रविवार, २३ मार्च, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

     " भक्ती हा परिपूर्णतेकडे जाणाऱ्या आत्म्याचा प्रवास आहे . सदैव ईश्वरचिंतनात लीन ही खरी भक्ती होय ".

पुष्प पंधरावे पुढे सुरु

          यासाठीच पूर्वीच्या काळी चार आश्रमांची स्थापना केली गेली . ब्रम्हचर्य , गृहस्थ , वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम होत . प्रथम मनुष्याने मन आणि इंद्रियांवर ताबा मिळवायला हवा . म्हणून सर्वांवर नियंत्रण कसे मिळवावे आणि या जगात उचित जीवन कसे जगावे हे शिकवले जाई . सर्वजण सद्गुण अंगी बाणवून मगच भौतिक जीवनात प्रवेश करत , नंतर विवाह करत . अनासक्त राहून आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत . त्यानंतर ते वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करत . यामध्ये ते त्यांची कर्तव्ये आणि कौटुंबिक बंध या सर्वांचा त्याग करत . त्यानंतर संन्यस्त जीवनाकडे , संन्यास या चौथ्या आश्रमाकडे वाटचाल करत . 
          आज मनुष्याने ही जीवन प्रणाली सोडून दिली असून तो मन मानेल त्याप्रमाणे जीवन जगतो आहे . त्याच्या अंगी शिस्त वा आत्मसंयमन नाही . शिस्त लावणे आणि ज्ञानदान हे सरस्वतीचे कार्य आहे . हे ब्रम्हा आणि सरस्वती या दोघांचे कार्य आहे . प्रत्येक पुरुष आणि स्त्री ब्रम्हा आहेत . त्यांचे ज्ञान सरस्वती आहे . ज्ञान आणि बोधरहित जीवन हे पशुजीवनासमान आहे . म्हणून सर्वांनी भारतीय संस्कृतीचे अनुसरण केले पाहिजे . 
          पुढचा मुद्दा - शिव शक्ती . संहारकर्ता म्हणून शिवाचे पूजन केले जाते . पार्वती ही शिवाची अर्धांगिनी आहे . शिव आणि शक्ती हे कोणी पुरुष आणि स्त्री नव्हेत . शिव आणि शक्ती हे रूपक आहे जे जगाला तप आणि कामदहन याविषयी निर्देश करते . भगवान शंकराने कामदहन केले . विवाहापूर्वी कामदहन करणे गरजेचे आहे . अशा तऱ्हेने शिव हे नितीतत्व शिकवतात . पार्वती हे तपाचे प्रतिक आहे . सर्व इच्छांचा नाश करण्यासाठी ती तप आणि साधना करते . सर्व भौतिक इच्छांचा नाश  झाल्यानंतरच त्यांचा विवाह होतो . तसे न केल्यास पुन्हा जन्म अटळ आहे . शिव संहारकर्ता आहे याचा हा अर्थ आहे . आपण साधना करून शिखर गाठतो . याचा अर्थ सर्वांमध्ये असणाऱ्या मूलाधार शक्तीचा आज्ञा चक्रात असणाऱ्या शिवाशी संयोग होतो . यानंतर जन्म मृत्यूचे चक्र थांबते . 
            माझा जन्म का झाला ? माझा जन्म आणि माझ्या जीवनातील  दुःख यामागे नेमके काय कारण असावे ? यावर मनुष्याने चिंतन केले पाहिजे . अशा तऱ्हेने चिंतन करून आसक्ती , इच्छा आणि ' मी व माझे ' भाव या सर्वांचा नाश केला पाहिजे . असे केल्यानंतर एका मागोमाग एक ज्ञानाची कवाडे खुली होतात . तुम्ही प्रत्येकजण शिव आहात . तुम्ही तुमच्यामधील दुर्गुणांचा नाश केला पाहिजे . यासाठी तुम्हाला सोबत करते तुमची साधना . हेच तप आहे . तुमच्या दुर्गुणांचा नाश करणारे तुम्ही शिव आणि तुमची साधना म्हणजेच तुमची शक्ती , पार्वती . या दोघांचा संयोग हा विवाह अथवा मुक्ती होय . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......

जय साई राम 
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा