रविवार, ३१ मे, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

               " पृथ्वीची लुटमार करणाऱ्या मानवाप्रती पृथ्वी जशी सहनशीलता दाखवते तशी सहनशीलता आपण चुकीचे वर्तन करणाऱ्यांप्रती दाखवायला हवी.


वसंतामृतमाला 

पुष्प ३८ 

आमची विवाह मनोकामना


                 माझ्या आयुष्यात आजवर किती डॉक्टर्स येउन गेले ? अगदी बाल वयापासूनच मला औषधोपचार घ्यावे लागले. मी अंदाजे ५ वर्षाची असताना नेहमी ' पोट दुखते ' म्हणून रडत असे. त्यांनी मला बऱ्याच डॉक्टरांना दाखविले. अखेरीस माझे पोट भुकेने दुखत असल्याचे एका डॉक्टरांच्या लक्षात आले. परंतु मला भूक लागल्याचे समजत नव्हते, त्यामुळे मी रडू लागल्यास मला दूधभात किंवा दहीभात द्यावा असे त्यांनी सांगीतले. मला भुकेची जाणीव नाही हे त्यांनी ओळखले. मदुराईतील वसतिगृहात शिकत असताना मी अनेक रोगांनी पीडीत होते. तिसऱ्या प्रसवानंतर असह्य प्रसववेदनांमुळे माझ्या हृदयाचा आकार वाढला होता. पाच महिने मी अंथरुणावर खिळून होते. अशी केस लाखांत एखादीच असते, असे डॉक्टर म्हणाले. 
              या गोष्टी अवतारकार्यासाठी घडल्या. माझे जीवन अवतारकार्यासाठीच आहे हे दर्शविण्यासाठी माझ्या बालपणापासूनच हे सर्व घडले. मला भुकेची जाणीव नव्हती. असह्य प्रसववेदनांमुळे माझ्या हृदयाचा आकार वाढला. ही घटना १९६१ मध्ये घडली. त्यानंतर ५० वर्षांनी माझे हृदय विश्व ब्रम्ह गर्भ कोटमच्या रूपात बाह्य जगामध्ये स्थित झाले. ह्या हृदयातूनच नवनिर्मिती उदय पावेल. १९६१ मधेच स्वामी माझ्यापासून दूर गेले. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 
जय साईराम  
ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

       " जर मनाने भगवद् नामाच्या अमृताची चव चाखली तर ते इतर कोणत्याही चवीचा विचार करणार नाही. " 

पुष्प ३७ पुढे सुरु 

                 दुसऱ्या दिवशी श्री विलीपुदूरच्या डॉक्टर आल्या. त्यांनी माझ्या गुडघेदुखीविषयी विचारपूस केली. यावेळी त्यांनी इन्फ्रारेड लॅम्प आणला होता. तो कसा वापरावा हे त्यांनी दाखविले. गुडघ्याला मालीश करून त्यावर मलम लावावे व नंतर बँडेज करावे असे सांगीतले. लॅम्प १० मिनीटे वापरावा, नंतर बर्फाच्या पिशवीने शेकावे अशा सूचना देऊन ते परत गेले. वडक्कमपट्टीला मी होते तेव्हापासून डॉ. षण्मुगलक्ष्मी माझ्याकडे येत असत. आता त्या मुक्ती निलयमला दर रविवारी येतात. एकदा त्यांचा एक रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत असताना त्यांनी आश्रमात फोन केला. एडींनी लगेचच स्तूपापाशी जाऊन प्रार्थना केली. रुग्ण बरा झाला. अशा रुग्णांसाठी त्या नेहमीच फोन करतात. साधारणपणे अशावेळी फक्त रुग्णांवर मानसिक ताण असतो पण इथे या डॉक्टर सुद्धा ताण सहन करतात. त्यांची माझ्यावर अपार श्रद्धा आहे. मी नेहमी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. दर आठवड्याला इथे येउन त्या स्वामींचे दिव्य संदेश वाचतात. जेव्हा स्वामी एखादा श्लोक देतात तेव्हा तो लिहून घेऊन त्या त्याचे उच्चारण करतात. त्यांचे समस्त कुटुंब अत्यंत भक्तिशील आहे. त्यांचे पती डॉ. लक्ष्मण सध्या पुढील शिक्षणासाठी चेन्नैमध्ये आहेत. ते श्रीविलीपुदुरला आले की  आवर्जून येथे येऊन जातात. 

जय साईराम

व्हि. एस. 

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

         " सत्य ईश्वर आहे. सत्यवचनाने परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. "

पुष्प ३७ पुढे सुरु

                एस.व्ही. आले; त्यांची तब्येत बरी नसल्याने ते काही दिवस येथे येऊ शकले नाहीत असे त्यांनी सांगीतले. मी त्यांना माझ्या गुडघे दुखीविषयी सांगीतले. श्रिविलिपुदूरच्या डॉक्टरांनी दिलेले मलम मी गुडघ्याला लावावे  का ? याविषयी यामिनीने एस.व्हीं ना   विचारले. एस.व्हीं नी  फोन करून डॉक्टरांना विचारण्यास सुचविले. डॉक्टरांनी दोन गोळ्यांची नावे सांगून गरम पाण्याच्या पिशवीने शेकण्यास सांगीतले. एस.व्हीं नी  ताबडतोब एका माणसाला गोळ्या आणण्यास पाठविले.  
                संध्याकाळी ६ वाजता यामिनी व एडी ना मी देव शर्माची गोष्ट सांगीतली. एखादे फुल पडून मला याचा पुरावा द्या असे मी स्वामींना सांगीतले होते. परंतु संध्याकाळी एवढ्या जोराचा वारा आला की संपूर्ण व्हरांडाच फुलांनी भरून गेला. त्यानंतर मुक्ति निलयमला भेट देऊ इच्छिणाऱ्या नेपाळी भक्ताचा ई-मेल आल्याचे एडीं नी सांगीतले. त्यांचे नाव शर्मा होते. ह्या नेमक्या पुराव्याने आम्हाला आनंद झाला.
               ६:३० वाजता अमरनी स्वामींचा एक व्हिडीओ दाखविला. त्यामध्ये स्वामी कोडाईकॅनलला जाण्यासाठी विमानात बसले होते, नंतर स्वामींनी विमान चालकाच्या हातावर सोन्याचे ब्रेसलेट बांधले ! ते पाहिल्याक्षणी सत्या पोदार उद्गारले, ' त्याचे नावही शर्मा आहे !' आम्ही चकीत झालो. मला ' मी ' नसल्यामुळे माझ्या पहिल्या पुस्तकाच्या लेखनापासून मी स्वामींकडे पुरावे मागते.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम


             

गुरुवार, २१ मे, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

          " तुम्ही तुमची कर्म अत्यंत कुशलतेने व निरासक्ततेने पार पाडा.  मनाला कर्माच्या परिणामामध्ये गुंतु न देता पूर्णपणे परमेश्वराच्या चिंतनात व्यस्त ठेवा. "

पुष्प ३७ पुढे सुरु 

२१ मे २०१३ सायं ध्यान 
वसंता - स्वामी, प्लीज, माझ्या ह्या वेदना थांबवा. आता मला हे सहन होत नाही ! 
स्वामी - रडू नकोस. सर्व ठीक होईल. 
वसंता - ठीक आहे स्वामी, मला ह्या गुडघे दुखीची गोष्ट सांगा. 
स्वामी - देव शर्मा नावाच्या एकाने सर्वसंग परित्याग केला व वनामध्ये जाऊन घोर तपश्चर्या केली. शिवशक्ती त्याच्यावर प्रसन्न झाले, त्यांनी त्याला दर्शन देऊन त्याच्यावर कृपावर्षाव केला. यानंतरही त्याने त्याची तपश्चर्या चालूच ठेवली. एक दिवस त्याचा पाय अतिशय दुखू लागला. ते दुःख असह्य होऊन तो परमेश्वराचा धावा करू लागला. भगवान शिव त्याच्यासमोर प्रकट झाले व म्हणाले की, त्याने गतजन्मी केलेल्या चुकीमुळे त्याला हे भोगावे लागत आहे. पार्वतीने त्याच्यावर कृपा करून त्याच्या वेदना स्वतःवर घेतल्या. त्याच वेदना आता तुला होत आहेत. तु तुझ्या कारुण्य भावाने सगळ्याचा स्वीकार करतेस. आता सर्व काही ठीक होईल. 
वसंता - स्वामी, हे दुखणं बरं व्हायला हवे . मला यासाठी काही पुरावा द्या. 
स्वामी  - हो, मी देईन. घाबरू नकोस. सर्व ठीक होईल.
ध्यान समाप्ती 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम

रविवार, १७ मे, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

" सत्य मनाला निर्मल बनवते सत्य वचन ही अंतर्शुद्धी आहे. "

पुष्प ३७ पुढे सुरु

                 अखेरीस केवळ धर्मराजास सदेह स्वर्गामध्ये प्रवेश करण्याची अनुमती मिळाली. तथापि तिथे जाण्याअगोदर त्याला नरकात जावे लागले. पांडव कधीही धर्मापासून ढळले नाहीत, परंतु थोड्याशा  अहंकाराने त्यांना पूर्णम् अवस्था प्राप्त होण्यापासून रोखले. हे मानवा ! यावर चिंतन कर ! जागा हो ! पूर्णम् अवस्थेची प्राप्ती झाल्याशिवाय जन्ममृत्यूचे चक्र कधीही थांबणार नाही. तुम्ही हजारो जन्म जरी घेतलेत तरी या चक्राला अंत नाही. ह्या अवताराच्या काळात हे जाणून घ्या, समजून घ्या. नरजन्माचा एकमेव उद्देश परमेश्वरप्राप्ती आहे; वंशवृद्धी नव्हे. 
                  माझ्या डाव्या गुडघ्यामध्ये तीव्र वेदना होत होत्या; वेदनांची तीव्रता वाढत होती तरीही मी माझे दैनंदिन कामकाज तसेच चालू ठेवले. 
२१ मे २०१३ मध्यान्ह ध्यान 
वसंता - स्वामी, माझा गुढघा खूप दुखतोय. मी माझी काया तुम्हाला अर्पण करायला हवी. परंतु ही काया डॉक्टरांच्या औषधांनी भरली आहे. तुम्ही मनात आणलेत तर ही क्षणभरात बरी होईल. 
स्वामी -  ही व्याधी डॉक्टर बरे करू शकतील कां ? हे जगाच्या पापकर्मांमुळे होत आहे. योग्य वेळ येताच हे बरे होईल. 
वसंता - स्वामी, आता ही गुढघेदुखी कशासाठी ? यामागे काही कारण आहे कां ? 
स्वामी - संध्याकाळी मी तुला एक गोष्ट सांगीन. 
ध्यान समाप्त 
                 आता आपण याविषयी जाणून घेऊ. मला माझी काया स्वामींना समर्पित करायची आहे. परंतु या देहाला रोज नवीन रोगबाधा होते. या अगोदरही मला थोडी गुडघेदुखी होती. विमलने मालिश केल्यानंतर दुखायचे थांबले होते पण यावेळी नाही. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम    

गुरुवार, १४ मे, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

               " जेथे जेथे आपली दृष्टी जाते तेथे आपले मन जाते आणि इच्छांचा उदय होतो. "

पुष्प ३७ पुढे सुरु

                  ही माझी प्रतिज्ञा होती. हीच नवनिर्मिती, सत्ययुग घेऊन येत आहे. इथे आम्ही केवळ दोघं असू. सत्ययुगात असण्याला थारा नसेल. प्रत्येकजण सत्य, प्रेम आणि ज्ञान यांनी व्याप्त होईल. या करुणासागर परमेश्वराच्या समकालीनानी दुष्कृत्ये करण्याचे थांबविले पाहिजे. मी तुमच्यासाठी स्वामींशी किती विवाद करते हे महत्वाचे नाही. तुम्ही केलेल्या कुकर्मांचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. सत्युगात सर्वांना क्षमा केली जाईल, मुक्तिही मिळेल. परंतु आता तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडविलेच पाहिजे अन्यथा तुम्ही पुढे येणाऱ्या कलियुगात जन्म घेऊन दुःख भोगाल. स्वामी येथे आले, त्यांनी सर्वांना जीवनमुक्त अवस्थेची गोडी चाखण्यास दिली. तुम्हाला तुमच्या जन्माचा उद्देश समजला तर तुम्ही ह्या स्वादाचा आनंद घेऊ शकाल. " हे कचऱ्यासारखे जीवन माझ्यासाठी पुरेसे आहे. " असा जर तुमचा विचार असेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकाल. एवढेच काय पण परमेश्वराकडूनही चूक झाली अथवा धर्मविरोधी कृती झाली तर त्यालाही त्या कर्मांचे परिणाम भोगावेच लागतात. मग मानवाची काय कथा ? म्हणून म्हणते जागे व्हा !
                  भीष्म , द्रोणाचार्य आणि कृपाचार्य हे महान गुरु होते. कृष्ण म्हणाला की या तिघांनीही एकेक चूक केली होती. आपण अजून अशी काही उदाहरणे पाहू. युधिष्ठीर हा धर्मराज होता. तो धर्ममार्गावरून कधीही ढळला नाही. परंतु महाभारत युद्धाच्या वेळी तो मोठ्याने ओरडला, " अश्वत्थामा हतह कुंजरवा (अश्वत्थाम्याचा मृत्यू झाला ). " त्यानंतर अगदी मृदू आवाजात तो उद्गारला " हत्ती अश्वत्थामा ." या पापकर्मांसाठी धर्मराजाला त्याच्या अंतिम यात्रेत नरकाचा अनुभव घ्यावा लागला. अंतिम  यात्रेवर निघालेल्या पांडवांचे एकामागोमाग एक पतन झाले. द्रौपदीला इतर चार भावांहून अर्जुन अधिक प्रिय होता त्यामुळे प्रथम द्रौपदी पडली. हे तिचे पापकर्म होते. दुसरा सहदेव पडला, कारण त्याला त्याच्या शास्त्रपुराणांविषयी असणाऱ्या विद्वत्तेचा किंचित अहंकार होता. स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार नकुलच्या  पतनास कारणीभूत झाला. सर्वश्रेष्ठ धनुर्धर असण्याचा अहंकार अर्जुनाच्या पतनास कारण ठरला होता. भीमाचे पतन त्याला असणाऱ्या अफाट शक्तीच्या अहंकारामुळे झाले. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम  

रविवार, १० मे, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 
              " जर आपण मनाची परमेश्वराशी गाठ बांधली तर ते नियंत्रणात येईल आणि फलस्वरूप विश्वातील कोणतीही गोष्ट आपल्याला स्पर्श करणार नाही. " 

पुष्प ३७ पुढे सुरु 

                  ज्यांनी मला पुट्टपर्थीमधून बाहेर काढले त्यांच्यावर माझा राग नाही. त्यांच्यासाठी मी स्वामींशी युक्तिवाद केला. कैकयीने रामाला वनात पाठविले नसते तर त्याने सर्व राक्षसांचा विनाश केला असता ? कैकयी त्या अवतारीक नाट्यात एक अभिनेत्री होती. अधर्माचा नाश करण्यासाठी परमेश्वर आला. त्याच्या  अवतारनाट्यात कैकयी एक साधनमात्र होती. ह्याप्रमाणे स्वामींच्या संघटनेने मला बाहेर काढले नसते तर सत्ययुग कसे येईल ? तुम्ही जसे कौटुंबिक जीवनाच्या जाळ्यात फसून परमेश्वराला विसरता तशी मीही स्वामींच्या सगुण रूपाच्या मोहिनीत फसून वैश्विक मुक्ती मागण्याचे विसरून गेले असते ! स्वामी ! स्वामी ! हाकारत त्यांच्यामध्ये विलीन झाले असते. मला स्वामींचे दर्शन घेण्यापासून वंचित केले गेले, त्यामुळे मी प्रतिज्ञा केली, ……
                    "…… मी एका सत्यसाईना प्राप्त करू शकत नाही, म्हणून मी या जगातील सर्व पुरुषांना सत्यसाई बनवेन आणि सर्व स्त्रियांना वसंता. नंतर मी हर्षभराने सगळ्यांचा आनंद लुटेन. "

उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम

गुरुवार, ७ मे, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

           " केवळ परमेश्वराला स्पर्श केल्याने आपल्याला चिरंतन शांतीचा लाभ होतो." 

वसंतामृतमाला
पुष्प ३७ 
मी परमेश्वर नाही 

                 मागील अध्यायात, परमेश्वराच्या सान्निध्यात चुका करणाऱ्यांच्या चुकांचे परिणाम अतिशय तीव्र असतात असे स्वामींनी सांगितले. या अध्यायाचे संत् संगात वाचन झाल्यानंतर अमरने मला एक प्रश्न विचारला. 
                …. " अम्मा , तुमच्या सान्निध्यात राहणारे आम्हीही चुका करतो, त्याचे काय ? "
                मी उत्तरले, " पहिली गोष्ट म्हणजे मी परमेश्वर नाही. " अनेकजण माझ्याशी कठोर शब्दात बोलले, त्यांनी माझ्याशी वादविवाद केला ; मला टाकून बोलले. परंतु माझ्या मनात त्यांच्याविषयी काही किल्मिष नाही. मी माता आहे. मुलांनी केलेल्या चुकांचा बाऊ न करता आई त्यांच्या चुका पोटात घालून त्यांना क्षमा करते तर वडील कठोरपणे शिक्षा करतात. अखिल जगताची पापकर्म घेण्यासाठी मी येथे आले आहे. मी परमेश्वर नाही. परमेश्वर केवळ साक्षीभावात स्थित असतो. तो करुणा दाखवत नाही. माझे हृद्य करुणेने ओतप्रोत आहे. यामुळेच मी येथे येऊन क्लेश सोसते आहे. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….

जय साईराम  

रविवार, ३ मे, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

             " प्रारंभी जग एक माया आहे अशा दृष्टीने पाहा त्यानंतर अंतर्मुख होऊन परमेश्वराला अंतर्यामी पाहा व त्यानंतर संपूर्ण विश्वामध्ये परमेश्वराला पाहा. " 

पुष्प ३६ पुढे सुरु 

                 आता आपण पाहू या. स्वामींनी ' इथेच याक्षणी मुक्ती ' या माझ्या पहिल्या पुस्तकाच्या हस्तलिखितावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर त्यांनी स्वहस्ते माझे पहिले पुस्तक प्रकाशित केले. १९९७ मध्ये जेव्हा स्वामी प्रथमच सुवर्णरथातून आले तेव्हा आम्ही त्या पुस्तकाच्या २ प्रती रिबिनीने बांधल्या आणि पादुका ट्रस्टच्या प्रमुखाकडे दिल्या. स्वामींनी व्हरांड्यामध्ये त्या प्रती त्यांच्याकडून स्वीकारल्या. स्वामींनी त्यांचे अनावरण करून ते पुस्तक पुस्तकांच्या दुकानात ठेवण्यास सांगितले. तथापि बुक ट्रस्टमधील लोकांनी सांगितले की प्रथम ते पुस्तक वाचतील आणि नंतर उत्तर कळवतील. नंतर त्यांचे उत्तर आले की ते पुस्तक दुकानात ठेवल्याने स्वामींची प्रतिमा डागाळेल. कोण कोणाच्या प्रतिमेचे रक्षण करते ? मनुष्य भगवंतांच्या प्रतिमेचे संरक्षण करू शकतो का ? भगवंत आपले रक्षण करतो का आपण भगवंताचे रक्षण करतो ? 
                 कौरवांनी कृष्णाचा वध करण्यासाठी एक कुटील कारस्थान रचले. कृष्ण पांडवांचे दूत बनून कौरवांच्या दरबारात गेले. कृष्णाच्या आसनाखाली त्यांनी एक खड्डा खणला. जेव्हा कृष्ण आसन ग्रहण करतील तेव्हा ते  त्या खड्ड्यात पडतील असा दुर्योधन आणि शकुनींनी डाव रचला. मनुष्याची कुटीलता भगवंताला ज्ञात नाही का ? कृष्ण आल्यानंतर सर्वांनी त्याचे स्वागत केले. त्यांनी आसन ग्रहण करताक्षणीच ते त्या खड्ड्यात पडले. विश्वरूप धारण करून ते बाहेर आले. कोण त्यांना मारू शकणार ? कोण त्यांची प्रतिमा डागाळू शकणार ? कोण त्यांच्यावर चिखलफेक करू शकणार ? ते परमेश्वर आहेत ! परमेश्वर ! 
                 स्वामी सर्व देवदेवता स्वरूप आहेत. कोण त्यांचे नाव कलंकित करू शकेल ? जर मी लिहिलेला पुस्तकातील मजकूर चुकीचा असता तर स्वामींनी त्यावर स्वाक्षरी केली असती का ? त्यांच्या सत्याने तत्काळ मला भस्मसात केले असते. जे परमेश्वराच्या निकट आहेत आणि जे परमेश्वराशी संबंधित बाबी हाताळतांना चुका करतात. त्या चुकांचे परिणाम अत्यंत गंभीर असतात. म्हणून जे कोणी त्यांच्या निकट आहेत त्यांनी अत्यंत दक्ष रहायला हवे. जगामध्ये सर्वजण चुका करतात ज्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तथापि जे परमेश्वराच्या निकट आहेत त्यांना कित्येक पटीनी त्यांच्या कर्मांचे परिणाम भोगावे लागतील. साधारणतः साधनेच्या सुरुवातीच्या काळात साधकाकडून चुका झाल्यास त्याच्या परिणामांची बाधकता एवढी तीव्र नसते. परंतु जे योगाच्या उच्च अवस्थांमध्ये चुका करतात ते योगभ्रष्ट होतात. त्यांच्यासाठी कर्माच्या परिणामांची बाधकता तीव्र असते. सर्वसाधारणपणे प्रत्येक चुकीला परिणाम असतो. तथापि परमेश्वर संबंधित चुकीचे परिणाम अत्यंत तीव्र आणि गंभीर असतात. 


जय साईराम 

व्हि. एस.