ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" निरंतर ईशचिंतन हीच खरी भक्ती ".
पुष्प पंधरावे पुढे सुरु
आता महाविष्णूंचे तत्व पाहू या . ते पालनकर्ता आहेत . महालक्ष्मी या कार्यात त्यांना मदत करते . संकटकाळी मनुष्य देवाची प्रार्थना करतो . जेव्हा तो कळकळून , अंतःकरणपूर्वक भगवंताची प्रार्थना करतो तेव्हा त्याची कृपा धावून येते मग तो कोणीही असो , कोठेही असो वा प्रार्थना कोणत्याही कारणास्तव् असो . त्याची कृपा त्यांना प्राप्त होते . हे मन आणि भाव यांच्याशी संबंधित आहे . त्यांच्या कृपेला महालक्ष्मीचे नाम आणि रूप देण्यात आले आहे .
महालक्ष्मीचे स्थान महाविष्णुंच्या वक्षस्थली का आहे ? कारण कृपा अंतःकरणातून , हृदयातून येते . मनुष्याच्या हाकेला कृपा धावून येते . महाविष्णु हे सृष्टीचे पालन पोषण करणाऱ्या देवाचे रूप आहे . संकटकाळात , दुःखात वा आजारपणात मनुष्याने केलेल्या अंतःकरणपूर्वक प्रार्थनेने त्याच्या हृदयातील निद्रिस्त परमेश्वर जागा होऊन त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतो व त्यांच्या दुःखाचे परिमार्जन करतो . महाविष्णु सर्वांच्या हृदयात निवास करतात व तेथून ते सर्वांचे पालन पोषण करतात . सर्वांचे हृदय म्हणजे क्षीरसागर होय . तेथे महाविष्णु योगनिद्रेत पहुडले आहेत . विवेक बुद्धीने आपण आपल्या हृदयाचे समुद्र मंथन केले पाहिजे . हे विश्व खरे नसून भ्रम आहे , माया आहे . मृत्युसमयी आपल्या बरोबर काहीही येत नाही . आपले मन ईश्वराभिमुख करून जेव्हा आपण पुन्हा पुन्हा यावर चिंतन करू तेव्हा त्याच्या कृपेचा ओघ आपल्याकडे वळेल . हीच महालक्ष्मी आहे .
जसे समुद्र मंथनानंतर प्रथम हलाहल बाहेर आले . त्याचप्रमाणे जेव्हा आपण साधना करतो तेव्हा आपल्यातील दुर्गुण दूर केले जातात . समुद्रमंथनातून सर्वात शेवटी बाहेर आली महालक्ष्मी . जेव्हा सर्व दुर्गुण नष्ट होतात तेव्हा परमेश्वरी कृपा म्हणजेच महालक्ष्मी हातात माला घेऊन दृश्यमान होते . मनुष्य म्हणजे महाविष्णु . जेव्हा तो साधनेद्वारे त्याच्या सर्व दुर्गुणांचा नाश करतो तेव्हा त्याला कृपा प्राप्त होते . ही कृपा म्हणजेच महालक्ष्मी होय . ती मनुष्याच्या गळ्यात मुक्तीची माला घालते व भवरोगामधून त्याची सुटका करते . तो परमेश्वरामध्ये विलीन होतो . स्वामींचे अवतार कार्य याचा निर्देश करते .
…
व्ही. एस.
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा