रविवार, ३१ मे, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आपले भाव आपल्या जीवनिर्मितीस जबाबदार असतात."

भाग - नववा 

आत्मगीते 


' परिपूर्णतेच्या दिशेने आत्म्याचा प्रवास म्हणजे भक्ती '

........ आत्मगीते 

           तरुण वयापासूनच परमेश्वराच्या तृष्णेने मला वेडेपिसे बनवले. मी त्याच्या शोधात धावत होते. श्रीरंगनाथ हे आमचे कुलदैवत. त्याच्या अनेक फोटोंनी आमचे घर सुशोभित झाले होते. प्रत्येक दरवाज्यावर त्यांचे चित्र होते. आम्ही कुटुंबीय वरचेवर श्रीरंगमला जात असू. असेच एकदा आम्ही तेथे गेलो असताना मी श्री रंगनाथाच्या चरणांवर लोटांगण घातले आणि शेकडो गीते लिहायला सुरुवात केली. माझे समाधान झाले नाही. त्यानंतर मी गीतांमधून माझे भाव व्यक्त केले. तिरुपतीला साद घालणारी १०० गीते लिहून त्यांच्या चरणी अर्पण केली . मी गुरुवायूर , तिरुमलीरुंचोलाई, मदुराई कुडलळगर तिरुकण्णापूरमचे श्री सौरीराजर, कांची श्री-वरदराज तिरुमोखूर या सर्वांवर गीते रचली. 
          ५० ओव्यांच्या रचनेमधून मी आंडाळची जीवनकथा रचली. मी आंडाळ होऊन जगले. तिचे आणि माझे भावविश्व एकच होते या कविता म्हणजे माझ्या उत्कट भक्तीचे फळ होते . माझे वडील मधुर कवी ळ्वार  यांच्यामध्ये आंडाळचे वडील पेरियाळ्वर यांचा अंश होता . 
           हा पद्यसंग्रह म्हणजे माझ्या गीतांचा आणि काव्यांच्या जगताची छोटीशी झलक आहे. ही गीते म्हणजे माझ्या आत्म्याने गेली ५० वर्षे काकुळतेने मारलेल्या हाकाच आहेत. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम   

गुरुवार, २८ मे, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " आपले अस्तित्व म्हणजे जीवनभराचे एक स्वप्न आहे हे आपण जाणले पाहिजे. "  

प्रकरण - आठ 

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

          अशी आमची अवस्था आहे. मला नावलौकिक, आश्रम काहीही नको, मला फक्त परमेश्वर हवा. कोणत्याही क्षणी हे सर्व इथेच सोडून स्वामींच्या चरणी अर्पण करायला मी तयार आहे. जगाला पावित्र्य सिद्ध करून दाखवण्यासाठी रामाने सीतेला अग्निप्रवेश करण्यास सांगितला. प्रशांती निलयम्ला आणि जगाला माझे पावित्र्य सिद्ध करून दाखवण्यासाठी मी माझी सर्व पुस्तके आणि मला स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करेन. मला फक्त स्वामी हवेत. स्वामींची प्राप्ती न करू शकणाऱ्या या देहाचा आणि या जीवप्रवाहाचा काय उपयोग ? 
           स्वामींच्या परवानगीशिवाय मी एक वाक्यसुद्धा लिहीत नाही. प्रत्येक चित्र व त्याचे स्पष्टीकरण आम्ही अगोदर स्वामींकडे पाठवतो आणि मगच प्रकाशित करतो. या जगातून कोणाकडून स्वामी पुस्तकाचे प्रकरणे घेतील ? 
           हे सर्व सत्य असल्याचा हा ठोस पुरावा आहे. जगाला माझी खरी ओळख करून देण्यासाठी ते योग्य वेळेची प्रतीक्षा करत आहेत. माझ्या आयुष्यात कोणतीही गुपिते नाहीत. मी माझ्या हृदयात कोणतीही गोष्ट लपवून ठेऊ शकत नाही. म्हणून स्वामी माझ्याबरोबर ध्यानात जे काही बोलतात, त्यातले काहीही लपवून न ठेवता मी सर्व काही लिहिते. 
          आज पुराव्यासाठी आम्ही सत्य साई स्पीक्सस्  भाग ३८ मधील १५७ व १५८ नंबरचे पान काढले.
          इथे ईश्वर यमाला सांगतो आहे," ज्या लोकांना कर्मफलाची आशा नाही, अशांना तुझा गळफास स्पर्श करू शकणार नाही." 
            गेली ७० वर्षे मी केलेल्या साधनेच्या फळाचा मी त्याग केला आहे. मी राधा, दुर्गा, लक्ष्मी व अवतारपद अशा पदव्याही दूर सारल्या. वैश्विक मुक्तीसाठी मी माझ्या तपाच्या फळाचा त्याग केला. त्यामुळे यम माझ्याजवळ येऊ शकणार नाही. या देहाचे ज्योतीमध्ये रूपांतर होऊन तो स्वामींमध्ये विलीन होईल. हे निश्चित  घडणार आहे. स्वामींनी सांगितल्यानुसार ' भगवंताचे अखेरचे सात दिवस ' या पुस्तकात मी हे लिहिले आहे. ऋषिमुनींनी माझ्या सर्व नाडी भाकीतांमध्ये हे लिहिले आहे. माझी अखेर ईश्वरानी यमाला सांगितलेले शब्द सिद्ध करेल. 
          या पुस्तकाची प्रकाशनपूर्व तयारी चालू असताना मी हे प्रकरण स्वामींकडे अनुमतीसाठी पाठवले. ८ मार्च २००९ ला स्वामींनी हे प्रकरण घेतले व म्हणाले, " अनुमती दिली." 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

रविवार, २४ मे, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " देह सोडताना आत्मा त्याच्या कर्माचे ओझे वाहतो आणि पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो."

प्रकरण - आठ 

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

            वयाच्या पाचव्या वर्षापासून माझ्या मनात परमेश्वराशी विवाह करण्याची तसेच  देहाचे ज्योतीत रूपांतर करून परमेश्वरमध्ये विलीन होण्याची इच्छा होती. याच विचारांबरोबर मी लहानाची मोठी झाले. हे माझे  जीवन आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते, ' मला आश्रम नको वा पुस्तके नकोत. कृपया मला एकटीला राहू द्या."
            तुमच्या  प्रेमाविना जगण्याचा काय उपयोग ? जर मी तुमच्या चिंतेचे कारण बनत असेन तर या जगात मी कोणासाठी जगते आहे ? ज्या परमेश्वराला साधनेद्वारे मी प्राप्त करू इच्छिते, तो माझ्या लिखाणाने व्यथित होतो, हे माझ्यासाठी दुःखदायक आहे. मी माझी सर्व पुस्तके जाळून टाकीन आणि हा आश्रम, स्तूप तुमच्या चरण कमलांवर अर्पण करून देह त्याग करेन. म्हणजे जगासाठी हा पुरावा ठरेल की, मी केवळ परमेश्वरसाठी जगते आहे. मला याहून दुसरा मार्ग माहीत नाही. संपूर्ण आयुष्यभर जे सत्य मी माझ्या उराशी बाळगलं त्याने मला सोडून दिलं. मी तुमच्या ज्ञेची प्रतीक्षा करते. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. 
           तथापि माझी एक नम्र विनंती आहे. जर हे सत्य असेल की, माझ्या जन्मापासून आतापर्यंत माझ्या हृदयात केवळ तुम्हीच आहात आणि मी जे काही लिहिले ते सत्य आहे, तर कृपया मला मृत्यु येण्यापूर्वी पादनमस्कार द्या. मी माझे सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण करेन आणि माझे जीवन तुम्हाला समर्पित करेन. 
            मला आता समजले की, या देहाचे ज्योतीमध्ये रूपांतर करून परमेश्वरामध्ये विलीन होते शक्य नाही. ट्रस्टला हे सर्व घेऊन टाकू दे. मी एकटीच कृष्णाबरोबर हिमालयात जाऊन तप करेन. जर शक्य असेल तर कृष्णामध्ये सदेह विलीन होईन अन्यथा साधना करण्यात अयशस्वी झालेला हा देह नष्ट होऊ दे. 

स्वामी, माझे तुमच्यावर प्रेम आहे. मी केवळ 
तुमच्यासाठी जगते आहे. 
वसंता 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

शनिवार, २३ मे, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - २९

सत्याकडे दुर्लक्ष

           जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा परमेश्वर अवतार घेतो व दुष्ट, दुर्जनांचा नाश करून धर्म संस्थापना करतो. श्रीराम आणि श्रीकृष्ण अवतार घेऊन आले व त्यांनी असूरांचा व अधर्मी राज्यांचा संहार केला. 
           भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायात, देव आणि असूर ह्यांच्यामधील युद्धाविषयी वर्णन केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की प्रत्येक मनुष्यामध्ये सत् आणि असत् (गुणांमध्ये ) युद्ध सुरु असते. हे युध्द सूक्ष्म स्तरावर चालते. महाभारतातील युध्द प्रत्यक्ष लढले गेले. ह्या अंतर्गत युद्धामध्ये, नेहमी दुष्प्रवृत्तींचा विजय होतो व मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या फेऱ्यात ढकलले जाते. आपल्या गतकाळातील अनेक नकारात्मक गुणांमुळे आपण अनेक जन्म घेतले आहेत. आपण जन्म घेतला ह्यातूनच आपण शुद्धता प्राप्त केली नाही हे सिद्ध होते. 
            मनुष्यामध्ये उद्भवणारा प्रत्येक भाव, मनुष्याचे भावी जीवन निश्चित केले जाते. त्याच्या ह्या जीवनातील भावांद्वारे त्याच्या पुढील जन्माची निर्मिती होते. मनुष्याच्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट गुणांमध्ये सतत संघर्ष सुरु असतो. मनुष्याने वाईट विचारांना मनामध्ये प्रवेश करू देऊ नये. त्याने सदैव विनम्र असायला हवे. 
            हे युद्ध कधी समाप्त होईल हे कोण सांगू शकेल ? मनुष्य जन्म घेतो व मृत्यु पावतो. हजारो जन्म घेतल्यानंतर मनुष्य स्वतःला मुक्त करून घेतो. 
            अनेक वर्षांपूर्वी एक अनोखा विचार माझ्या मनात उद्भवला, " मी सर्वांना मुक्त का करू नये ?" सर्वांना मुक्ती मिळावी ह्या माझ्या इच्छेमुळे माझे वैश्विक मुक्तीचे तप सुरु  झाले. माझ्या तपाने माझ्या ध्येयाची परिपूर्ती होईल. मी सर्वांच्या मनातील संस्कार दूर करून, त्यांना माझ्या सारखे बनवेन. 
             प्रत्येकामध्ये दुष्प्रवृत्ती वास करतात. त्यांचे उच्चाटन करण्याची इच्छा म्हणजे  महाभारत युद्ध नव्हे तर महा जागतिक युद्ध होय. माझ्या तपोबलाने मी नवीन विश्वाची निर्मिती करेन. जेथे सर्वांठायी माझे गुण, परमेश्वराप्रती विशुद्ध प्रेम असेल. 
            अनेकजण माझ्यामध्ये दोष शोधतात. तथापि मी दोष स्वीकारून त्यांना क्षमा करते. 
             मी सत्य आहे हे सर्व नाडीग्रंथ दर्शवतात. सर्व महान ऋषी स्वामींच्या आणि माझ्यामधील बंधाविषयी सांगतात. 
              अनेकांना हे माहित आहे तथापि त्यांच्या वृत्ती बदलाल्या नाही. मग त्याचा काय उपयोग ? सत्य दुर्लक्षिले जात आहे. जेव्हा सत्य दुर्लक्षिले जाते तेव्हा पंचतत्वे क्रोधीत होतात. त्यांच्या क्रोधातून कोणीही सुटु  शकत नाही. स्वामींनी, जरासंध, शिशुपाल, आणि कंस ह्यांच्या उदाहरणाद्वारे हे सत्य सिद्ध केले आहे.

संदर्भ - श्री वसंत साईंच्या शिवसूत्र ह्या पुस्तकातून. 

जय साईराम 

गुरुवार, २१ मे, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " जर मनाने भगवद्नामाच्या अमृताची चव चाखली  तर ते इतर कोणत्याही चवीचा विचार करणार नाही."

प्रकरण - आठ 

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

प्रिय स्वामी, 

तुमच्या चरणकमलांशी माझे अनंत कोटी प्रणाम !
          स्वामी, तुम्ही मला ध्यानामध्ये सांगितलेला शब्द न् शब्द मी पुस्तकांमध्ये लिहिते. त्याने तुमची आणि तुमच्या  ट्रस्टची अडचण होते, हे मला माहित नव्हते. मी सदैव एकाकी असल्यामुळे मला जगाची रीत माहीत नाही. गोष्टी जशा आहेत तशाच मी लिहिल्या आहेत. त्यामध्ये काही बदल करणे वा लपवाछपवी करणे मला माहीत नाही. आपल्यामध्ये होणारे संभाषणाच मी लिहिते. मला क्षमा करा. माझ्या वडिलांनी मला ' सर्वकर्म भगवद्प्रीत्यर्थ ' अशी शिकवण दिली आहे. मी लिहिलेल्या पुस्तकातून जर तुम्हाला आनंद मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग ? मला केवळ तुमचे प्रेम हवे आहे.
           मला नावलौकिक नको, आश्रम नको, हे सर्व तुम्ही जाणता. जरी माझा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला असला तरी मी वयाच्या एकविसाव्या वर्षी धन, दागदागिने, किमती साड्या यांचा त्याग केला व विनयशील साधी राहणी अंगीकारली. परमेश्वर प्राप्ती हे माझे एकमेव ध्येय आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १७ मे, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" सत्य ईश्वर आहे. सत्यवचनाने परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. "

प्रकरण - आठ 

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

            मी आश्रमाची तपशीलवार माहिती, आर्थिक व्यवहार, आश्रम कसा चालवला जातो, आश्रमातील दैनंदिन कार्यक्रम व सेवा - उपक्रम याविषयी लिहून प्रशांती - निलयम्मधील श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्टला पाठवले. त्यासोबत पाठवलेल्या पत्रात आम्ही म्हटले, " तुमच्या ट्रस्टतर्फे कोणीही व्यक्ती येथे येऊन जमाखर्चाचा हिशोब पाहू शकते. स्वामींच्या प्रत्यक्ष आज्ञेचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत."
            मी त्यांच्यासोबत स्वामींची लिहिलेले एक पत्रही दिले व त्या ट्रस्टच्या अधिकाऱ्यास ते स्वामींच्या चरणकमलांवर अर्पण करण्याची विनंती केली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १४ मे, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" सत्य मनाला निर्मल बनवते. सत्य वचन ही अंतर्शुद्धी आहे. " 

प्रकरण - आठ 

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

साधनेचे फळ 

           प्रशांती - निलयम् येथून एक दूत आला व त्याने माझ्याकडे स्वामींच्या लिखाणावर स्पष्टीकरण मागितले. तो दूत म्हणाला,
* स्वामी तुमच्या लिखाणाने अत्यंत व्यथित झाले आहेत. 
* तुमच्या पुस्तकातील मजकुराने अनेकजण संभ्रमात पडले आहेत. 
* तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःला स्वामींशी जोडून जे लिहिता ते आम्हाला मान्य नाही. 
* ह्या सर्वांमुळे स्वामींची प्रतिमा मालिन होत आहे. 
* तुम्ही स्वतःला स्वामींहून अधिक सामर्थ्यशाली असल्याचे दर्शवत आहात.
* तुमच्या आश्रमाला परदेशातून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत आहेत. 
* अनेक परदेशी भक्त तुमच्याबरोबर आश्रमामध्ये राहतात. 
            त्यांना माझ्यामध्ये आणि आश्रमामध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या, त्यामुळे मला असे वाटले की, त्यांच्या आरोपांना उत्तर देणे माझे कर्तव्य आहे. मी त्यांना माझी स्थिती व आश्रमाची परिस्थिती स्पष्ट करून सांगितली पाहिजे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

रविवार, १० मे, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " जेथे जेथे आपली दृष्टी जाते तेथे आपले मन जाते आणि इच्छांचा उदय होतो. "

प्रकरण - आठवे

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

           हे प्रकरण लिहून पूर्ण केल्यानंतर मी शेल्फातून एक पुस्तक काढले आणि प्रार्थना केली," स्वामी, मी जे लिहिले आहे ते बरोबर असेल तर आशीर्वाद द्या." मी ते पुस्तक ( सत्य साई स्पीकस्, खंड ७ वा -पान ६४ ) उघडले. 
           त्यातील स्वामींचे शब्द मी वाचले," ही माझ्या कृपेची अजून एक खूण समज."
            मला ज्ञान आहे परंतु मी स्वामी बनू शकत नाही. मला बनायचेही नाही. मी सदैव त्यांच्या चरणांची धूळ आहे. म्हणून मी जेथे जाईन तेथे स्वामींच्या पादुका घेऊन जाते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

गुरुवार, ७ मे, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " जर आपण मनाची परमेश्वराशी गाठ बांधली तर ते नियंत्रणात येईल आणि फलस्वरूप विश्वातील कोणतीही गोष्ट आपल्याला स्पर्श करणार नाही. "

प्रकरण - आठवे

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये  

            ध्यान म्हणजे बैठक घालून काही तास चिंतन करणे. मी गेली ७० वर्षे ✕ १२ महिने ✕ ३० दिवस ✕ २४ तास ✕ ६० मिनिटे ✕६० सेकंद  इतका वेळ ध्यान केले  आहे. मी अखंड त्याचेच चिंतन करत तेच बनून गेले. ते जे काही मला सांगतात - ब्रम्हसूत्र, शिवसूत्र, प्रेमसूत्र ते मी लिहिते. 
             ' अग्नी मिले ' या वेदाच्या आद्य ध्वनीमधून माझा जन्म झाला. मी परमेश्वराचे शब्दरूप आहे. म्हणून मला नेहमी त्यांचा आवाज ऐकू येतो. शब्दभेदी म्हणजे ध्वनीच्या रोखाने बाण सोडून सावज टिपणे. तो बाण अचूक सावजाचा वेध घेतो. माझे ध्येय केवळ स्वामी आहेत. माझे कान केवळ त्यांचा आवाज ऐकतात. जर ध्वनी नसेल तर आकाशही नसेल. जर आकाश नसेल तर सृष्टी नसेल. ध्वनी सर्वव्याप्त आहे. हे सर्वव्याप्त शब्दब्रम्ह मी ऐकले आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम     

रविवार, ३ मे, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " केवळ परमेश्वराला स्पर्श केल्याने आपल्याला चिरंतन शांतीचा लाभ होतो. " 

प्रकरण - आठ 

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

         एकलव्याने हे कौशल्य कसे आत्मसात केले ? अंतरंगातील द्रोणाचार्यांनी त्याला शिकवल्यामुळे हे एक महद् आश्चर्य आहे. असे कोणीही शिकू शकत नाही. याचप्रमाणे ध्यानामध्ये संतमहात्म्ये परमेश्वराचा आवाज ऐकतात, उच्च ज्ञान प्रकट होते. 
         मला हा अवतार हवा आहे. त्यांच्या प्राप्तीसाठी मी ध्यान केले. क्षणभरासाठी सुद्धा त्यांचे रूप मला सोडत नाही, ते माझ्या हृदयात स्थानापन्न झाले आहेत. माझा ' मी ' मी त्यांना दिला आहे. मला हे ज्ञान वा अवतारपद काहीही नको. मला फक्त ते हवेत, या सतत विचारामुळेच ते माझ्यामध्ये भरून राहिले आहेत. हे रूप वसंतचे आहे परंतु आतमध्ये सत्यसाई भरले आहेत. स्वामी माझ्या रूपामध्ये आहेत. हे सर्व ऋषींनी माझ्या नाडीमध्ये उघड केले आहे. मी अखंड त्यांचेच चिंतन करते म्हणून मी ' ते ' झाले आहे. 
          हे ' यद् भावम् तद भवति ' आहे. हे ' विचारांचे रूप धारण करणे ' आहे. एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून आपला उजवा अंगठा दिला. त्याची संपूर्ण विद्या निरुपयोगी ठरली. त्याचप्रमाणे मी संपादन केलेले ज्ञान, प्राप्त केलेली ईशावस्था माझ्या काहीही उपयोगाचे नाही. मला ' मी ' नसल्यामुळे मला या अवस्थांची जाणीव नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ....

जय साईराम