गुरुवार, २३ मार्च, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - १५ जानेवारी
 
       " तुम्ही परमेश्वराला काय अर्पण करता हे महत्त्वाचे नाही परंतु तुम्ही त्याला ते कसे अर्पण करता हे महत्त्वाचे आहे. "

      अर्पण करण्यामागचे आपली भावना अत्यंत महत्त्वाची आहे. याचा संदर्भ आपण ते कसे अर्पण करतो याच्याशी आहे. आपण दररोज आपली दैनंदिन कर्तव्य करत असतो. ती आपली दिनचर्या बनून जाते. त्याचप्रमाणे आपण देवघरात जाऊन देवाला फुले वाहतो आणि आपले दैनंदिन कार्य सुरू ठेवतो. ही खरी भक्ती नव्हे. आपण अंतकरणपूर्वक परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. पुन्हा जन्म घ्यावा लागू नये यासाठी आपल्याला हा जन्म दिला आहे. हा माझा मंत्र आहे. प्रत्येक प्रकरणात याचा मी पुनरुच्चार केला आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वाईट सवयींमध्ये आणि गुणांमध्ये बदल केला पाहिजे. आपण जे बोलतो जे करतो त्यावर चिंतन करून त्यानुसार सुधारणा केली पाहिजे. आपण धार्मिक(सदाचारी)जीवन जगून आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
         आपली इंद्रिये नेहमी भौतिक गोष्टींकडे धाव घेतात. आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून त्यांना ईश्वराभिमुख केले पाहिजे. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात म्हणजे सांख्य योगामध्ये श्रीकृष्णाने हे शिकवले आहे. धोक्याची चाहूल लागल्यावर कासव जसे त्याचे पाय आणि डोकं आत मध्ये ओढून घेते तशी आपणही आपली इंद्रिये आत ओढून घेतली पाहिजेत. इंद्रियांवर नियंत्रण ठेवल्याने ती भौतिक गोष्टींकडे भरकटत नाहीत. हे भगवान श्री सत्यसाई बाबांनीही शिकवले आहे.
      आपण आपले चित्त शुद्ध केले पाहिजे. ते कसे करायचे? स्वामी म्हणतात की आपले हृदय म्हणजे संगीत खुर्ची नव्हे. संगीत खुर्ची खेळताना आपण अनेक खुर्च्यांचा वापर करतो. आपण आपल्या हृदयामध्ये केवळ परमेश्वरासाठीच एक खुर्ची ठेवली पाहिजे. जर आपण दररोज आपल्या हृदयामध्ये खुर्च्यांमध्ये बदल करू लागलो तर आपण तेथे अनेकानेक नात्यांसाठी जागा निर्माण करु. बालपणी आपल्याला आपल्या पालकांचे अत्यंत महत्व वाटते. तरुणपणात आपल्याला आपले मित्र महत्त्वाचे वाटतात आणि मनामध्ये अधिक इच्छा निर्माण होतात. लग्न झाल्यावर आपण आपले हृदय पती वा पत्नीस देतो. आपल्याला आपले पालक वैरी वाटू लागतात आणि आपण त्यांना वृद्धाश्रमात घेऊन जातो. आपण पालक झाल्यावर आपल्या मुलांना हृदयातील खुर्ची मिळते. अशा प्रकारे आपल्या हृदयातील खुर्ची संगीत खुर्ची प्रमाणे आपल्या हृदयात फिरत राहते. इंद्रिये आणि मन कोठे भ्रमण करत आहेत यावर लक्ष ठेवण्यासाठी आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. बुद्धी स्वामी आहे आणि इंद्रिये आणि मन तिचे दास आहेत तथापि बुद्धी विकसित झाल्यानंतर मनामध्ये आशंका येतात आणि मनुष्य संशयखोर बनतो आपल्या मधील दोष कमी करण्यासाठी आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे असे स्वामी म्हणतात. बुद्धीकडे अत्यंत कौशल्याने आणि धूर्तपणाने आपल्यामधील दोषांवर पांघरूण घालण्याची क्षमता असते. या गोष्टीस आपण थारा देता कामा नये. आपण जी चूक केली आहे ती चूक मान्य करून ताबडतोब दुरुस्त केली पाहिजे. जर आपण एखाद्याशी वाईट वागलो तर आपण त्याची माफी मागितली पाहिजे. माफी मागणे ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. अनेक लोक त्यांच्या चुकीच्या वर्तणुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. हा धूर्तपणा आपल्याला नरकाकडे घेऊन जातो.आपण नेहमी आपले विचार शब्द आणि कृती यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यामध्ये सुसंगतता आणली पाहिजे आणि आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. हीच खरी साधना आहे,आत्मिक साधना आहे. स्वामींनी हे सनातन सारथी मध्ये सांगितले आहे.
      भगवद्गीते मध्ये श्रीकृष्णाने परमेश्वरप्राप्तीसाठी कर्मयोग भक्तीयोग आणि ज्ञानयोग हे तीन मार्ग सांगितले आहेत. कर्मयोगाच्या मार्गावरून चालणाऱ्याने त्याचे प्रत्येक कर्म परमेश्वराला समर्पित केले पाहिजे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पूर्णतः समर्पित होता तेव्हा कर्मयोग, भक्ती आणि ज्ञानयोग बनतो. चिंता करू नका आणि तप करण्यासाठी जंगलात जावे लागेल असा विचारही करू नका तुम्ही जे कर्म कराल ते अंत:करणपूर्वक आणि परिपूर्णतेने करा. लहानात लहान कर्मापासून ते मोठ्या कर्मांपर्यंत प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करा. हा गुण अंगी बाणवण्यासाठी सत्कर्म करणे आणि सत्संगात राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. "चांगले पाहा,चांगले करा आणि चांगले बना" ही स्वामींची शिकवण आहे आपल्या मधील दोष शोधून त्यामध्ये सुधारणा करण्याची आपण सवय लावून घेतली पाहिजे इतरांमधील दोष पाहू नका. हे करण्यासाठी सतत ती जाणीव असणे आवश्यक आहे.

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा