रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

       " मनुष्यामध्ये असणारी अतृप्त इच्छांची शक्ती त्याच्या बंधाचे मूळकारण आहे . " 

पुष्प २९ पुढे सुरु 

             सत्संगात राहणेही आवश्यक आहे . परमेश्वराविषयी इतरांशी बोलणे हे भक्तांसाठी लाभदायी आहे . सकाळपासून रात्रीपर्यंत मन आणि इंद्रिये वेगवेगळ्या दिशांना धावत असतात . जप, ध्यान आणि सत्संगाद्वारे आपण आपले मन एकाग्र केले पाहिजे . मन दाही दिशांना धावत असते . ते एकाग्र करणे म्हणजेच शिवम् . एक म्हण आहे , " मनाला शिवम् बनवणे हेच तप होय ."
       प्रेम देण्यासाठी आणि घेण्यासाठी वेळ काढा .
             प्रेम ही परमेश्वराची महान देणगी आहे . केवळ कुटुंब , नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्यावर प्रेम करणे असा त्याचा अर्थ नाही तर सर्वांवर प्रेम करा . तथापि सर्वजण केवळ आप्तस्वकीयांवर प्रेम करून प्रेमाला मर्यादा घालतात . म्हणून संतमहात्मे , अवतार पुन्हा पुन्हा सांगतात " सर्वांवर प्रेम करा " आपल्या आप्तस्वकीयांवर केलेले प्रेम म्हणजे निव्वळ आसक्ती होय . ते प्रेम नव्हे . खरे प्रेम म्हणजे निःस्वार्थता . सर्वांवर निःस्वार्थ , निरपेक्ष प्रेम करा . निःस्वार्थ प्रेमाद्वारे आत्मसाक्षात्कार होतो . 
स्वार्थ + प्रेम = आसक्ती 
 निःस्वार्थ प्रेम म्हणजे आत्म साक्षात्कार . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम  

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" भौतिक जग मिथ्या आहे."

पुष्प २९ पुढे सुरु
 
               मनुष्याला जन्मापासून मृत्युपर्यंत अनेक कार्ये करावी लागतात . जर एखाद्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय केले हे लिहून काढायचे म्हटले तर त्या यादीला अंत नाही . आपण झोपेतून उठतो , दात घासतो , स्नान करतो , कपडे घालून तयार होतो, परमेश्वराची प्रार्थना करतो , भोजन करतो , शाळा वा ऑफिसमध्ये जातो . आपण दररोज विविध कृती करत असतो . असंख्य कार्ये करत असताना आपल्या मनात हजारो विचार येतात , बोलणे , वाद विवाद , दुसऱ्यातील दोष काढणे , कठोरपणा , क्रोध द्वेष - शेकडो वेगवेगळे भाव मनात येतात . एक दिवस वेळ काढून सकाळपासून रात्रीपर्यंत करत असलेल्या सर्व गोष्टी न् मनातील सर्व विचार व भाव लिहून काढा अस म्हंटल तर अबब ! तुमचं डोकं भणभणायला लागेल . हे झालं एका दिवसाच ! मग संपूर्ण जीवनाची कल्पना करा !
               आपल्या मनामध्ये अनेक भाव दडून बसलेले असतात जे आपल्याला फसवतात . म्हणून त्यांच्यापासून सुटका मिळविण्यासाठी अर्धा तास शांत बसा . परमेश्वराचे चिंतन करण्याचा हा एकमेव मार्ग आहे . जप, ध्यान, भजन, श्लोकपठण इ. गोष्टींमध्ये वेळ व्यतीत करा . अशा तऱ्हेने वेळ घालवल्यास तुम्हाला शांती मिळेल . जर ह्या गोष्टींमध्ये मन रमत नसेल तर अध्यात्मिक पुस्तके वाचा पण परमेश्वराबरोबर वेळ व्यतीत करण्याचा मार्ग शोधा. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

 जय साई राम

रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " मन बाह्य जगतातून काढून घेऊन , जाणीव अंतर्यामी केंद्रित करणे तोच आत्मा होय . "
अम्मा 

भगवान श्री सत्यसाई बाबाच्या ८९ व्या जन्मदिनानिमित्य

( २३/११/२००५ रोजी , ८० व्या जन्मदिनानिमित्य दिलेल्या भगवंताच्या दिव्य प्रवचनामधून.)

       ॐ श्री साई राम 

आत्मस्वरुपांनो  , 
               हा नाश पावणारा देह म्हणजे तुम्ही नाही . तुम्ही अंतरात्मा आहात, ज्याला ना जन्म आहे ना मृत्यू. तो बंध मुक्त आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होईल तेव्हा तुम्हाला अमरत्व प्राप्त होईल . तुम्ही सर्व चिंता, काळज्या आणि इच्छा वासनांमधून मुक्त व्हाल . तुम्ही कदाचित म्हणाल , " चिंता आणि इच्छांपासून मुक्त कोणीतरी या जगामध्ये आहे का ?" या बाबतीत मी स्वतः एक जितेजागते उदाहरण आहे . मला कोणत्याही इच्छा नाहीत . सर्व काही माझ्याच हातामध्ये आहे . तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देऊ शकतो . तथापि माझ्याकडे भौतिक गोष्टींची मागणी करू नका . त्या धावत्या मेघांसारख्या क्षणिक असतात  जे शाश्वत आहे ते मागा. सत्य आणि प्रेम या जुळ्या तत्वांनी अखिल जगताचे पोषण होते . ते प्रत्येकामध्ये विद्यमान आहे . मी सत्य आणि प्रेम आहे .जे सर्वांमध्ये विद्यमान आहे . सत्य आणि प्रेम सर्वव्यापी आहे . तथापि तुम्ही सत्य आणि प्रेम यांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करत नाही. जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे विस्मरण झाले तरी चालेल परंतु सत्य आणि प्रेमाचे विस्मरण होऊ देऊ नका . सत्य बहिर्वाहिनी आहे तर प्रेम अंतर्वाहिनी. या दोन्हीचे रक्षण आणि पोषण करणे हा मनुष्याचा धर्म आहे. 
बाबा
 


पुष्प २९ पुढे सुरु 

             माझ्या जीवनात मी कृष्णाशी खेळले . मी एकटीचखेळत असे . शाळेत असताना मी कधी कोणताही खेळ खेळले नाही . मी माझ्याशी खेळलेला एकमेव खेळ म्हणजे ' तोड आणि जोड ' ( तोडजोड ) दिवसभरात घरातलीकामे करून मी रात्री आकाश , ढग, तारे यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी खेळत असे . मी गीते आणि काव्यांद्वारे त्यांच्याशी खेळले . आश्रमात आल्यावर सुरुवातीला आम्ही अनेक खेळ खेळत असू . एका खेळामध्ये सर्वांनी वेगवेगळे ३ शब्द घेऊन त्याचे परमेश्वराशी संबंधित वाक्य बनवायचे , तर दुसऱ्या खेळात सर्वांनी गोलाकार बसायचे आणि दोन दोनच्या जोड्यांनी दोन व्यक्तीमत्वांच्या भूमिका घेऊन संवाद करायचा . उदा. एकदा त्या खेळात आम्ही सीता आणि हनुमान यांच्यामधील संभाषण केले. स्वामीही काहीतरी करण्यास सांगून आमच्या खेळात सहभागी होत . नुकतेच त्यांनी काही खाद्यपदार्थांची नावे देऊन ती सूत्रांशी जोडून त्यावर लेखन करण्यास सांगितले . अशा तऱ्हेने खेळतानासुद्धा आम्ही स्वामींना विसरत नाही आणि नवनवीन खेळ खेळत राहतो . 
                मी माझ्या बालपणापासून खेळत असलेल्या खेळामुळे माझ्या देहाने पुन्हा तारुण्य प्राप्त केले . इतर योगप्रशिक्षणाचा काहीही उपयोग नाही . प्रत्येकाने परमेश्वराशी खेळले पाहिजे . मी कधीही कोणतेही बाह्य खेळ न खेळल्याने त्याचा माझ्यावर प्रभाव नाही . आता माझा वयस्क देह तरुण होईल . म्हणून म्हणते परमेश्वरासाठी , परमेश्वराविषयी , परमेश्वराशी खेळा. 
शांत होण्यासाठी वेळ द्या . शांत होणे म्हणजे परमेश्वराचा शोध घेण्याची संधी .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

        " जेव्हा मनाला बाह्य जगताची जाणीव असते तेव्हा ते मायेमध्ये अडकते . " 
 
पुष्प २९ पुढे सुरु 

             मनुष्याच्या मूलाधार चक्रात निद्रिस्त असणाऱ्या शक्तीला जागृत करून आज्ञाचक्रात तिचा शिवाशी योग घडवून आणणे हे अवतार कार्य आहे . ही अमर्याद कुंडलिनी शक्ती आज भौतिक गोष्टींसाठी वाया घालवली जातेय . जर आपण साधनेद्वारे या शक्तीवर मन केंद्रित केले तर एकेक चक्र उघडून आज्ञा चक्रात जीवाचे शिवाशी मिलन होईल . या शक्तीद्वारे जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते . सातवे चक्र उघडल्यानंतर परमेश्वरप्राप्ती होते व जीव देह त्याग करतो. परंतु आता मात्र जीव देह न सोडता , येथेच राहून मोक्षावस्थेच्या आनंदाची अनुभूती घेईल . हे दर्शवण्यासाठी स्वामी येथे आले .
           काही दिवसांपूर्वी स्वामींनी एक कार्ड दिले त्यावर काही वाक्ये लिहिली होती . मी त्यातील २ मुद्यांवर लिहिले व आता ते लिखाण पुढे सुरु राहील . त्या कार्डवरील शब्द संत पॉल यांचे होते .  
खेळण्यासाठी वेळ काढा, ते चिरतारुण्याचे रहस्य आहे. 
             इथे ते म्हणतात , खेळणे आरोग्यासाठी हितकारक असल्यामुळे खेळण्यासाठी वेळ दिला पाहिजे . जर सतत काम करत राहिले तर मन आणि देह दोन्ही थकून जाते . थोडा वेळ खेळल्याने देह आणि मन ताजेतवाने होते . सर्वजण असे करतात . शाळेमध्ये खेळण्यासाठी एक तास वेगळा ठेवला जातो . कार्यालयांमधूनही खेळण्यासाठी थोडासा वेळ किंवा मोकळा वेळ ठेवला जातो . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

      " अज्ञानाच्या अंधकाराला जिंकल्यानंतर साधकाला विजयश्री प्राप्त होते . "

वसंतामृतमाला
पुष्प २९ 
पूर्णम् येत आहे 


              स्वामींनी भगव्या रंगातील एक कार्ड दिले . त्यामध्ये दोन्ही बाजूला त्यांचे चित्र होते व त्या चित्रांच्या बाजूला काही मजकूर होता . एका बाजूला लिहिले होते ,
            ' प्रत्येक मनुष्यातील निद्रिस्त दिव्यत्व जागृत करण्यासाठी ते दिव्य चैतन्य पूर्ण शक्तीनिशी सत्य साई बनून आले व मानवजातीमध्ये वावरले . तुम्ही कोणीही असा , मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही . तुम्ही माझेच आहात .' 
आणि दुसऱ्या बाजूस म्हटले होते , 
            ' हे विश्व माझे निकेतन आहे आणि ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही ते सुद्धा माझेच आहेत .' 
            आता आपण पाहू या . स्वामी त्यांच्या पूर्ण शक्तीनिशी भूतलावर अवतरले . त्यांनी मला येथे आणले . अन् सर्वांच्यातील निद्रिस्त दिव्यत्व जागृत करण्यासाठी स्वामींनी सतत ८५ वर्षे शिकवण दिली. आमच्या वियोगामुळे मी अविरत विलाप करते आहे . माझ्या या विलापामुळे विश्वाची परिभ्रमन कक्षा बदलते . माझे सहस्त्रार उघडत त्यातून नवनिर्मितीचा आराखडा बाहेर पडतो . या नवनिर्मितीत सर्वांमधील दिव्यत्व जागृत असेल व सर्व जीवनमुक्त अवस्थेत असतील . याचे प्रात्यक्षिक , हे स्वामींचे अवतार कार्य आहे . या कार्याकरिता आदिमूलम्  त्यांच्या पूर्ण स्वरुपात येथे अवतरले आहे . हे विश्व त्यांचे निकेतन आहे . येथील सर्वकाही त्यांचेच आहे . इथे चांगले वाईट असा भेद नाही . स्वामी येथे जे सांगतात त्याचे प्रात्यक्षिक करतील . एक हजार वर्षांसाठी तेच सर्वकाही असतील व सर्वकाही त्यांचेच असेल .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ....

जय साई राम
 

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " अधिकाधिक साधना करून ज्ञानाची वृद्धी होते आणि समग्र ज्ञान प्राप्त होते . "

पुष्प २८ पुढे सुरु 

             ६ जुलै रोजी स्वामींनी एक त्रिशूल दिले. त्याच्या तिन्ही टोकांवर फळासारखे दिसणारे तीन बॉल होते . त्याचे मधले टोक बाजूच्या तिन्ही टोकांपेक्षा मोठे होते . स्वामींनी मधल्या टोकावर S लिहिले होते , व बाजूच्या दोन्ही टोकांवर चमकदार सोनेरी रंगात V हे अक्षर लिहिले होते . S अक्षर साईन करिता , एक V वसंतासाठी तर दुसरा वसंतमयम् निर्मितीकरिता असे यातून सूचित होते . माझ्या तपाचे फळ स्वामींनी टोकावरील फळांद्वारे दर्शवले . परमेश्वर, त्याची शक्ती व आद्य निर्मिती , तिन्ही एक आहे . 
              स्वामींनी बुकमार्कसारखे एक आयताकृती कार्डही दिले. ते गडद निळ्या रंगाचे होते . त्याच्या एका बाजूवर ५ सोनेरी चांदण्या व दुसऱ्याबाजूस १८ सोनेरी चांदण्या होत्या . मी माझ्या जीवनात भगवत्  गीतेतील १८ योगांचे आचरण केले. याचा निर्देश १८ चांदण्या करतात . आता हे योग स्तुपामध्ये समाविष्ट आहेत . पाच चांदण्या स्तुपाद्वारे उदयास येऊन घातलेली पंचमहाभूते सूचित करतात . ही नूतन तत्वे ( महाभूते ) नवनिर्मितीसाठी आहेत . १८ + ५ = २३ ; स्वामींची व माझी आमच्या दोघांची जन्मतारीख नवनिर्मितीच्या अपत्यासाठी आवश्यक असणाऱ्या ४६ गुणसुत्रांचे प्रतिनिधित्व तसेच कार्यवाही ही करते . ही भावगुणसूत्रे विश्वब्रम्ह गर्भ कोटम् मधून बाहेर पडतात . सुवर्णयुग प्रदान करणाऱ्या सुवर्णतारका स्पंदनांद्वारे हे सर्व घडत आहे . 
              स्तूपाच्या उद्घाटन दिनी स्वामींनी मला चांदण्या असलेली आकाशी रंगाची साडी परिधान करण्यास सांगितले . हे चांदण्यांचे कार्ड माझ्या डायरीतील त्या दिवशीच्या पानामध्ये होते . म्हणून आम्ही चांदण्यांची निळी साडी विकत घेतली . ती साडी विकत घेण्यासाठी स्वामींनी पैसे पाठवले होते .


जय साई राम  
          

रविवार, ९ नोव्हेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

      " सत्य मनाला निर्मल बनवते . सत्य बोलणे ही अंतर्गत निर्मलता आहे . मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द सत्य असायला हवा ."

पुष्प २८ पुढे सुरु 

५ जुलै २०१३ : दुपारचे ध्यान
वसंता : स्वामी , हे कोनाच्या आकारातील काय आहे ?
स्वामी : सत्ययुगामध्ये धर्म चार पायांवर उभा असेल . त्यावेळी धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष पूर्णम् अवस्थेत असतील . 
ध्यान समाप्त .
            आता आपण याविषयी पाहू . भगव्या रंगाचा कोन  सत्यसाईमयम्  सृष्टीचे प्रतिनिधित्व करतो . यामध्ये धर्म चार पायांवर उभा आहे . मानवी जीवनातील धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ पूर्णम् अवस्थेत आहेत . कोनाची खालच्या बाजूस असणारी रुपेरी पट्टी , प्रेम सर्वाचा पाया आहे ; हे सुचविते . वरील दोन रुपेरी पट्ट्या परमेश्वर व त्याच्या शक्तीचे द्योतक आहेत . कोन उदंड फळ आणि आज्ञा चक्र यांचे प्रतिक आहे , हे आम्हाला इंटरनेटवर पाहिल्यानंतर समजले . 
            आता मी स्वामींसमवेत  आज्ञाचक्रामध्ये परमानंद अवस्थेत आहे . आमचे भाव स्तूपाद्वारे बाह्यगामी होत नवनिर्मिती करतात . या निर्मितीमध्ये आम्ही दोघं असू . माझ्या ७३ वर्षांच्या कठोर तपाचे उदंड फळ म्हणजे कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन अन् वैश्विक मुक्ती होय . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ...... 
  
जय साई राम

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई  साय नमः 


सुविचार 


        " पुन्हा पुन्हा जन्म न घेण्यासाठी आपण जन्म घेतो . आणि पुन्हा मृत्यु  न यावा असा मृत्यू आपल्याला यायला हवा."

पुष्प २८ पुढे सुरु

             आदिपुरुष भगवान प्रथम निर्मितीचा संकल्प करतो . आदिशक्ती त्याच्यापासून जन्म घेते . आदिशक्तीमधून पंचमहाभूते निर्माण होतात , व त्यानंतर अखिल सृष्टीची निर्मिती होते . सृष्टीतील सर्व , आदिशक्ती म्हणजे माझ्यामधून बाहेर पडत स्तुपाद्वारे विश्वव्याप्त होते . प्रदूषित कलिच्या भीतीने पंचमहाभूतांनी माझा आश्रय घेतला . यालाच लय म्हणतात  .
             प्रलयकाळी सर्वाचा लय होतो . सर्वत्र मिट्ट अंधार असतो . निर्मितीचे अस्तित्व नसते . ही  स्थिती हजारो वर्षे राहते . नंतर कृत युगाचा आरंभ होतो . मत्स्य अवताराच्या शेपटीला बांधलेल्या कलियुगातील उत्तम बीजांपासून निर्मिती अस्तित्वात येते . या बीजांपासून नवीन कृत युग जन्म घेते . महाप्रलयानंतर नेहमी हाच घटनाक्रम असतो . परंतु आताची नवनिर्मिती अशी नसून ती थेट परमेश्वरापासून जन्मली आहे . ही नवनिर्मिती स्वामींच्या व माझ्या भावसंगमातून जन्मली आहे . म्हणून सर्वांनी सिद्ध व्हा . स्वामी आल्यानंतर सर्व कार्यरत होईल . ५ जुलै २०१३ - स्वामींनी भगव्या रंगाचा एक कोन दिला . त्याला तीन रुपेरी पट्ट्या  लावल्या होत्या . २ पट्ट्या वरच्या बाजूस व एक तळाशी लावली होती . कोनाला गोल छोटे पाय होते . 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात …. 

जय साई राम        

रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

           " जेव्हा आपले परमेश्वराप्रती असणारे प्रेम सर्व मर्यादा ओलांडते तेव्हा देहाच्या मर्यादाही ओलांडल्या जातात ." 
                           
                                 पुष्प २८ पुढे सुरु

              पंचमहाभूतांना कलियुगात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो . इथे प्रदूषणाने सर्वत्र  विळखा घातल्यामुळे देवांनी माझ्या देहात आश्रय घेतला असे त्यांनी सांगितले . आता ते माझ्या देहातून बाहेर येतील . कलियुगातील लोकांच्या कर्मांमुळे माझ्या देहाला क्लेश सोसावे लागत आहे . या युगातील प्रदुषणामुळे पंचमहाभूतेही माझ्या आस-याला आली . आता ती बाहेर पडतील . मी आदिशक्ती असल्याचे स्वामी याद्वारे सिद्ध करतात . 

            प्रथम भगवंत , आदिपुरुष निर्मितीचा संकल्प करतो . आदिशक्ती त्याच्यापासून जन्म घेते . आदिशक्ती मधून पंचमहाभूते निर्माण होतात व त्यानंतर सृष्टीची निर्मिती होते . सृष्टीतील सर्व माझ्यामधून ( आदिशक्ती ) बाहेर पडत स्तूपाद्वारे विश्वव्याप्त होते . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साई राम