शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

                                                                                    ओम श्री साई राम
                                     पुष्प चौथे  पुढे सुरु


७) जन्मभूमी - काही जणांना त्यांच्या जन्मभूमीचा आणि वंशाचा अहंकार असतो. हा ही अत्यंत घातक आहे . आपण एक उदाहरण पाहू. यादवांना कृष्ण त्यांच्या वंशात जन्मला याचा अति अहंकार होता . एकदा त्यांच्या जवळ राहणाऱ्या काही ऋषींची परीक्षा घेण्याचे त्यांनी ठरवले . त्यांच्या मध्ये कृष्ण आणि जांबवतीचा पुत्र सांभाही होता . इतर मुलांनी त्याला गर्भवती स्त्रीची वेशभूषा करुन त्या ऋषींसमोर नेले आणि त्यांना विचारले , " हे ऋषीवर कृपया या मुलीला पुत्र वा कन्या होईल हे सांगावे ". ऋषी म्हणाले , " हीच्या पोटी  लोहाचे  मुसळ जन्माला येईल आणि तुमच्या संपूर्ण वंशाचा नाश करेल ". तात्काळ लोखंडाचे मुसळ प्रसवले . त्या मुलांनी त्या मुसळाची कुटून कुटून भुकटी केली आणि सागरामध्ये फेकून दिली . त्याचा एक छोटा भाग राहिला . ज्याची ते भुकटी  करू शकले नाहीत . तो ही त्यांनी समुद्रात फेकून दिला . ती भुकटी पाण्यात विरघळून गेली . या पाण्यातून समुद्रकिनारी गवत उगवले . 
            एक दिवस समुद्र किनारी एक उत्सव साजरा केला जात होता . सर्वजण मदयपान करत होते , नाचत होते , गात होते . बेधुंद  होऊन ते एकमेकांशी भांडू लागले . किनाऱ्यावरील गवत उपटून एकमेकांना त्या लोहासारख्या गवताने मारू लागले  . अखेरीस सर्वजण मृत्यू पावले . अशा प्रकारे ऋषींच्या शापाने संपूर्ण यादव कुळ नष्ट झाले . हा कुळाचा अहंकार आहे . त्यांच्या अहंकारामुळे त्यांनी ऋषींचा उपमर्द केला. त्याचे पर्यवसन त्यांच्या कुळसंहारात झाले . ऋषींना भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही कालाचे ज्ञान असते . त्या मुलांना हे माहित नव्हते का ? त्यांनी कृष्ण पुत्र सांभाला   स्त्रीची  वेशभूषा करवुन   तो  प्रश्न का विचारला . कारण त्यांना कृष्णाच्या  कुळात जन्म घेतल्याचा अहंकार   झाला  होता . तो अहंकारच  त्यांच्या  बोलविता  धनी  झाला . अखेरीस संपूर्ण कुळाचा नाश झाला . द्वारका नगरी ही समुद्र तळाशी समाधिस्थ  झाली . 
८) अध्यात्म मार्गातील व्रतवैकल्य पूर्ती - अध्यात्म मार्गावर वाटचाल करतांना आपण जी साधना करतो त्या साधनेचाही आपल्याला अहंकार होऊ शकतो . हा अहंकारही घातक असतो . आपल्याला वाटते , " आपण या मार्गावर महान व्रत वैकल्ये, तप करत आहोत " अनेक जण  असा विचार करून आश्रम स्थापन करतात आणि अनुशासक बनतात . ह्या तपपूर्तीच्या अहंकारातही प्रयत्न पूर्वक दूर सारायला हवे . आपण एक उदाहरण  पाहू या .
            एकदा अंबरीश राजाचा एकादशीचा उपवास होता . उपवास सोडण्याची शुभ वेळ झाल्याचे सांगून पंडीतांनी त्यांना सोडण्यास सांगितला  . तत्पूर्वी दुर्वास ऋषी राजाकडे येऊन त्याला सांगतात की ते स्नान करून पुन्हा तेथे येतील . उपवास सोडण्याची शुभ वेळ झाल्याने पंडीत राजाला उपवास सोडण्याची विनंती करतात . म्हणून तो थोडेसे जलप्राशन करतो . हे ऐकून दुर्वास अत्यंत क्रोधीत होतात आणि राजाला शाप देतात . तात्काळ विष्णूचे  सुदर्शन चक्र तेथे येऊन दुर्वासांचा पाठलाग करते . ते धावत धावत विष्णू कडे जातात . विष्णू त्यांना सांगतात , " तू अंबरीश राजाकडे जा तोच तुला यातून वाचवू शकेल ". त्या प्रमाणे ते अंबरीश राजाकडे जातात.  अंबरीशाने चक्राला प्रार्थना करताच ते अदृश्य होते . 
          या कथेतून दुर्वासांचा आध्यात्मिक अहंकार दिसून येतो . आपण आपल्या अंतिम श्वासापर्यंत साधना केली पाहिजे . हे खरे तप आहे . एकदा गांधीजी म्हणाले," आता मला महात्मा म्हणू नका . जर एखाद्या व्यक्तीने माझ्यासमोर येऊन माझ्यावर गोळी झाडली आणि तरीही मी त्याचा राग न  मानता रामनाम जपत राहिलो तर तुम्ही मला महात्मा म्हणू शकता ". आध्यात्मिक साधनेत विनम्रता आणि साधेपणाला अतिशय महत्व आहे  . अहंकार मनुष्याचा निःपात करतो . 
          अहंकाराच्या  आवरणाने आत्मस्वरूप म्हणजेच परमेश्वर झाकले जाते . परमेश्वर आणि आत्मा एकच आहे . स्वामींनी या अष्टाहंकाराविषयी लिहिले आहे . 

जय साई राम 
व्ही. एस.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा