शनिवार, २३ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प पंधरावे 
चैतन्य युग


              आपण चैतन्य युगामध्ये, शुद्ध सत्व युगामध्ये   प्रवेश करत आहोत. खरच ! किती आनंददायी आहे ही जाणीव . आपण नवयुगात प्रवेश केला आहे का ? आपल्यामध्ये असणाऱ्या अस्वस्थ , असंतुष्ट , दुःखी आत्मे कोठे आहेत ?  ॐकार आणि वेदांच्या दिव्य उच्चारणाने आसमंत भरून गेला आहे ! कानामध्ये संगीताचा निनाद ऐकू येतोय हृदय पुलकीत झाले आहे . हे साम वेदाचे संगीत आहे का ? नाही मानवाचा आवाज आहे का हे स्वर्गातील गंधर्वगायन आहे ? 
               आपल्या पावलांखाली असणाऱ्या भूमीचा स्पर्श किती मऊशार आहे, असे वाटते की आपण पृथ्वीवर चालत आहोत का स्वर्गामध्ये. आपल्या पावलांना ह्या पवित्र भूमीचा दिव्य स्पर्श जाणवतो आहे. फुलाच्या पाकळीसारखा अत्यंत कोमल स्पर्श आहे हा ! 
               ही सत्ययुगाची, चैतन्य युगाची भूमी आहे ! ह्या सुपीक आणि वैभवशाली भूमीने पोषित झालेल्या लोकांच्या भाग्याची कल्पना करा. ह्या भूमीने लोकांना वैभवशाली बनवले का लोकांनी ह्या भूमीला पवित्र बनवले ? आपल्या पावलांना अशा ह्या भूमीचा स्पर्श लागेल का ? 
                येथे सामान्यजनांचे महात्म्यांमध्ये परिवर्तन होत आहे. येथे सदाचरणाची राजवट आहे. सदाचरण हा ह्या भूमीचा कायदा आहे. गवताचे पाते व प्रत्येक मूळ सुद्धा ह्या सदाचरणाच्या कायद्यानुसार वाढते. जेथे गवताचे पातेसुद्धा सदाचरणाचा मार्ग अंगिकारते तेथे मनुष्याचा तर प्रश्नच नाही. येथे वेद घरे आहेत, उपनिषदे मार्ग आहेत, परमेश्वर म्हणजे मानवच आहे, नद्या प्रेम आहेत, पर्वतशिखरे त्याग आहेत. येथील दुकानांमधून ज्ञानाची विक्री होते परंतु दुकानांमध्ये मालाचा (ज्ञानाचा ) साठा पडून आहे कारण तेथे खरेदीदार नाही. कारण हे लोकं ज्ञानदेह आणि प्रेमदेह घेऊन जन्मले आहेत. त्यामुळे त्यांना ज्ञानाच्या साठ्याची गरज नाही. 
              येथे श्वासासाठी प्राणवायू नाही ते श्वासातून मुक्तीवायू आत घेतात. येथे कृपेचा पाऊस पडतो. येथे केवळ एकच परमेश्वर आहे. सर्वसत्ताधिश, सर्वशक्तिमान परमेश्वर ! साईंच्या साम्राज्यात समस्त लोकं जीवनमुक्त आहेत. सर्वजण परब्रम्हाचा दिव्य अंश आहेत. ह्या भूमीवर त्याच्या कृपेचा सरींचा वर्षाव होतो. अशा ह्या समृद्ध भूमीतून उपजणाऱ्या अन्नावर येथील लोकांचे पोषण होते. त्यांचे पेयजल म्हणजे साक्षात प्रेमरसच !
              गाई आणि वाघ गुण्यागोविंदाने एकत्र राहतात वाघांचे बछडे गाईंच्या आचलांमधून दूध पितात. सिंह  आणि हरणे एकाच तळ्यामधील पाणी पितात. बगीच्यांमध्ये कुत्री आणि मांजरे ही एकत्र फिरताना दिसतात. घराघरांमधून, बागबगीच्यांमधून पारिजातकाच्या फुलांचा सुगंध दरवळताना आढळतो. तसेच इतर स्वर्यीग वृक्षांनी घरे व बागबगीचे सुशोभित झालेले दिसतात. 
             सूर्य ही मंद मंद तळपत असल्यामुळे कोणीही झाडाच्या सावलीचा शोध घेत नाही. बाबांनी म्हटले आहे " वैकुंठ हे असे स्थान आहे जेथे दुःखाचा लवलेशही नाही. " येथे सर्वजण सुखात, आनंदात आहे. रात्र होताच चंद्राच्या शीतल, आल्हाददायक प्रकाशात सर्वजण परमेश्वराबरोबर रासक्रीडा करतील.  
              येथील विद्यालये म्हणजे गुरुकुले आहेत तेथे वेदांमधील ज्ञान आचरणात कसे आणावे हे शिकवले जाते. येथील विज्ञान म्हणजे केवळ शुद्ध आध्यात्मिक विज्ञान, ह्याची बरोबरी कशाशीही होऊ शकत नाही.  येथे केवळ आंतरिक ज्ञान दिले जाते, बाह्यविषयक ज्ञान दिले जात नाही. येथील सर्व बालके ज्ञानसंपन्न असतील. 
              येथे आध्यात्मिक ज्ञानाव्यतिरिक्त अन्य कोणतेही शिक्षण दिले जात नाही. येथे वेदमंत्रोच्चारणाच्या ध्वनिशिवाय अन्य कोणताही ध्वनी नाही. येथे जात, धर्म, वंश आणि भाषा असा कोणताही भेदभाव नाही.  

संदर्भ - श्री वसंत साईंच्या Bliss, Bliss, Bliss ह्या पुस्तकातून. 

जय साईराम 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा