ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
महाशिवरात्री संदेश
दिव्यात्मस्वरूपलारा !
नरजन्माचे दुर्लभ भाग्य लाभल्याने मनुष्याने उत्कृष्टता प्रकट करण्यासाठी निरंतर प्रत्यत्न केले पाहिजे.
मेघांमधून बरसणारे पावसाचे अमृतथेंब प्राशन करण्यासाठी चातक पक्षी अत्यंत आतुरतेने प्रतिक्षा करत असतो. भयंकर तूफान विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट डोळ्यापुढे अंधेरी आणणारे विद्युल्लतांचे तेज ह्याने तो त्याच्या एकाग्रतेचा भंग होऊ देत नाही. अशाच तऱ्हेने साधकानेही परमेश्वराविषयी व्याकुळ भावनेने त्याचे हृदय भरून घेतले पाहिजे सुख-दुःख , नफा-नुकसान, मान - अपमान ह्यासारख्या सर्व बाजूंनी त्याच्यावर प्रहार करणाऱ्या गोष्टी तसेच पालक, नातेवाईक वा त्याचे सखेसोबती ह्यांनी त्याचा उपहास केला, त्याला विरोध दर्शवला वा तिरस्कार केला तरी त्याने विचलित वा अस्वस्थ न होता प्रेमामृताच्या परमेश्वरी कृपेची प्रतीक्षा केली पाहिजे.
प्रार्थना ओठातून नव्हे तर हृदयातून आली पाहिजे परंतु आजकाल बहुतांशी साधक केवळ अभिनय करतात आणि आध्यात्मिक उन्नतीचा दिखावा करतात. त्यांनी परमेश्वरास केलेल्या प्रार्थना, विनवण्या ह्या हृदयातून न येता केवळ ओठातून येतात. त्यांचा शब्द खरा मानून जर परमेश्वर त्यांच्या समोर उभा ठाकला व त्यांनी मागितलेली मुक्ती त्यांना प्रदान केली. तर त्यांचे शब्द अडखळायला लागतात, अंग थरथरू लागते ते म्हणतात, " हे प्रभू, मी केवळ सवयीनुसार, यांत्रिकपणे मुक्तीसाठी प्रार्थना केली परंतु जर त्यामुळे माझी पत्नी व मुले एकाकी पडणार असतील आणि माझ्या स्वकष्टर्जित संपत्तीचाही त्यामध्ये समावेश असेल तर ही मुक्तीची भेट माझ्या मृत्युनंतर प्रदान करा. ते अधिक स्वागतार्ह ठरेल.
मनाला इतरांमधील दोष शोधण्यासाठी मुभा देऊ नका नाहीतर मन प्रदुषित होईल. त्याऐवजी मनाला इतरांच्या सद्गुणांवर व निष्पक्षतेवर केंद्रित करा म्हणजे मन निर्मळ आणि पवित्र होईल.
भावनांच्या उन्मादात मनुष्य स्वतःचा मूळ स्वभाव बाजूला सारून इतरांवर दोषारोप करतो वा इतरांवर अपशब्दांचा मारा करतो, त्यांना काही इजा व्हावी अशी इच्छा करतो वा त्यांच्या दुःखात आनंद मानतो. असे हे वाईट विचार त्याच्या मनात रुजतात व मनामध्ये कुविचारांचे तण माजते व त्या बदल्यात दुःखभोग वाट्याला येतात. इतरांची चिंता कशाला ? जर ते तुम्हाला आवडत असतील तर त्यांच्याशी संवाद करा, आवडत नसतील तर त्यांच्याशी संपर्क ठेवू नका. त्याच्यामधील दोष का शोधता ? त्यांच्याविषयी वाईट का बोलता ? असे करून तुम्ही तुमच्या आध्यात्मिक अधःपतनास आमंत्रित करता आणि तुम्ही करत असलेल्या, जप, पूजा, ध्यान, दर्शन ह्यामधून प्राप्त झालेले पुण्य गमावून बसता.
मानवी मानाने परिवर्तनाचा अनुभव घ्यायलाच हवा. मनाला बंधांसाठी नव्हे तर मोक्षासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. मनाने बहिमुर्ख न होता, भौतिक विश्वात रममाण न होता अंतर्मुख झाले पाहिजे, ईश्वराभिमुख झाले पाहिजे. तुम्हाला खूश करण्यासाठी मन नाना क्लूप्त्या लढवते तुम्ही स्वामींना वंदन करून शरणागती पत्करल्याचे घोषितही कराल परंतु एकदा तुम्ही तेथून दूर गेलात की तुमचे वर्तन विपरीत असेल. साधना करणे तुमचे कर्तव्य आहे, आंतरीक उत्कट इच्छा आहे, तुमचा खराखुरा क्रियाकलाप आहे. बाकी सर्व ईश्वराच्या इच्छेवर सोडा हा तुमचा पवित्र महाशिवरात्रीचा संकल्प असायला हवा.
भगवान श्री सत्यसाई बाबांच्या महाशिवरात्री संदेश
२९-०२-१९८४
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा