गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

"जे जे तो बोलतो,
जे जे तो ग्रहण करतो,
जे जे तो विचार करतो,
ज्या ज्या ठिकाणी तो जातो,
जर त्याची दृष्टी पूर्णपणे परमेश्वरावर केन्द्रीत असेल तर त्याला जग स्पर्श करू शकणार नाही " .

' thought for the day ' श्री वसंतासाईच्या या पुस्तकातून .
वसंतामृतमाला
  
तोफ गोळ्यांचा भडिमार ( पुष्प पाचवे )



           मागील प्रकरणात स्वामींनी , अहंकार म्हणजे आत्मस्वरुपाला झाकून टाकणारे आवरण असल्याचे दर्शवले . परमेश्वर आणि आत्मा एकच आहे . स्वामींनी अष्टाहंकारांविषयी लिहिले . आता आपण स्वामींनी ' करा अखेर यांने ' या शीर्षकाखाली लिहिलेला मजकूर पाहू या . 
प्रभू , 
पहा माझ्या द्वारे 
ऐका माझ्या द्वारे 
अनुभवा माझ्या द्वारे ( किंवा जाणा माझ्या द्वारे ) 
कर्म करा माझ्या द्वारे 
बोला माझ्या द्वारे  
… 
रिक्त होऊ द्या माझ्या ' मी ला '
कृष्णाच्या  मुरलीसम
साधन मज तुम्ही बनवून 
मंजुळ मधुर वाजवा धून 
माझ्या या मुरलीतून 
… 
शुन्यवत व्हा , नायक व्हा . ( Be a zero , Be a hero )
           येथे स्वामी असे सांगतात की  एखादयाने अष्टाहंकार सोडल्या नंतर स्वतःला रिक्त केले पाहिजे . यालाच शून्यवत होणे म्हटले आहे . या शून्यवत अवस्थेला पोहोचल्यानंतर तो नायक बनतो . जे अहंकाराचा ' मी ' चा त्याग करतात ते कसे असतात ? 
             ' पहा माझ्या द्वारे ' याला उत्तर देतांना स्वामी म्हणतात की जे जे काही पहाल ते त्यांच्या द्वारे पहा . जेथे ' मी ' नाही तेथे सर्वत्र परमेश्वरच दिसतो .परंतु जर ' मी ' असेल तर जे जे पाहू त्याला आपण म्हणतो ' हे माझे , हे तुझे ' यातूनच भेदाची जाणीव निर्माण होते . 
              जेव्हा एखादा स्वतःला पूर्णपणे रिक्त करतो आणि अहंकाररहित होतो तेव्हा निल ज्योतीरुपात त्यांच्या अंतर्यामी वास करणारा परमात्मा विस्तार पावतो . तोच परमेश्वर आहे . ह्या विषयी मी  अनेकदा लिहिले आहे . जेव्हा आपण स्वतःला रिक्त करतो तेव्हा आपला अंतर्यामी विस्तार पावत आपल्याला पूर्णपणे व्याप्त करतो . जीवात्मा परमात्म्याला म्हणतो , " हे प्रभू , मी केवळ एक साधन आहे . तू माझ्या द्वारे हे सर्व  करून घे  ". ही ' भर्ता ' अवस्था आहे . मनुष्य परमेश्वराला म्हणतो , " सर्व कर्मांचा करता करविता तूच आहेस म्हणून मी सर्व कर्मांच फल तुझ्या चरणी अर्पण करतो . केवळ  परमेश्वर त्या फलांचा आस्वाद घेऊ शकतो ". येथे परमेश्वर ' भोक्ता  ' अवस्थेत असतो आणि सगळ्यांचा आनंद घेतो . पाहणाऱ्याला सर्वत्र केवळ परमेश्वरच दिसतो . 
            स्वामींनी नंतर लिहिले ' ऐका माझ्या द्वारे ' परमेश्वर कधीही अपशब्द ऐकत नाही . जो स्वतःला पूर्णपणे रिक्त करतो त्याची ही  अवस्था असते. तो केवळ परमेश्वराचे शब्द ऐकतो . परमेश्वराचे शब्द कोणते आहेत ? जप , ध्यान आणि भजन हे सर्व परमेश्वर विषयक आहेत . स्वामींनी ८४ वर्षे प्रशांती निलयममध्ये काय ऐकले ? केवळ वेद मंत्रोच्चारण . हे सर्व काही केवळ परमेश्वर विषयक , त्यांच्या विषयक होते . त्या व्यतिरिक्त तेथे बाजारातल्या कोलाहलासारखे कोणतेही आवाज नव्हते  ! राजकारणातल्या व्यक्तींचे आव्हानात्मक आवाज तेथे नव्हते . जे आपण ऐकायला नको ते आपल्या कानावर यायला नको . 
           संन्यासी नेहमी एकटेच असतात . त्यांचे इतरांशी बंध नसतात . त्यांचे कान केवळ ईशवाणी ऐकतात . एवढेच नाही तर भुंग्याचा गुंजार परमेश्वराचे मधुर संगीत आहे . तसेच पक्ष्यांचे मधुर कूजन म्हणजे नगर संकीर्तन आहे . अशा भावाने ते प्रत्येक ध्वनी ऐकतात . ते जीवनही अशाच त-हेने व्यतीत करतात मग ते वनात असोत  वा बाजारात . 
           स्वामी नंतर सूचित करतात ' माझ्या द्वारे जाणा ' परमेश्वर त्यांच्या द्वारे जाणण्यास सांगतोय . जाणणे म्हणजे ' स्पर्श संवेदना ' ज्याला ज्याला आपण स्पर्श करतो तो परमेश्वराच्या स्पर्शा सारखा झाला पाहिजे . परमेश्वर कसा स्पर्श करतो ? तो साक्षी अवस्थेत असतो . त्याला कोणी स्पर्श केला तर तो अबाधित राहतो तसेच त्याने कोणाला स्पर्श केला तरीही तो अबाधित राहतो . प्रत्येकाने असे असायला हवे . मनुष्याला पत्नीचा स्पर्श स्वर्ग सुखासमान भासतो तर त्याच्या मुलाचा स्पर्श परमानंदा समान भासतो तथापि शत्रूच्या स्पर्शाने तो क्रोधित होतो त्याचा स्पर्श त्याला अग्निसमान भासतो. अशा त-हेने सर्व काही असत्य आहे . मिथ्या आहे , माया आहे . ह्यात बदल व्हायला हवा . 
            जे साधना करतात साधकांना कोणतीही गोष्ट स्पर्श करत नाही आणि ते स्वतःला रिक्त करतात कारण त्यांची सर्व नातीगोती म्हणजे केवळ परमेश्वरच  असतो. हा  ईशस्थितीत असलेला जीव निरंतर परमशांतीत असतो . तो सदैव परमेश्वराच्या विचारात असतो , परमेश्वराचे गुणगान गातो . त्याचे एक वेगळेच विश्व बनते . त्याला भौतिक  जगातले काहीही स्पर्श करत नाही . तो सर्वांपासून वेगळा स्वतःच्याच विश्वामध्ये रमतो . स्वामींनी चंदेरी बेटाचे वेगळे विश्व माझ्यासाठी निर्माण केले .
 उर्वरित वसंतामृत पुढील भागात …

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३

                                   ओम श्री साई वसंतासाईसाय नमः



             सुविचार  

" आपल्या अंतरंगी असणाऱ्या परमेश्वराचा शोध घेतल्यानंतर होणारी अनुभूती म्हणजेच आनंद होय . "

     आदिशक्तीचा प्रवेश


वसंता - स्वामी , माझा जन्म दिपावलीच्या दिवशी झाला का ? 
स्वामी - तुझ्या वडिलांची रोजनिशी तपासून पहा . 
        माझ्या वडिलांचे रोजनिशीतील लिखाण -
                  ' २३ ऑक्टोम्बर १९३८ कन्यारत्न . वेळ सकाळी ११ वाजून ४२ मिनिटे .ही बालिका देशासाठी कार्य करेल. ' मी आधीचे पान उलटले तेव्हा मला पुढील नोंद सापडली . ' हिंदूंचा सण - २२ ऑक्टो . अश्विन ६ दिपावली ' ही सर्व परमेश्वराची कृपा . माझा जन्म दिपावलीच्या दुसऱ्या दिवशी झाला . परंतु अमावस्येच्या दिवशी जगातील बऱ्याच ठिकाणी दिपावली साजरी केली जाते . 
            सत्यभामा ही भूदेवीचा ( भूमाता ) अंश होती. जेव्हा हिरण्यकश्यपू नावाच्या असूराने पृथ्वीचे हरण करून तिला दडवून ठेवले तेव्हा सर्व देव देवतांनी भगवंताचा धावा केला . भगवंताने वराह अवतार घेऊन त्या असूराचा वध केला आणि पृथ्वीला मुक्त केले . त्या वेळेस नरकासूराचा जन्म झाला . जर त्याच्या मातेने त्याच्या मृत्यूची इच्छा केली तरच त्याचा अंत होईल . असा त्याला वर मिळाला होता . जेव्हा त्याची असूरी कृत्ये नियंत्रणा बाहेर गेली तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा नाश करण्याचे ठरवले . आणि म्हणून त्यांनी सत्यभामेला आपल्या बरोबर घेतले . नरकासूराची युद्ध नीति आणि त्यांनी वापरलेली शस्त्रास्त्रे पाहून सत्यभामा अचंबित झाली . तिला चिंता वाटू लागली व तिने श्रीकृष्णाला, नरकासूराचा वध  करण्याची विनंती केली . त्या नंतर श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे शीर धडावेगळे केले . 
            त्यावेळी नरकासूराने सत्यभामे कडून एक वर मागून घेतला , " माते, जगामध्ये सर्वत्र माझा मृत्यू दिन उत्सवा प्रमाणे साजरा केला जावा ." म्हणून श्रीकृष्णाने असे घोषित केले , " नरक चतुर्दशीच्या दिवशी माझे  पूजन करणाऱ्यांची सर्व पापांमधून मुक्तता होईल, त्यांची भरभराट होईल . " म्हणूनच हा दिवस दिपावली म्हणून सर्वत्र साजरा केला जातो . स्वामींनी मला अनेकदा सांगितले आहे , " तू सुद्धा भूमा देवींचा अंश आहेस . " प्रकृती म्हणजे पृथ्वीच  नाही का ? ... 
२५- १०- २०००
          रात्री २ वाजल्या पासून मी जागीच होते . माझे मन फक्त स्वमींचाच विचार करत होते . मी ध्यान केले. 
वसंता - स्वामी आज मला तुम्ही दिपावली विषयी काही सांगा ना . 
स्वामी - तू स्वतः नरकासूराचा वध  करून मला वाचवलेस . मी तुला एक वर देईन . तुला हवा तो वर माग . 
वसंता - स्वामी , मला खरे काय हवे आहे हे तुम्हाला माहित नाही का ? इथून पुढे माझे जे काही जन्म असतील त्या मध्ये माझे जीवन केवळ तुमच्यासाठीच असायला हवे . मला हे  कुटुंब वगैरे काही नको . माझे जीवन केवळ तुमच्या आणि तुमच्या साठीच असायला हवे  . 
            जगातील सर्व जीवांना , प्राणीमात्रांना मुक्ती दया. तुम्ही प्रत्येकाला तुमच्या कमलचरणांशी घेऊन या . यासाठी कोणताही त्याग करण्याची माझी तयारी आहे . 
स्वामी - तू हे नक्कीच करशील . तेव्हा तू एका नरकासूराचा वध केलास  .आज प्रत्येकाच्या मनात एक नरकासूर दडलेला आहे . त्यांच्यातील त्या नरकासूराचा वध करण्यासाठी तू आली आहेस. दिपावलीच्या दिवशी तू जन्म घेतलास .  प्रत्येकाच्या मनात ज्ञानाग्नी चेतवणार आहेस . तू आहेस ' ज्ञानाग्नीदायिन्ये '.
           मायेला दूर फेक आणि सिद्ध हो . आता पुरे ! तुझे अश्रू तुला झाकून ठेवतील , मायेच्या आवरणातून बाहेर पड आणि पूर्णशक्तीचे रूप धारण कर . तू 'ज्ञानेश्वरी ' आहेस . 
          असे म्हणत , स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मी त्याच क्षणी उन्मनी अवस्थेत गेले . त्या अवस्थेत माझ्या मनात विचार आले , " मी साईशक्ती आहे . त्यांच्या सर्व शक्ती माझ्या ठायी आहेत. मी ज्ञानाग्नी चेतवणार आहे . हा ज्ञानाग्नी एखादया  वणव्याप्रमाणे सर्व जग भर पसरेल .प्रत्येकाच्या मनामध्ये  दडलेल्या नरकासूराचा वध करून मी तिथे ज्ञानज्योत प्रज्वलित करेन . मला प्रत्येकामध्ये परिवर्तन घडवायचे आहे आणि ते मी घडवणारच. " 
           स्वामींनी प्रत्येकाच्या मनामध्ये नरकासूर असल्याचे मला सांगितले . मनामध्ये असणाऱ्या नरकासूराचा वध म्हणजे दिपावली. यातील परस्पर संबंध पहा .
            दिपावली म्हणजे काय ? नरकासूराच्या वधानंतर साजरा करण्यात येणारा आनंदोत्सव . जेव्हा आपल्या मधील असूरी  वृत्तीचा नाश होईल तेव्हा आपण खरी दिपावली साजरी करू शकू . केवळ नवीन कपडे घालणे , फराळ करणे आणि फटाके उडवणे म्हणजे दिपावली नव्हे . हा काही खरा उत्सव नव्हे . आपल्या मनातील दूषप्रवृत्तींमध्ये बदल घडवून आणला पाहिजे . आणि प्रेमाचा वारा घालून ज्ञानाग्नी चेतवला पाहिजे . मगच आपण दिपावली साजरी करण्यास पात्र ठरू . याचा खरा अर्थ न जाणल्याने आपण मेवामिठाई , खरेदी यामध्येच मौज मजा मानून आपला वेळ खर्ची घालतो . 
           आत्मसाक्षात्कारामध्येच खरा आनंद आहे . मग त्या दिशेने आपण प्रयत्न करायला नको का ? तुम्ही केवळ एक दिवस मिळणाऱ्या आनंदामध्ये समाधान मानाल का ? दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच समस्या विशाल रूप धारण करून तुमच्या समोर उभ्या ठाकतात . त्यांचा तात्पुरता विसर पडून मौजमजा करणे या मध्ये खरा आनंद आहे का ? खरा आनंद म्हणजे काय ? तर चिरशांती आणि चिरंतन आनंद . आज बाहेरील नरकासूराचा वध झाला आहे . परंतु प्रत्येकाच्या मनातील नरकासूर जीवित आहे . त्याचा वध करणे हीच खरी दिपावली . पारंपारिक दिपावली उत्सव साजरा करण्याचा काय उपयोग ? लोकांच्या मनातील अज्ञानाच्या अंधःकाराचा नाश करून ज्ञानाग्नी प्रज्वलित करणे हीच खरी दिपावली . 

 संदर्भग्रंथ - इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!!    


 

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

                                                                                    ओम श्री साई राम
                                     पुष्प चौथे  पुढे सुरु


७) जन्मभूमी - काही जणांना त्यांच्या जन्मभूमीचा आणि वंशाचा अहंकार असतो. हा ही अत्यंत घातक आहे . आपण एक उदाहरण पाहू. यादवांना कृष्ण त्यांच्या वंशात जन्मला याचा अति अहंकार होता . एकदा त्यांच्या जवळ राहणाऱ्या काही ऋषींची परीक्षा घेण्याचे त्यांनी ठरवले . त्यांच्या मध्ये कृष्ण आणि जांबवतीचा पुत्र सांभाही होता . इतर मुलांनी त्याला गर्भवती स्त्रीची वेशभूषा करुन त्या ऋषींसमोर नेले आणि त्यांना विचारले , " हे ऋषीवर कृपया या मुलीला पुत्र वा कन्या होईल हे सांगावे ". ऋषी म्हणाले , " हीच्या पोटी  लोहाचे  मुसळ जन्माला येईल आणि तुमच्या संपूर्ण वंशाचा नाश करेल ". तात्काळ लोखंडाचे मुसळ प्रसवले . त्या मुलांनी त्या मुसळाची कुटून कुटून भुकटी केली आणि सागरामध्ये फेकून दिली . त्याचा एक छोटा भाग राहिला . ज्याची ते भुकटी  करू शकले नाहीत . तो ही त्यांनी समुद्रात फेकून दिला . ती भुकटी पाण्यात विरघळून गेली . या पाण्यातून समुद्रकिनारी गवत उगवले . 
            एक दिवस समुद्र किनारी एक उत्सव साजरा केला जात होता . सर्वजण मदयपान करत होते , नाचत होते , गात होते . बेधुंद  होऊन ते एकमेकांशी भांडू लागले . किनाऱ्यावरील गवत उपटून एकमेकांना त्या लोहासारख्या गवताने मारू लागले  . अखेरीस सर्वजण मृत्यू पावले . अशा प्रकारे ऋषींच्या शापाने संपूर्ण यादव कुळ नष्ट झाले . हा कुळाचा अहंकार आहे . त्यांच्या अहंकारामुळे त्यांनी ऋषींचा उपमर्द केला. त्याचे पर्यवसन त्यांच्या कुळसंहारात झाले . ऋषींना भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही कालाचे ज्ञान असते . त्या मुलांना हे माहित नव्हते का ? त्यांनी कृष्ण पुत्र सांभाला   स्त्रीची  वेशभूषा करवुन   तो  प्रश्न का विचारला . कारण त्यांना कृष्णाच्या  कुळात जन्म घेतल्याचा अहंकार   झाला  होता . तो अहंकारच  त्यांच्या  बोलविता  धनी  झाला . अखेरीस संपूर्ण कुळाचा नाश झाला . द्वारका नगरी ही समुद्र तळाशी समाधिस्थ  झाली . 
८) अध्यात्म मार्गातील व्रतवैकल्य पूर्ती - अध्यात्म मार्गावर वाटचाल करतांना आपण जी साधना करतो त्या साधनेचाही आपल्याला अहंकार होऊ शकतो . हा अहंकारही घातक असतो . आपल्याला वाटते , " आपण या मार्गावर महान व्रत वैकल्ये, तप करत आहोत " अनेक जण  असा विचार करून आश्रम स्थापन करतात आणि अनुशासक बनतात . ह्या तपपूर्तीच्या अहंकारातही प्रयत्न पूर्वक दूर सारायला हवे . आपण एक उदाहरण  पाहू या .
            एकदा अंबरीश राजाचा एकादशीचा उपवास होता . उपवास सोडण्याची शुभ वेळ झाल्याचे सांगून पंडीतांनी त्यांना सोडण्यास सांगितला  . तत्पूर्वी दुर्वास ऋषी राजाकडे येऊन त्याला सांगतात की ते स्नान करून पुन्हा तेथे येतील . उपवास सोडण्याची शुभ वेळ झाल्याने पंडीत राजाला उपवास सोडण्याची विनंती करतात . म्हणून तो थोडेसे जलप्राशन करतो . हे ऐकून दुर्वास अत्यंत क्रोधीत होतात आणि राजाला शाप देतात . तात्काळ विष्णूचे  सुदर्शन चक्र तेथे येऊन दुर्वासांचा पाठलाग करते . ते धावत धावत विष्णू कडे जातात . विष्णू त्यांना सांगतात , " तू अंबरीश राजाकडे जा तोच तुला यातून वाचवू शकेल ". त्या प्रमाणे ते अंबरीश राजाकडे जातात.  अंबरीशाने चक्राला प्रार्थना करताच ते अदृश्य होते . 
          या कथेतून दुर्वासांचा आध्यात्मिक अहंकार दिसून येतो . आपण आपल्या अंतिम श्वासापर्यंत साधना केली पाहिजे . हे खरे तप आहे . एकदा गांधीजी म्हणाले," आता मला महात्मा म्हणू नका . जर एखाद्या व्यक्तीने माझ्यासमोर येऊन माझ्यावर गोळी झाडली आणि तरीही मी त्याचा राग न  मानता रामनाम जपत राहिलो तर तुम्ही मला महात्मा म्हणू शकता ". आध्यात्मिक साधनेत विनम्रता आणि साधेपणाला अतिशय महत्व आहे  . अहंकार मनुष्याचा निःपात करतो . 
          अहंकाराच्या  आवरणाने आत्मस्वरूप म्हणजेच परमेश्वर झाकले जाते . परमेश्वर आणि आत्मा एकच आहे . स्वामींनी या अष्टाहंकाराविषयी लिहिले आहे . 

जय साई राम 
व्ही. एस.  

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

                                                                                   ओम श्री साई राम                              
                                    पुष्प चौथे पुढे सुरु

६ ) विद्वत्ता - याचा अर्थ वेद आणि धर्मग्रंथ पंडीत. तथापि तुम्ही एक विद्वान पंडीत आहात असा अहंकार बाळगत असाल तर ते अत्यंत चुकीचे आहे . एकदा जनक राजाच्या दरबारात अनेक विद्वान पंडीत विवाद करण्यासाठी जमले होते . त्या विवादामध्ये जो पराजित होईल त्यास शिक्षा करण्यात येईल असा या विवादासाठी नियम होता . अष्टवक्राने दरबारात प्रवेश केला . त्याचे शरीर आठ ठिकाणी वाकडे झाले होते . त्याला पाहताच सर्व पंडीत हासून म्हणू लागले , " आपल्या सारख्या विद्वानांसमोर ह्या मुलाचे काय काम ? " अष्टवक्र उत्तरला ," मी तुमच्या बरोबर  विवाद करण्यासाठी येथे आलो आहे . माझ्या बाह्य रुपाकडे पाहून माझ्या विषयी मत बनवू नका . " त्या नंतर त्याला जे जे प्रश्न विचारण्यात आले त्याची त्याने अचूक उत्तरे दिली . त्याने सर्व विद्वान पंडीताचा अहंकार मोडून काढला. म्हणून विद्वत्तेच्या अहंकाराचे उच्चाटन केले पाहिजे .      
        प्रत्येकात दैवत्व वास करते . ते कसे आणि कोणामधून प्रकट होईल हे आपण सांगू शकत नाही . स्वामींनी एकदा मन्सूर नावाच्या मुलाची एक गोष्ट सांगितली . तो एक लहान मुलगा होता त्याला त्याच्या खऱ्या  स्वरूपाचे ज्ञान झाले होते . त्याने घराचा त्याग केला आणि ' मी परमेश्वर आहे , मी परमेश्वर आहे ' असे तो सतत म्हणत  होता. रस्त्यावरून चालतांना तो जाहीर पणे  म्हणत होता , ' मी परमेश्वर आहे , मी परमेश्वर आहे ' . अनेक पंडीतांच्या हे कानावर आले. त्यांनी त्याला कडक शब्दात असे म्हणू नये म्हणून सांगितले . ते म्हणाले , " असे म्हणू नकोस . तू परमेश्वर कसा बनशील ? " तरीही त्याने आपले म्हणणे चालूच ठेवले . अखेर त्यास राजाकडे नेण्यात आले . राजा म्हणाला , " हे बालका , तू तर खूप लहान आहेस तू असे म्हणू नयेस . " तो उत्तरला , " मी परमेश्वर आहे . " राजा क्रोधीत झाला व त्याने त्याचे डोळे फोडण्याचे फर्मान सोडले .तो मुलगा अंध झाला तथापि त्याने त्याचे 'मी परमेश्वर आहे ,मी परमेश्वर आहे ' . हे म्हणणे चालूच ठेवले .त्यानंतर त्याचे  हात पाय  तोडण्यात  आले . त्याच्या  देहावरून रक्ताचे पाट  वाहू   लागले.   तरी  त्याच्या देहातून  त्याचे बोल  ऐकू  येत  होते . त्यानंतर  त्याचे   प्राणोत्क्रमण  झाले   आणि  त्याच्या   देहाला  अग्नी  देण्यात  आला . त्याच्या   चितेतील  राखेमधुनही 'मी  परमेश्वर   आहे ' हे  बोल ऐकू  येत  होते  .यावरून   दिसून   येते   की   त्याला   परमेश्वराचा  बोध  झाला   होता . त्याच्या देहातील प्रत्येक अणुरेणु मधून ' मी परमेश्वर आहे ' हा ध्वनी निनादत होता . म्हणून विद्वत्तेचा काय उपयोग ? त्या पंडितांनी त्यांच्या  विद्वत्तेच्या   अहंकारापायी  एका खऱ्या संताला  जीवे  मारले  .  स्वामी ,   तुम्ही आम्हाला  किती त-हेने  उपदेश  आणि  बोध  करता ! किती  उदाहरणे   देता  .  हे  मानवी   मन  जागृत  होईल  का ?  विद्वत्तेच्या  अहंकारामुळे एका  संताच्या  हत्येचे  पाप  त्यांच्या  माथी आले  . म्हणून  आपल्या मानवी  बुद्धीने आपण सत्याची पारख करू शकत नाही . 
                  उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......