ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सूक्ष्म साई वा स्थूल साई
श्रीकृष्णाने त्याच्या वयाच्या ७५ व्या वर्षी, अर्जुनाला गीतेची शिकवण दिली जी कृष्ण लहान असताना गोपगोपिंनी आचरणात आणली होती. गीतेचा जन्म होण्याअगोदरच,त्यातील शिकवण साध्यासुध्या आणि निरक्षर गोपींनी त्यांच्या जीवनामध्ये आचरणात आणली होती. गीतेविषयी त्या अनभिज्ञ होत्या परंतु त्यांनी त्या मार्गावर वाटचाल केली आणि कृष्णभावामध्ये जीवन कसे जगावे हे दाखवून दिले. त्यांना कुटुंब होते मुलेबाळे होती,त्या सर्व घरकामही करत होत्या,दूध आणि लोणी विकण्यासाठी मथुरेला जात होत्या.
ही सर्व कामे करताना त्या सदैव कृष्णाच्या चिंतनात गढलेल्या असत. त्यांचे जीवन म्हणजे कृष्णाने शिकवलेल्या कर्मयोगाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
गोपगोपींचे जीवन म्हणजे एक जीती जागती गीता होती आणि त्यांची जीवन पद्धती म्हणजे योग होता कारण परमेश्वराच्या प्रेमामध्ये ते स्वतःला पूर्णपणे विसरून गेले होते त्यामुळे कर्मयोग, संन्यास योग, परित्याग मार्ग बनला. पूर्वीच्या काळी कृष्णाच्या सवंगड्यांनी वनात अथवा गुहेमध्ये जाऊन तप केले नाही परंतु ते सदैव कृष्णभावात जीवन जगले वृक्षवल्लीमध्येही त्यांनी कृष्णाला पाहिले.परमेश्वराला सर्वत्र पाहण्याचे त्यांना उपजत ज्ञान होते.
ते त्रिगुणातीत असल्यामुळे त्यांना त्यांच्या उच्च अवस्थेची जाणीव नव्हती. ही त्रिगुणातीत अवस्था त्यांना जन्मजात प्राप्त होती.एवढेच नव्हे तर महाज्ञानी अक्रूरालाही या साध्याभोळ्या गोपींकडून ज्ञानाचा लाभ झाला. उद्धवाने जेव्हा राधेला आणि गोपींना मोक्षाची शिकवण दिली तेव्हा त्यांनी त्याला अत्यंत सोप्या शब्दात गीतेमधील तत्त्वज्ञान सांगितले. त्या म्हणाल्या," आम्हाला मोक्ष किंवा स्वर्ग नको, कृष्णचिंतनातील दिव्य आनंद आम्हाला पुरेसा आहे." अशा तऱ्हेने गोपींनी त्यांच्या प्रेमाखातर मोक्षाचाही त्याग केला. त्यांचे जीवन म्हणजे गीतेमध्ये शिकवलेल्या त्यागाचे आणि " सर्वधर्मान्परित्यज्य " या श्लोकाचेही उदाहरण आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांनी म्हटले आहे की गोपी मुमुक्षु होत्या. मुमुक्षु सर्व तपस्वी योगी आणि जीवनमुक्तांहून श्रेष्ठ आहेत.
अशा गोपींच्या जीवनातून दर्शवली जाणारी गीता भगवानांनी अर्जुनाला शिकवली. अर्जुनामुळे अखिल जगताला गीता प्राप्त झाली. लोकांनी कृष्ण आणि गोपींच्या नात्याविषयी, चुकीच्या कल्पना केल्या आहेत. गोपी महाज्ञानी होत्या आणि देहभाव विसरून त्या दिव्य चैतन्यामध्ये समरसून गेल्या होत्या. लोकं त्यांची विशुद्ध भक्ती समजू शकत नाहीत. गोपींचे शुद्ध भाव जाणून घ्यायला हवेत. अज्ञानी लोकं रासलीलेचा गैरअर्थ लावतात. त्यांना परमेश्वरामध्येही दोष दिसतात. त्याचप्रमाणे, जे लोक देह भावामध्ये अडकलेले असतात त्यांना, प्रेम,भक्ति आणि मधुरभाव हे देहभाव आहेत असे वाटते.
स्त्री साधकांनी अत्यंत सावध आणि दक्ष राहिले पाहिजे. निरंतर साधना करून त्यांनी देहभावाच्या पलीकडे जायला हवे.साधनेविना कोणतीही गोष्ट घडणे शक्य नाही. देहभावाला जिंकल्याशिवाय मधुरभाव अशक्य आहे. ते केवळ भगवानांचे नाव कलंकित करेल. जे लोक कृष्णा विषयी वाईट बोलतात तेच आज भगवान साईकृष्णाविषयीही वाईट बोलतात.
गोपींसारखेच आपणही आपल्या भक्तीने आपल्या हृदयात राहणाऱ्या आत्मनिवासीला आपल्यासमोर साकार केले पाहिजे. हे केवळ पूर्णज्ञानाचा उदय झाल्यानंतरच शक्य होते. पूर्ण ज्ञान प्राप्त होईपर्यंत सर्व अनुभव, भ्रम म्हणजेच मनाचे खेळ असतात. आपण मनाच्या पलीकडे जायला हवे. ज्ञानाने चित्तशुद्धी होते आणि म्हणून आपले सर्व अनुभव सत्य असतात. या अवस्थेला पोहोचण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.
प्रल्हादाच्या भक्तीने भगवान विष्णूंच्या नरसिंह अवतारास
खांबामधून प्रकट होण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे गोपींच्या भक्तीने, कृष्णाला प्रत्येक गोपीसाठी प्रकट होण्यास भाग पाडले. जर त्यांनी हे केले तर आपण का करू शकत नाही? जर आपण गीतेमध्ये आखून दिलेल्या मार्गावर वाटचाल केली तर आपण हे घडवून आणू शकतो. कृष्णाने त्याचा वयाच्या ७५ व्या वर्षी गीतोपदेश केला. गोपींच्या जीवनाचे उदाहरण असलेली गीता त्याने शिकवली. गोपींचे जीवन हीच गीता बनली. कृष्ण परमात्म्याने भगवान श्री सत्यसाई बाबा म्हणून जन्म घेतला आणि आपले जीवन गीता बनून जावे यासाठी ते आपल्याला गीतेची शिकवण देत आहेत. त्यांच्या वयाच्या ७५ व्या वर्षी, भगवानांनी मला माझे जीवन म्हणून नवीन गीतेचे लेखन करण्यास सांगितले.
श्री वसंतसाई
संदर्भ - श्री वसंत साईंच्या इथेच! या क्षणी!! मुक्ती!!! भाग - ३ या पुस्तकातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा