शुक्रवार, २३ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

मोती तिसरा 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्  || 

               जे भक्त अन्य कोणत्याही गोष्टीची इच्छा न धरता निरंतर परमेश्वराचे चिंतन करतात त्यांचे योगक्षेम, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी परमेश्वर घेतो. आई जशी आपल्या लहान मुलाची सर्वतोपरिने काळजी घेते तसा परमेश्वर आपल्या भक्ताची काळजी घेतो. 
              अनन्याश्चिन्तयतो - ह्याचा अर्थ ज्याच्या मनात परमेश्वराशिवाय अन्य कोणतेही विचार नाहीत. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की परमेश्वराची अशी विशेष भक्ती करणे खरच शक्य आहे का ? हो निश्चित शक्य आहे. माझ्या जीवनाचे उदाहरण तुमच्या समोर आहे. मी परमेश्वराशिवाय अन्य कोणताही विचार करत नाही. बाकीच्या सर्व गोष्टी माझ्या विस्मरणात गेल्या आहेत. माझे बाह्य जगताशी अजिबात संबंध नाहीत. केवळ भगवान माझ्या जीवनाचा श्वास आहेत. त्यांच्या विचारांशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. मी त्यांना सर्वस्व समर्पित केल्यामुळे तसेच मी त्यांचे सतत स्मरण करत असल्यामुळे ते माझ्या सर्व गोष्टींची काळजी घेतात. 
              माझ्याकडून मी कोणतेही प्रयत्न न करता माझे जीवन सुरळीतपणे चालले आहे. सांसारिक जीवन महासागरासारखे असते. हा महासागर कसा पार करायचा ? केवळ परमेश्वराच्या चरण कमलांवर पूर्ण शरणागती पत्करून. एकदा का तुम्ही परमेश्वराशी पूर्ण शरणागत झालात की महासागर पार करणे अगदी सोपे होऊन जाते. जेव्हा नौका वल्ह्यांविना चालते. ह्याचा अर्थ भक्ताचे जीवन विनासायास चालू आहे. कोणतीही इच्छा वा महत्वाकांक्षा न ठेवता सतत परमेश्वराचे चिंतन करणे म्हणजे परमानंदाची अनुभूती ! जेव्हा तुम्ही ह्या परमानंदाची गोडी चाखता तेव्हा त्याच्यापुढे अन्य कोणत्याही आनंदाचा काय उपयोग ? हे अनन्याश्चिन्तयन्तो पोटी मिळणारे फळ आहे . ज्याच्या मनात भगवानांच्या विचारांशिवाय अन्य कोणतेही विचार नसतात त्यांना हा परम आनंद लुटता येतो. जीवनातील आसक्ती, अडचणी आणि चिंता ह्यांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. मी सदैव भगवानांशी एकत्व अवस्थेत असल्यामुळे हरघडी मी परामानंद अनुभवते. 
             प्रत्येकजण ही अवस्था प्राप्त करू शकतो. ह्याच हेतूने भगवद् गीतेचा जन्म झाला आहे. विनोबा भावे नेहमी म्हणत, " जोपर्यंत तुम्ही वेदमार्गावरून वाटचाल करत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष प्राप्ती नाही. " प्रत्येकाला सहजपणे वेद शिकणे शक्य नाही मग सामान्य मनुष्याचे प्रारब्ध काय ? त्यासाठीच गीतेचा जन्म झाला. 
                मनुष्याला वेद शिकण्याची आवश्यकता नाही. व्रत वैकल्ये करण्याची गरज नाही. मोक्षप्राप्तीचा अगदी सोपा उपाय, तुम्ही करत असलेले प्रत्येक कर्म भगवानांना अर्पण करा. आपण आपल्या प्रत्येक कृतीचे भक्तीकर्म वा योग ह्यामध्ये रूपांतर केले पाहिजे. गीतेतील कर्मयोगाच्या तिसऱ्या अध्यायात सांगितल्यानुसार जर तुम्ही तुमचे प्रत्येक कर्म परमेश्वराला समर्पित करण्याच्या भावनेने केलेत तर त्याचा योग्य होतो. 
              मी वयाच्या २१ व्या वर्षी गीता वाचायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर त्यातील शिकवण आचरणात आणण्यास सुरुवात केली. तेव्हाची वसंता आणि आताची वसंता ह्यांच्यामध्ये खूप फरक आहे. हा बदल कसा घडला ? परमेश्वर सतत आपल्या बरोबर आहे. ह्या कल्पनेची ही फलश्रुती आले. ९ व्या अध्यायामध्ये लोखंडाचे सोन्यामध्ये परिवर्तन करण्याचे सामर्थ्य आहे. गीतेतील शिकवणीचे दैनंदिन जीवनात आचरण करणे पुरेसे आहे. ह्यासाठी निर्धार आणि एकाग्रता हे दोन्ही गुण आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक कर्म परमेश्वराशी जोडता तेव्हा त्यातून प्रचंड शक्ती निर्माण होते. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या साई गीता प्रवचनम्  या पुस्तकातून. 


जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा