रविवार, २९ मे, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " आत्मसाक्षात्कार ही जीवनयात्रेची खरी सांगता आहे. जीवनमुक्त ही अंतिम अवस्था आहे."

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

मी याहून का बरं वेगळी आहे ? 
                    याचे कारण म्हणजे मी एका पद्धतीने लहानाची मोठी झाली आहे आणि तुम्ही दुसऱ्या पद्धतीने. सदेह भगवंत प्राप्ती हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्वांना जीवनमुक्त स्थिती प्राप्त व्हावी, अशी माझी इच्छा आहे. हाच माझा पूर्णवेळ आणि अर्धवेळ उद्योग आहे. माझे मन परमेश्वराच्या - फक्त परमेश्वराच्या विचारांनी भरून आणि भारून गेले आहे. मनात उद्भवलेल्या जरा, व्याधी आणि मृत्यू यांची भीती हेच माझ्या वर्तमान स्थितीचे कारण आहे. 
                     मी अगदी वेगळ्या वातावरणात लहानाची मोठी झाले. नवजात बालकाला दुध पाजले जाते. मला कृष्णभक्तीचे दुध पाजले गेले. माझा देह माझ्या आईच्या दुधावर पोसलेला नसून तिच्यामध्ये असलेल्या कृष्णभक्तीच्या दुधावर पोसलेला आहे. म्हणूनच कृष्णाने मला पूर्णतः व्यापून टाकले आहे. माझे वडील, काका, आजी आणि पणजी यांच्या अंगाखांद्यावर मी लहानाची मोठी झाले. तेच मला खाऊ घालत. त्यांनी माझे संगोपन केले, त्यांनी मला फक्त अन्न खाऊ घालून माझे पोषण केले का ? ते मला जेवण भरवत असत मी तोंडात घास घेऊन चावून खात असे. परंतु माझे लक्ष पूर्णपणे ते सांगत असलेल्या कथांकडे असे. माझ्या मुखाने कृष्ण अन्नाचे घास घेतले, माझ्या दातांनी कृष्णाचाच रवंथ केला. अंथरुणात पडल्यावर कृष्णाच्या कथा ऐकल्याशिवाय मला झोप येत नसे. मी खेळत असे ती फक्त कृष्णरूपी बाहुलीशीच. मी वाचत असे ते फक्त माझ्या वडिलांचे अत्यंत प्रिय पुस्तक, भगवद्गीता. त्यांनी मला अनेक मंत्र आणि श्लोक शिकवले. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २६ मे, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " शुद्ध सत्वामध्ये एकत्व पावलेला जीव पुन्हा माघारी येऊ शकत नाही."

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                 तुमचे बालपण आठवायचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचा बालपणीचा, दहाव्या वर्षापर्यंतचा काळ कसा घालवलात ? तुमची मुलं आता काय करत आहेत ? ती त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळतात. त्यांना विविध प्रकारचे रुचकर पदार्थ खायला हवे असतात. त्यांना जे हवे तेच ते खातात. ती शाळेत जातात. सिनेमाला जातात, मित्रांकडे तसेच नातेवाईकांकडे जातात. त्यांना नवीन नवीन कपडे हवे असतात. केवढ्या ह्या इच्छा वासना ! 
                    मला या गोष्टींमध्ये का बरं रुची नव्हती ? मला व्याधी, जरा, मृत्यू यांचे भय का वाटत असे ? त्यामधून सुटका करून घेण्याच्या वेगवेगळ्या मार्गांचा मी का बरे शोध घेत होते ? मी इतर मुलांपेक्षा वेगळी का होते ? माझे विचार वेगळे का होते ? आजही मी अशीच आहे. 
                    या जगामध्ये सर्वजण काय करत आहेत ? सर्वजण आपापल्या कुटुंबात रममाण झाले आहेत, बायकामुलांसाठी पैसा कमावण्याच्या मागे आहेत. ह्यांना घर, पद, प्रतिष्ठा, धन याविषयी आसक्ती आहे. या गोष्टी तुमचे मन व्यापून टाकतात. त्या गोष्टी मिळवणे हेच तुमचे मुख्य उद्दिष्ट बनते. त्यातून थोडासा वेळ काढून तुम्ही देवळात धावती भेट देता किंवा एखादी पूजा करता. साईभक्त समितीत जातात. भजने गातात. सेवेच्या उपक्रमात भाग घेतात. पुट्टपर्तीला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. हे सर्व अर्ध - वेळ उद्योग आहेत. 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, २२ मे, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " प्रत्येक मनुष्य परमेश्वरामधून जन्मला आहे. आणि पुन्हा त्याच्यामध्येच विलिन होणार आहे."

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                 तरुणपणी मी बऱ्याचदा तंबूतील सिनेमा पाहण्यासाठी कालीगुडीला जात असे. त्यातील अभिनेत्यांना पाहून मला वाटू लागले की चिरतारुण्यासाठी व वृद्धत्वापासून सुटका करून घेण्यासाठी सिनेस्टार बनणे हा एकच मार्ग आहे. मग वृद्धत्व मला स्पर्शही करू शकणार नाही. काही काळानंतर मी असे ऐकले की माझी प्रिय सिनेकलावंत खूप आजारी असून, अंथरुणाला खिळून आहे. त्यामुळे मला समजले, की तेही वृद्ध होतात व मृत्यू पावतात. पुन्हा तोच प्रश्न ! 
जरा, व्याधी आणि मृत्यू यातून सुटका कशी करून घ्यायची ?
                  मी सतत यावरच विचार करत होते. मला माझ्या आजीने सांगितलेली मार्कंडेयाची गोष्ट आठवली. त्याने परमेश्वराकडून आजन्म १६ वर्षांचा राहण्याचा वर मागून घेतला होता .  
  ' मृत्युपासून सुटका कशी करून घ्यावी ?'
                 मी भगवंताची प्रार्थना केली आणि माझ्या मनात एक ठाम मत निर्माण झाले . 
                ' मी सुद्धा कथेतील मीरेप्रमाणे भगवंतामध्ये एकरूप होणार. आंडाळप्रमाणे भगवंताशी विवाह करणार आणि त्याच्याशी सदेह संयुक्त होणार. हा एकच मार्ग आहे. मला जरा, व्याधी, मृत्यू यांची भीती वाटते. हा देह वृद्ध होऊ नये. भगवंताला घट्ट धरून ठेवणे याखेरीज अन्य मार्ग नाही. तोच एकमेव अद्वितीय मार्ग आहे.' 
                   बालपणीच असे विचार माझ्या मनात आले आणि दैवी मार्गावर मी माझे पाय घट्ट रोवले.

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम
              

गुरुवार, १९ मे, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

         " परमेश्वर सर्वत्र आहे, प्रत्येकामध्ये आहे.  कोणतीही गोष्ट माया म्हणून दूर सारू नका.  जे घडते ते स्वीकारा आणि जसे आहे तसा त्याचा अनुभव घ्या."

प्रकरण दुसरे

अंकुर पुढे सुरु




बालपणातील भयंगड आणि परमेश्वर

                   लहान असताना मला वृद्धत्व, व्याधी आणि मृत्यू याविषयी खूप भीती वाटत असे. माझी पणजी अर्धांगवायूच्या विकाराने अंथरुणाला खिळून होती. सुरवातीला तर मी तिच्याजवळ जायलाही घाबरत असे. काही काळानंतर मी तिच्याजवळ बसू लागले. ती मला पुराणातील अनेक कथा सांगत असे. तिची अवस्था पाहून भीतीने माझ्या पोटात गोळा येई. मी विचार करत असे, वृद्धापकाळात सर्वांची अशी अवस्था होते का ? मी वृद्ध होऊच नये.
                    मी कुटुंबामध्ये सर्वांची खूप लाडकी होते. मी घराचा उंबरठा कधी ओलांडलाच नाही. त्यामुळे बाहेरच्या जगाविषयी मी पूर्ण अनभिज्ञ होते. आमच्या छोट्याशा गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दहनाच्या वेळी ढोल वाजवले जात असत. त्या आवाजानेही मी खूप भयभीत होऊन स्वतःला एका खोलीत कोंडून घेत असे. माझ्या मनात विचार येई, " माणसाचा मृत्यू का बरे होतो ?" मला मृतदेहाचे दर्शन घेण्याचीही  भीती वाटत असे. या भीतीपोटी मी विचार करण्यास प्रवृत्त झाले . " यातून सुटकेचा काही मार्ग असेल का ?"

पुढील मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १५ मे, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " केवळ साधना करण्यासाठी आपण या देहात जन्म घेतला आहे. साधनेचे फळ म्हणून जरी आपल्याला परमेश्वराचे दर्शन झाले तरी अखेरच्या श्वासापर्यंत आपण आपली साधना चालू ठेवली पाहिजे."

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु

                   माझे SSLC शिक्षण पूर्ण झाल्यावर माझ्या कुटुंबीयांना माझे लग्न करायचे होते. मी म्हणाले," मी कृष्णाशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही." मला बाहेरच्या जगाची काही माहितीच नव्हती. मी बुद्धाप्रमाणे घरातच लहानाची मोठी झाले. जर राधा, आंडाळ आणि मीरा पृथ्वीवर जन्म घेऊन कान्हाला प्राप्त करू शकतात तर मग मी का नाही ? ही प्रबळ भावना माझ्या मनात होती. त्यावर मला असे सांगितले गेले, की त्यांचा परमेश्वराशी भौतिक विवाह झाला नव्हता. मानवी जीवनात हे शक्य नाही. माझ्या वडिलांनी आणि आजीने माझे मन वळवले. आजी म्हणाली की माझे वडील एकटे आहेत. तीही वृद्ध झाली आहे. त्यामुळे विवाहास राजी होणे हेच माझ्या हिताचे आहे. 
                    तीन मुलांमधून मला एकाची निवड करण्यास सांगितले. माझ्या आईने मृत्युपूर्वी मात्र माझ्या सख्ख्या आतेभावाशी लग्न न करण्यास सांगितले होते. कारण त्याचे आई वडील विभक्त झाले होते. 
                   तिघांपैकी एक श्री मनोहरन हे नेहमी माझ्या वडिलांना सेवाकार्यात मदत करत असत. ते वृत्तीने भाविक होते. मला फक्त त्यांच्याविषयी माहिती होती. बाकी इतर दोघांची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे मी त्यांची निवड केली. माझे लग्न झाले. श्री मनोहरननी नेहमी माझ्या वडिलांना धर्मार्थ कार्यात मदत केली. ते आमच्या नात्यातलेच होते. त्यांच्या घरात ते एकुलते एक होते. तरीही आम्ही आमच्या घरीच एकत्र राहिलो. रीतीरिवाजानुसार लग्नानंतर वधू वरच्या घरी राहायला जाते. तथापि मला माझे घर सोडून दुसरीकडे जाणे पसंत नव्हते. म्हणून माझ्या आजीने त्यांच्या आईवडिलांना हे समजावून सांगितले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला आमच्या घरी राहण्यासाठी संमती दिली. 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम
             

गुरुवार, १२ मे, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " परमेश्वराला त्याच्या निर्मितीमध्ये पाहिल्यास सत्याचा साक्षात्कार होतो."

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                 लहानपणी मी सतत माझ्याजवळ नीलकृष्ण बाळगत असे मी जिथे जाईन तिथे कृष्णाला घेऊन जात असे. ते पाहून माझी आजी म्हणे," ती पहा, जणू काही दुसरी मीराच !" 
                आजी नेहमी तिच्या जीवनातील प्रसंग,  चुटके सांगत असे. त्यातून मी अनेक अविस्मरणीय धडे शिकले. एका सनातनी हिंदू स्त्रीच्या नात्याने दैनंदिन जीवनात, पवित्र ग्रंथामधील शिकवणीचे आचरण करण्यावर तिची नितांत श्रद्धा होती. स्त्रियांचे वर्तन योग्य असावे यावर तिचा विशेष कटाक्ष असे. ती म्हणे:
" उंबरठ्यावर बसू नका." 
" मंदिरातला दिवा रस्त्यावर ठेवला तर चालेल का ?"
" स्त्री पुरुषांनी मुक्तपणे एकत्र फिरू नये." 
" कापूस अग्नीच्या जवळ ठेवू नये."
                 माझ्या आईप्रमाणेच आजीनेही माझ्या वडिलांच्या तत्वांना पाठिंबा दिला. कुटुंबाला कठीण परिस्थितीतून जावे लागत असताना दानधर्मासाठी तिने आपले दागिने मोडण्यासही मागे पुढे पाहिले नाही.

उर्वरित मजकूर पुढील भागात 

जय साईराम

रविवार, ८ मे, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " साधक एवढा सत्वगुणांनी युक्त असायला हवा की त्याला त्याच्या अवस्थेची जाणीवही नसेल." 

प्रकरण दुसरे

अंकुर पुढे सुरु 

                    कावेरी, अरविंदन आणि मणिवन्नन या माझ्या तिन्ही मुलांना माझ्या आजीनेच वाढवले. तिच्या मदतीमुळेच मी माझ्या साधनेवर लक्ष केंद्रित करू शकले. माझ्या कठोर व्रतवैकल्यांना, माझ्या प्रयत्नांना आजीने पूर्ण पाठिंबा दिला. ती मला घरकामात मदत करत असे. जेव्हा मी एकभुक्त व्रत ( दिवसातून एकवेळ जेवण घेणे ) करत असे, तेव्हा ती मला लाडीगोडी लावून जास्त खाण्याचा आग्रह करत असे. त्यावर मी तिला म्हणत असे, " आजी, मला नको ग आग्रह करूस. ही माझ्या आणि कृष्णामधली बाब आहे." 
                   जन्मतःच मी रंगाने खूप काळी होते. गावातील सर्वजण म्हणत, " तिची आई तर खूप गोरी आहे. बहुतेक हॉस्पिटलमध्ये बाळांची अदलाबदल झाली असावी." माझ्या आजीने मग प्रतिज्ञा केली, की ती माझा रंग बदलून दाखवेल. ती रोज मला एरंडेल तेल व हळदीच्या मिश्रणाने मालीश करून आंघोळ घालत असे. 
                   खाण्याच्या बाबतीत मी खूपच चिकित्सक होते. मला भाज्या आवडत नसत. माझी आजी माझ्यासाठी नाचणी आणि भाज्या यांचे सूप व इतर अनेक पौष्टिक पदार्थ बनवत असे. माझ्या जवळ बसून ती मला अनेक भक्ती कथा सांगून खायला लावत असे. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ५ मे, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" असीम प्रेम म्हणजे प्रज्ञान."

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                     लहानपणी मला वरचेवर पोटदुखीचा त्रास होत असे. माझ्या पालकांनी मला बऱ्याच डॉक्टरांकडे नेले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी एका डॉक्टरांच्या लक्षात आले, की भुकेमुळे माझे पोट दुखते. ते म्हणाले, " तिला भूक लागली आहे हे न कळल्यामुळे ती रडते आहे. तिचे पोट दुखायला लागले तर तुम्ही तिला दुध किंवा दहीभात द्या."
                   नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला सर्वात पहिली जाणीव होते ती भुकेची ! मला त्या जाणीवेचे ज्ञानच नाही. आत्ता स्वामींनी याचे कारण सांगितले, " तू प्रथमच इथे जन्म घेतला आहेस, त्यामुळे तुला भुकेची जाणीव माहितच नाही. " मी अमरत्वाच्या स्थितीतून आले, तिथे ना तहान ना भूक म्हणून मी भूक लागल्याचे सांगू शकत नाही. आज आश्रमातही तसेच होते. सर्वजण माझी काळजी घेतात. मला वेळच्यावेळी जेवण देतात, दुध देतात. तरीपण माझा आहार खूपच कमी आहे. नाश्ता आणि रात्रीच्या जेवणात मी एक डोसा किंवा दीड इडली खाते आणि दुपारच्या जेवणात थोडासा भात खाते. 
                   माझ्या आईची आई, श्री रेंगनापीयार अगदी तरुण वयातच विधवा झाली. तिला दोन मुले होती. मुलीचा क्षयरोगाने झालेला मृत्यू व मुलाचा घटस्फोट या दुःखद प्रसंगांना तिला सामोरे जावे लागले. तथापि तिच्या श्रद्धा आणि भक्तीने तिला काळाच्या कसोटीत उतरलेल्या तत्वांनुसार जीवन जगण्याचे बळ दिले. तिने माझा अतिशय प्रेमाने सांभाळ केला. मला पहिले मूल झाल्यावर ती म्हणाली, " ती स्वतःच एक बालक आहे आणि तिला एक बाळ झाले आहे." 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

सोमवार, २ मे, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " केवळ परमेश्वराप्रती प्रेम म्हणजे प्रेम नव्हे तर समस्त निर्मितीविषयी प्रेम म्हणजे प्रेम होय. "

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                   दर आठवड्याला आम्ही शाळेतून चर्चमध्ये जात असू. तिथे मी साश्रू नयनांनी जीझसला प्रार्थना करत असे," मला कृष्णाचे दर्शन घ्यायचे आहे. मला कृष्णाचे दर्शन घ्यायचे आहे." मी माझ्या आईचाच कित्ता गिरवत होते. माझ्या केवळ आई वडिलांनीच नव्हे तर कुटुंबातील सर्वांनीच भगवंताचा ध्यास घेतला होता. 
                  एकदा मला वॉर्डनने बोलावले. त्या म्हणाल्या," तुझी आई आजारी आहे. तू घरी जा. जाताना काही कपडेही बरोबर ने. " मी घरी पोहोचले. तेव्हा आईने या जगाचा निरोप घेतला होता. मी धाय मोकलून रडत होते. माझ्या आजीने व इतरांनी माझे सांत्वन केले. " आता तुझे वडिलच तुझी आई आहेत." असे सांगून माझी समजूत घातली. माझी आई वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी निवर्तली. त्याकाळी दुर्धर असणाऱ्या क्षयरोगाने ती गेली. कृष्णाच्या तीव्र ध्यासाने आधीच कृश झालेला तिचा देह थोड्याच अवधीत रोगाला बळी पडला. 
                  त्यानंतर कुटुंबातील अनेकांनी माझ्या वडिलांना पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला. माझे वडील तरुण असूनही त्यांनी पुनर्विवाहास नकार दिला. ' काँग्रेसच्या कार्यकर्त्याने एक किंवा दोन मुले झाल्यानंतर ब्राम्ह्चाऱ्याचे आयुष्य जगावे.' या गांधीजींच्या तत्वाला अनुसरून त्यांनी हा निर्णय घेतला. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम