गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " योग म्हणजे परमेश्वराशी ऐक्य , दिवसाचे २४ तास ईश्वर चिंतन " . 

पुष्प अकरावे पुढे सुरु

*  आत्मनिवेदन :- प्रल्हादाचा नातू बळी जो परमेश्वराशी शरणागत होतो तो याचे उदाहरण आहे . त्याने त्याचे सर्व परमेश्वरचरणी अर्पण करून जीवनाचे सार्थक केले . तो प्रभूचा निःस्सीम भक्त होता . प्रभूला स्वतःचे शरीर अर्पण करून पाताळलोकांत जाण्यासही  त्याची तयारी होती . परमेश्वरी कृपा संपादन करण्यासाठी कोणताही त्याग त्याच्या दृष्टीने मोठा नव्हता .
           सर्वजण आत्मनिवेदन करतात , परंतु मला शरीर निवेदन करायचे आहे . यापूर्वी जगातील कोणीही शरीर निवेदन केलेले नाही . मी परमेश्वराला देह समर्पित केल्यानंतरच सत्ययुग येईल . त्यानंतर माझा देह विस्तार पावत नवनिर्मिती होईल . स्वामी माझ्याद्वारे हे अवतारकार्य करत आहेत . 
           माझी काया पृथ्वी व निर्मितीच्या रुपात विस्तार पावेल . हे वसंतमयम आहे . हनुमानाने रामाचे नाम लिहिल्यामुळे लंकेचा सेतू तयार झाला . मी माझ्या पूर्ण देहावर ' ॐ साईराम ' लिहिते.  सर्वांमध्ये वावरण्यासाठी हा देह पृथ्वी रूप धारण करील .  मी प्रत्येक व्यक्तीत व प्रत्येक गोष्टीत स्वामींना पाहते . मी म्हणते की सर्व माझे गुरु आहेत.   मी सर्वांकडून अमूल्य धडे घेतले.   कृतज्ञतेपोटी त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी मी वैश्विक मुक्ती मागितली.   मी सर्वांच्या चरणांना वंदन करून सर्वांच्या चरणांची धूळ बनले.   मी केवळ स्वामींच्या चरणाखालची धूळ नव्हे तर सर्वांच्या चरणांखालची धूळ आहे.  अशा तऱ्हेने विस्तार पावून मी सर्वांना वावरण्यासाठी पृथ्वी बनले.   लोक हो ! मायेतून , भ्रमातून जागे व्हा.   भक्तीचा कोणताही मार्ग निवडा आणि परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करा.  तुम्ही खात्रीने स्वामींची कृपा संपादन कराल.  
जय साई राम 
V S

       नवविधा भक्ती मार्ग 


१) श्रवण - परमेश्वराच्या महिम्याचे श्रवण. 
२) कीर्तन - परमेश्वराचे गुणगान  .
३) विष्णुस्मरण - परमेश्वराचे अखंड नामस्मरण.
४) पादसेवन - भगवंताच्या पदकमलांची  सेवा .
५) अर्चना - परमेश्वराची पूजा  .
६) वंदना - नतमस्तक होऊन परमेश्वराला वंदन करणे.
७) दास्य - स्वतःस परमेश्वराचा सेवक मानणे. 
८) सख्य - परमेश्वराला सच्चा मित्र  मानणे.  
९) आत्मनिवेदन - संपूर्ण शरणागती.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा