रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वराला विशुद्ध प्रेमाने स्पर्श करणे म्हणजेच मुक्ती."

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

                स्वामींनी अनेकदा त्यांच्या कृपाशिर्वादांमधून स्तूप बांधावा हे सूचित केले. ५ मार्च २००४ रोजी स्तूपाची पायाभरणी करण्यात आली. नाडीग्रंथांनी सूचित केलेल्या पवित्र वस्तू स्तूपाच्या पायामध्ये घालण्यात आल्या. उदा. अखिल जगातील तीर्थक्षेत्र व आध्यात्मिक केंद्रे यामधून आणलेली वाळू, माती आणि वेगवेगळ्या नद्यांचे व देवळांमधील पवित्र जल. या मिश्रणामध्ये मी माझे प्रेमभाव ओतले. 
खालील ठिकाणांहून आम्हाला पवित्र माती आणि जल मिळाले. 
- द्वारका, वृंदावन, सोमनाथ 
- वैदिश्वरन मंदीर 
- तिरुवनंतपूरम, पद्मनाभ स्वामी मंदिर 
- दांडी 
- पुट्टपर्तीतील पवित्र माती, सर्व धर्म स्तूप, ध्यान वृक्ष, कल्पवृक्ष, हनुमान मंदिर, राधाकृष्ण मंदिर, चित्रवती नदी. 
- जेरुसलेम ( ख्रिस्ताचे थडगे )
- बेथलहेम 
- ग्रीसमधील पवित्र स्थाने व प्राचीन मंदिरे 
- माउंट अॅथोस 
- सेंट रॅफेल 
- टिनोस (एक बेट, ज्या बेटावर व्हर्जिन मेरीचा पवित्र फोटो आहे.)
- फादर पॅशिअस यांचे थडगे 
- आर्केंजल मायकेल मठ 
- रोम - द व्हॅटिकन 
- योगानंदांचे अमेरिकेतील एनसिनिटस रिट्रीट 
- सॅन - डि - अॅगो येथील पॅसिफिक महासागर 
- भारतातील नद्या - बद्रीनाथ, हरिद्वार, ऋषिकेश व गंगोत्री 
- अरुणाचल प्रदेशातील तिरुवन्नमलई येथील खडक आणि माती 
- श्री काली दक्षिणेश्वर मंदिर, कोलकता 
- श्री रामकृष्ण मठ, बेलूर 
- श्री शारदादेवी मंदिर, कोलकता 
- स्वामी विवेकांनद मंदिर, कोलकता 
- आळंदीची इंद्रायणी नदी 
- ज्ञानदेवांचे जन्मस्थळ 
- श्री राघवेंद्र मंदिराजवळील तुंगभद्रा नदी 
- मुंबईचा अरबी समुद्र 
- बंगालचा उपसागर, अष्टलक्ष्मी मंदिर, चेन्नई 
- कपालेश्वर मंदिर, चेन्नई येथील यज्ञकुंड 
- मथुरा, वृंदावन, हरिद्वार, ऋषिकेश येथील वाळू 
- कावेरी आणि कोलिदाम या नद्यांच्या संगमावरील श्रीरंग मंदिर 
- केरळमधील गुरुवायूर मंदिर 
- २२ हरीश्चंद्र मंदिरामधील पवित्र माती 
- काशीमधील पवित्र माती 
- अयोध्येमधील पवित्र माती 
- शिर्डीमधील पवित्र माती 
- मुक्ती निलयममध्ये केल्या जाणाऱ्या प्रेमयज्ञातील उदी 
- वडक्कमपट्टीमधील साई गीतालयमच्या उद्घाटन प्रसंगी झालेला यज्ञ व त्यांनतर झालेल्या सर्व यज्ञातील उदी .     
- श्री चैतन्य, जगन्नाथ पुरी व अशा इतर अनेकानेक ठिकाणांच्या अक्षता. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " परमेश्वरावर केंद्रित असणारे भाव मनुष्याला जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्त होण्यास मदत करतात."

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

                 स्तूप कोणत्या व्यक्तीकडून बांधून घ्यावा, त्यासाठी लागणारे खडक कोठून आणायचे, हे नाडीमध्ये सविस्तर दिले होते. तसेच जगातील २५ पवित्र स्थानांची पवित्र माती गोळा करून आणावी, असेही लिहिले होते. 
                 भूमीपूजन कोणत्या दिवशी करावे, प्राणप्रतिष्ठा कोणत्या दिवशी करावी ह्याप्रमाणे कार्यारंभापासून कार्य पूर्णत्वास जाईपर्यंत प्रत्येक गोष्ट बारीकसारीक तपशीलासह सहा नाड्यांमध्ये देण्यात आली होती.  
                वास्तुविशारद गणपती स्थपती यांनी आम्हाला स्तूपाविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले," हे शिवलिंग आहे. करोडो लोक त्याची पूजा करतील. स्तूपाच्या मध्यभागी सर्व क्ती एकवटली आहे. हा आदिम अग्नी आहे. हा स्तूप मूल स्तंभ आहे. ही आदिशक्ती, निर्मितीच्या आधीपासून अस्तित्वास आहे. हा स्तूप १००० वर्षे उभा राहील. हे मुक्ती निलयम भविष्यात वृंदावन बनेल."

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २४ डिसेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

         " निरागसतेने प्राप्त केलेल्या स्थानापाशी अहंकार कधीच पोहोचू शकत नाही."

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

                 मी आणि स्वामी एकाच देहाचे दोन भाग आहोत. वसिष्ठ गुहेमध्ये माझा स्वामींशी योग झाला. स्वामी म्हणाले तू सर्वांना वैकुंठाप्रत घेऊन येशील. याचा नाडीग्रंथामध्येही उल्लेख आहे. नाडीत असे लिहिले आहे," तिने परमेश्वराकडे प्रार्थना करून मुक्ती स्तंभ बांधण्याचा वर मागून घेतला आहे. " स्वामी मला भरभरून देण्यास तयार होते. परंतु मला त्यातले काहीही नको होते. मला फक्त वैश्विक मुक्ती हवी आहे. मला माझ्याकरता काहीही नकोय. या वरदानामुळे स्वामींनी मला स्तूप बांधण्यास सांगितला. माझे तपोबल स्तूपाद्वारे विश्वामध्ये पसरते व सर्वांची आध्यात्मिक उन्नती करते. नाडीमध्ये असेही म्हटले आहे की स्तूपामुळे दृष्ट, दुर्जन, मद्यपी अशा लोकांनाही मुक्ती मिळेल. त्यात म्हटले आहे -
                " स्तूपस्तंभ हे संदेशद्वार असून त्याद्वारे साईबाबा विश्वाला सत्यबोधन करत आहेत. मी, विश्वाचा आदिगुरू काकभुशंडी येथे ज्ञानश्रुती देत आहे. या परिशुद्ध धर्म चक्र स्तंभामुळे जगातील लोकांना मुक्तीचा कृपाप्रसाद लाभणार आहे." 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

         " एकवेळ तुम्ही समुद्रकिनाऱ्यावरील वाळूचे कण मोजू शकाल परंतु परमेश्वराचा संपूर्ण महिमा जाणणे तुम्हाला कधीही शक्य होणार नाही. "

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

               स्वामींनी मुक्ती स्तूपाचे महत्त्व समजावून सांगितल्यानांतर आम्ही जगद्विख्यात मंदीर शिल्पकार व वास्तूतज्ञ गणपती स्थपती यांना भेटण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नांनंतर आम्ही त्यांना चेन्नईत भेटलो. योगायोगाने काही दिवस अगोदरच एका व्यक्तीने आम्हाला कांचीपुरमला जाऊन काकभुशंडी ऋषींना स्तूपासंबंधी लिहिलेल्या नाडीग्रंथाचे वाचन करण्याचा सल्ला दिला होता.एस. व्हीं.नी. कांचीपुरमला जाऊन नाडीग्रंथ पाहिला. 
ते ऋषी सांगतात,
               " हे स्थान पांडयनाडुच्या सीमेवर आणि मीनाक्षीच्या वास्तव्याजवळ आहे; हा भूलोक वैकुंठ, पृथ्वीवरील स्वर्ग, स्वर्ग आणि धरती यांना जोडणारा पूल. हे स्थान पवित्र मैलकोटे या नावाने ओळखले जाते ... ती परमेश्वराची अर्धांगिनी बनली आहे." 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १७ डिसेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" भगवंतावर स्थिर असणारे मन सदैव शांत असेल."

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

               स्वामींनी ध्यानात दाखवल्यानुसार मी स्तूपाचे चित्र रेखाटले. स्वामींनी त्यावर कुंकू सृजित करून आशीर्वाद दिले. नोव्हेंबरमध्ये आम्ही स्वामींच्या वाढदिवसासाठी पुट्टपर्तीला गेलो. 
तेथे स्वामी म्हणाले, 
                 " तू स्तूप बांधायला सुरुवात कर. तुझ्या खोलीच्या बरोबर समोर स्तूप बांध. स्तूपाद्वारे तुझी स्पंदने ग्रहण केली जाऊन सर्व जगामध्ये प्रसारित होतील. तू ताबडतोब बांधकामाला सुरुवात कर."

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" गीता ..... मुक्तीचे अमृत आहे."

प्रकरण तेरा

मुक्ती स्तूप 

१५ ऑक्टोबर २००२ ध्यान 
वसंता - स्वामी, मला दुसरे काही नकोय, मला फक्त तुम्ही हवेत. मी माझी पूर्ण तपशक्ती व प्रेमशक्ती अर्पण केली आहे. तुम्ही जगामध्ये परिवर्तन घडवा आणि सर्वांना मुक्ती द्या. तुम्ही मला मुक्ती नाही दिली तर हरकत नाही, मात्र इतरांना अवश्य द्या. 
स्वामी -  रडू नकोस. तुझा त्याग आणि कारुण्यभाव यांचे अमृत होऊन तुझे सहस्त्रार उघडले आहे. त्यातून अमृत कारंजाचे तुषार उडत आहेत. ही अमरतारका आहे, अमरत्वाची चांदणी. साधुसंत, योगी यांच्या शरीरात अमृताचे थेंब निर्माण होतात. ते त्यांना अमरत्व बहाल करतात. मी तुझ्या सहस्रारामधून अमरतारका उगवताना दाखवली. त्याग अमृत झाला, अमृत तेजोमय झाले व त्या तेजाची स्पंदने बनली. ही स्पंदने सर्वव्याप्त झाली. ही प्रक्रिया प्रत्येकाला मुक्ती प्रदान करेल. तू चारही दिशांकडून लोकांना तुझ्याकडे आकर्षित करशील आणि उर्ध्वलोकात घेऊन जाशील 
ध्यानसमाप्ती


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १० डिसेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " ऐहिक संपत्ती अशाश्वत आहे तर आध्यात्मिक संपत्ती शाश्वत आहे. " 

प्रकरण तेरा 
  मुक्ती स्तूप    



" जे कोणी स्तूपाचे दर्शन घेतील त्यांची कुंडलिनी जागृत होईल " 
अमर तारका 
                 वसिष्ठ गुहेमध्ये योग झाल्यानंतर एप्रिल २००२ साली स्वामींनी मला मुक्ती निलयममध्ये स्तूप बांधण्यास सांगितले. ध्यानामध्ये त्यांनी मला स्तूपाची बांधणी (रचना )दाखवली. 
स्वामी म्हणाले,
                " त्याचा पाय षट्कोनी असावा, जो परमेश्वराच्या षट्गुणांचे निदर्शन करेल. त्याच्यावर महालक्ष्मी चे आसन दर्शवणारे लाल रंगाचे कमलपुष्प असावे. तू महालक्ष्मी आहेस. हा स्तूप म्हणजे तुझा देह आहे. त्या लाल कमलपुष्पावर ६ भागांचा एक स्तंभ असावा. ते सहा भाग म्हणजे कुंडलिनीचा सहा चक्रे. सहाव्या भागाच्या वरती सहस्त्रार असावे व सहस्त्राराच्या वर सोनेरी चांदणी असावी. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

        " आसक्ती आणि ममत्व मनामध्ये संभ्रम निर्माण करते तर परमेश्वरावरील प्रेम आत्मसाक्षात्कारा कडे घेऊन जाते. "

प्रकरण बारा 

पंढरपूर 

४ ऑक्टोबर २००८ 
                आम्ही सकाळी ' गणेश अभिषेक '  करण्यासाठी जात होतो, तेव्हा आमच्या नजरेस वाळूमध्ये पावलांचे दोन खोल ठसे उमटलेले दिसले. ते थोडेसे अवघडलेल्या स्थितीत उमटल्यासारखे  दिसत होते. दोन्ही टाचा टेकल्या होत्या परंतु दोन्ही पायांची बोटे एकमेकांपासून दूर आणि बाहेरच्या बाजूला उमटली होती. आम्ही आश्रमातील सर्वांना विचारले, परंतु कोणीच तिथे उभे राहिले नव्हते. 
               थोडयाच वेळाने एडी धावत आले आणि म्हणाले, की त्यांनी आत्ताच एक भाला मोठा गरुड पक्षी आश्रमाच्या वर पाहिला. आम्ही आपआपसात चर्चा करून असा निष्कर्ष काढला की गरुडाने पांडुरंगाला इथे सोडले असावे. कारण त्या पावलांचे ठसे पांडुरंगाच्या पावलांशी मिळते जुळते होते. पांडुरंग ज्या विशिष्ट पवित्र्यात उभे राहतात. त्याच्याशी ते ठसे मिळतेजुळते होते. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम    

रविवार, ३ डिसेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " मुक्तीची कामना करणाऱ्यांना भगवंत मुक्ती देतो आणि आनंदाची इच्छा असणाऱ्यांना आनंद देतो."

प्रकरण बारा 

पंढरपूर 

पांडुरंग - ध्येयाचा मार्ग 
             १९८२ मध्ये मी ३५ दिवसांच्या यात्रेला गेले होते. तेव्हा आम्ही बद्रीनाथ, केदारनाथ, गया, काशी, अयोध्या, पंढरपूर इ. तीर्थक्षेत्रांना भेट दिली. पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेतले. चरणस्पर्श केला. परंतु त्यावेळी  काही विशेष अनुभव आला नाही. तेव्हाही तेच पंढरपूर, तोच पांडुरंग आणि तीच वसंता होती. परंतु काहीच घडले नाही. का बरं ? आता वसंताच्या मनात जे भाव आहेत ते १९८२ मधील वसंतामध्ये नव्हते. 
              त्यावेळी मी स्वामींना पाहिले नव्हते. मी १९८५ मध्ये त्यांचे प्रथम दर्शन घेतले. वीस वर्षांच्या कालावधीत माझी भक्ती ज्ञानात परिपक्व होऊन विरागी बनली. मी अखंड साधना केली. माझी साधना म्हणजे केवळ भक्ती, पराकोटीची भक्ती. मला साधना म्हणजे काय, हेच माहित नव्हते. देह, मन, आत्मा यांना हलवून सोडणारी परमेश्वर प्राप्तीची तळमळ मला होती एवढेच ! मूर्तीने प्रथम माझ्या मनास बंदिवान केले व नंतर त्याचा ताबा अवताराने घेतला. त्याच्यावर माझ्या भावभावनांचा वर्षाव केला. बाह्यजगात आणि भौतिक गोष्टी ह्यांचे विचार माझ्या मनात कधी आलेच नाहीत. मनात होते ते फक्त स्वामी, स्वामी आणि स्वामींच ! 
              हळूहळू स्वामी ध्यानामध्ये माझ्याशी बोलू लागले. मला मार्गदर्शन करू लागले. त्यांनी मला माझ्या भक्तीचे भावविश्व उलगडून दाखवणारी पुस्तके लिहिण्यास सांगितले आणि नंतर गीता, उपनिषदे आणि उपनिषदांच्या पलीकडे याविषयी लिहिण्यास सांगून स्वामींनी मला भक्तिमार्गावरून ज्ञानमार्गाकडे वळवले. 
               मला परमेश्वराशी लग्न करायचे आहे आणि स्वामी माझी इच्छा पुरी करत आहेत. त्यामुळे ऐक्याची परमोच्च स्थिती प्राप्त करूनही मी विरहवेदना अनुभवत असते. ज्या पांडुरंगावर मी लहान वयापासून भक्तीची उधळण केली, तो पांडुरंग म्हणजे तेच असल्याचे स्वामी सिद्ध करत आहेत. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम    

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" जर मन शांत असेल तर देहालाही पीडा नसेल."

प्रकरण बारा 

पंढरपूर 

स्वामी म्हणाले,
                 " तू रडू नकोस. तू अश्रू ढाळलेस तेव्हा माझ्या डोळ्यात रक्ताश्रू आले. तुझ्या हातातून रक्त आले तेव्हा माझ्याही हातातून रक्त आले. तुझी पावले भाजली तेव्हा माझेही पाय भाजले. त्याचप्रमाणे तुझ्या हृदयाची जखम माझ्या देहाची जखम झाली." 
                 २७ मे ह्या दिवशी मला झालेलं दुःख मी कोणत्या शब्दात सांगू ? त्यानंतर महिनाभर माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. माझ्या हृदयाची जखम ही स्वामींच्या देहावरील जखम बनली. कशाच्या तरी अलर्जी माझ्या त्वचेला आत्यंतिक कंड सुटली होती. मला खूपच त्रास होत होता. माझ्या हातांना व पायांना जखमा झाल्या होत्या. त्यातून द्रव पाझरत होता. अनेक दिवस माझ्या संपूर्ण अंगाची लाही लाही होत होती. 
हे प्रभू,
बंधमुक्त कर मज, ये मजसमवेत
सदा सर्वदा राहू दे हातात हात 
पुन्हा पुन्हा जन्म, किती दुःखभोग 
आस तुझ्या करूणदृष्टीची 
प्रीती तुझी असे माझा अक्षय ठेवा ! 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " परमेश्वराचे साम्राज्य तुमच्या प्रतिक्षेत असताना ऐहिक साम्राज्याची इच्छा कशाला ? "

प्रकरण बारा 

पंढरपूर 

                 २७ तारखेला स्वामींच्या स्वागताची जय्यत तयारी झाली होती. आम्ही डोळ्यात प्राण आणून स्वामींची प्रतिक्षा करत होतो. पण ते आले नाहीत. मी धाय मोकलून रडत होते. 
                 त्यानंतर स्वामी कोडाईकॅनलहून व्हाईटफिल्डला गेले. मी स्वामींना विचारले, " स्वामी, मी व्हाईटफिल्डला येऊ का ? " स्वामी म्हणाले," नको. तू येऊ नकोस." स्वामी ४ जूनपर्यंत दर्शन देणार नसल्याचे बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितले. त्यांनतर आम्हाला एक फोन आला, की स्वामींचे ऑपरेशन झाले आहे. त्यांनतर बऱ्याच जणांकडून ही बातमी खरी असल्याचे समजले. प्रत्येक फोनगणिक दुःखाचे कढ अनावर होऊन मी आक्रोश करत होते. स्वामींनी नंतर मला सांगितले," जगाच्या कर्मांचा संहार करण्यासाठी मी हे सोसतो आहे." 
                माझ्या अश्रूंना अंत नव्हता. काही दिवसानंतर मुक्ती निलयममधील, पुरुषभर उंचीचा स्वामींचा फोटो खाली पडला. कृष्णाच्या मूर्तीचा मुकुटू तुटला व त्याच्या हनुवटीलाही भेग पडली. मी एक महिना सतत रडत होते. त्यावेळी आम्ही स्वामींच्या फोटोवर रक्ताश्रू पाहिले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  
  

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


कलियुग अवतार भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या आगमन दिना निमित्त  

                 आज २३ नोव्हेंबर, सर्वशक्तिमान सर्वज्ञ आणि सर्वव्यापक श्री सत्य साई बाबांचा जन्मदिवस ! त्यानिमित्त श्री वसंतसाईंनी त्यांच्या पुस्तकातून केलेल्या उपदेशाचे वाचन करून तो आचरणात आणण्याचा संकल्प करून श्री सत्य साई बाबांचा जन्मदिन साजरा करू या.
अम्मा म्हणतात,
                 " विश्वाचे कल्याण कशामध्ये आहे ? प्रत्येकामध्ये आध्यात्मिक जागृती व्हायला हवी ! आपण हे जीवन का जगतो ? आपण जन्म का घेतला ? पुन्हा पुन्हा मृत्यू पावण्यासाठी आपण जन्म घेतला का ? नाही हा आपला उद्देश नाही. अंत नसलेल्या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी आपण जन्म घेतला आहे. आपण जन्म घेण्याचे हे एकमात्र कारण आहे. आता ही मुक्ती मिळवायची कशी ? अखंड साधनेद्वारे हे शक्य आहे . मी भक्तांना नेहमी सांगते की स्वामींच्या शिकवणीचा नियमित अभ्यास हेच आपले जीवन बनून गेले पाहिजे. जर आपल्यापैकी प्रत्येकाने आध्यात्मिक सत्यं जाणून घेतली तर खऱ्या अर्थानी आपली घरे माधुर्याने ओतप्रत भरून जातील. आपल्या घरांमधील परिवर्तनाने देशामध्ये परिवर्तन घडून येईल जर संपूर्ण देशात आध्यात्मिक जागृती आली तर संपूर्ण जगामध्ये सुपरिवर्तन दिसून येईल. आपण मानवतेच्या कल्याणाची उत्कट इच्छा ठेवली पाहिजे. " लोक समस्ता सुखिनो भवन्तु " चा हाच अर्थ आहे. (जगातील सर्व जीव सुखी होवोत )
                  हा धडा आपण आपल्या पूर्वजांकडून शिकलो आहोत.' संपूर्ण जग सुखात आनंदात राहो ' अशी एक म्हण आहे. हा आपला वारसा आहे, आपली संस्कृती आहे. समस्त जग सुखी होवो, हा आपल्या पूर्वजांकडून मिळालेला अमूल्य ठेवा आहे. भौतिक संपत्ती अशाश्वत असते परंतु आध्यात्मिक संपत्ती शाश्वत असते. आपण सदैव निःस्वार्थीपणे सामायिक  हिताचा विचार करून कार्य केले पाहिजे.




जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " परमेश्वरावर प्रेम करा. त्याचा ध्यास घ्या. तुम्हाला फक्त तो आणि तोच हवा आहे, हे त्याला सांगा. "

प्रकरण बारा 

पंढरपूर 

                  तसेच एकदा प्रेमयज्ञ करताना चुकून माझा पाय निखार्यावर पडला आणि माझा तळपाय भाजला. त्याच दिवशी आम्ही फोटोतील स्वामींच्या पायावर भाजल्याच्या खुणा पाहिल्या. अशा बऱ्याच घटनांमधून मी आणि स्वामी एक आहोत, हे स्वामी पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहेत. 
                  पंढरपूरहून परत आल्यानंतर आम्ही ११ मे २००३ ला व्हाईटफिल्डला गेलो. कारण स्वामी तिथे होते. स्वामींनी तात्काळ समर कोर्स रद्द केला आणि ते कोडाई कॅनलला गेले. त्यांच्या पाठोपाठ आम्हीही कोडाई कॅनलला गेलो. तेथे ध्यानात स्वामी म्हणाले," तू  मुक्ती निलयमला जा. मी तिथे येईन." आम्ही त्वरित निमंत्रण पत्रिका बनवली. चार दिवसाच्या अवधीत स्वामींनी त्यांच्या भेटीशी संबंधित आमची १३ पत्रे व निमंत्रण पत्रिका घेतली. स्वामींनी आम्हाला आशीर्वाद दिले. आम्ही मुक्ती निलयमला आलो. स्वामींच्या स्वागताची सर्व तयारी केली. मी स्वामींना रोज प्रार्थना करत होते." स्वामी, तुम्ही माझ्यासाठी नाही, तर जगाच्या कल्याणासाठी मुक्ती निलयमला या. तुम्ही इथे येऊन मुक्तीचा ध्वज फडकवा. आम्ही येथे दररोज यज्ञ करतो. तुम्ही स्वतः येऊन, स्वहस्ते देवांना पूर्णाहुती द्या."  

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" निरंतर ईशचिंतन हीच खरी भक्ती."

प्रकरण बारा 

पंढरपूर 

आम्ही दोघं एक आहोत 
                 ऑक्टोबर २००२ साली मुक्ती निलयमच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी आम्ही ' शुद्ध सत्व ' इमारतीमध्ये यज्ञ केला. यज्ञात समिधा अर्पण करताना प्रत्येकवेळी मी म्हणत होते," स्वामी, तुम्ही पूर्णाहुती म्हणून माझा स्वीकार करून जगाला मुक्ती द्या. " आम्ही जेव्हा यज्ञात पूर्णाहुती दिली तेव्हा मी स्वतःस अग्नीला अर्पण करण्याचा प्रयत्न केला. परंतु एस. व्हीं. नी मला मागे ओढले. त्या वेळी माझा हात भाजला होता.
                 ऑस्ट्रेलियाच्या लुईसने माझे आणि स्वामींचे एकेक चित्र काढून मला दिले होते. आम्ही ते त्या दिवशी वेदिकेवर ठेवले होते. दुसऱ्या दिवशी त्यातील स्वामींच्या आणि माझ्या चित्रावर भाजल्याच्या खुणा आम्हाला दिसल्या. ध्यानात स्वामी म्हणाले," जे जे काही तुझ्या बाबतीत घडेल ते सर्व माझ्याही बाबतीत घडेल. आपण दोघं एक आहोत. " 
                एकदा गीता माझ्या हातात काचेच्या बांगड्या भरत असताना माझ्या हाताला बांगडीची काच लागली आणि रक्त आले. रक्ताचा रंग भगवा होता. त्यादिवशी संध्याकाळी माझ्या कॉटवरील स्वामींच्या फोटोतील बोटांवर कापल्याच्या खुणा दिसल्या, तसेच कॉटवर आणि उशीवर रक्ताचे काही थेंबही दिसले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " भक्ती हा परिपूर्णतेकडे जाणाऱ्या आत्म्याचा प्रवास आहे. सदैव ईश्वर चिंतनात लीन ही खरी भक्ती होय."

 प्रकरण बारा 

पंढरपूर 

                 वृंदावनमध्ये कृष्णाने राधेच्या गळ्यात अग्नी मंगळसूत्र बांधले. प्रेमयज्ञात अगदी तेच घडले. स्वामींनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले. फोटोमधून हे सिद्ध झाले. फोटोत स्वामी व्हाईटफिल्ड - वृंदावन येथील स्टेजवर बसल्यासारखे दिसत आहेत. मला बनवायला सांगितलेल्या पोट्टू मंगळसूत्रास स्वामींनी २७ मे २००१ रोजी तिथेच आशीर्वाद दिले. त्यावेळी आमच्यापैकी फार थोड्या लोकांना या घटनेची माहिती होती. आता स्वामींनी हे परत एकदा अनेक लोकांसमोर दाखवले आहे. अग्नीला साक्षी ठेवून अग्नीसमोर, अग्निच्याद्वारे स्वामींनी ही घटना दाखवून दिली. त्यांनी माझ्या गळ्यात अग्नी मंगळसूत्र घातले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

               " भक्तांसाठी तो निर्गुण निराकार परमेश्वर अनेक रूपे धारण करतो. भक्तांच्या स्थायीभावानुसार ती रूपे वेगवेगळी असतात. "

प्रकरण बारा 

पंढरपूर 

                 १९६१ मध्ये स्वामी पंढरपूरला गेले होते, तेव्हा त्यांनी मंगळसूत्र साक्षात् करून रुक्मिणीच्या गळ्यात बांधले. राधाकृष्णाचा विवाह झाला नाही. माझ्या शरीर निवेदनासाठी स्वामींनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी विवाह दाखवला. या सर्वज्ञ परमेश्वराची कुशल योजना कोणाला कळणार ? मी हे लिहित असताना मला एक प्रसंग आठवतो आहे. 
                 १९ ऑक्टोबर २००५. मुक्ती निलयमच्या उद्घाटन समारंभाचा वर्धापन दिन. सकाळी आम्ही प्रेमयज्ञ केला. अमरने यज्ञकुंडातील अग्निज्वालांचे बरेच फोटो काढले. एका फोटोमध्ये स्वामी माझ्या मस्तकाच्या वरती खुर्चीमध्ये बसलेले दिसत होते. अजून एका फोटोमध्ये जणूकाही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " प्रेमाने सिंचीत केलेल्या भक्तिच्या बीजातून भक्तिचे नाजुक रोपटे अंकुरते, त्याच्या संरक्षणासाठी साधनेचे कुंपण घालून परमेश्वर प्राप्तीचे फळ मिळवता येते. "

प्रकरण बारा 

पंढरपूर 

स्वामी म्हणाले,
               " तू इथून ताबडतोब निघून परत जा. येथील स्पंदने तू सहन करू शकणार नाहीस. तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेव. अग मीच तो विठ्ठल आहे. यावर विश्वास ठेव. बालपणापासून तू  सदैव ह्याच रूपाचं चिंतन व भक्ती करत होतीस. तुला कल्पना नाहीय की हेच रूप तुझ्या हृदयावर कोरले गेले आहे. मीच तो खरा पांडुरंग आहे हे दाखविण्यासाठी मी तुला इथे बोलावले. नाहीतर मी रुक्मिणीच्या गळ्यात मंगळसूत्र कसे बांधले असते ? तुझी इष्टदेवता कोणती हे तुला माहीत नव्हते. आता ते तुला ज्ञात झाले." 
                 या अगोदर स्वामींनी मला सांगितले," वृंदावनमधील विवाहदृश्यामध्ये तू मला तुझे सर्वस्व अर्पण केलेस. तू तुझा देहही मला अर्पण केलास. याचा सबळ पुरावा मी तुला व्हाईटफिल्डमध्ये देईन. "
                त्यावेळी व्हाईटफिल्ड म्हणजे बंगलोरमधील व्हाईटफिल्ड असे आम्हाला वाटले. तथापि पंढरपूरमधील घटनेनंतर आमच्या लक्षात आले, की पांडुरंगाचे पंढरपूर म्हणजे व्हाईटफिल्ड पांडुचा अर्थ पांढरे आणि रंग म्हणजे क्षेत्र. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

           " आसक्ती आणि इच्छा विरहित मनुष्य जगातील सर्वात श्रीमंत मनुष्य आहे." 

प्रकरण बारा 

पंढरपूर 

                   "  माझा आत्मा ज्याला हाकारत होता, तेच आहे हे ! माझ्या हृदयाची केवळ हीच एक जागा आहे. हा माझा, माझ्या एकटीचा विठ्ठल आहे. आता माझ्या लक्षात आलं की युगानुयुगे मी त्याच्याशी संयुक्त होते. विरहाच्या जाणीवेने माझे डोळे अश्रूंनी डबडबले. मी आक्रोश केला." आता मी दुसरीकडे कुठेही जाणार नाही. मी ही जागा सोडून कुठेही जाणार नाही. पांडुरंगा !विठ्ठला ! मी तुझी आहे."
              कोठून उसळी मारून हे रडू येत होतं ? कुणास ठाऊक !  तेवढयात मंदिराचे पुजारी आले, त्यांनी गाभाऱ्याचे दार बंद केले. ते म्हणाले," तुम्ही रुक्मिणी मंदिरात जा."  मला पाय उचलणेही शक्य होत नव्हते. डोळ्यातून अखंड अश्रूधारा वाहत होत्या. मी अगदी वेडीपिशी झाले होते. मी मोठ्याने ओरडत होते. " नाही, नाही. मी नाही येणार. तुम्ही सगळे जा." मी पूर्णपणे भाववश झाले होते. माझ्या भावनांवर काबू करण्याचा मी प्रयत्न करत होते. माझ्या सोबत्यांच्या मदतीने मी रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात गेले व पुन्हा ध्यानाला बसले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " आपण आपली सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण केल्यानंतर हळूहळू चित्त शुद्धी होते." 
प्रकरण बारा 
पंढरपूर

" आत्म्याचा परमात्म्याशी पूर्ण योग झाल्यानंतरच पूर्ण सत्य प्रकट होते."
               वृंदावनला जाऊन आल्यानंतर आम्ही शिर्डीला गेलो, तेथून पंढरपूरसाठी निघालो. विठ्ठल मंदिराजवळ पोहोचल्यावर दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहिलो. गर्भगृहात प्रवेश मिळाल्यानंतर पांडुरंगाचे दर्शन झाले. मी विठ्ठल पाहिला ! त्याला पाहताक्षणी मला एक जबरदस्त ओढ जाणवली. मी विलाप करत वेदिकेच्या दिशेने ओढली गेले. त्याचा चरणस्पर्श करताक्षणी जणू काही माझ्या डोक्यापासून पायापर्यंत विजेचा झटका बसला. मी आता पूर्ण होते आहे. ही भावना हृदयाच्या गाभ्यातून विकसित झाली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " मृत्यू समयी मनात असणारे प्रबळ विचार पुढील जन्माचा पाय रचतात. "

प्रकरण अकरा

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम

२८ एप्रिल २००३ 
               स्वामी म्हणाले, " इथे राधेचे प्रेम सर्वव्याप्त आहे. सर्वत्र राधाकृष्णाचे प्रेम आहे. लोक, भूतल, झाडेझुडपे, फुले, पाने सर्वकाही प्रेमाने ओथंबले आहे. आचार, विचार, उच्चारांमधून प्रेमाची जाणीव होते व प्रेम व्यक्त होते. वृंदावनला भेट देणाऱ्या कोणालाही या स्थानामध्ये भरून राहिलेल्या दिव्य प्रेमाची अनुभूती येईल. राधा कृष्णाचा आत्मा आहे ह्याची त्यांना जाणीव होईल. हेच आहे आत्मदर्शन ! तुझ्याबरोबर आलेल्या भक्तांना हे आत्मदर्शन झाले. हे आहे राधाकृष्ण तत्वाचे ज्ञान, प्रेमाच्या सत्याची जाणीव. " 
              राधेचे प्रेम एखाद्या तटबंदीप्रमाणे वृंदावनचे रक्षण करत आहे. 
              तेच राधा कृष्ण वेगळ्या रूपात वेगळ्या ठिकाणी पुन्हा जन्मले आहेत. परंतु या जन्मात ते एकमेकांपासून दूर आहेत. त्यांच्या प्रेमाने संपूर्ण जगत भरून राहिले आहे. हे जगच वृंदावन बनले आहे. ही सत्य युग पृथ्वी आहे. 
प्रियतम स्वामी, 
तुम्ही सांगितले 
- " लिही " - मी लिहिले 
- " मला सामील हो." - सामील झाले 
- " सर्वसंगपरित्याग कर." -  मी केला 
- " माझ्या अवतारकार्यात मला सहाय्य कर." - सहाय्य केले. 
- " आश्रमाची जबाबदारी स्वीकार " - तुमच्यावर असलेल्या अनिर्बंध प्रेमापोटी मी जबाबदारीही स्वीकारेन. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" परमेश्वराशी तादात्म्य पावलेले मन परमेश्वरच होऊन जाते."

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

२७ एप्रिल २००३
                 आजचा दिवस माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा सुवर्णदिन ! मी सकाळी लवकरच स्नान केले आणि स्वामींनी सुचवलेली गुलाबी रंगाची साडी नेसले.
ध्यान पहाटे ४ वाजता 
दिव्य दृश्य
                  मी स्वर्गलोकामध्ये होते. स्त्रियांनी मला रत्नालंकार व बांगड्या घालून सजवले. माझ्या हातावर मेंदी काढली. पार्वतीने मला हार घातला आणि सभागृहाकडे नेले. नवरा मुलगा भगवान श्रीकृष्ण माझ्यासमोर बसले. ब्रम्हदेव स्वतः यज्ञविधी करत होते. मी राधेच्या देहात होते आणि माझे भाव वसंताचे होते . विवाहविधी पार पडले. होमाग्नीमधून अग्निदेवांनी मंगळसूत्र आणून एका तबकमध्ये ठेवले, ते सर्वांना दाखवून त्यांचे आशीर्वादही घेतले. ब्रम्हदेवाने ते तबक हातात घेतले व वेदिक मंत्रांचे उच्चारण केले.  वसुदेव, देवकी तसेच राधेचे मातापिताही या सोहळ्यास उपस्थित होते. कन्यादानाचा विधी झाला. श्रीकृष्णाने राधेच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. वधूवरांनी एकमेकांना हार घालून पवित्र अग्नीभोवती फेरे घेतले. ब्रम्हदेव म्हणाले, " द्वापारयुगामध्ये त्यांचा विवाह झाला नाही. आता ऋषी, मुनी, संत, देवगण यांच्या समक्ष हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. भूतलावरील लोकांसह जे कोणी इथे हजर आहेत ते या विवाहाचे साक्षीदार आहेत. श्रीकृष्ण हा सर्वांमधील आत्मा आहे व राधा कृष्णाचा आत्मा आहे.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

परमपूज्य श्री वसंतसाई अम्मा यांच्या ७९ व्या जन्म दिनानिमित्त 

आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यू कसा होणार हे महत्वाचे आहे. 
              आपला जन्म कसा झाला, आपण कोणाच्या पोटी जन्म घेतला, कोठे जन्म घेतला हे महत्वाचे नसून आपला मृत्यू कसा होणार हे महत्वाचे आहे. तुम्ही एखादा लक्षाधीश म्हणून जन्म घेतला वा भिक्षाधीश म्हणून जन्म घेतला ह्याला महत्व नाही. आपण जन्म का घेतला, आपल्या जन्म घेण्यामागचे ध्येय, उद्देश काय आहे हे जाणणे सर्वात महत्वाचे आहे. हे जाणल्यानंतर जीवाला अजन्मा अवस्था प्राप्त होते. पुन्हा जन्म न घेण्यासाठी सर्वांनी जन्म घेतला आहे. परमेश्वराने भूतलावर अवतरून ८४ वर्षे मनुष्याला शिकवण दिली. आपण हा देह नसून आत्मा आहोत हे त्याने सांगितले तसेच जीवनाचा उद्देश काय आहे हेही त्याने आपल्याला सांगितले. परमेश्वर परमात्मा आहे आणि इतर सर्व जीवात्मे आहेत. परमेश्वर परमदेही आणि आपण जीवदेही असे आपण म्हणत नाही. आपणही परमात्मा आणि जीवात्मा ह्या संज्ञानचा वापर करतो तर मग मी देह आहे असा विचार कशासाठी ? ह्या देहाविषयी केवढी आसक्ती आहे !
                  पुन्हा जन्म न घेण्यासाठी आपल्याला हे जीवन प्रदान करण्यात आले आहे . आणि म्हणूनच आपला मृत्यू कसा व्हावा हे महत्वाचे ठरते . आपला मृत्यूच आपल्या पुढील जन्माचे बीज बनते . योग्य तऱ्हेने मृत्यू आल्यास आपली जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होऊ शकते हे शिकवण्यासाठी भगवान श्री सत्य साई भूतलावर अवतरले परंतु जीवन कसे जगावे ह्यामध्येच मनुष्य व्यस्त आहे . त्याला केवळ हा एकच उद्देश आहे उद्या मी काय करू ? पैसे कसा मिळवू ? अधिक पैसा मिळवण्यासाठी मी काय करू ? हा मिळवलेला सर्व पैसे क्षणभंगुर गोष्टींवर खर्च केला जातो, ज्या गोष्टी तुम्ही जग सोडताना बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. जीवन कसे जगावे हा विचार सोडा आणि मृत्यू कसा व्हावा ह्यावर चिंतन करा.  हेच महत्वाचे आहे इतर कोणत्याही अवताराने भूतलावर येऊन स्वामींसारखी शिकवण दिली होती का ? त्यांनी सतत ८४ वर्षे कसे जगावे, कसे मरावे आणि जीवनाचा उद्देश काय ही शिकवण दिली. त्यांच्या शिकवणीतल एक दोन शिकवणीचे जरी तुम्ही आचरण केलेत तरी तुमची जीवनमृत्युच्या चक्रातून सुटका होण्यासाठी ते पुरेसे आहे. 
वसंत साई

जय साईराम

रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

          " जीवनामध्ये कितीही दुःख, क्लेश वा अडचणी आल्या तरी प्रभूचरण धरून ठेवणे हे जीवनाचे एकमेव ध्येय असायला हवे. " 

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

२६ एप्रिल २००३
               सकाळी आम्ही दिल्लीहून मथुरा वृंदावनला जायला निघालो. मुक्ती निलयमचे सर्वजण येऊन आम्हाला सामील झाले. संध्याकाळी आम्ही बाँके बिहारी मंदिरात गेलो. 
                त्या मंदिराच्या अरुंद गल्लीतून जात असताना माझ्या मनात विचार घोळत होते,' स्वामी मला इथं का बरं घेऊन आले आहेत ? ते काय करणार आहेत ? ' तेवढ्यात अचानक बाजूच्या छोट्याश्या गल्लीतून एक लग्नाची वरात आमच्या समोर आली. बँड वाजत होता. त्याच्यामागे नटून थटून आलेल्या लोकांचा एक घोळका हातामध्ये रंगीबेरंगी छत्र्या घेऊन नृत्य करत होता. त्यांच्या आनंदमय गीतांचे आवाज आमच्या कानावर पडले. " हे प्रिय राधे, कृष्ण तुला बोलावतो आहे." वधूवर मात्र कुठे दिसत नव्हते. आम्हीही आनंदाने त्यांच्या मागोमाग गेलो. मंदिरासमोरच पोहोचलो आणि काय आश्चर्य ! हे मंदिर आहे का लग्नमंडप ? 
                प्रत्येक प्रवेशद्वाराच्या खांबांना केळीची पाने बांधण्यात आली होती. प्रत्येक दारावर आंब्याची डहाळी लावण्यात आली होती. विविधरंगी सुवासिक पुष्पमालांचा सुगंध आसमंतात भरून राहिला होता. 
                 लग्नाच्या आदल्या दिवशी जसे संध्याकाळी वधूला कार्यालययात घेऊन येतात, अगदी तेच दृश्य होते. मला वाटले : लहानपणापासून उराशी बाळगलेले, परमेश्वराशी लग्न करण्याचे स्वप्न आता सत्यात उतरते आहे. माझ्या हृदयाचे गुपित या  मंदिरामध्ये सर्वांना  नाट्यरूपात पहायला मिळणार आहे.
                 माझ्याबरोबर आलेल्या सर्व भक्तांना नवल वाटले. मंदिराच्या आतील दृश्य पाहून तर आम्ही भारावून गेलो. असंख्य पुष्पमालांनी सुशोभित केलेला मंदिराचा अंतर्भाग विविध रंगांनी झगमगत होता. जिकडे पहावे तिकडे फुलेच फुले ! मंदिराचे पुजारी सर्वांच्या अंगावर तीर्थ शिंपडत होते. विवाहाची किती सुंदर तयारी !

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

           " एखादी गोष्ट अनुभवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. हा जगाचा कायदा आहे. "

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

२५ एप्रिल २००३ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही मला मथुरा वृंदावनला कशासाठी जायला सांगत आहात ? असे काय विशेष आहे ?
स्वामी - तिथे राधा -कृष्ण विवाह होणार आहे. 
वसंता - स्वामी, तुम्ही हे मला बऱ्याच वेळा सांगितले आहे. 
स्वामी - वसिष्ठ गुहेमध्ये तू माझ्याशी संयुक्त झालीस. तुझ्या कठोर साधनेचे फळ म्हणून तुला अतिउच्च अवस्था प्राप्त झाली. तू तुझे मन, बुद्धी, इंद्रिये , चित्त आणि अहंकार शुद्ध करून सर्वकाही मला अर्पण केलेस. परंतु तुझा हा देह राहिला, तोही शुद्ध करून मला अर्पण करण्याची तुझी इच्छा आहे. तू त्यासाठी साधना केलीस. आता तुझा देह समर्पणासाठी शुद्ध झाला आहे. याबद्दल तुझी खात्री झालीय. म्हणूनच वृंदावनला जाऊन तू तुझा देह मला अर्पण करणार आहेस. हा विवाह आहे, विशेष विवाह, तू ये, सर्व तुझ्या प्रतिक्षेत आहेत. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " तेलाच्या संततधारेप्रमाणे आपण अखंड परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे. " 

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

                 इथेच, याक्षणी मुक्ती भाग -२ या पुस्तकावर स्वामींची स्वाक्षरी घेण्यासाठी मी पुट्टपर्तीला गेले असताना तेथील एका उच्च पदाधिकाऱ्यांनी मला सांगितले. " तुम्ही प्रशांतीमध्ये येऊ नका." माझ्या अश्रूंना अंत नव्हता.  स्वामींनी माझी समजूत घातली. ते म्हणाले," तुझ्या इतमामाला शोभेल अशा मानसन्मानात तू पुट्टपर्तीला येशील. " मी म्हणाले," स्वामी, प्रत्यक्ष तुम्ही मला बोलवा, अन्यथा मी येणार नाही." त्यानंतर मी स्वामींच्या दर्शनासाठी कोडाईकॅनाल आणि वृंदावन येथे गेले. त्याठिकाणी स्वामींनी माझ्या पुस्तकांना आणि काही महत्वाच्या फोटोंना आशीर्वाद दिले. 
                 त्यांनतर स्वामींनी मला एका दूताकरवी बोलावणे पाठवले . तो माझा शोध घेत मुक्ती निलयम येथे आला आणि म्हणाला," या शिवरात्रीला तुम्ही पुट्टपर्तीला या. " त्यानंतर स्वामींनी ध्यानातही मला तेच सांगितले. पुट्टपर्तीच्या पवित्र भूमीवर स्वामींचे दर्शन घेता येणार या कल्पनेने झालेल्या आनंदापुढे माझ्या सर्व चिंता विरून गेल्या. आम्ही शिवरात्रीसाठी तेथे आलो आणि काही दिवस मुक्काम केला. त्यानंतर स्वामींनी मला सांगितले," तू मथुरा वृंदावनला जा. तेथे आपला राधा - कृष्ण विवाह होणार आहे." 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 
 
        " इतरांमधील दोष शोधू नका, स्वतःमध्ये असणारे दोष शोधून काढा. "

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

९ फेब्रुवारी २००३ 
                ध्यानात स्वामींनी मला विचारले ," तू अशी सारखी रडतेस का ? तू माझा तरुणपणीचा फोटो आणि तुझ्या विवाहाचा फोटो या दोन्हीची तुलना करून पहा." माझ्या लग्नानंतर आमचा एक फोटो काढला होता. आम्ही स्वामींचा १९४४ सालामधील फोटो व माझ्या पतींचा विवाहातील फोटो, या दोन्हीची तुलना केली. दोघांच्या चेहऱ्यावरील साम्य पाहून आम्ही थक्कच झालो. जणू काही एका साच्यातून काढलेले दोन चेहरे. हे सत्य आहे का स्वप्न ? हे असे कसे काय ? पुन्हा पुन्हा आम्ही त्या फोटोंची तुलना करत होतो. ध्यानामध्ये स्वामींना मी याविषयी विचारले. ते म्हणाले," त्या रूपामध्ये माझे दिव्यत्व होते. तुला कोणीही स्पर्श करू शकत नाही. तू अग्नी आहेस, तू शुद्ध आहेस." 
                  आता शेवटची गाठही सुटली. माझ्या पहिल्या पुस्तकात स्वामी म्हणाले," तू माझी शक्ती आहेस " त्यांनतर त्यांनी मॉडर्न पार्वतीच्या फोटोद्वारे १२ व्या वर्षी मी कोण होते हे दाखवले. आता त्यांनी मला त्यांचा फोटो आणि मी विवाहबद्ध झालेल्या व्यक्तीचा फोटो त्यांची तुलना करण्यास सांगितले .शेवटचे कोडेही सुटले. स्वामी म्हणाले," तू जे काही करतेस त्यामध्ये धर्म प्रवेश करतो." माझ्या विवाहाच्या फोटोमध्ये धर्माने प्रवेश करून हे सिद्ध केले की ते सत्य आहे. 

असतो मा सद्गमय 
तमसो मा ज्योतिर्गमय 
मृत्योर्मा अमृतम् गमय 

                 हे परमेश्वरा, मला असत्याकडून सत्याकडे, अंधःकाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमृतत्वाकडे घेऊन जा. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम