रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

           

      वसंतामृतमाला
 विदूषक आणि भिकारी (पुष्प दुसरे ) 


      
यामिनीने प्रश्न विचारला, " अत्रेय उपनिषदात असे म्हटले आहे की दृष्टी म्हणजे मनःचक्षुंनी पाहणे . तुम्ही सामान्य लोकांसाठी हे स्पष्ट करून सांगितले परंतु तुम्ही हे सर्व कसे पाहता ?"
          ह्याला माझे उत्तर असे आहे . तरुण वयापासूनच मी कोणतीही गोष्ट भौतिक दृष्टीकोनातून कधीही पाहिली नाही . प्रत्येक गोष्ट मी अध्यात्माशी जोडली . ' तोडजोड ' या नावाने मी याविषयी सविस्तर लिहिले आहे . सामान्य लोकं एखादी गोष्ट त्यांच्या चर्मचक्षूंनी पाहतात आणि काही गोष्टी मनःचक्षूंनी मी जे जे काही माझ्या चर्मचक्षूंनी पाहते ते सर्व मी परमेश्वराशी  जोडते . मी याची अनेक उदाहरणे यापूर्वी दिली आहेत . स्वामी आता फोटो , वस्तू आणि इतर गोष्टी देतात आणि मला लिहायला सांगतात . मी त्या प्रत्येक गोष्टीतील ज्ञानावर लिहिते . जे जे काही मी पाहते . मला त्याचे बाह्य रूप दृष्टीस पडत नाही . मी केवळ त्यातला गर्भितार्थ पाहते . मी प्रत्येक गोष्टीत अंतर्भूत असलेल्या दिव्यत्वाविषयी सांगते . या जगामध्ये दिव्यत्वाविरहीत असे काहीही नाही सर्वकाही त्या एका परमेश्वरातूनच येते . भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे . की ही संपूर्ण सृष्टी म्हणजे एका धाग्यामध्ये ओवलेल्या मण्यांच्या माळेसारखी आहे . हे मणी म्हणजे सृष्टीतील वेगवेगळी निर्मिती . परमेश्वर हा त्या ओवलेल्या माळेचा धागा . जेव्हा आपण माळ पाहतो तेव्हा धागा दृष्टीस पडत नाही . केवळ मणी दिसतात . याप्रमाणे सर्वजण बाह्यजग पाहतात आणि संभ्रमित होतात . बाहेर दिसणारे मणी वेगळे असतात . मनुष्य ' मी आणि माझे ' करण्यात निरर्थक वेळ घालवतो . 
              स्पर्श संवेदना ही जन्मघेण्यास कारणीभूत असते . माणसाच्या मनाला जे जे स्पर्श करून विचलित करते ते सर्व म्हणजे स्पर्श संवेदना. परिणामतः मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या फे-यात अडकतो मनुष्याच्या अतृप्त इच्छा वासना पुढील जन्मास कारणीभूत ठरतात . हे सत्य जाणून आपण त्याचा लाभ घेतला  पाहिजे . केवळ ज्ञानच मनुष्याला पुन्हा जन्म घेण्यापासून मुक्त करू शकते . मन हे सदैव कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मागणी करत असते. मनुष्याच्या मनात सतत काही ना काही इच्छा उदभवत असतात . मनुष्याला सतत काहीतरी हवे असते स्वामींनी एका प्रवचनात असे सांगितले , "तुम्ही भिकारी नाही सिंह आहात. " तसेच 'सत्य साई स्पीक्स ' भाग ५ यातील पान नं. ८ वर ते म्हणतात .
            " जन्मामागून जन्म गेले तरी तुम्ही भिका-याची आणि विदूषकाची भूमिका करून दमला नाहीत का ? आता या जन्मात तरी उदात्त भूमिका करण्यासाठी प्रेरित व्हा ." 
               असे स्वामी म्हणाले . मनुष्य जन्मानुजन्म एखाद्या भणंग भिकाऱ्यासारखा कशाच्या तरी शोधात वणवण फिरतो आहे . आज स्वामी आपल्या बरोबर येथे आहेत . आतातरी आपण ही भिकाऱ्यासारखी वणवण थांबवली पाहिजे . सर्वजण येथे परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी आले आहेत . हे आपण जाणले पाहिजे. इच्छा वासनांमुळेच मनुष्य सैरभैर होऊन वणवण भटकतो आहे . आपल्या इच्छा वासनांची तृप्ती करण्यासाठी तो इकडे तिकडे धावतो आहे . प्रयत्नांची पराकाष्ट करतो आहे . ही सर्व माया आहे . हे सर्व क्षणभंगुर आहे,  अशाश्वत आहे. जर हे जाणले तर तुम्हाला शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल . परमेश्वरप्राप्तीसाठीच आपल्याला हा जन्म दिला आहे . 
          आपल्या प्रत्येकामध्ये एक दिव्य शक्ती आहे . जर हे जाणले आणि तिचा योग्य मार्गाने उपयोग केला तर मनुष्य परमपदास पोहचू शकतो . मनुष्याला ह्याची जाणीव नसते की तो स्वतः एक भिकारी आहे . जेव्हा दारावर एखादा भिकारी येतो तेव्हा तो त्याच्याकडे पाहून घृणा व्यक्त करतो आणि त्याला हाकलवून लावतो . आपल्या शुल्लक इच्छा आकांक्षा पु-या करण्यासाठी आपण स्वाभिमान गमावून एखाद्या भिकाऱ्यासारख्या विनवण्या करतो . 
             जग ही एक रंगभूमी आहे व सर्वजण रंगकर्मी आहेत . सर्वजण परमेश्वराचा अंश म्हणून जन्मले आहेत . आपण आपल्या जीवनातून हे सत्य दर्शवले पाहिजे . सर्वजण त्या एका परमेश्वराची लेकरे आहेत . सर्वांनी हे घोषित करायला हवे . 
             मी एका भिकाऱ्याचा  मुलगा नाही ! या नाट्यात मी एक राजपुत्र आहे , राजाचा मुलगा . मी सम्राट सत्य साईचा पुत्र आहे , विदूषकाचा नव्हे . 
             प्रत्येकाने असा विचार करायला हवा . आपले जीवन ह्या विचारानुसार व्यतीत करू अशी प्रतिज्ञा करायला हवी . तथापि , जीवन कसे जगावे ? आपण सर्वांशी विनम्रतेने प्रेमाने वागायला हवे . आपल्या इच्छा वासना कमी करायला हव्यात . भारतीय संस्कृतीचे अनुसरण करायला हवे. सत्य वचन आणि सदाचराणाच्या मार्गावरून वाटचाल करायला हवी . जीवनाकडून जे मिळाले आहे त्यामध्ये आपण संतुष्ट राहायला हवे . काम आणि पैसा यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे थांबवले  पाहिजे . आजकाल सर्व तरुण मुले पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. तथापि त्या वस्तू आणि ती कमाई क्षणभंगुर आहे . अनित्य आहे . हे जग सोडताना आपण पैसा वा पद बरोबर घेऊन जाऊ शकत नाही . अध्यात्मिक जीवनात घेतलेल्या धड्यांनुसार केवळ सत्कर्म आणि सदगुण आपल्या बरोबर येतात . स्वामींनी गेली ८४ वर्षे जे काही आपल्याला शिकवले त्याचे आचरण , सदगुण  आपण केले पाहिजे . आपल्या जीवनात ती  शिकवण उतवरली पाहिजे . पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू आता पुरे ! परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करा . याच कारणासाठी तो महामहीम अवतार आला आणि सर्वांना शिकवण दिली . हे जग सोडतांना आपण काहीही बरोबर घेऊन जात नाही . नुसती वंशवृद्धी करून काय उपयोग ? एक उदा. पाहू या.  एका मनुष्यास एक मुलगा असतो . एक दिवस तो मृत्यु पावतो. आई वडील अत्यंत शोकाकुल होतात . त्यांचे दुःख पाहून त्यांचे गुरु येतात आणि वडिलांना देव लोकात घेऊन जातात . तेथे त्याला त्याचा मुलगा भेटतो . त्याला तो मनुष्य म्हणतो " तुझी आई आणि मी तुझ्यासाठी किती अश्रू ढाळतो आहोत. तू माझ्या बरोबर घरी परत येणार नाहीस का ? " तो मुलगा विचारतो , " तुम्ही कोण आहात ? मी इथे खूप आनंदात आहे . तुम्ही मला पृथ्वीवर का बोलावता ? तुमचा माझा काय संबंध आहे ? आणि तो मुलगा तिथून निघून जातो . मनुष्याचे मन असेच असते. कोणाचे कोणाशी नाते असते ? मृत व्यक्ति व त्यांचे कुटुंब ह्यांच्या मध्ये काहीही संबंध नसतो . मुलगा स्वर्गात असूनही त्याचे वडील दुःखी होते व मुलगा पुन्हा पृथ्वीवर यावा यासाठी प्रयत्न करत होते. त्यांना त्यांचा वारस त्यांच्या बरोबर हवा होता . त्यांचा वंश चालू राहावा व वाढावा अशी त्यांची इच्छा होती . हा किती मूर्खपणा  आहे ? तुमचा वंश खुंटो वा वाढो एक दिवस सगळ्यांचाच नाश होणार आहे . हे जाणून आसक्ती न  ठेवता तुमची कर्तव्ये पार पाडा आणि परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करा . स्वामींची शिकवण आचरणात आणा . उठा ! जागे व्हा ! तुम्ही भिकारी नाही ! तुम्ही येथे तुमच्या भिकारी वंशाच्या वृद्धीसाठी आलेले नाही ! तुम्ही महासम्राट सत्य साईची मुल आहात . जर तुम्ही हे जाणलेत तर रामकृष्ण परमहंस आणि रमन महर्षींप्रमाणेच तुमचे नांवही जगामध्ये अमर होईल . 

                                      जय साई राम  
                                                                       श्री वसंता साई

वसंतामृतमाला - विदूषक आणि भिकारी ( पुष्प दुसरे ) दि. २२/ ९/ २०१३ ला ब्लॉगवर प्रकाशित केले होते परंतु चुकून ते डिलीट झाले. करिता आज पुन्हा प्रकाशित करीत आहे . चूकीबद्दल दिलगिर आहे .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा