ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प - ३१
कर्मयोग - उपाय
कर्मयोग हा कर्मकायद्याचा अनुभवसिद्ध उपाय आहे. कर्म म्हणजे काय ? आपण करीत असलेली प्रत्येक कृती म्हणजे कर्म. योग म्हणजे परमेश्वराशी जोडणे. सर्वसाधारण कृती योगात परिवर्तित करणे म्हणजे कर्मयोग. कृती योगात परिवर्तित करणे म्हणजे काय ? याचा अर्थ असा की परिणामांचे ओझे न वाहता केलेले कर्म. जेव्हा तुम्ही सर्व कर्म परमेश्वराची पूजा म्हणून कराल तेव्हाच तुम्हाला खरी मनः शांती मिळेल.
आपण स्वतःला सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठीच जन्मास आलो आहोत. सगळी कर्म योगात परिवर्तित करून आपण मुक्ती प्राप्त करू शकतो. कोण कोणाचा नातेवाईक ? कौटुंबिक जीवन हे आगगाडीच्या प्रवासाप्रमाणे आहे. प्रवासी एकमेकांशी हसत, खेळत, बोलत एकत्र प्रवास करतात; प्रत्येकाचे स्टेशन आले की ते वेगवेगळ्या मार्गांनी जातात. त्या कुटुंबात असेपर्यंत प्रत्येकाने बंधनात न अडकता आपली कर्तव्ये परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनी पार पाडावी.
सर्व नाती फसवी आहेत. फक्त परमेश्वर शाश्वत आहे. तोच आपला खराखुरा नातलग आहे. त्यालाच आपला समजून कर्म करीत राहणं हाच कर्मयोग आहे. ' कर्ता आहे ' या भावनेने केलेल्या कर्माचे पाश होतात, परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने केलेल्या कर्माचा योग होतो. अशाप्रकारे, भावना हेच बंधन किंवा मुक्तीचे कारण असते.
कर्म हा मनाचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. एकांतात मन शांत असल्यासारखे वाटते. जेव्हा आपण इतरांबरोबर काम करतो, तेव्हा लपलेले भाव उफाळून वर येतात. समोरचा माणूस आपल्या मताशी सहमत झाला नाही तर क्रोध आणि नाराजी उद्भवते. अशावेळी एकांतात अनुभवलेली शांती कुठे जाते ?
आरशात पाहताना जर आपल्याला चेहऱ्यावर काळा डाग दिसला तर स्वतःशीच आरशाचे आभार मानून,' धन्यवाद ! मी जर अशीच बाहेर गेले असते तर माझा चेहरा पाहून सर्वजण मला हसले असते.' असे पुटपुटत तोंड धुतो. त्याचप्रमाणे, जे आपले दुर्गुण दाखवतात, त्यांच्यावर आपण रागवता कामा नये, उलट त्यांचे आभार मानावेत. ' तुमचे मन शुद्ध करा, स्वतःमध्ये बदल घडवून आणा.' कुठल्याही घटना, माणसे किंवा गोष्टीत गुंतून भावनांच्या आहारी जाऊ नका. इच्छा हेच भावनांच्या उत्पत्तीचं मूळ कारण आहे. आपलं मन कुठल्याही इच्छांमध्ये गुंतू न देण्याविषयी आपण जागरूक रहायला हवे. दुसऱ्याने निदर्शनास आणलेले आपले दोष आपण मान्य करत नाही, तेव्हा आपण जन्ममृत्युच्या चक्रात अडकतो. ते मान्य करून आपण स्वतःला बदलले नाही तर आपण मुक्त कसे होणार ? एखादा आपली चूक निदर्शनास आणतो, तेव्हा आपला अहंकार ती मान्य न करता तक्रार करून भांडतो.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा