ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार - ४ जानेवारी
" परमेश्वराचे नामस्मरण करत राहा, सुरुवातीला जरी ते यंत्रवत असेल तरी नंतर भाव येईल ."
परमेश्वराचे नाम घेत राहा. कोणतेही काम हाती घेण्याअगोदर थोडा वेळ नामस्मरण करून त्यांनतर काम सुरु करा. नामस्मरणाने आध्यात्मिक जीवन सुरु करणाऱ्या साधकांसाठी ते अत्यंत लाभदायी आहे. दरोडेखोर रत्नाकरला सुरुवातीला रामाचे नाम घेता येत नसल्यामुळे त्याने मरा, मरा ,मरा उच्चारण्यास सुरुवात केली अखेरीस ते राम, राम, राम बनले. रामनामात लय पवण्याच्या अवस्थेप्रत तो पोहोचेपर्यंत त्याची नामस्मरणाची साधना अधिकाधिक तीव्र होत गेली आणि तो महान वाल्मिकी ऋषी बनला.
आता आपण दुसरे उदाहरण पाहू या. ध्रुव एक लहान मुलगा होता व त्याला आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा होती. परंतु तसे करण्यापासून त्याला मनाई करण्यात आल्यामुळे तो जंगलात गेला आणि त्याने घोर तप केले आणि परमेश्वराचे नामस्मरण करण्यास सुरुवात केली. नारदमुनी त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला ' ॐ नमो भगवते वासुदेवाय ' ह्या मंत्राची दीक्षा दिली. त्या छोट्याश्या बालकाने, भगवान विष्णु साक्षात त्याच्यापुढे प्रकट होईपर्यंत हृदयपूर्वक मंत्रोच्चारण केले. त्या बालकाने वर प्राप्त करून, तो आकाशातील तारा बनला, ध्रुव तारा बनला. त्याच्या मंत्रोच्चारणाने प्रसन्न होऊन भगवंतानी स्वतः त्याला ध्रुवताऱ्याचे पद बहाल केले. म्हणून त्याचे नावं सदैव लोकांच्या स्मरणात आहे. जोपर्यंत सृष्टीचे अस्तित्व आहे तोपर्यंत त्याचे नावं राहिल. त्याने जे केले ते महान संतांनी वा ऋषींनीही केलेले नाही. त्याच्या मंत्रोच्चारणाने त्याला विश्वामध्ये चिरस्थायी स्थान दिले. जहाजे समुद्रपर्यटन करत असताना ध्रुव तारा त्यांना उत्तर दिशा दर्शवतो. ध्रुव तारा नेहमी आकाशाच्या उत्तर दिशेस असतो.
माझ्या जीवनात मी सदैव ' ॐ नमो नारायणाय ' मंत्राचा जप केला. सुरुवातीस तो यांत्रिकपणे होत होता. तेव्हा मी दिवसाला ५०,००० वेळा उच्चारण्याचे लक्ष्य ठेवले होते. ह्या मंत्रोच्चारणामुळे स्वामींनी स्वतः मला उच्चारण थांबवण्यास सांगितला. जर मी तो सुरु ठेवला तर मी समाधी अवस्थेत जाईन असे त्यांनी सांगितले. मी अनेक वेळा समाधी अवस्थेत गेले होते. ह्या मंत्रोच्चारणातुनच मी कलियुगाचे सत्युगात परिवर्तन करते. ह्या मंत्राचे हे सामर्थ्य आहे. जरी तुमचे मंत्रोच्चारण सुरुवातीस यांत्रिकपणे झाले तरी काही काळानंतर त्यामध्ये भाव येण्यास सुरुवात होईल. साधना करणाऱ्यांची ही सुरुवातीची अवस्था आहे. मी क्षणाचाही खंड न पाडता अविरतपणे स्वामींचे नाम घेते. ह्याद्वारे माझे भाव प्रत्येकाच्या हृदयात प्रवेश करून त्यांना माझ्यासारखे बनवतात. ही मंत्रोच्चारणाची परमोच्च स्थिती आहे.
जय साईराम