रविवार, १७ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

         कृष्ण भक्ती ही एक अशी शृंखला आहे जिच्याद्वारे तुमचे मर्कट मन बद्ध केले जाते , शांत केले जाते . क्रिश शब्दाचा अर्थ आकर्षून घेणे . भगवान कृष्ण तुमचे मन त्यांच्याकडे आकर्षून घेतात व तुम्हाला सतावणाऱ्या इंद्रियजन्य इच्छांपासून दूर ठेवतात . ते सर्व जीवांची शांती आनंद आणि ज्ञान प्राप्तीची गहिरी तृष्णा भागवतात म्हणून अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कृष्णभक्तीची तृष्णा हे स्वास्थ्याचे लक्षण समजले जाते . जोपर्यंत कृष्णमहिम्याच्या चिंतनाने तुमचे चारित्र्य शुद्ध होण्यास सुरुवात होत नाही तोपर्यंत कृष्णनाम जपणे व्यर्थ आहे . भगवद्कृपेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आणि ती केवळ पात्र व्यक्तीस प्राप्त होते म्हणून मनामध्ये ईश्वरनिष्ठा आणि भक्तीभाव ठेवून आज गोकुळाष्ठमीच्या शुभदिनी तुम्ही तुमचे चारित्र्य शुद्ध बनवण्यास प्रारंभ करा म्हणजे तुम्हाला भगवद्कृपेची प्राप्ती होईल .
- बाबा -


जेव्हा बाळ कृष्ण येतो 



            एकदा दिव्य दृश्यात मी बाळकृष्ण बघते .
          तो मला उंच आकाशात घेऊन जातो . जंगल, पर्वत, झाडे, वृक्षवेली सर्व काही कृष्ण . सर्वत्र कृष्ण, अगदी पृथ्वीच्या कणाकणात, पाण्याच्या प्रत्येक थेंबात ! अहाहा ! किती आनंद ! कृष्ण गातोय गोपी त्याच्या सभोवती नाचत आहेत . संपूर्ण जग आनंदाने नाचतंय . कृष्ण आणि मी पोपट बनून एकमेकांशी बोलतोय, कोकीळ बनून गातोय, मोर होऊन नाचतोय, गरुड होऊन आकाशात भरारी घेतोय ! 
( माझ्या नेत्रांवाटे अश्रुधारा वाहताहेत . मी पुतळ्यासारखी निस्तःब्ध झाले . ) 
१७ मार्च १९९६ 
         प्रातःकाळी मी विष्णूसहस्त्रनाम म्हणते आहे . एकाकी मी बाळकृष्णाला उड्या मारत, नाचत, गात, असलेला पाहते . तो माझ्या मांडीवर बसतो आणि माझ्याकडे पाहून हसतो . गळ्याभोवती हात टाकून माझा पापा घेतो . मी त्याला प्रेमाने कुरवाळते, त्याचे हात धरून त्याच्याशी खेळते . त्याला झोपाळ्यावर बसवते आणि हळुवार झोका देते . यशोदामातेप्रमाणेच, मी त्याच्या मिश्कील डोळ्यांकडे एकटक पाहण्याचा आनंद लुटते . त्याच्या इवल्याश्या निळसर पायांना स्पर्श करून लाडानी त्याच्या हातांना चापटी मारते . तो धावतो, मी त्याला पकडायचा प्रयत्न करते पण पकडू शकत नाही . माझे डोळे आनंदाश्रूंनी भरतात . शेवटी थकून मी ध्यानाला बसते . गालातल्या गालात हसत तो माझ्या मागे येऊन लडिवाळपणे आपल्या इवलाश्या हातांनी माझे डोळे झाकतो . 
         किती सुंदर दर्शन ! मी पूर्ण शुद्धीवर आले तेव्हा रेडिओवर स्वामी हरिदास गिरींच गाणं लागलं होतं, ' कृष्णा, ये, तुझ्या खोड्यांविना ये ! ' 




       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा