ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
शिवरात्रीचे महत्व
शिवरात्रीमध्ये काय असे विशेष आहे ?वास्तविक आपण अनेक रात्री अनुभवतो परंतु ह्या रात्रीला आपण शिवरात्र का म्हणतो ? शिवरात्र म्हणजे मंगलरात्र, पवित्ररात्र. म्हणून ही मंगलरात्र परमेश्वराच्या पवित्र नामाचे उच्चारण करण्यात व्यतीत केली पाहिजे. शिवरात्र म्हणजे केवळ रात्रभर जागरण करणे नव्हे. काही लोकं रात्रभर जागरण करतात आणि जागरण करून ते काय करतात ? रात्रभर पत्ते खेळणे ह्याला तुम्ही जागरण म्हणू शकत नाही. किंवा तीन, चार लागोपाठ चित्रपट पाहून जागरण केले असे म्हणू शकत नाही. शिवरात्र म्हणजे केवळ परमेश्वराच्या नामस्मरणात रात्र घालवणे. ते नामस्मरणही अंतःकरणातून यायला हवे. म्हणून याला ' अंतरात्म्याचे चिंतन, मनन ' असे म्हटले जाते. अंतःकरणापासून येणाऱ्या परमेश्वराच्या पवित्र नामाला ' शिवतत्व ' असे म्हणतात. आपण जे काही करतो ते आतून यायला हवे. उस्फूर्तपणे यायला हवे बळजबरीने नव्हे. जे करायचे ते मनापासून व प्रेमाने केले पाहिजे. प्रेमही उत्स्फूर्त हवे बळजबरीचे नव्हे. आजकाल आपण सर्व बळजबरीतून करत असतो हे योग्य नाही. तुम्ही सर्व गोष्टी (नामस्मरण )मनापासून केल पाहिजे मग ते अर्ध्या मिनीटाचे का असेना ! एक चमचा साखर, एक चमचा गायीचे दूध पुरेसे आहे. त्या ऐवजी हंडाभर गाढवीणीचे दूध कशाला ?
मनुष्याची १० इंद्रिये त्याला कुमार्गावर घेऊन जाण्यास जबाबदार असतात. शिवरात्र ह्या शब्दामध्ये शि, व, रा, त्र अशी चार अक्षरे आहेत. ह्या चार अक्षरांचा अर्थ व संख्याशास्त्र ह्यामध्ये जवळचा संबंध आहे. ' शि ' हे अक्षर ५ ह्या आकड्याचे, ' व ' ४ ह्या आकड्याचे, ' रा ' २ ह्या आकड्याचे प्रतिनिधित्त्व करते. ५ + ४ +२ ह्याची बेरीज ११ येते. ५ कर्मेंद्रिये, ५ ज्ञानेंद्रिये आणि मन ह्याची बेरीज ११ येते. हे ११ रुद्र आहेत. हे एकादश रुद्र काय करतात. ते मनुष्याला भौतिक गोष्टींच्या विश्वामध्ये ओढतात; त्यांच्या क्षुद्र इच्छा वाढवतात व त्याला भौतिक जगामध्ये हरवून जाण्यास भाग पडतात. ह्या ११ रुद्रांच्या पलीकडे एक अस्तित्व आहे ते म्हणजे ' परमात्मा '. त्या बाराव्यास जर आपण घट्ट धरून ठेवल तर आपल्याला इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येते. म्हणून आपण या १२ व्या अस्तित्वाकडे, परमात्म्याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.शिवरात्र - १५ कला नियंत्रणामध्ये आहेत आणि केवळ मनाची एक कला जिंकायची आहे .
रात्र मूलतः काळोखाचे प्रतिक आहे. चंद्रमा मनसो जातः | चक्षोः सूर्यो अजायत. चंद्र आणि मन ह्यांचे जवळचे नाते आहे. आज चतुर्दशी आहे. चंद्राच्या १६ कला आहेत तसेच मानवी मनालाही १६ कला आहेत. आज मनुष्याने मनाच्या १५ कला जिंकल्या आहेत आणि त्याला केवळ मनाच्या एका कलेवर विजय मिळवायचा आहे. ह्याच कारणामुळे आज मानवता परमेश्वराच्या अत्यंत निकट आहे, जो कोणी आज हृदयाच्या गाभ्यापासून परमेश्वराचे नामस्मरण करेल त्याला अलभ्य लाभ होईल.
आजचा संपूर्ण वेळ, मनाला इतस्तः भटकू न देता केवळ परमेश्वराच्या चिंतनात घालवणे आवश्यक आहे. ह्या अमूल्य समयातील एक क्षणही व्यर्थ दवडू नका. क्षणाक्षणाने बर्फाच्या खड्यासारखा समय कमी कमी होत आहे ! छिद्र असलेल्या भांड्यातून जसे पाणी गळते तसे आपले आयुष्य सतत कमी होते. असे असताना, आपण पुढे कधीतरी परमेश्वराची भक्ती करू, अशा विचारांना थारा देऊ नका. परमेश्वराची भक्ती लांबणीवर टाकली जाऊ नये ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. आपल्याला लाभलेल्या या महद्भाग्याची आंनदाने अनुभूती घ्या व त्याचे सार्थक करा.
- बाबा
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा