रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " खऱ्या प्रेमाला देह अथवा विवाहाची आवश्यकता नसते केवळ भावना पुरेशा असतात. "

सूत्र पाचवे 

कृतज्ञता 

            स्वामींनी सांगितले की हे माझे कृतज्ञतेचे भाव आहेत. माझ्यासाठी जर कोणी काही केले, मग ते छोटेसे काही का असेना मी ते खूप मोठे समजून त्याची या ना त्या मार्गाने परतफेड करते. जर एखाद्याने संतमहात्म्यांसाठी आवळ्याएवढे कार्य केले तर ते कोहळ्याएवढे कार्य करून आपली कृतज्ञता करतात. 
दुपारचे ध्यान 
वसंता - स्वामी मला स्वतःस सर्वांना द्यावेसे का वाटते ?
स्वामी - प्रथम तू अनेक भेटवस्तू दिल्यास. त्याने तुझे समाधान झाले नाही. नंतर तू तुझे भाव ओतून व्यक्त करणाऱ्या कविता लिहिल्यास, त्यानेही तुझे समाधान झाले नाही. मग तू मला माझे भाव त्या कवितेमध्ये अंतर्भूत करण्यास सांगितले. तरीही तू असमाधानी राहिलीस. आता तुला स्वतःस सर्वांना द्यायचे आहे. तू पूर्णम आहेस. 
वसंता - स्वामी, प्रथम तुम्ही अनेक चमत्कार दाखवलेत. त्यानंतर शक्ती, सिद्धी, अनेक पदे, अवतारपद सर्व काही मला देऊ केलेत. परंतु तुम्ही स्वतःस मला पूर्णपणे देऊ केले नाही. 
स्वामी - मी नक्की करेन, त्यानंतरच तू तृप्त होशील. तुला इतरांबद्दल एवढी कृतज्ञता का वाढते ? तू या जगात प्रथमच जन्म घेतल्यामुळे. तू सगळ्यांमधले फक्त चांगले गुण घेतेस. तू सगळ्यांकडून जे जे काही शिकतेस त्याचे ऋण फेडण्यासाठी हे सर्व करतेस. तुझ्यामध्ये सर्व काही आहे परंतु तुला वाटते की, तू इतरांकडून ते शिकत आहेस. तुझ्या विनम्रतेतून आणि कृतज्ञतेतून तू संपूर्ण जगाला आदर्श जीवन कसे जगावे त्याचे प्रात्यक्षिक दाखवत आहेस. 
ध्यानसमाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी मनुष्याला असणाऱ्या लालसेपोटी निसर्गाचा समतोल बिघडला आहे." 

सूत्र पाचवे

कृतज्ञता 

             स्वामींनी त्या काव्यामध्ये एक ओळ अंतर्भूत केली. तरीही मला पुरेसे वाटेना. हेही मला साधारणच वाटत होते. मला अधिकाधिक द्यायचे आहे. ही अतृप्त तृष्णा आहे. मला वाटते की, मी स्वतःलाच सर्वना देऊन टाकावे. 
              स्वामी सर्वांतर्यामी असल्यामुळे मी स्वतःस सर्वांना देऊन टाकावे असे मला वाटत राहाते. स्वामींनी सांगितले, प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये असणाऱ्या ' त्याला ' मी मला द्यावे अशी माझी इच्छा आहे. रिकाम्या हिंगाच्या डबीला जसा हिंगाचा वास राहतो त्याचप्रमाणे जन्मानुजन्मं, युगानुयुगं साठवलेल्या वासनारूपी कचऱ्याच्या दुर्गंधीने सर्वजण भरून राहिले आहेत. मी एक पूर्ण रिक्त घट आहे. परमेश्वर हीच माझी एकमेव वासना आहे . मला या परमेश्वराच्या सुगंधाने सर्वांना भरून टाकायचे आहे . जेव्हा मी स्वतःला  सर्वांमध्ये वाटून टाकते तेव्हा तो सुगंध सर्वांतर्यामी परमेश्वराशी पोहोचतो . 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

पुष्प एकवीस 
जेव्हा भाव कृतीत उतरतात

१४ ऑक्टोबर २००५ ध्यान
वसंता - स्वामी, मी लेखनकार्य पूर्ण केले असे तुम्ही म्हणालात. आता तुम्ही स्वतःला मला देऊन टाका.
स्वामी - हे कार्य भावनिक पातळीवर पूर्ण झाले आहे. आता ते कृतीत उतरले पाहिजे हो की नाही ?स्तूपाचे काम पूर्ण झाल्यावर हे घडेल. जेव्हा आपण परत येऊ तेव्हा तुझ्या सर्व भावनांची मी परतफेड करेन. आतापर्यंत जे अवतार होऊन गेले त्यांनी धर्म संस्थापना केली. सर्वजण त्यांच्या कृतीचे साक्षीदार होते परंतु कोणालाही त्यांच्या भावनांविषयी माहिती नव्हती. राम, कृष्ण आणि मी आमचे भाव कोणीही पाहिले नाहीत. जेव्हा आपण परत येऊ तेव्हा तुझ्याविषयीचे माझ्या मनातील भाव मी उघडपणे व्यक्त करेन. तू म्हटलेस की प्रकृतिच्या अंगप्रत्यंगामध्ये तुझे प्रेम प्रवेश करेल. प्रत्येक गोष्टीतील सत्यावर तुझे प्रेम आघात करेल, सर्वांमधील सत्याला हलवून सोडेल. सत्य जागृत होऊन प्रेमाद्वारे कार्य करण्यास आरंभ करेल.

ज्ञान 
            माझा प्रेमभाव सर्वांमध्ये प्रवेश करून सत्यतत्वास जागृत करेल. स्तूप स्वामींच्या आणि माझ्या दैहिक एकात्मतेचे प्रतिनिधित्व करतो. ह्याचा नेमका अर्थ काय ?
           मी साधना केली आणि वसिष्ठ गुंफेमध्ये स्वामींशी माझा योग झाला. पंढरपूरमध्ये शरीर निवेदनम् म्हणून स्वामींना मी माझा देह अर्पण केला. त्यांनी त्याचा स्वीकार केला म्हणून ह्या शरीरामधून केवळ तेच कार्य करतात. आमचे देह एक आहेत. ह्या देहामधून उत्पन्न होणारी स्पंदने स्तूप खेचून घेतो आणि ती अखिल विश्वामध्ये प्रसूत करतो. अशा तऱ्हेने हा देह स्तूपाद्वारे कार्य करेल. प्रेम समस्त सृष्टीमधील सत्याला जागृत करेल.
           सत्य हे सर्वव्यापी परमेश्वर तत्व आहे. प्रेमाच्या कमतरतेमुळे कोणत्याही युगामध्ये सत्य स्वतःला पूर्णत्वाने प्रकट करू शकले नाही. द्वापार युगामध्ये सुरु झालेली प्रेमाची कमतरता अजूनही सुरूच आहे. वाईट स्पदंनांच्या आवरणाने परमेश्वर तत्वास झाकून टाकले आहे. जेव्हा माझ्या प्रेमाचा परमेश्वर तत्वाशी संयोग होईल तेव्हा वैश्विक परिवर्तन घडेल आणि त्यामुळे विश्वव्यापी परमेश्वर प्रकट होईल.
            प्रत्येकातील दिव्य प्रवृत्ती सुप्तावस्थेत आहे, निष्क्रिय आहे. प्रेम सत्याला, दिव्य चैतन्याला जागृत करेल. प्रेमाची स्पंदने सत्य तत्वाला कार्यान्वित करतील.
             परमेश्वर अस्तित्व अवस्थेत आहे. निष्क्रिय अवस्थेत आहे. जेव्हा त्याची चित् शक्ती , प्रेमाशी त्याचा संयोग होईल. तेव्हा तो कार्य करण्यास सुरुवात करेल. अशा तऱ्हेने प्रेम तत्वाने गतिमान होऊन प्रत्येकामधील सत्य तत्वाला जागृत केल्याने, दिव्यत्वाने व्यापलेल्या सत्ययुगाची पहाट होईल !
            अवतारांनी धर्मसंस्थापना करण्यासाठी अनेक कार्ये केली परंतु त्यांनी त्यांच्या कुटुंबियांपाशी मोकळेपणानी त्यांचे भाव व्यक्त केले नाहीत. जेव्हा आम्ही परत येऊ स्वामी तिन्ही अवतारांच्या भावांचे मूर्तिमंत स्वरूप असतील. पूर्वी अवतारांनी कृतीद्वारे धर्मसंस्थापना केली. हा अवतार भावांद्वारे प्रेम संस्थापना करेल.
            आतापर्यंत आपण माया जीवनाविषयी पाहिले आता आपण निर्मितीविषयी पाहू.
            प्राण आणि आकाश एकमेकांवर आघात करतात आणि निर्मितीचा श्रीगणेशा होतो. जेथे प्राण आणि आकाश नाही अशी कोणतीही जागा नाही. जेव्हा त्या दोन्हीचा संयोग होतो तेव्हा पर्वत, वृक्ष, नद्या, सागर ह्यांच्या सहीत विश्व दृश्यमान होते. प्रलयानंतर ह्या निर्मितीचे आगमन होते. तथापि नवनिर्मिती याहून वेगळी आहे, कशी ? प्रेमाने सत्यावर आघात केल्याने प्रलयाविना नवनिर्मिती होईल प्रेम आणि धर्म ह्यांच्या अभावाशिवाय पशुतुल्य जीवन जगणाऱ्यांमध्ये सुपरिवर्तन घडेल. सर्वांमधील आत्मतत्व जागृत होईल. प्रेमाचा आत्मतत्व सत्याशी संयोग झाल्यामुळे हे घडेल.  प्रेम आणि सत्य ह्यांच्या संयोगाने प्रत्येकामध्ये परिवर्तन घडून नवजागृती येईल. ही नवनिर्मिती आहे हे सत्ययुग आहे.

संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' प्रेमसाई प्रेमावतार ' ह्या पुस्तकातून.
जय साईराम 

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

      " मनुष्याने विवेकबुद्धीचे अनुसरण केल्यास पंचतत्वांमध्ये समन्वय राहिल."

सूत्र पाचवे 

कृतज्ञता 

             आश्रमामध्ये असलेल्या फलकावर आश्रमाला भेट देणाऱ्यांचा तपशील लिहिलेला असतो. त्यांची नावे, आगमन व प्रस्थान दिनांक इ. ते वाचताक्षणीच माझ्या मनात विचार येतात की ते आले की, मी त्यांना काय देऊ ? मी माझ्या सहचऱ्यांशी बोलून प्रत्येकाला काय भेट द्यायची ते ठरवते. मी जे काही देते त्याने माझे समाधान होत नाही. मला वाटते हे पुरेसे नाहीये. 
             राजकुमार माझ्याविषयी स्वामींशी बोलले. त्यांच्यामुळे प्रथमच स्वामींनी माझे नाव उच्चारले. मी त्यांना साडी व इतर काही भेटवस्तू दिल्या, परंतु माझे समाधान झाले नाही. त्यांनतर मी त्यांच्यासाठी एका काव्यातून माझे भाव व्यक्त केले व ते काव्य त्यांना दिले, तरीही मी अतृप्तच होते. म्हणून मी ध्यानामध्ये स्वामींना त्या काव्यासाठी अजून काही ओळी सांगण्याची विंनती केली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ...... 

जय साईराम 

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

       " परमेश्वराची निर्मिती परस्परावलंबी आहे. निर्मितीत समतोल राखण्यासाठी आपण वापरात असलेल्या प्रत्येक गोष्टीची परतफेड केली पाहिजे ."

सूत्र पाचवे 
कृतज्ञता 


३० जून २००८
वसंता - स्वामी, राजकुमारांनी मला तुमचा आवाज ऐकवून अतीव आनंद दिला. मला त्यांना काहीतरी द्यायचं आहे. 
स्वामी - तू अगोदरच त्यांना एक कविता आणि काही भेटवस्तू दिल्या आहेत ना, मग अजून तू  काय देऊ इच्छितेस ?
वसंता - स्वामी, तेवढे पुरेसे नाही. मला याहून अधिक द्यायचे आहे. मला स्वतःलाच त्यांना द्यायचे आहे. 
स्वामी - बरं, बरं ! रडू नकोस. 
वसंता - स्वामी, नेहाच्या कुटुंबाला आपल्याविषयी केवढे प्रेम, जिव्हाळा आणि श्रद्धा आहे. मी त्यांना खूप गोष्टी दिल्या आहेत, परंतु तेवढे पुरेसे नाही. मला स्वतःलाच त्यांना द्यायचे आहे. प्रमिला आणि अय्यरही माझ्यावर किती प्रेम करतात. मी जे काही देते त्याने माझे समाधान होत नाही. मी स्वतःलाच त्यांना द्यायला हवे. निकोलाही माझ्यासाठी किती रडते ?
स्वामी - जर तू  सगळ्यांना वाटून दिलेस तर माझ्यासाठी काय शिल्लक राहणार ? 
वसंता - हो, स्वामी, मला तुमच्या चरणांशी पूर्णपणे समर्पित व्हायचे आहे. मी अशी का बरं आहे ? माझ्या मनात असे भाव का येतात ? मला काही समजत नाही. मला हे सहनही होत नाही. मी स्वतःलाच सर्वांना द्यावे असे मला वाटते ; का बरं ?
स्वामी - रडू नकोस, हे वसंतमयम आहे. सर्वांतर्यामी अशा मलाच तू स्वतः अर्पण व्हावंस अशी  तुझी इच्छा असते. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम     

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" परमेश्वर ना नर आहे ना नारी, वास्तविक त्याला लिंग नाही."

सूत्र चौथे

प्रेमाची सखोलता

            प्रेमामध्ये नीतिनियम नसतात, त्याला मर्यादा नसतात, सीमा नसतात, कायदेही नसतात. हे असे का असते ? कारण प्रेम हे व्यक्तिसापेक्ष असते. आता मी माझ्या प्रेमाच्या सखोलतेबाबत लिहिले आहे. सामान्य प्रेम असे नसते. ते क्षणभंगुर असते, नश्वर असते. माझे प्रेम केवळ परमेश्वरासाठी आहे. ते अन्य कोणालाही मिळणार नाही. कोणीही ते समजू शकणार नाही. 
२९ जून २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही प्रेमसूत्राविषयी काही सांगा ना. 
स्वामी - प्रेमाची अभिव्यक्ती दोन व्यक्तींमध्ये होते. तू केवळ तुझ्या प्रेमाविषयीच का लिहिलेस ? माझ्या प्रेमाचे काय ?
वसंता - स्वामी, तुमच्या प्रेमाविषयी केवळ तुम्हालाच माहिती ! मी कशी काय लिहू शकेन ?
स्वामी - तू म्हणजे मी. मी जेव्हा तुझा विचार करतो तेव्हा तुझ्या प्रेमाने तू मला व्यापून टाकतेस. जेव्हा मी तुझी पत्रे वाचतो तेव्हा तू रूप धारण करतेस. 
वसंता - आता मला समजले. स्वामी, माझ्या डोळ्यात अश्रू आले की तुमच्याही डोळ्यात अश्रू येतात. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" प्रेम हवेला शुद्ध बनवून, पृथ्वीला मंगल बनवते."

सूत्र चौथे

प्रेमाची सखोलता 

              माझ्या दृष्टीने स्वामींचे वय आणि बाह्यरूप या बाबी गौण आहेत. माझ्यामध्ये बदल घडलाच पाहिजे. आपण आपल्या प्रियतमाला सर्वस्व अर्पण करतो त्याला प्रेम म्हणतात. मग तो कसा आहे याला महत्व नाही. ही माझ्या प्रेमाची गहनता आहे. 
              या इच्छेचा उगम कुठे आहे ? हिचा उगम हृदयाच्या गाभ्यातून होतो. हे काय आहे ? याला भौतिक शरीराची अभिलाषा आहे का नावलौकिक, धन, शिक्षण, सौंदर्य, हुद्दा यांची अभिलाषा आहे ? या प्रेमाला ही मीमांसा करता येत नाही कारण हे ' आंधळं प्रेम ' आहे. हे देहस्पर्शी नाही, चित्तस्पर्शी नाही, आत्मस्पर्शी नाही -यामध्ये स्पर्शभावही नाही. हे हृदयस्पर्शी प्रेम आहे. केवळ हृदयालाच त्याची जाणीव !

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

       " प्रेमाला लज्जा माहीत नाही. कोणतीही गोष्ट प्रेमाला नियंत्रित करू शकत नाही. ते कोणावरही अवलंबून नाही ते सदा मुक्त असते."

सूत्र चौथे 

प्रेमाची सखोलता

            एका बाजूला मला अवतारपद, लक्ष्मीपद पार्वतीपद प्राप्त झाले आहे. मी म्हणते," मला यांपैकी काही नको. मला फक्त स्वामी हवेत." या प्रेमाने ही सर्व पदे दूर सारली. दुसऱ्या बाजूला, जर स्वामी राक्षस, अळी वा मनुष्य झाले तर मला फक्त ते हवेत. स्वतःची अवस्था अथवा स्वामींची अवस्था या प्रेमाच्या खिजगणतीतही नाही. एकदा स्वामींनी मला विचारले," तू स्वतःचा देह तरुण, अक्षत, सुंदर आणि परिपूर्ण बनवू इछितेस मग मी तुला कसा काय शोभेन ? मी नव्वद वर्षांचा आणि तू वीस वर्षांची तर ते साजेसं दिसेल का ? 
             त्यावर मी उत्तरले," तुमचे वय कितीही असो; तुमचे रूप कसेही असो, जसे आहे तसे माझ्या दृष्टीने ठीक आहे. त्यामध्ये काहीही बदल घडू नये असे मला वाटते. मला माझा देह तुम्हाला समर्पित करायचा आहे. हे शरीर निवेदन असल्यामुळे मी हे शरीर तरुण सुंदर, अक्षत आणि परिपूर्ण करूनच ' शरीर निवेदन ' करायला हवं."

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम      

रविवार, १ सप्टेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " शुद्ध भाव मानवाला माधव बनवतात. अशुद्ध भाव मानवाला पशु बनवतात."

सूत्र चौथे 

प्रेमाची सखोलता

            एक दिवस स्वामींनी मला विचारले," समजा, जर मी अचानक परमेश्वराच्या स्थितीमधून सर्वसामान्य मनुष्याच्या स्थितीमध्ये आलो तर तू काय करशील ? " मी म्हणाले," मला परमेश्वर प्रिय आहे. मला फक्त परमेश्वर हवा आहे. जर माझा प्रिय परमेश्वर सामान्य मनुष्याच्या पातळीवर आला तर मी सामान्य स्त्री होईन." मग त्यांनी प्रश्न केला," जर मी राक्षस झालो तर तू काय करशील ?" मी उत्तरले," मी राक्षसीण होईन."
             जर ते अळी झाले तर मी अळी व्हायची इच्छा कारेन. मला फक्त स्वामी हवेत -मग ते देव असोत ,मनुष्य असोत, राक्षस असोत व अळी असोत. ते कोणतेही रूप धारण करोत -हे प्रेम परमेश्वर वा अळी यामध्ये भेद करत नाही. माझे प्रेम वेगवेगळ्या अवस्थांच्या उच्चनीचतेचा विचार करत नाही. पदवी, प्रतिष्ठा व धन यांची फिकीर करत नाही. ही प्रेमाची दुसरी बाजू आहे.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम