ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" संपूर्ण विश्वामध्ये एकच चैतन्य भरून राहिले आहे. आपले भाव आपल्याला त्या वैश्विक चैतन्याशी जोडतात."
पुष्प ३९ पुढे सुरु
एकलव्य पारधी जमातीत जन्मला. धनुर्विद्या शिकण्यासाठी द्रोणाचार्य आपले गुरु असावेत ही त्याची इच्छा होती. परंतु द्रोणाचार्य राजपुत्रांचे गुरु होते, त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले नाही. एकलव्याने जंगलात द्रोणाचार्यांचा एक पुतळा तयार केला व त्या पुतळ्यासमोर तो धनुर्विद्या शिकला. तो आत्मशिक्षित होता. अशा तऱ्हेने तो अर्जुनाहून श्रेष्ठ धनुर्धर झाला. प्रत्यक्ष गुरुंशिवाय प्रशिक्षण घेणे त्याला कसे बरे शक्य झाले ? एकलव्याने द्रोणांना गुरु मानले. गुरुचरणी असलेली त्याची अपरिमित श्रद्धावान भक्ती यांमुळे हे शक्य झाले.
आपण अजून एक उदाहरण पाहू या. रामानुजांचा शिष्य नम्बी, नेहमी त्यांच्यासाठी भोजन बनवत असे. एकदा रस्त्यावरून श्री रंगनाथाची मिरवणूक चालली होती. मठातील सर्वजण रंगनाथाच्या दर्शनासाठी धावले. रामानुजांनी नम्बीला बोलावले, परंतु तो आला नाही. दर्शन घेऊन सर्वजण परतले. रामानुजांनी नम्बीला विचारले, " तू रंगनाथाच्या दर्शनाला का नाही आलास ? " तो उत्तरला, " तुम्ही सर्व तुमच्या भगवंताच्या दर्शनासाठी गेलात, मी माझ्या परमेश्वरासाठी दुध तापवत होतो. मी तेथे आलो असतो तर दुध ओतू गेले असते. "
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम