गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

         " भौतिक कल्पना आणि ज्ञान तोडून प्रत्येक गोष्ट दिव्य ज्ञानाशी जोडल्यास तुम्हाला परमेश्वराच्या वैश्विक रूपाचे दर्शन होईल."

पुष्प ४६ पुढे सुरु 

                मनात उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक इच्छेच्या बाबतीत अशा तऱ्हेने चिंतन करूनच इच्छा पूर्ती करावी. ज्या इच्छांशिवाय आपण जगू शकत नाही अशा जीवनावश्यक गोष्टींनाच पसंती द्यावी. एवढा ताबा तुमच्या मनावर असायला पाहिजे. सतत चिंतन करत प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवावे. वासनांचे मूळ कारण नेत्र आहेत. देवलोकांत सुखच सुख आहे. स्वर्गीय जीव सदैव नृत्य, संगीत व अशाच इतर सुखांमध्ये रंगलेले असतात. म्हणून जे काही दृष्टीस पडते व आवडते त्याची तुलना स्वामी देवलोकाशी करतात. 
              यक्ष लोक :  गंधर्व लोकानंतर येतो यक्ष लोक. हा जिव्हेशी संलग्न असतो. यक्ष लोक अपार धन संपदा असलेले कुबेराचे विश्व आहे. मानवाला कुबेर होण्याची इच्छा असते ! जिव्हा ही कुबेरलोकांसारखी आहे. जिभेला विविध चवींचे पदार्थ खाण्याची तसेच जगातील प्रत्येक पदार्थांची चव घेण्याची इच्छा असते. खाण्याविषयीचे नुसते बोलणे ऐकल्यावर त्यांच्या तोंडाला पाणी सुटते, तो पदार्थ खाण्याची इच्छा जागृत होते. म्हणून स्वामी जिव्हेची तुलना यक्षलोकाबरोबर करतात. मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत जिभेचे चोचले पुरविण्यात आयुष्य खर्ची घालतो, जीवन खाण्यापिण्यात व्यतीत करतो. जिभेवर ताबा ठेवणारा खरा योगी ! एकदा एका गुरूंनी त्यांच्या शिष्याच्या जिभेवर साखर ठेवली. ती विरघळली नाही ! तशीच राहिली. हे जिव्हेचे नियंत्रण आहे. साखरेचे नाव घेताक्षणी साधारण माणसाच्या तोंडाला पाणी सुटते. जिभेचा दुसरा गुण बोलणे होय. वाचेवर ताबा ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. मानवाने केवळ सत्य तसेच परमेश्वराविषयी बोलावे. आपल्याला जिव्हा देण्याचे कारण हे आहे. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम    

रविवार, २७ डिसेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

             " ' अहम् ब्रम्हास्मि ' मी परमेश्वर आहे हे सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवे."

पुष्प ४६ पुढे सुरु 

                    सात अधोभुवने म्हणजे पाताळ लोक. ही भुवने देहात उदर व जननेंद्रिये यांच्या मध्यभागी स्थित आहेत. उदराच्या वरील भागात असलेले सप्तलोक पाच इंद्रिये खुणावतात. इंद्रियदमन करून आपण आनंददायी उच्च लोक प्राप्त करू शकतो. 
                  वैकुंठाचे प्रतिनिधित्व करणारा गरुड लोक सर्वोच्च आहे. गरुड लोकाशी जोडलेली नासिका वासनांचे जन्मस्थान आहे. वासना म्हणजे उपभोग. वासना जन्मानुजन्म आपला पिच्छा सोडत नाहीत. आपण जन्मोजन्मी जे काही अनुभवतो ते अव्याहत चालू राहते. अनुभव घेण्याने वासना आपला पिच्छा पुरवितात. प्रत्येक जन्मात त्या आपल्याला चिकटतात. मनातील खोल ठसे म्हणजे वासना. आपण हे ठसे पुसून टाकायचा मनःपूर्वक प्रयत्न केला तर वासना आपोआप कमी होतील. इच्छांवर ताबा ठेवला तर वासनांचा क्षय होऊन आपल्याला गरुड लोक प्राप्त होऊ शकतो. 
                     आता, नेत्रांशी संलग्न असलेला गंधर्व लोक पाहू. हा देवलोकाचा एक भाग आहे. इथे सदैव संगीत व नृत्य चालते. ही डोळ्यांसाठी मेजवानीच. डोळे जे काही पाहतात ते अनुभवण्याची इच्छा निर्माण होते. हा गंधर्व लोक आहे. स्वामींनी सांगितलेली एक गोष्ट इथे अनुरूप आहे. वासना निर्माण झाल्याबरोबर कृती करू नका. प्रथम, खरंच कृतीची गरज आहे का, यावर चिंतन करा. चिंतनानंतरही ती इच्छा डोकं वर काढत असेल तर ती माझ्या जीवनासाठी खरंच आवश्यक आहे कां यावर पुन्हा चिंतन करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम 

गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" तुमचे भाव तुम्हाला जन्म, नाम आणि रूप देतात."

वसंतामृतमाला 
पुष्प ४६ 

मानवी देहात १४ भुवने 

  
               स्वामींनी एका छोट्याशा कागदाच्या तुकड्यावर मोठ्या अक्षरात T K 14असे लिहिले. मी याविषयी स्वामींना विचारले, ते म्हणाले," कली बदलला की १४ भुवने बदलतील." स्वामी येतील, मला बोलावतील व नंतर कली बदलण्यास सुरुवात होईल. आमचे भाव सर्वांमध्ये प्रवेशित झाल्यानंतर सर्वकाही बदलेल. १४ भुवने म्हणजे काय ? ती कशी बंर  बदलतील? हे आपण आता पाहू. मानवी देहात सात ऊर्ध्व भुवने व सात अधो भुवने अशी १४ भुवने विद्यमान आहेत. आता आपण ऊर्ध्व भुवनांविषयी पाहू. 
सात ऊर्ध्व लोक ( देव लोक ) 
           गरुड लोक                   नासिका 
२,३         गंधर्व लोक                   नेत्र 
४            यक्ष ( कुबेर) लोक          जिव्हा 
५,६         किन्नर लोक                 कर्णेनद्रिये 
           किंपुरुष लोक                त्वचा 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २० डिसेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

      " सर्वकाही परमेश्वर आहे असे मानून आपण आपल्या प्रेमाची कक्षा रुंदावली पाहिजे."

पुष्प ४५ पुढे सुरु 

१० जून २०१३ प्रातर्ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही ' अमर पिस्ता ' हे काय बरं लिहिले आहे ? 
स्वामी - सत्ययुगात सर्वजण अमर असतील, आणि सुखी, आनंदी व निरामय जीवन जगतील. 
वसंता - आता मला समजले स्वामी. 
ध्यान समाप्त 
                 सत्ययुगात सर्वजण जीवनमुक्त असून सर्व आनंदी व निरामय जीवन जगतील. हा संस्मरणीय, सदाहरित  दिवस आहे. हा कोणता दिवस आहे ?स्वामींनी हे काल  लिहिले. तो स्वामींच्या आगमनाचा दिवस आहे कां ? नाही, नाही ! कितीही युगे येवोत, हा दिवस सर्वांसाठी संस्मरणीय असेल ! जागे व्हा ! आता माया व देहभाव पुरे ! देहभान विसरून आत्मभान येवो. सर्वांमध्ये एक सर्वव्याप्त आत्मा आहे. सत्याचे दरवाजे खुले आहेत. स्वामी तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. जे कोणी हे वाचतील त्यांना स्वामींची कृपा प्राप्त होवो.

जय साईराम 

व्ही. एस.  


गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " नाम रूप रहित असलेले एकतत्व सत्यस्वरुप होऊन सर्वांना व्यापून टाकते." 

पुष्प ४५ पुढे सुरु 

                   स्वामींनी व मी सर्वांना जीवनमुक्त अवस्था प्रदान करण्याचे मुल्य फेडणे भाग आहे. जीझसचा देह क्रूसावर चढविण्यात आला, त्याप्रमाणेच स्वामींचा व माझा देह ह्या अष्टकोनी चक्रावर चढविण्यात आला आहे. हे वैश्विक कर्मचक्र स्वामींचा व माझा देह घायाळ करते. धर्मचक्र भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. तथापि कलियुगात जगातील सर्वजण अधर्मचक्र झालेत. स्वामी व मी ह्या अधर्मचक्राची कर्मे वाहत आहोत. नंतर आम्ही सर्वांना मुक्ती प्रदान करू. सर्वजण जीवनमुक्त होतील. जगामध्ये सत्ययुग स्थापित होईल.
                     स्वामींनी १ ऑगस्ट १९९६ रोजी दिलेल्या प्रवचनातील काही मजकूर मी आज जून महिन्याच्या सनातन सारथीमध्ये वाचला. त्यात स्वामी दोन प्रकारच्या मुक्तींविषयी बोलतात. 'जीवन मुक्ती व विदेह मुक्ती.' जीवन मुक्तांचे मन सदैव ईश्वराभिमुख असते. सभोवताली घडणाऱ्या घटनांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. सर्वजण एक आहेत. असा त्यांचा भाव असतो. ही जीवनमुक्त अवस्था आहे, ह्याला देहभान असते तर विदेह मुक्तास देहभान नसते; म्हणून तो विदेह. राजा जनक हे याचे उत्तम उदाहरण आहे असे स्वामी म्हणतात. 
९ जून २०१३; प्रातःध्यान 
वसंता - स्वामी, प्लीज मला विदेह मुक्ती द्या. मी सतत शरीराचा विचार करत असते. 
स्वामी - तू विदेहमुक्त आहेस. या जगात तूच एकटी विदेहमुक्त आहेस . तू जगास विदेही अवस्था दर्शवितेस. तू जे करतेस ते कोणीही करू शकत नाही. 
वसंता - असे आहे तर मग सदैव देहभान कां ? शरीरभर वेदना कां ?
स्वामी - हे वैश्विक मुक्तीसाठी आहे. वैश्विक मुक्तीकरिता तू तुझे शरीर अर्पण केले आहेस. तुझा देह वैश्विक र्मांप्रीत्यर्थ आहे. 
ध्यान समाप्त 
                  आता आपण ह्याविषयी पाहू. मला बालपणापासून देहभाव नव्हता, तसेच तहानभूकेची जाणीवही नव्हती. हे कसे बरे ? या जगात मी प्रथमच जन्म घेतला आहे. मी देही नाही; मला ' मी ' नाही. जेथे ' मी ' असतो तेथे देहाविषयी विचार असतात. माझ्या मनात अन्य कोणतेही विचार नसून फक्त स्वामींविषयीचे विचार असतात. अंतिम घडीला माझी काया ज्योतीमध्ये परिवर्तित होऊन स्वामींच्या देहात विलीन होईल. माझा देह त्यांना समर्पित व्हावा अशी मी प्रार्थना करते. माझे शरीर वैश्विक कर्मांकरिता अर्पण केला. माझ्या साधनेद्वारे मला नवीन देह प्राप्त होईल, तो मी स्वामींना समर्पित करीन. आजवर या जगात असे कोणीही नाही. युगानुयुगे घोषित करणारी ' लोका समस्ता सुखिनो भवन्तु ' ही प्रार्थना मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष उतरविली. स्वामी, हा महामहीम अवतार हे दर्शविण्यासाठीच येथे आले. लोका समस्ता सुखिनो भवन्तुचा खरा अर्थ सांगून त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. जगाची अवघी कर्मे स्वतःवर घेऊन त्यांनी देह त्याग केला. ते आता नवीन देहात येत आहेत. 
                     हा देह स्वामींना अर्पण करावा ही माझी इच्छा, परंतु मी तो वैश्विक कर्मांप्रीत्यर्थ समर्पित केला. जगाला समर्पित झालेल्या या शरीराच्या कर्मांचा अंत झाल्यानंतरच ते नूतन देहात परिवर्तित होईल. माझ्या इच्छेनुसार तरुण, सुंदर, सुकुमार आणि अक्षत असेल. ही काया मी स्वामींना अर्पण करेन. ही विदेह मुक्ती आहे. सर्वांना जीवनमुक्त अवस्था प्रदान करण्यासाठी मी विदेहमुक्त अवस्थेत आहे. तुम्ही तुमचा देह इच्छा आकांक्षांना समर्पित करता. इच्छा तृप्तीसाठी तुम्ही अपार कष्ट घेत, तुमची प्रचंड शक्ती व जीवप्रवाह खर्ची घालता. तरीसुद्धा तुमच्या काही इच्छांची पूर्ती होत नाही, तुमचा देह अग्नीच्या स्वाधीन होतो. त्यांनतर पुन्हा जन्म घेऊन अतृप्त इच्छांच्या पूर्तीसाठी तुम्ही तुमचा देह परत समर्पित करता. प्रत्येक जन्माबरोबर एक नवीन देह येतो. माझे शरीर मी विश्वकल्याणासाठी समर्पित केले आहे. हे शरीर नूतन देहात परिवर्तित  होईल. म्हणून म्हणते हे पुन्हा पुन्हा नवीन जन्म घेणे पुरे झाले ! देहाबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे ही प्राप्त होते हे जाणून घ्या ! 
                  काल अमर सगळीकडे दिव्य टपाल शोधत होता. ' शुद्ध सत्व ' इमारतीच्या मागे एक मोठी भिंत आहे. त्या भिंतीवर लाल रंगाच्या चौकोनात काहीतरी लिहिल्याचे त्याने पाहिले. त्याने तेथील कामगारांकडे तो मजकुर दाखवून विचारले. त्यांनी त्याला सांगितले की तो तमिळ मजकूर होता व त्याचा अर्थ ' अमर पिस्ता '. आम्ही त्याचा फोटो काढला आणि ' पिस्ता ' या शब्दातून स्वामींना काय सांगायचे आहे याचा इंटरनेटवर शोध घेतला.  


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम     

रविवार, १३ डिसेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आहे. अशी कोणतीही जागा नाही जेथे तो नाही. "

पुष्प ४५ पुढे सुरु 

                   स्वामी येतील आणि समस्त निर्मिती होतील. सर्वव्यापी नेत्र हे दर्शवितात. हृदयाच्या बाजूला असलेले दोन नेत्र स्वामींचा निर्देश करतात, व बाकीचे निर्मितीचा. यामधून ते त्यांचे पुनरागमन सुनिश्चित करतात. 
                   काही दिवसांपूर्वी स्वामींनी एक गोल पेपर प्लेट दिली. त्याच्या पृष्ठभागावर आठ पत्यांचा अष्टकोन होता. मध्यभागी असलेल्या गुलाबाच्या फुलाला एक पान होते. बाजूला दोन व तिन अशी पाच पाने होती. पुढे एक फुलपाखरू होते. 
                   हे पाहून मला संत कॅथरीनच्या जीवनाची आठवण झाली. पात्यांनी बनविलेल्या अष्टकोनी चक्रावर खिळे ठोकून गजाने तिची हत्या केली. केशरी गुलाब स्वामींचा निर्देश करते. आदिमूलम् एक आहे. ते स्वतःला दोघांत विभागते. म्हणजे एका पानातून दोन पाने, स्वामी व त्यांची शक्ती होतात. ही दोघांनी केलेली निर्मिती तीन पानांद्वारे सुचविली आहे. म्हणून परमेश्वर, त्याची शक्ती व निर्मिती हे तिन्ही एक आहेत. एकातून दोन व दोनांतून तीन. अष्टकोन पृथ्वीवर अवतरलेल्या वैकुंठाचे प्रतिनिधित्व करतो. सर्वजण कर्मकोषांतून मुक्त होऊन फुलपाखरांत परिवर्तित झाले. हे फुलपाखरू दर्शविते.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम  

गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

        " परमेश्वरावर भक्तीचा वर्षाव करण्याचे नानाविध मार्ग तुम्ही शोधू शकता."

पुष्प ४५ पुढे सुरु 

                  आता आपण याविषयी पाहू. दुपारी स्वामींनी एक कार्ड दिले, त्यावर त्यांचा तरुणपणीचा फोटो होता; व मागील बाजूस एक वाहती नदी व बरेच वृक्ष असलेले चित्र होते. त्या नदीमध्ये एक हृद्य आणि दोन नेत्र दिसत होते. दोन नेत्रांवर एक नेत्र असे एकूण तीन नेत्र होते. स्वामींनी त्यांच्या पुनरागमनाचा पुरावा म्हणून हे कार्ड दिले. माझ्या अंतरीच्या भावविश्वामुळे स्वामी परत येतील, असे ते सुचवितात. त्या फोटोत नदीच्या प्रवाहात अनेक गोष्टी प्रतिबिंबित झाल्या आहेत. उदा. तीन नेत्र व अनेक वृक्ष. जलतत्व सुखाशी संबंधित असून ते पंचेंद्रियांमधील एका इंद्रियाचे प्रतिक आहे. माझे भाव मी माझ्या सुखाद्वारे शब्दबद्ध करते. ह्या भावांमधून स्वामींचे नवीन रूप साकारते. माझे व्याकूळ अश्रू, विलाप, आणि शोक स्वामींना परत घेऊन येतील. माझे अश्रू या नदीसारखे सतत वाहात आहेत; येथूनच स्वामी येतील. स्तुपाचा चौथा प्राकार जलाचे प्रतिक आहे. स्वामींचे ४ महिन्यांत पुनरागमन होईल असे ते यातून सुचित करतात. आम्ही अजून निरीक्षण केले असता आम्हाला त्या चित्रात डोळ्यांच्या अनेक जोड्या आढळून आल्या. हे ' सर्वतो पाणी पादम् ' सारखे आहे, परंतु इथे हे सर्वतो शिरोमुख आहे. म्हणजे सर्वत्र परमेश्वराचे नेत्र, हात, पाय आहेत.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम   

रविवार, ६ डिसेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " पार्वतीमाता तुमच्या सुटकेसाठी धावली की भगवान शिव पाठोपाठ येतीलच."

वसंतामृतमाला  
पुष्प ४५ 
विदेह मुक्ती म्हणजे काय ?


५ जून २०१३ प्रातर्ध्यान 
वसंता - स्वामी, मी गुरूविषयी लिहित असताना, तुम्ही ४ ढगांचे चित्र दिलेत, ते काय सुचविते ?
स्वामी - सर्व काही धावत्या ढगांसारखे आहे. आता फक्त चार राहिले. अर्थात् मी चार महिन्यांच्या कालावधीत येईन. 
वसंता - खरंच स्वामी ? तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या वेळी येणार?
स्वामी - हो, मी नक्की येईन. 
वसंता - आता पुरे झाले स्वामी, यासाठी काहीतरी पुरावा द्या. 
ध्यान समाप्त 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडा. सर्वांमध्ये केवळ चांगले पाहिल्यास त्यांची चैतन्य शक्ती तुमच्यामध्ये प्रवाहित होईल. "

पुष्प ४४ पुढे सुरु 

                   कमल आणि तारका कुंडलिनीचे प्रतिनिधित्व करते. कुंडलिनीची सात चक्रे म्हणजे कमल होय. सहस्त्रार उघडल्यानंतर तारका स्पंदने बाहेर पडतात. हे वाचणाऱ्यांनी जागृत व्हायलाच हवे ! मायेमध्ये वणवण भटकणे पुरे ! भवसागरात गटांगळ्या खाणे पुरे ! स्वामी येथे आले आहेत ते सर्वांना मुक्ती प्रदान करतील. त्यावर कदाचित तुम्ही म्हणाल, " मी त्यासाठी काय करायला हवे ?" स्वामी शाश्वत मुक्ती देणार नाहीत. एक हजार वर्ष तुम्ही आनंदाने जीवन मुक्त अवस्थेत जगू शकाल. तथापि जेव्हा कलियुगाचा उर्वरित भाग सुरु होईल तेव्हा, आता तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्याच बिंदूपासून पुन्हा सुरुवात कराल. यावर तुम्ही कदाचित म्हणाल," मी आता वयस्क झालो आणि अजून केवळ १९ / २० वर्षे जगेन." हो तुमचा देह मृत्यू पावेल परंतु तुमचे गुण आणि चारित्र्य दुसऱ्या देहात प्रवेश करतील. जन्मामागून जन्म तुम्ही मिळविलेले संचित तुमचे संस्कार होतात. तो कचरा तुमचा पाठलाग करतो. 
                   आता तरी जागे व्हा आणि स्वामींची शिकवण आचरणात आणा. स्वामी जे शिकवतात ते तुम्ही तुमच्या जीवनात उतरवलेच पाहिजे. परमेश्वराच्या कोणत्याही नामरूपाचे ध्यान करा. तुम्ही कोणत्याही नामरूपाचे ध्यान केलेत तरी स्वामी सहाय्य करण्यास तयार आहेत. म्हणून आता जागे व्हा ! 
                  भजनाच्या दरम्यान, मांगल्याविषयी पुरावा म्हणून त्यांचा फोटोवरून एक फुल पडावे अशी मी विनंती केली. मी आरती करत असताना शिवशक्ती फोटोवरून ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः मंत्रपादुकांवर फूल पडले. स्वामींनी योग्य पुरावा दिला. नंतर, स्वामी काय म्हणाले हे सांगण्यासाठी मी सर्वांना माझी डायरी दाखवताना अजून एक फुल पडले. ह्यावेळी पांढऱ्या रंगाची कफनी घातलेला स्वामींच्या वाढदिवसाच्या फोटोवरून फूल पडले. या पुराव्यावरून स्वामी पुन्हा येतील आणि मंगळसूत्र बांधतील हे दर्शवले जाते. शिवशक्तीच्या फोटोवरून पडलेले फुल शिवशक्ती संगम सुचवते. 

जय साईराम 

व्ही. एस.   

रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" जसे भाव तसे विचार."

पुष्प ४४ पुढे सुरु 

                   जन्मापासून मी भगवंताचे चरण धरून ठेवले आहेत. मला मृत्यूचे भय वाटते. मृतदेह पाहिल्यावर भयभीत होऊन मी यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक साधुसंतांकडे धाव घेतली. माझे मन आक्रोश करत होते. अखेरीस १९७४ मध्ये ' सत्यम्  शिवम्  सुंदरम् ' हे स्वामींविषयीचे पुस्तक मी वाचले. ते वाचल्यानंतर मी त्यांच्या चरणी पूर्ण शरणागत झाले. अखंड अश्रू ढाळल्यानंतर शेवटी स्वामींनी मला त्यांच्या पादुका दिल्या. मी जेथे जाई तेथे त्या पादुका घेऊन जात असे. प्रत्येक ठिकाणी पादुका माझ्या हातात असत. त्याचप्रमाणे स्वामींचे चरण माझ्या हृदयात विराजमान आहेत. त्या चरणांनी आता विश्व ब्रम्ह गर्भ कोटमचे रूप धारण केले आहे.  
                   स्वामींनी प्रशांती निलयममध्ये वेगळ्या छोट्या पादुका हस्तस्पर्शाने आशिर्वादित करून दिल्या होत्या, त्या आता मी माझ्याजवळ ठेवते. ह्याच चरणांनी, मी मागितलेले वैश्विक मुक्तीचे वरदान दिले. ५७० करोड जीवांना ते मुक्ती प्रदान करतात. ते सर्वांना भवसागरातून पार करतात. ह्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आम्ही येथे आलो.  स्वामींनी या विशिष्ट भजनाची त्यांचे पहिले भजन म्हणून या भजनाची निवड का केली ? याचा मला हे लिहिता लिहिता उलगडा झाला. हे भजन दर्शविण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी व त्याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी आम्ही येथे आलो. हे अवतार कार्य आहे. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम      

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" मुक्ती म्हणजे बंधनातून स्वातंत्र, एकत्वाचा आनंद."

पुष्प ४४ पुढे सुरु

                    मी नभ कमल आहे. मी भूतलावर येऊन अत्यंत क्लेश सोसते आहे या नभ कमलाचे हृद्य विस्तार पावले, त्याने पृथ्वीचे रूप धारण केले. स्वामींचे मांगल्य माझे पातिव्रत्य दर्शवते. मांगल्याशिवाय नवनिर्मिती शक्य होणार नाही. विवाहाशिवाय संतती कशी जन्मास येईल ? 
                  स्वामींनी आधी यायला हवे आणि जगासमोर मी कोण आहे हे घोषित करून माझ्या गळ्यात मंगलसूत्र बांधले पाहिजे. त्यानंतरच स्तूप आणि विश्व ब्रम्ह गर्भ कोटमच्या कार्यास प्रारंभ होईल. तो पर्यंत ह्या वास्तु स्मारकांसारख्याच राहतील. स्वामींनी यायलाच हवे. अन्यथा त्यांच्या अवतार कार्याची पूर्ती होणार नाही. 
                 मानस भज रे गुरु चरणम् , दुस्तर भव सागर तरणम् ,स्वामींनी रचलेले आणि गायलेले हे पहिले भजन होय. ते स्वतः जगद्गुरु असल्याचे त्यांनी प्रकट केले. येथे स्वामींनी त्याचा अर्थ लिहिला आहे. मनामध्ये तुम्ही तुमच्या गुरूंच्या चरणकमलांचे ध्यान करा. त्याचे चरण घट्ट पकडून ठेवा केवळ तेच तुम्हाला भवसागरातून पार नेतील.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम  


सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः  

 कलियुग अवतार भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या आगमन दिना निमित्त 



                  जगातील सर्व शक्यता मानवामध्ये वाट  बघत असतात. जसे वृक्षामध्ये बीज वाट बघत असते तसा हा प्रकार असतो. त्याच्या भूतकाळावर त्याचा भविष्यकाळ अवलंबून असतो. त्याच्या वर्तमानकाळावर त्याची नियती ठरते. 
                  आता आपण यावर खोल विचार करू. केवळ एका छोट्या बी मधून एक प्रचंड वृक्ष वाढतो याप्रमाणेच प्रत्येक मनुष्यामध्ये सर्व शक्यता दडलेल्या आहेत. तो काहीही सध्या करू शकतो. त्याचे पूर्वीचे जन्म त्याच्या विचारांनीच ठरविले व तेच पुढील जन्मही ठरवतील. माणूस त्याच्या पूर्व जन्मापासून फक्त त्याच्या आचार विचारांची संपत्ती साठवितो. त्याचा पैसा, नाव, कीर्ती, कुटुंब, अधिकार अथवा पदवी यापैकी काहीही तो घेऊन येत नाही. फक्त त्याच्या मनावर खोल बिंबलेली त्याची वागणूक व त्याचे गुणविशेष तो स्वतःबरोबर घेऊन येतो. हे सर्व मिळून त्याचे भविष्य ठरविणारा आराखडा तयार होतो. ह्या जन्मातील त्याचे आचरण त्याचा पुढील जन्म निर्माण करते. त्याला जर हे उमजले तर तो काहीही साध्य करू शकतो. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रचंड शक्ती असते. 
              आपण एक उदाहरण पाहूया. वटवृक्षाच्या झाडाची बी अगदी लहान असते. तथापि त्या बीजामध्ये अफाट शक्ती असते. बीज अंकुरित झाल्यानंतर त्याचा वटवृक्ष होतो. या झाडाची खोडापासून येणारी मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात व जमिनीत प्रवेश करतात त्यांचेही झाड होते. या झाडाच्या विशाल सावलीमध्ये हजारो लोक विसावा घेऊ शकतात. एका छोट्या बीजामध्ये एवढी मोठी शक्ती आहे. प्रत्येक मानवामध्येसुद्धा महान शक्ती सुप्तावस्थेत असते. या शक्तीद्वारे तो हजार माणसांना मुक्त करू शकतो ! परंतु जर त्याने मुक्ती प्राप्त केली नाही तर त्याला जन्ममृत्यूच्या चक्रात फसावे लागेल. 
                   सवयीनुसार तुम्हीही पुन्हा पुन्हा या जगात जन्म घेत राहता. ' मी आणि माझे ' च्या भावना व बंधनामुळे माणूस कायमचा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकला आहे. जेलरने जशी चोरास ताकीद दिली. तसे स्वामी सर्वांना धोक्याची सूचना देत आहेत. सत्ययुग येत आहे. त्याच्या आगमनापूर्वी सर्वांनी तयार राहायला हवे. आपण आपल्या वाईट सवयी बदलायला हव्यात. प्रत्येक विचार काटेकोरपणे न्याहाळून दुरुस्त करायला हवा. आपण स्वामींना अंतःकरणपूर्व प्रार्थना करून अश्रू ढाळावेत, तरच ते आपले भाग्य बदलतील. स्वामी त्यांच्या कृपेने काहीही करू शकतात. ते सर्वांचे भाग्य बदलू शकतात. तुम्ही निदान आतातरी हे करा, म्हणजे पुढील कलियुगात तुम्ही जन्म घेणार नाही. जर तुम्ही तुमचे कुसंस्कार बदलले नाहीत तर पुन्हा पुन्हा या जगात जन्म घेत रहाल. जागे व्हा ! जागे व्हा ! स्वामींबरोबर सत्ययुगात जाण्यासाठी सर्वजण तयारी करा. 

व्ही. एस. 

जय साईराम  


रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

        " बंध म्हणजे द्वैतावस्थेत अडकलेले मन त्यामुळेच भेद उत्पन्न होतात." 

पुष्प ४४ पुढे सुरु 

७ जून २०१३ सायं ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही गुरूविषयी लिहिले ? 
स्वामी - हो, मी लिहिले आता तू लिही. 
वसंता - स्वामी जगन्मातेला कोण बोलावते आहे ? 
स्वामी - सगळे बोलावत आहेत. 
वसंता - त्या चांदणीच्या गळ्याभोवती काय आहे ? 
स्वामी - ध्रुव तपश्चर्या करून तारा झाला तुझी तारका स्पंदने संपूर्ण व्यापतात. ती अवघ्या निर्मितीमध्ये पसरतात. ते तुझे मांगल्य आहे. 
वसंता - खरंच ? हे खरं आहे ? 
ध्यान समाप्ती 
                   आता आपण या विषयी पाहू. स्वामींनी हे गीत लिहिले. यात सर्वजण माझ्यासाठी गात आहेत. माझी तारकास्पंदने समस्त विश्व व्यापतात. ध्रुवाने तपश्चर्या केली व तो अढळ तारा बनला. माझे तप वैश्विक मुक्तीसाठी आहे. माझ्या सहस्त्रातून उत्पन्न होणारी तारका स्पंदने सर्वांमध्ये प्रवेशित होत त्यांचे ताऱ्यांमध्ये परिवर्तन करतात.  

                    ही स्पंदने सृष्टीमध्ये प्रवेश करत सर्वकाही दिव्य करतात. नवनिर्मिती सत्य साई मयम आहे. यासाठी स्वामींनी गळ्यात मांगल्य असलेला माझा चेहरा स्तूपाचा चांदणीवर काढला परत आल्यावर स्वामी मला बोलावतील, याचा मला हे लिहिता लिहिता उलगडा झाला. माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधतील आणि त्यानंतरच स्तूपामधून तारका स्पंदनांचा विस्तार होईल. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम   

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार 

       " प्रत्येक गोष्टीकडे परमेश्वरी लीला या दृष्टीकोनातून पाहिल्यास तुम्हाला दिव्यानंदाची अनुभूती होईल. "

वसंतामृतमाला  
पुष्प ४४ 

गुरु चरणम् 


                  आज स्वामींनी एक कागद दिला. त्यावर लिहिले होते -
ॐ श्री साई राम 
जगद् जननीस माझे विनम्र अभिवादन 
ॐ श्री साई जय जय साई 
जय जय राम कृष्ण हरी 
जय जय राम 
जय जय साई 
जय जय राम कृष्ण हरी 
मानस भज रे गुरु चरणम्   
दुस्तर भवसागर तरणम्  
अर्थ - मनामध्ये तुम्ही तुमच्या गुरूंच्या चरणकमलांचे ध्यान करा. केवळ तेच तुम्हाला भवसागरातून पार करतील. 
*  *  *
                हे त्या कागदावर लिहिले होते. गीताच्या डाव्या बाजूला एक कमळ होते, व त्याचे पान हृदयाच्या आकाराचे. उजव्या बाजूला एक पंचकोनी चांदणी होती. चांदणीच्या मध्यावर एक नेकलेस घातलेला चेहरा होता. तो एका स्त्रीचा चेहरा असावा असे दिसत होते. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात..... 

जय साईराम 

रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

      " जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याचा क्रोध परमेश्वराचा क्रोध आहे असे मानून आनंद घ्या."  

पुष्प ४३ पुढे सुरु 

                    स्वामींनी दिलेल्या फुलपाखराला ४ पंख असून ते चमकदार हिरव्या रंगाचे आहे. मागील दोन पंखांवर प्रत्येकी ५ काळे खडे जडवले आहेत तर पुढील दोन पंखांवर प्रत्येकी ५ सोनेरी खडे, त्यांच्या दोन बाजूना दोन काळे खडे आहेत. सगळे मिळून एकूण २४ खडे आहेत, हे मानवी देहातील २४ तत्वांचा निर्देश करतात. चारी पंखांच्या ४ कोपऱ्यात पिवळे गोल खडे आहेत. मागच्या पंखांवर दोन्ही बाजूना तीन तीन पांढरे खडे आहेत तर पुढे एकेक पांढरा खडा आहे. फुलपाखराच्या अर्ध्याभागावर एकूण १८ खडे आहेत, हे खडे स्तूपाचे १८ योग दर्शवितात. सर्वजण आपल्या जीवनात स्तूपाच्या १८ योगांचा अंगिकार करून जीवन मुक्त होतील. फुलपाखराच्या देहाचा मध्यभागी आत्म्याचे प्रतिक आहे. आत्मा २४ तत्वांसह देहास कार्यप्रवण करतो. 
                   साधना करा ! जागृत व्हा ! परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करा. तुमच्या अंतरातील साई तुमच्यावर कृपावर्षाव करतील. फुलपाखरांच्या देहावर पांढऱ्या रंगात S व V ही अक्षरे आहेत. १०००वर्षांसाठी सर्वांना साई आणि वसंता या गोंदणाचा लाभ होईल असे ही अक्षरे सुचवितात. यानंतर पुन्हा कलियुग सुरु होईल. 


जय साईराम 

व्ही. एस.  

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

         " सज्जन असो वा दुर्जन परमेश्वर प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करतो."

पुष्प ४३ पुढे सुरु 

                   पाठीच्या कण्याच्या तळाशी मूलाधार चक्र असते. तेथून इडा व पिंगला ह्या सर्पासारख्या नाड्या उर्ध्वगामी होतात. त्यांच्या मध्यभागी सुषुम्ना नाडी असते. या सर्व नाड्यांचा संयोग आज्ञा चक्रात होतो. ह्याच्या वर महस्त्रार असते. येथूनच तारका स्पंदनानद्वारे अखिल विश्वात अमृत स्त्रवते. ही तारका स्पंदने सर्वांमध्ये प्रवेश करत त्यांना जीवनमुक्त अवस्था प्रदान करतात. चार निळे ढग, स्वामी लवकरच येतील असे सुचित करतात. 
८ जून २०१३ 
                  आज स्वामींनी एक मोठे फुलपाखरू दिले. चमकदार हिरव्यागार फुलपाखरावर सर्वत्र खडे जडविले होते. 
९ जून २०१३: प्रातर्ध्यान 
वसंता - स्वामी, ह्या फुलपाखराचा अर्थ काय ? 
स्वामी - समस्त विश्व हिरवेगार झालं आहे; आणि सर्वजण फुलपाखरांसारखे मुक्त भरारी घेत आहेत. 
ध्यान समाप्त 
                    आता आपण पाहू या. कलियुगात सर्वजण त्यांच्या गतजन्मातील कारागृहात बंदीवान आहेत. कोषातील अळीसारखे ते कार्मिक तुरुंगवास भोगत आहेत. ही जन्मानुजन्मांची संचित कर्मे आहेत. स्वामींनी व मी त्यांची कर्मे घेतल्यामुळे ते सर्व फुलपाखरांसारखे झाले. सत्ययुगातील निर्मिती सदाहरित आहे. सर्वजण जणू आनंदाच्या अवकाशात मुक्तपणे विहरणारी फुलपाखरेच. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम  

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंत साई साय नमः 

दिपावलीचा संदेश 



       अहंकाराचे उच्चाटन साजरे करण्यासाठी परमेश्वराने दिपावली या सणाची योजना केली आहे. मनुष्य अज्ञानाच्या अंधःकारात चाचपडतो आहे. त्याची विवेक बुद्धी नष्ट झाली आहे.  त्यामुळे त्याला नित्य व अनित्य यातील भेद जाणता येत नाही. दिव्यत्वाच्या तेजाची अनुभूती घेतल्यानंतर व दिव्यज्ञानाच्या तेजाने, अहंकारामुळे निर्माण झालेला अज्ञानाचा अंधःकार नाहीसा होतो. 
बाबा 
( १९९१ च्या दिवाळी प्रवचनामधून )

जय साईराम  




रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" तो केवळ एकच आहे, जो एकातून अनेक झाला आहे."

पुष्प ४३ पुढे सुरु 

                      ह्या जगात अनेक गुरु-शिष्य आहेत. गुरु शिष्याला मार्गदर्शन करतात, उपदेश देतात. तथापि कोणताही गुरु शिष्याला ध्येयाप्रत नेण्यासाठी उचलून घेतो कां ? गुरु शिष्याला पाठीवर घालून परमेश्वराप्रत नेतो असे स्वप्नातही कोणी पाहिले नसेल. क्षुधिताला त्याची भूक भागविण्यासाठी स्वतः खावे लागते;  दुसऱ्याने खाऊन चालणार नाही. ही गोष्ट अध्यात्मातही लागू आहे. प्रत्येकाला वैयक्तिक साधना करावी लागते. प्रत्येकाने साधना करत प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. सरत्या काळाची जाणीव ठेऊन साधना करा. सर्वांना आपल्या छोट्या मोठ्या कर्मांच्या परिणामांना सामोरे जावेच लागते. तथापि पुण्यकर्मांचे फळ वेदनाशामक इंजेक्शन सारखे कार्य करू शकते. या कायद्यापासून कोणाचीही सुटका नाही. अवतारही त्यांच्या जीवनांद्वारे हेच दर्शवितात. ह्या अवतार काळात केलेल्या कर्मांची अनुभूती ते पुढील अवतारात घेतील. परमेश्वराने मानवरूप धारण करून आदर्श जीवन कसे जगावे हे दाखवून दिले. ह्या कारणासाठीच ते भूतलावर अवतरले. 
                     आता आपण त्या चित्राविषयी पाहू. मध्यावरील पणती स्तूपाचे ध्योतक आहे. तिच्या एका बाजूला स्वामींचे तर दुसऱ्या बाजूला माझे नाव आहे. स्वामींचे व माझे भाव स्तूपामधून तारका स्पंदनांद्वारे विश्वव्याप्त होतात. स्वामींनी चितारलेल्या या दिव्याभोवतीचा प्रकाश एकमेकांत गुंतलेल्या इडा व पिंगला या सर्पसदृश नाड्यांचे प्रतीकात्मक स्वरूप आहे. या नाड्यांच्या योग आज्ञाचक्रामध्ये होतो. त्यांच्या मध्यभागी असलेल्या नाडीला सुषुम्ना नाडी म्हणतात. येथूनच तारका स्पंदने बाह्यगामी होतात. षटकोनी पणती स्तूपाचा जो पाया लाल कमळ त्याचे प्रतिनिधित्व करते. याची उत्पत्ती परमेश्वराच्या सहा गुणांपासून होते. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

         " प्रत्येक गोष्टीकडे आपण ईश्वरलिला या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. हे विश्व म्हणजे त्या सर्व श्रेष्ठ परमेश्वराचे नाट्य आहे."

पुष्प ४३ पुढे सुरु

                     विष्णू म्हणजे पालनकर्ता. जो मनुष्य भौतिकते कडून अध्यात्माकडे वळतो, जन्म व दुःखाचे मूळ कारण शोधून काढतो आणि स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणतो तो विष्णू बनतो. यानंतर त्याचे मन केवळ अध्यात्मात निमग्न राहते. 
                    स्वतःमधील दुर्गुणांचा संहार केल्याने तो महेश्वर; संहारकर्ता शिव होतो. असे हे त्रिदेव तसेच ब्रम्ह्लोक, कैलास व विष्णूलोक प्रत्येकाच्या अंतरातच आहेत. परमेश्वराचे चिंतनकरून ध्यान केल्यास मानवाला ह्या तिन्ही लोकांचे ज्ञान प्राप्त होते. आपला हृदयस्थ आत्माराम गुरु बनून आपले मार्गदर्शन करतो. ह्या काळात सद्गुरु दुर्मिळ आहेत. एकलव्याने एकट्याने साधना करून परमेश्वर प्राप्ती केली, त्याप्रमाणे आपणही परमेश्वरालाच गुरु मानले पाहिजे, त्यासारखी एकाग्र साधना करायला हवी.   
ध्यान: ८ जून २०१३ ध्यान 
वसंता - स्वामी, काहीजण तुमच्या समीप असूनही त्यांना दुःख भोगावे लागते. असे का बरे ? 
स्वामी - सर्वांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्याचे परिणाम भोगावेच लागतात. 
वसंता - स्वामी, असे आहे तर परमेश्वरी कृपा त्यांच्यासाठी काहीच करत नाही कां ? 
स्वामी - नाही. त्यांनी केलेल्या दुष्कर्मांना त्यांना तोंड द्यावेच लागते. तथापि त्यांची दुष्यकर्मे, सत् कृत्ये त्यांचे फल त्यांच्यासाठी वेदनाशामक उतारा ठरते. त्यांना वेदना जाणवत नाही. सर्वांना त्यांनी केलेल्या कर्मांच्या परिणामांना सामोरे जावेच लागते. 
वसंता - स्वामी, आपण ' गुरुचरण मानवाला भवसागरातून तारतात ' असे लिहलेत. 
स्वामी - गुरु मार्गदर्शन करतो, उपदेश करतो. परंतु यासाठी सर्वांनी स्वतः प्रयत्न करणे अनिवार्य आहे. भूकेल्याने स्वतः खायला हवे, त्याच्या क्षुधाशांतीसाठी दुसरा कोणीही खाऊ शकत नाही. 
वसंता - ठीक आहे स्वामी. मी याविषयी लिहीन.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

             " प्रथम साधना करून आपण मोक्ष प्राप्त केला पाहिजे आणि नंतर स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले पाहिजे."

वसंतामृतमाला 

पुष्प ४३ 
गुरु कोण ?

                    ४ जून २०१३ रोजी स्वामींनी एक कागद दिला; त्यावर काही चित्रे रेखाटली होती. मध्यभागी लाल रंगी ज्योत असलेली तेलाची पणती होती. पणती भोवती पिवळे वलय होते, आणि वरच्या बाजूला एका पिवळ्या वर्तुळात पंचकोनी चांदणी होती . चांदणीच्या आत शिरोभागी मंगळसूत्र होते तर दोन्ही बाजूंना दोन दोन असे एकुण चार निळे ढग होते. पणतीच्या एका बाजूला साई लिहिले होते व दुसऱ्या बाजूला वसंता. आणिक् पणतीच्या खाली …. 
           ' गुरु तिन्ही लोकांचा स्वामी आहे. तो ब्रम्हा, विष्णू व महेश्वर आहे. ' असे लिहिले होते. 
                 आता आपण पाहू. गुरू तिन्ही लोकांचा स्वामी आहे. तो ब्रम्हा, विष्णू व महेश म्हणून ओळखला जातो. आपल्या प्रत्येकाच्या अंतरात ह्या त्रिमूर्ती विद्यमान असतात. मी पूर्वी या विषयावर एक अध्याय लिहिला आहे. मानव त्याची कर्मे व इच्छांपुढे स्वतःचे जीवन घडवत असतो, तो स्वतः त्याच्या प्रत्येक जन्माचा निर्माता असतो. प्रत्येकाच्या अंतरात ब्रम्हदेव विद्यमान आहे, याचा हा अर्थ. माणसाचा प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार संस्कार रूपाने त्याच्या मनावर बिंबतो, आणि हाच त्याच्या पुढील जन्माचा आराखडा बनतो. मृत्यूनंतर ही त्याची निर्मिती होते.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" आपण इथेच, याक्षणी मुक्ती प्राप्त करू शकतो."

पुष्प ४२ पुढे सुरु

४ जून २०१३ दुपारचे ध्यान 
वसंता - स्वामी ज्ञानाविषयी तुम्ही हे काय दिले आहे ? 
स्वामी - तू संयमपूर्वक ज्ञानाविषयी लिहतेस. प्रथमतः तू सरस्वती आहेस; त्यानंतर तू राजाची लक्ष्मी आहेस. 
वसंता - स्वामी, अजून किती काळ हा संयम ? 
स्वामी - सरस्वतीसारखे संयमपूर्वक ज्ञानलेखन कर. मी आलो की तू राजाची लक्ष्मी होशील.  
ध्यान समाप्ती 
                  आता आपण याविषयी पाहू. मी जे काही लिहिते ते सर्व उच्च ज्ञान आहे. स्तूपाचा पाया म्हणजे लक्ष्मीचे पीठ असलेले लाल कमळ होय. स्तूपाची उभारणी या पायावर झाली आहे. स्तूपाच्या शिरोभागी सहस्त्र दलांचे कमळ आहे; ह्यापासून ज्ञानोद् भव होत जगात परिवर्तन घडते. हे ज्ञानसरस्वतीचे पीठ, तिचे आसन आहे. जेव्हा स्वामी येतील आणि मला बोलावतील तेव्हा मी राजाची लक्ष्मी होईन. स्वामी महाराजा आहेत, १४ भुवनांचे अधिपती. बालपणी त्यांना सर्वजण ' राजू, राजू !' म्हणून हाका  मारायचे. वडक्कमपट्टीत असताना मी त्यांना ' माझा राजा ' म्हणून संबोधित असे. या कारणासाठी प्रेम साई अवतारात ते ' रंगराजा ' म्हणून येतील. मला आंडाळ सारख विवाह करून रंगनाथामध्ये विलीन व्हायचे आहे. आता ते रंगराजा असतील. 

जय साईराम 
व्ही. एस.

               

रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

          " जीव परमेश्वराचा शोध घेत, त्याचा पुकारा करत त्याच्याकडे धाव घेतो. परमेश्वर त्याच्याप्रयत्नांची प्रशंसा करतो व त्याच्याकडे धावत जाऊन त्याला आपल्या कृपाछत्राखाली घेतो."

पुष्प ४२ पुढे सुरु 

                   ज्ञानाचा अलंकार संयम आहे. जीवनांत सर्व बाबींत संयम असावा. माझे जीवन हा संयमाचा आविष्कार आहे. जन्मापासूनच मी संयमी आहे. एक कन्या या जगात जन्म घेते, जिने यापूर्वी कधीही येथे जन्म घेतला नाही. असे कसे ? या मलीन धरतीवर जन्म घेण्यापूर्वी मी विशुद्ध परमेश्वरासोबत राहत होते. आता मी आले आणि पुन्हा या मलीन भूतलावर जन्म घेतला. इथे बिलकुल शूचिता नाही, मांगल्य नाही. अशा या विश्वामध्ये मी राहतेय. ही सुद्धा एक महान साधना आहे.
                     परमेश्वरास ज्ञान व्यक्त करावयास लावून ते जगासाठी उघड करण्यास संयम हे एक साधन आहे. संयम जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. संयमाद्वारे आपण ज्ञानाचे भांडार प्राप्त करून घेऊ शकतो. यासाठी मी पूर्वी ' Wisdom Mine ' ( ज्ञानाचे भांडार ) नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मी लिहिते ते सर्व अस्सल ज्ञान आहे. माझ्याकडे ज्ञानाव्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. ५ जून २०१३ रोजी स्वामींनी त्यांच्या फोटोवर एक छोटेसे गुलांबी उमललेले फूल ठेवले. त्याविषयी मी स्वामींना विचारले असता ते म्हणाले," हे स्वर्गीय फूल आहे, हे फूल म्हणजे तूच आहेस कारण माझ्या शेजारी बसण्याचा अधिकार केवळ तुझाच आहे." 
                      पूर्वी मी म्हटले आहे की मी शुद्ध पवित्र पुष्पासमान स्वतःला समर्पित केले आहे. म्हणून स्वामींनी या फोटोद्वारे दर्शवले. या फोटोवर स्वामींनी ' Wisdom Nugget ' (ज्ञानाचा गोळा ) असे लिहिले आहे. फोटोच्या मागच्या बाजूला सरस्वती तिच्या वीणेसह श्वेतपद्मासनात बसलेली आहे. तिच्या बाजूला हंस आहे. सरस्वतीच्या भोवती विलयनाचा जांभळा रंग आहे व त्यावर 'ज्ञान सशक्त होत आहे. ' असे लिहिले असून त्याच्याखाली मोठ्या अक्षरात राजलक्ष्मी लिहिले आहे. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम 
            

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 



परमपुज्य श्री वसंतसाई अम्मा यांच्या ७७ व्या वाढदिवसा निमित्त





' वैश्विक स्फोट '

२३ ऑक्टोबर १९३८

अमावस्येची काळोखी रात 
अहो आश्चर्यम् 
अवसेच्या अंधाऱ्या रात्री 
जाहला पुनवेचा जन्म ! 

पिता मधुरकवी आळवार 
माता वेदवल्ली 
दक्षिणेकडील मदुरैसमीप 
वडक्कम् पट्टी ग्राम तयांचे 
कन्येच्या आगमने आनंद त्यांसी शब्दातीत 
सानुल्या ह्या देवदूताचे 
नामाभिधान केले ' वसंता '
केवढे समर्पक नामकरण 
केले तयांनी अजाणता !
वसंता अर्थात वसंतऋतु 
अखेरीस त्या शुष्क मानवी जीवांना 
गवसले प्रयोजन 
आनंदाचा उत्सव करण्या 
प्रभुवराचे गुणगान गाण्या !

स्वागत तुझे माता मेरी 
साक्षात् प्रभूशी विवाह करी ! 
या ! सकल जन या … 
तिची कथा पुढे ऐकण्या !

कट्टर गांधीवादी पिता 
आचरे जीवनी भगवत् गीता !
असे अत्यंत दानशूर 
स्वातंत्र्य सैनिक शूरवीर 
तळपला शुक्र ताऱ्यासम 
सच्चा पुत्र भारतमातेचा 

वेदवल्ली , वैष्णव भक्तपरायण 
रात्रंदिन प्रार्थनेत रममाण  
पतीस घडता तुरुंगवास 
त्या दुर्बल स्त्रीस 
आसरा ना कोणी दूजा 
केवळ एक प्रभू परमेश, प्रभू परमेश ! 

हे प्रभू आहेस कोठे तू ?
अंतरलास का मजसी तू ?
हे माझ्या कृष्णा !
मज उध्दरणार नाहीस का ?
तिच्या करूण रुदनाचे पडसाद उमटती स्वर्गलोकी 
भार असह्य वसुंधरेसी
प्रभू म्हणे," परतुनी ये स्वगृहासी 
प्रतिक्षेत मी तव नेत्रातील अश्रू पुसण्यासी !"

भगवंतासाठी अपयश येते क्वचित 
कसे ? ते पाहू आपण 
बालवसंतेने नेली पुढे 
मातेची प्रज्वलीत ज्योत 
त्या प्रखर ज्योतीने 
जर दाहिले प्रभूवरां
तर दोष कोणा द्यावा बरे ?

धगधगता अग्नि भक्तिचा 
उद्रेक ज्वालामुखीचा 
अर्थात् स्फोट विश्वाचा 
'ब्रम्हांड स्फोट ' सिद्धांत नव्हे हा 
आहे साक्षात् स्फोट ब्रम्हांडाचा !

भगवंतासी संकल्पबदल अनिवार्य आता 
२७ मे २००१ या शुभदिनी 
मांगल्य दिले ब्रम्हचारी बाबांनी 
देऊनी मांगल्य केली घोषणा मूक 
" आम्ही दोघं आहोत एक "

नायक नायिकेचा विवाह होऊनी 
सदा जीवन सुखी होता 
कथेची होते सुफळ सांगता !

परि अम्मा याहुनी न्यारी 
वसंता न केवळ , ही आहे विश्वमाता 
तिचे विश्व , तिची लेकुरे दुःखात चूर असता 
असेल का संतोष तिच्या चित्ता ?

जोवरी ना देसी वैश्विक मुक्ती 
नसे मज शांती विश्रांती 
अग्निप्रवेश , नरकयातना 
सिद्ध मी याहुनी घोर सत्वपरीक्षा देण्या 
पाऊले ना ढळतील माझी मार्गावरूनी 
हा मार्ग वैश्विक मुक्तीचा,
मानवा, दानवा 
कीटक, पशू, जलचरा 
मुक्त करील चराचरा






जय साईराम