बुधवार, २६ फेब्रुवारी, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " तुम्हाला मृत्यु कसा येतो त्यावरून तुम्ही कशाप्रकारे जीवन जगलात हे निर्देशित होते ".
व्ही. एस.


    महाशिवरात्रीचे महत्व
   
१९९६ साली महाशिवरात्रीनिमित्य स्वामींनी दिलेल्या दिव्य प्रवचनामधून


        शिवरात्र ही एक मंगल रात्र आहे . मनुष्याला अमर्याद शक्तिची ईश्वरदत्त देणगी मिळालेली आहे . पाहणे, ऐकणे याद्वारे तुम्ही जे काही अनुभवता ते तुमच्या अंतर्मनातील प्रतिबिंब असते . या अनुभवांच्या अर्थाचा बोध करून घेतला पाहिजे . उदा. आज शिवरात्र आहे . तुम्ही रोजच रात्र अनुभवता त्या सामान्य रात्री आहेत .काळोख्या रात्री आहेत . परंतु शिवरात्र मंगल रात्र आहे . कशी काय ? मनाला १६ कला असतात . चंद्र  ही मनाची अधिष्ठात्री देवता आहे .आज चंद्राची१४ वी कला आहे .या दिवशी मनावर पूर्ण नियंत्रण  मिळवणे शक्य आहे .म्हणून हा मंगल दिन समजला जातो . 
           मनाला  ईश्वराभिमुख करणे ही मंगलता आहे . मनुष्यामध्ये अनुवंशिकतेने आलेल्या पशुवृत्तीमधून मुक्त होण्यासाठी याची आवश्यकता आहे . सर्व प्राणीमात्रांमध्ये विद्यमान असलेले आत्मतत्व ओळखण्याची हीच शुभघडी आहे . कोणत्याही व्यक्तीचा तुम्ही केलेला आदर वा अनादर परमेश्वराचाच आदर वा अनादर ठरतो . ' सर्वांना मदत करा , कोणालाही दुखवू नका ' हे  तत्व आचरणात आणा. 
            प्रत्येक मनुष्यामध्ये त्याच्यातील शिवत्वावर आधारित सद्गुण असतात .  मनुष्याचा देह जरी पंचतत्वाने बनलेला असला तरी मनुष्याने त्याच्यातील आत्मतत्व ओळखले पाहिजे . त्यायोगे मानवत्व दिव्यत्वामध्ये परिवर्तित होईल . धर्माचे अनुसरण करणे हा मनुष्य जन्माचा उद्देश आहे . धर्म , विचार , उच्चार आणि आचार यांच्यातील सुसूत्रता सूचित करतो . जेव्हा प्रत्येक मनुष्याला त्याच्या  मुलभूत दिव्यत्वाचा साक्षात्कार होईल तेव्हा संपूर्ण  विश्वामध्ये परिवर्तन घडेल  .  देह आणि मन ही निव्वळ साधने आहेत . आत्मा ही मनुष्याची वास्तविकता आहे . मनुष्याने त्याला दिलेल्या साधनांचा उपयोग करून व्यवस्थितपणे त्याची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत आणि परमेश्वराशी असलेले ऐक्य जाणले पाहिजे . 
बाबा 

जय साई राम 

1 टिप्पणी: