गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१३

                                        ओम श्री साई राम             
                                अनुभवसिद्ध कर्मयोग 

श्री वसंत साई अम्मांची कर्मयोगावर आधारित जीवनशैली
 कर्मयोग म्हणजे काय ?
       कर्मयोग - गीतेतील तिसरा अध्याय . सामान्य कर्म करतानाही परमेश्वराशी नित्य युक्त राहण्याचा सराव करणे म्हणजे कर्मयोग होय . हा काही एकांतात जाऊन करण्याचा योगाभ्यास नव्हे . कर्म म्हणजे आपण करत असलेली नेहमीची दैनंदिन कृत्ये . उदा :- चालणे,  बोलणे, बसने , लिहिणे आपण करत असलेली प्रत्येक कृती .   
      कर्माशिवाय कोणीही क्षणभरसुद्धा राहू शकत नाही . श्वासोच्छवास हे ही  एक कर्मच आहे . जीवनातल्या प्रत्येक क्षणी आपण कर्म करत  असतो . झोपेतही कर्म करत असतो तथापि , मायेने संभ्रमित झाल्यामुळे इच्छा वासनांमध्ये अडकून आपण आपल्या कर्मामधून य:कश्चित फलाची अपेक्षा धरतो. 
      आपल्या या कर्मांचे मुळ  कारण काय ? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण अविश्रांत काम करत असतो . आपल्याला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा असतो . मुलांचे पालन पोषण करायचे असते . त्यांना चांगले शिक्षण व सुखसोयी उपलब्ध करून दयायच्या असतात . यासाठी आपण हा सर्व खटाटोप करत असतो . एवढे करून आपल्याला काय मिळते ? तर अनंत अडचणी , त्रास आणि अपमान . आपले जीवनही अशांत व अस्वस्थ असते . या सर्वत्र त्रासापासून , मानसिक अस्वस्थतेपासून सुटका करून घेण्यासाठी आपण नाटक , सिनेमा , टी. व्ही. , मासिके यांचा आश्रय घेतो . मित्र- मैत्रिणीना भेटून त्यांच्या बरोबर दुस-यांची निंदानालस्ती करत वेळ घालवतो . याने आपल्याला शांती मिळते का ? दिलासा मिळतो का ? फार फार तर असे म्हणता येईल की , आपल्याला आपल्या मानसिक अस्वस्थतेचा थोड्या काळाकरता विसर पडतो . परंतु घरात पाऊल टाकताक्षणी पुन्हा सगळ्या चिंता-काळज्या आपल्याला घेरून टाकतात . 
            जर हे खरे आहे , तर जगातील सर्व वस्तूंमधून मिळणारा आनंदही तात्कालिक स्वरूपाचा नाही का ? मनुष्य ह्याचा विचारच करत नाही . या वस्तूंमधून मिळणारी शांती , ही खरी शांती नाही याची जेव्हा मनुष्याला जाणीव होते तेव्हा तो ख-या शांतीच्या स्त्रोताचा शोध घ्यायचा प्रयत्न करू लागतो आणि तिथूनच त्याच्या अध्यात्मिक प्रवासास सुरुवात होते . आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर परमेश्वर आपल्याला मदत करतो . परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावातून जर आपण आपली नित्यकर्मे पार पाडली , तर आपल्याला चित्तस्थिरता व शांतीचा लाभ होतो . आपली कामें परमेश्वराला कशी अर्पण करायची ? पुढील गोष्टींवरून याची कल्पना येईल .

                                 सर्व कर्म भगवद्प्रीत्यर्थ
 
            एका गावात दोन विणकर राहत होते . एक होता सामान्य विणकर आणि दुसरा होता कबीरदास . कबीरदास कापड विणतांना परमेश्वराचे नामस्मरण करत असे , स्तुती स्तोत्रे गात असे . तसेच ते कापड तो ईश्वरासाठी विणतो आहे असा भाव त्याच्या मनात असे . दोघेही विणकर बाजारा मध्ये जात  व कापड विकून पैसे मिळवत . दोघेही धन प्राप्तीचा आनंद घेत . कबीराला मात्र त्या बरोबर आध्यात्मिक धन प्राप्तीही होत असे . त्याला भक्तीचा अतिरिक्त लाभ होत असे . अशा रीतीने आपले कर्म ईश्वर चरणी अर्पण करून  कबीराने सामान्य विणकराला कर्मयोगाचा उच्च  दर्जा प्राप्त करून दिला . 
           असेच दुसरे उदाहरण गोरा कुंभाराचे . तो कुंभार काम करत असे , मडकी बनवतांना परमेश्वराचे गुणगान करत असे . मातीची मडकी व भांडी बाजारात विकून त्यावर आपला चरितार्थ चालवत असे . त्याने आपल्या कर्माची भक्तीशी सांगड घातल्याने त्याला परमेश्वर कृपा प्राप्त झाली व तो एक कर्म योगी म्हणून ओळखला जाऊ लागला.

संदर्भग्रंथ :- अनुभवसिद्ध कर्मयोग  

















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा