ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मी अनादी अजन्मा असून कुठेही गेलेलो नाही . मी तुमच्या हृदयात चितस्वरुपात स्थित असून माझे चैतन्य सदैव तुमच्या बरोबर आहे ".
बाबा
भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या ८८ व्या जन्मदिना निमित्य कमलचरणी कोटी कोटी प्रणाम.
आश्रमामध्ये एक छापील कागद सापडला . तो माझ्याकडे आणून दिला . अशाप्रकारे माझ्याकडे आलेल्या गोष्टी स्वामींनी, श्री सत्य साई बाबांनीच दिल्या आहेत असे मी मानते . त्या पेपर वर लिहिले होते .
" प्रत्येक गोष्टीला काही कारण असते . आपल्या आयुष्यात आपण जिथे कुठे आहोत . जे काही करत आहोत आणि जे काही घडत आहे त्या सर्वांमधून परमेश्वराचे प्रेम व कृपा प्रकट होते , हे जाणले पाहिजे. प्रत्येक अनुभव मग तो छोटा असो वा मोठा , आपणास काहीतरी शिकवत असतो , कोणतीही गोष्ट स्वेच्छेने घडत नसते ……"
माझ्या आयुष्यावरून याची सत्यता मला पटली . मी ज्यांना कोणाला भेटले , जे जे काही पाहिले त्या प्रत्येकातून मी काही शिकले . सर्वजण माझे गुरु आहेत. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी , गुरुदक्षिणा म्हणून वैश्विक मुक्ती द्यावी अशी मी स्वामींना विनंती केली . ' इथेच या क्षणी मुक्ती ! ' या माझ्या पहिल्या पुस्तकात स्वामींनी सांगितले आहे की आपला सभोवताल हा केवळ आपल्या स्वतःच्याच विचारांचे आणि कृतींचे प्रतिबिंब असते . जर आपण चांगले असलो तर जग चांगले दिसते . आणि जर आपण वाईट असलो तर सर्व वाईट भासते . महाभारतातील धर्मराज व दुर्योधनाच्या स्वभाव संबंधातील गोष्टीवरून हे लक्षात येते . जर आपण आपले मन शुद्ध केले तर सर्व जगही निर्मळ बनते .
जग एक शाळा आहे . इथे आपण शिकण्यासाठी आलो आहोत . आपण शिक्षण पूर्ण केले तरच आपल्याला पुनर्जन्म नाही . आपण आपले खरे स्वरूप जाणल्या नंतरच शिक्षण पूर्ण होते . आपण देह नसून आत्मा आहोत , वैश्विक स्वरूपाचा एक वंश आहोत . हे जाणल्या नंतर आत्मा परमात्म्यात विलीन होईल व आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही .
जगामध्ये वावरणे हीच एक परीक्षा
आहे . परीक्षा कशी ? परीक्षेत पास होवो या नापास परंतु सर्वकाही शांतपणे व
समतोल वृत्तीने मान्य करायला हवे . जर आपण आपली सर्व कर्म प्रभूला
केंद्रबिंदू ठरवून केली तर आपण सर्वांकडे आत्म्याचे, अंतर्यामीचे
प्रतिबिंब या दृष्टीनेच पाहू . मी अशा प्रकारे जीवन जगले . माझ्या जीवनाचा
प्रत्येक क्षण परमेश्वरावर केंद्रित होता .प्रभू माझ्या जीवनाचे केंद्रस्थान आहे . अशा अवस्थेतील माझे अनुभव मी कविता व काव्यांमधून शब्दबद्ध केले आहेत . मला आलेल्या अनुभवांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारी अनेक पत्रे मी त्याला लिहिली आहेत . क्षणाक्षणाला मी भगवंताची अनुभूती घेते . असे आहे माझे जीवन .
युवावस्थेत मी ' भक्त विजयम् ' या पुस्तकात पांडुरंगाच्या भक्तांच्या गोष्टी वाचल्या . त्यांच्याप्रमाणे प्रभूंनी मलाही नेहमी मदत करावी अशी मी प्रार्थना करत असे . घरकामात मदतीसाठी गडीमाणसं नसली की मी प्रभूंची आठवण करत असे आणि लगेचच कोणीतरी माझ्या मदतीला येत असे . मी हे काव्यात लिहिले होते .
बांधायचे असेल धेनूस दोरखंडाने मज जरी
येईल तो अन्य रुपात अन बांधेल धेनूस
पीठ इडलीचे दळण्या साहाय्य हवे असेल मज जरी
येऊन वेगळ्या रुपात तो सहाय्य मज करी
शोधिले मी ज्या परमेशास , मूलस्त्रोतास ,
आला शोधीत मज तो ईश
दररोज धावूनी येतो सहाय्यास
कसे सांगू मी हे तुम्हास ?
त्या काळी विद्युत उपकरणे नसल्यामुळे इडली पीठ रगड्यात वाटावे लागे . एखाद्या दिवशी ते करण्यासाठी कोणी आले नाही तर मी स्वामींना प्रार्थना करत असे आणि लगेचच पीठ वाटून देण्यासाठी गावातून कोणीतरी येत असे . तसेच गायीला बांधलेला दोर सुटला असेल तर मी विचार करे ' अरे गाईला बांधायला कोणीच नाही ' लगेचच कोणीतरी येऊन गाय बांधून देत असे . अशा रीतीने मी ज्याला शोधत होते तो प्रभू , माझ्या शोधात येऊन हर प्रकारे मला मदत करत असे . अनेक काव्यांमधून आणि पत्रांमधून मी माझी कृतज्ञता व्यक्त केली आहे . क्षणोक्षणी जर आपण अशी प्रार्थना केली तर अनेक चमत्कार घडतात ! आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वराची अनुभूती मिळते .
जीवनाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपण स्वामींच्या शिकवणीनुसार वागायला हवे . चराचरात परमेश्वर आहे हे जाणायला हवे . एखाद्या व्यक्तीचे गुण आणि स्वभाव यामुळे त्याच्यातील अंतर्यामीकडे पाहताना मनाला विचलित होऊ देऊ नये . आपण कोठेही राहत असलो तरी आपला इंद्रियं आणि मन यावर ताबा असणे अत्यंत महत्वाचे आहे . हे जर आपण केले नाही तर परमेश्वराला जाणण्याचे आपले प्रयत्न व्यर्थ ठरतील .
परमेश्वर धरतीवर आला व त्याने दररोज आपल्याला शिकवले . स्वामींप्रमाणे पूर्वीच्या कोणत्या अवताराने धरतीवर येऊन सर्वसामान्य लोकांमध्ये वावरणे, सर्वांशी संभाषण करणे, त्यांना मार्गदर्शन करणे असे केले आहे का ? किती वर्षे ? किती प्रवचने ? सर्वांना सुमार्ग दाखवण्यासाठी स्वामींनी किती लिहिले . असे पूर्वी कधी कोठे घडले आहे का ? आजवर जगात कधीही न घडलेले हे एक महान आश्चर्य आहे . भगवंतांच्या करुणेचा हा पुरावा आहे . गीतेत श्रीकृष्ण म्हणतात :-
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिरभवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे
हे भारता ! जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हाच मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.
सज्जनांच्या उद्धारासाठी , पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो .
हेच भगवान श्रीकृष्ण सांगतात . यासाठीच आता त्यांनी जन्म घेतला आहे . प्रेमाच्या अभावामुळे धर्माचे अधःपतन झाले आहे . यासाठी स्वामी आले आणि त्यांनी प्रेमाची शिकवण दिली . स्वामींनी ८४ वर्षे अविरत प्रेमाची शिकवण दिली . मानवात परिवर्तन घडण्यासाठी ते आले . स्वामी परमेश्वर आहेत यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी आणि त्यांच्यामुळे ज्यांचे जीवन सार्थ बनले आहे , त्यांनी प्रतीज्ञा करावी .
" मी माझ्या जीवनात स्वामींच्या किमान एका शिकवणीचे पालन करेन ".
मनुष्याने परमेश्वराप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी . किती विद्यार्थी , शिक्षक, सर्वसामान्य लोक आणि आश्रमातील लोक स्वामींमुळे लाभान्वित झाले आहेत ? जर त्या सर्वांनी प्रतिज्ञा केली तर विचार करा , स्वामींना किती आनंद होईल ! जगातील सर्वांना माझी विनंती आहे , आता आजपासून उर्वरित जीवनामध्ये स्वामींची किमान एक शिकवण आचरणात आणण्याची प्रतिज्ञा करा . आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हाच एक मार्ग आहे .
काही दिवसांपूर्वी स्वामींच्या ' चिन्न कथा ' पुस्तकात मी एक गोष्ट वाचली . मी जे तुम्हाला सांगते आहे , तेच त्या गोष्टीमधून सांगितले आहे .
एक चोर एकदा एका आश्रमात गेला . त्याने तेथील गुरूंना आध्यात्मिक मार्गासाठी दीक्षा देण्याची विनंती केली . गुरूंनी प्रथम त्याला चोरी करणे सोडून देण्यास सांगितले परंतु चोर म्हणाला की तोच त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे . त्यावर गुरु म्हणाले , " तू निदान एक दुर्गुणाचा त्याग कर ". चोराने ते मान्य केले . व यापुढे तो खोट बोलणार नाही नेहमी खरेच बोलेल असे वचन दिले . त्या रात्री जेव्हा तो चोरी करण्यासाठी राजाच्या महालामध्ये गेला तेव्हा गच्चीवर त्याला एक माणूस भेटला . तोही चोर असल्याचे त्याने सांगितले. त्या दोघांनी मिळून तिजोरी उघडली आणि त्यातील हिरे दोघात वाटून घेतले .
ती दुसरी व्यक्ति म्हणजे खुद्द राजाच होता . त्यानेच चोराचे सोंग घेतले होते . तिजोरीच्या चाब्या कोठे होत्या हे त्याला ठाऊक होते . राजाने व चोराने मिळून तिजोरी उघडली व संपत्तीची वाटणी केली . शेवटी तीन हिरे उरले . चोराने राजास सांगितले आपण एक हिरा घेऊन उरलेला एक हिरा राजासाठी तिजोरितच ठेऊन देऊ या . राजाने ते मान्य केले व चोरास त्याचा पत्ता विचारला म्हणजे तो त्याच्या घरी त्याला भेटायला येईल . चोराने आपला पत्ता सांगितला . दुसऱ्या दिवशी सकाळी खजिना लुटल्याचे लक्षात आले .
किती नुकसान झाले हे पाहण्यासाठी मंत्र्यास पाठवण्यात आले मंत्र्याने तिजोरीची पाहणी केली त्याला चोरांनी ठेवलेला तो हिरा सापडला . त्याने गुपचूप तो स्वतःच्या खिशामध्ये ठेवला व तिजोरी पूर्ण रिकामी असल्याचे राजाला सांगितले . आदल्या रात्री संपत्तीची वाटणी करतांना राजाने त्या इमानदार चोराचा पत्ता विचारला होता . त्याने त्याला बोलावून घेतले जेव्हा तो दरबारात राजापुढे उभा राहीला तेव्हा त्याने कबुल केले की त्याने चोरी केली परंतु एक हिरा तिजोरीत ठेवला होता . राजाने शिपायांना मंत्र्याची झडती घेण्यास सांगितले . त्यांना त्याच्या खिशात तो हिरा सापडला . राजाने मंत्र्यास तुरुंगात टाकले . आणि इमानी चोरास मंत्रीपद दिले . चोरास आता चोरी करण्याची आवश्यकताच उरली नाही. चोर गुरूंकडे गेला त्याने त्यांच्या पायाशी लोटांगण घातले.
…
त्या चोराप्रमाणे , शपथ घ्या की तुम्ही जीवनामध्ये स्वामींच्या एका तरी शिकवणीचे पालन कराल . चोराने खरे बोलण्याची शपथ घेतली आणि राजाचा मंत्री झाला . तुम्ही जर त्याप्रमाणे केलेत तर तुमचे कल्याण होईल . तुम्हाला मान मरातव प्राप्त होईल आणि जन्म मृत्युच्या चक्रातून तुमची सुटका होईल . म्हणून स्वामींकडे येऊन लाभान्वित झालेल्या सर्वांना मी शपथ घेण्याची विनंती करते .
जगात लक्षावधी लोकं स्वामींमुळे लाभान्वित झाले आहेत . हजारो विद्यार्थी स्वामींच्या संस्थेतून शिकले आहेत . या सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामींच्या शिकवणीतील एक तरी शिकवण आचरणात आणावी . काहीजण अगोदरच याचे पालन करत असतील तर त्यांनी स्वामींची अजून एखादी शिकवण आचरणात आणावी .
स्वामींनी कित्येक लोकांचे संकटांपासून , दुर्घटनांपासून संरक्षण केले आहे . ज्यांनी याचा अनुभव घेतला आहे त्यांनी कृतज्ञता म्हणून स्वामींची एक शिकवण आचरणात आणावी . तुमच्या अशा आचरणाने स्वामी खुष होतील . त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा , इतके पुरेसे आहे . अशी माझी सर्वांना कळकळीची , नम्र विनंती आहे . मी तुमच्या पुढे पदर पसरते . सर्वांनी आत्मपरिवर्तनाची शपथ घ्या . एका सदगुणाचे आचरण करा . ह्याने स्वामींना आनंद होईल आणि ते लवकर परत येतील .
श्री वसंत साई