ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
गोकुळाष्टमी संदेश
गोकुळामध्ये असताना कृष्ण आठ वर्षांचा होता आणि सर्व गोपी विवाहित असून त्या त्यांच्या पती आणि मुलांबरोबर कौटुंबिक जीवन जगत होत्या. सर्वजणी कृष्णाकडे आकर्षित झाल्याने सतत त्याच्या अवतीभवती फिरत असत. त्यावेळी कृष्ण त्यांच्याबरोबर रासलीला खेळत असे. रासलिलेच्या दरम्यान, प्रत्येकीला कृष्णाचे दर्शन, स्पर्शन आणि संभाषणाचा लाभ होत असे.
जरी कृष्ण बालक होता तरी त्या त्याच्या दिव्यत्वाकडे आकर्षित होऊन स्वतःला विसरून जात असत. कृष्ण म्हणजे मूर्तिमंत्त माधुर्य होय. हे माधुर्य मनाला भुरळ घालणारे होते. त्याच्या रूपाची मोहिनी विलक्षण होती आणि त्याचे प्रेम अतुलनीय होते. या त्याच्या गुणांवर सर्व गोपी मोहित झाल्या होत्या. गोपगोपींच्या निष्पाप, निरागसतेमुळे त्यांना कृष्णाच्या स्पर्शातून परमानंदाचा लाभ झाला जो की कृष्णाच्या राण्यांनाही मिळू शकला नाही.गोपींना देहाचे आकर्षण नव्हते तर आत्म्याचे आकर्षण होते म्हणून त्यांनी कृष्णाला आत्मनिवेदन केले. ज्यांच्यासाठी देह केंद्रस्थानी असतो त्यांना परमानंदाची अनुभूती होऊ शकत नाही. गोपगोपी कोणी सर्वसामान्य जीव नव्हते. त्यांनी पूर्वीच्या अनेक जन्मात अनेक सत्कर्म केल्यामुळे त्यांना हे सौभाग्य लाभले.
कृष्णाने वृंदावनमधील ग्रामस्थ गोपगोपींच्याद्वारे मोक्षप्राप्तीसाठी केवळ निष्पाप आणि विशुद्ध प्रेम पुरेसे आहे हे दर्शवले. त्या भोळ्या भाबड्या गोपगोपींसाठी मोक्षाची द्वारे खुली केली. राधेची मधुर भक्ती ही भक्तीच्या कोणत्याही प्रकाराहून अधिक श्रेष्ठ आहे हे कृष्णाने दाखवून दिले.
श्री वसंतसाई अम्मांच्या आनंद सूत्र या पुस्तकातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा