दिली आहेत. आता हजारो लोकं या मंत्राने व्याधी मुक्त झाले आहेत. वाईट गुण आणि वाईट चारित्र्य  हे मनोविकार आहेत. हा मंत्र सर्व दुर्गुणांचा नाश करून मनाला योग्य दिशेला वळवतो. अखेरीस तो आत्म्याला जन्म मृत्यूचा चक्रातून मुक्त करून, मोक्ष प्रदान करतो. हा मंत्र वैश्विक कर्मांचा संहार करून वैश्विक मुक्तीही प्रदान करतो.

शिव आणि शक्तीचा योग म्हणजेच नवनिर्मिती. हा मंत्र निर्मितीचा पाया आहे.

माझ्या पालकांचा विवाह २३ मे १९३७ रोजी झाला. याच दिवशी या मंत्राचे बीजारोपण झाले.

२३ ऑक्टोबर 1938 या दिवशी  या मंत्राचा अर्ध भाग म्हणजे शक्ती चा जन्म माझ्या म्हणजे वसंतेच्या रुपाने झाला.

२३ नोव्हेंबर १९२६ रोजी स्वामी म्हणजे सत्य साईबाबा यांच्या रुपाने शिवाचा जन्म झाला.

मंत्राच्या रुपाने शिव आणि शक्तीचे मिलन होण्यास ६० वर्षाचा कालावधी लागला कारण ह्यासाठी  शक्तीला ६० वर्षे तप करावे लागले.

शक्तीचा तपाने प्रसन्न होऊन शिव तिच्यावर कृपा वर्षाव करण्यासाठी आला. त्याने त्याच्या नावा समवेत तिचे नाव जोडून मंत्र निर्मित केला.


🌸ॐ श्री साई वसंत साईसाय नम:🌸

जय साईराम 

गुरुवार, ८ जून, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " मनामध्ये कधीही न शमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते. "

कर्मयोग - उपाय 


          आपण स्वतःला सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठीच जन्मास आलो आहोत. सगळी कर्म योगात परिवर्तित करून आपण मुक्ती प्राप्त करू शकतो. कोण कोणाचा नातेवाईक ? कौटुंबिक जीवन हे आगगाडीच्या प्रवसाप्रमाणे आहे. प्रवासी एकमेकांशी हसत, खेळत , बोलत एकत्र प्रवास करतात ; प्रत्येकाचे स्टेशन आले की उतरून जातात . ट्रेनच्या प्रवाशांप्रमाणेच कुटुंबात सर्वजण एकत्र येतात ; ते कर्मांनुसार एकमेकांना जोडलेले असतात. एकमेकांचे ऋण फेडले की वेगवेगळ्या मार्गांनी जातात. त्या कुटुंबात असेपर्यंत प्रत्येकाने बंधनात न अडकता आपली कर्तव्ये परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनी पार पाडावी. म्हणजे मन त्यात घुटमळत राहणार नाही. कुटुंबातील व्यक्तीला जर त्रास होत असेल तर आपण विचार करावा, ' मी माझी शांती का बरे बिघडवावी ? प्रत्येकजण आपल्या कर्मानुसार सुख किंवा, दुःख भोगत असतो. मी शांत राहून त्याच्यासाठी प्रार्थना करेन. '  


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ४ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 
सुविचार 
       " जादूटोणा, चमत्कार वा मंत्र याद्वारे, प्रेम एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये स्थलांतरीत करता येत नाही. "
कर्मयोग - उपाय 

          सर्वसाधारण कृती योगात परिवर्तित करणे म्हणजे कर्मयोग. कृती योगात परिवर्तित करणे म्हणजे काय ?  याचा अर्थ असा की परिणामांचे ओझे न वाहता केलेले कर्म. कर्म करताना त्याविषयी मनात जे विचार येतात त्याचे ओझे होते. सुख- दुःख, चिंता, आवड-नावड या सर्व भावनांनी भरलेल्या विचारांचा मनावर ताण येतो. या भावना म्हणजेच बंधने. त्याचे संस्कार बनतात. ते 'मी' म्हणजेच अहंकाराची भावना निर्माण करतात. जर 'मी ' हा नसेल तर आपण चिंता आणि भीतीपासून मुक्त होऊ, आपली कर्म सहजतेने होत राहतील. अशी कर्म शुद्ध आणि निर्दोष असतात. हाच योग आहे. स्थिर मन म्हणजेच योग. 'मी कर्ता आहे' ही भावनाच आपली शांती बिघडवते. 
           आपण सकाळपासून रात्रीपर्यंत कामात व्यस्त असतो. धावपळीच्या जीवनात आपण अगदी थोडी विश्रांती घेतो. या सर्व धकाधकीतून आपण काय मिळवतो ? बायको, मुले, अधिकारपद आणि थोडीशी मालमत्ता. यासाठी आपण किती धडपड करतो, कित्येक वेळा दैवाला दोष देतो आणि मनःशांती हरवून बसतो. जीवनात जराही शांती नाही. यातून सुटका मिळवण्यासाठी माणूस सिनेमाला जातो, मित्रांना भेटतो, कादंबऱ्या, मासिकं वाचतो. हे सर्व तात्पुरते उपाय आहेत. काही काळ कदाचित तो त्याची दुःख विसरेल, पण घरी परतल्यावर ती पुन्हा त्याच्या मानगुटीवर बसतील. माणसानी कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे. सखोल चिंतन केल्यावर तुम्हाला याचं उत्तर सापडेल. जेव्हा तुम्ही सर्व कर्म परमेश्वराची पूजा म्हणून कराल तेव्हाच तुम्हाला खरी मनःशांती मिळेल. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत."
कर्मयोग - उपाय 

           कर्मकायदा म्हणजे काय आहे ? सर्वांनी आपल्या पूर्व आणि वर्तमान कर्मांची प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी यांचा अनुभव घ्यायलाच हवा. हा परमेश्वरचा कायदा आहे, तो पृथ्वीवरील जीवनाला लागू होतो. 
           भगवद्गीतेत, माणसाला त्याची कर्म समतोल करण्यासाठी आणि कर्माचा परिणामांपासून त्याला मुक्त करण्याचे अनेक मार्ग दाखवले आहेत. हे प्रकरण म्हणजे, 'ज्ञान गीता - गुप्त भांडार' या अप्रकाशित गीतेवरील पुस्तकाचा सांराश आहे. मला असे वाटते की कर्मयोग हा कर्मकायद्याचा अनुभवसिद्ध उपाय आहे, म्हणून मी हा सारांश इथे समाविष्ट केला आहे. 
          कर्म म्हणजे काय ? आपण करीत असलेली प्रत्येक कृती म्हणजे कर्म. उदा. बोलणे, लिहिणे, बसणे, आराम करणे ही सर्व कर्मच आहेत. क्षणभरही कोणी कर्माशिवाय राहू शकत नाही. प्रत्येकजण काही ना काही कामात गुंतलेला असतो. झोपेत होत असलेली श्वासाची क्रिया हेही कर्मच होय. योग्य म्हणजे परमेश्वराशी जोडणे. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम