ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार - २१ जानेवारी
" प्रवाहाबरोबर वहात आनंदप्राप्ती करा. भगवंताला त्याच्या इच्छेनुसार तुमच्या जीवनाचा सूत्रधार बनू द्या. "
साधनेचं वर्ष
३० जून २०१६ प्रात:ध्यान
वसंता : स्वामी, भगवंताच्या जीवनात शनी कसा काय येतो? मी अगदी गोंधळून गेलेय. पूर्वी मी मंगळसूत्र आणि नवग्रहांबद्दल लिहिलं आहे.
स्वामी : परमेश्वर अवतरीत झाला तरीही त्याला हे भोगावे लागते. येऊ घातलेल्या सत्ययुगाकरता आपण नवग्रहांवर ताबा ठेवला आहे. त्या काळात नवग्रह कोणावरही परिणाम करू शकणार नाहीत. रामानं वालीवर लपून बाण मारला. परिणामतः कृष्णास वाली नामक शिकाऱ्याच्या बाणानं मृत्यु आला. माझ्यावरील अतीव प्रेमामुळं तू आता विरह वेदना सोसत आहेस. प्रेमसाई काळात मी तुझ्यावरील प्रेमामुळे अशाच यातना सोसेन. परमेश्वर एका अवतार काळात जे करतो त्याच्या परिणामास त्याला पुढील अवतारात सामोरे जावे लागते.
वसंता : मला कळतंय स्वामी. पण,तुम्ही यायला हवे. आता मला हे नाही सहन होत.
ध्यान समाप्ती
आता आपण हे सविस्तरपणे पाहूया. परमेश्वर मानवी देह धारण करून अवतरीत होतो. स्वामींच्या बाबतीत हेच घडले. २०११ साली स्वामींनी देह सोडल्यावर ते विश्व ब्रह्म गर्भकोट्टममध्ये राहावयास आले. त्यावेळी त्यांनी शुक्र ग्रह निर्देशित करणारे एक रत्न दिले. याप्रमाणे इतर ग्रहांसाठीही रत्ने दिली. स्वामींनी मला त्या रत्नांचं एक लॉकेट बनवायला सांगितलं.
त्या लॉकेटमध्ये नवग्रह दर्शवणाऱ्या प्रत्येक रत्नाची जागा कुठे असावयास हवी हे एक चित्र काढून समजावून सांगितलं. तसेच मंगळसूत्रं बनवण्याकरता पवित्र पिवळा धागा दिला. स्वामींनी नवग्रहांचे हे मंगळसूत्र नवग्रहांना ताब्यात ठेवण्यासाठी मला करावयास सांगितले.
• प्रेमसाई अवतार काळात म्हणजेच सत्ययुगाच्या कालखंडात कोणालाही नवग्रहांची पीडा होणार नाही. (२००० साली स्वामींनी मला नऊ जगतात आमचा विवाह संपन्न होत असतानाची दिव्य दृश्ये दाखवली होती.)
आम्ही माझ्या दैनंदिन्या चाळत असताना अमरना स्वामींचे हस्ताक्षर दिसले. तिथे स्वामींनी ' Saturn R turn Sat ' असं लिहिलं होतं. याचा अर्थ स्वामी परत येणार.
रामवतारात, रामानं झाडाआडून बाण मारला आणि वालीचा वध केला. त्यानं झाडामागे लपून बाण मारला. असं का केलं रामानं ? याचं कारण असं की, वालीला एक वर प्राप्त झाला होता तो असा, " जो कोणी त्याच्या समोर युद्धास उभा राहील,त्याचे अर्धे सामर्थ्य वालीला मिळेल." म्हणूनच रामानं झाडाआडून वालीचा वध केला. कृष्णावतारात वाली पुनश्च त्याच नावानं जन्मला,परंतु एक शिकारी म्हणून. त्याने झाडाआडून मारलेल्या बाणामुळे कृष्णाचा अंत झाला. कारण आणि परिणाम सर्व जीवांना कसे लागू होतात याचे हे समर्पक उदाहरण आहे. प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते. एका जन्मातील क्रियेची प्रतिक्रिया पुढील जन्मी उमटते. जर प्रत्यक्ष परमेश्वर कर्मकायदा पाळतो तर सर्वसामान्य माणसांचे काय?
मी स्वामींच्या दर्शन, स्पर्शन आणि संभाषणाकरता अखंड आतुर असते. त्यांनी मला सोडून इतर सर्वाना ह्या तिन्हींचा मुक्त अनुभव दिला. त्यामुळे स्वामी जेव्हा प्रेमसाई म्हणून येतील तेव्हा ते माझ्या एका स्पर्शासाठी, एका कटाक्षाकरता तसेच माझ्याकडून एकतरी शब्द ऐकावयास मिळावा म्हणून क्षणोक्षणी आतुर असतील. आम्ही जरी एका मोठ्या विस्तृत कुटुंबात वावरलो, तरीही त्यांना ही व्याकुळ आतुरता असेल. याद्वारे परमेश्वरास असे दर्शवायचे आहे की, एका जन्मात केलेल्या कृतींचा पुढील जन्मी समतोल साधावा लागतो. आमच्या ह्या जन्मातील कृतींची परतफेड पुढील जन्मी होऊन समतोल साधला जाईल. हे आम्ही आमच्या जीवनाद्वारे दर्शवित आहोत. हे उदाहरण समस्त मानवतेकरता आहे.
काल मला मिळालेल्या केळ्यावर एक संदेश आला. त्यावर एक सूळ, इंग्लिश अक्षर S, आणि १६ हा अंक होता.
३० जून २०१६ मध्यान्ह ध्यान
वसंता : स्वामी, केळ्यावर तुम्ही सूळ, S, आणि १६ असे लिहिलेत. ह्यातून तुम्ही काय बरं सांगू इच्छिता?
स्वामी : मी जगाच्या कर्मांचा सूळ वाहिला,आणि देहत्याग केला. आता मी १६ कलांनी परिपूर्ण होऊन परत येईन.
वसंता : खूप छान स्वामी. तुम्ही लवकर या. स्वामी तुम्ही शनी विषयी सांगितलेत. शनीच्या प्रभावाचा अजून एक महिना बाकी आहे का?
स्वामी : होय. एक महिना बाकी आहे.
वसंता : स्वामी, मी मानसरोवर आणि मन याविषयी लिहितेय.
स्वामी : होय. तुझं मन हे मानसरोवर आहे तर तुझं हृदय कैलास.
वसंता : मी लिहिन, अचूक लिहिण्यासाठी कृपा करून मला आशीर्वाद द्या.
स्वामी : होय ,तू लिही .
वसंता : मला तुमची शारीरिक जवळीक का बरं हवीशी वाटते? ही वासना तर नव्हे?
स्वामी : तुला वासना नाही. तुझे विचार हे माझ्या विचारांचं प्रतिबिंब आहेत. राधा आणि कृष्ण हे एकात्म होते. आपली जवळीकीची इच्छा नवसृष्टीकरता आहे.
आता आपण ह्याविषयी अधिक जाणून घेऊ यात. येशू सुळावर चढला,त्याप्रमाणे स्वामींनी सर्वांची कर्मं स्वतःवर घेतली,आणि शेवटी देह सोडला. येशूने देह सोडल्यानंतर पुन्हा देह धारण केला. त्याचप्रमाणे स्वामी पूर्णावताराच्या १६ कलांसह देहधारी होऊन पुन्हा येतील. १६ हा अंक उलटा लिहून स्वामी त्यांचं पुनरागमन सूचित करतात. कदाचित ते महिन्याभरात येतीलही!
हा सुविचार गीतेच्या १३व्या अध्यायाशी संबंधित आहे. १३व्या अध्यायात भगवत प्राप्तीच्या पाच अवस्था सांगितल्या आहेत. परमेश्वर सर्वांच्या हृदयात भातकणाच्या टोकाएवढ्या निळ्या ज्योतिस्वरुपात स्थित असतो.हा साक्षी अवस्थेतील अंतर्यामी होय. ही आपल्या साधनेच्या टप्प्यातील पहिली अवस्था; उपद्रष्टा. माणूस ‘जीवनाचा अर्थ काय?’ यावर चिंतन करून साधना करायला लागला की त्याचे मन परमेश्वराकडे वळते. तो आध्यात्मिक पुस्तकं वाचून साधना करू लागतो. आता परमेश्वर त्याच्या जीवनात 'अनुमंत' या अवस्थेत प्रवेशतो. साधक ह्या टप्प्यात असताना अंतर्यामी भगवान त्याला प्रोत्साहन देत 'हे चांगले आहे, तू सन्मार्गावर आहेस' अशी दाद/ ग्वाही देतो. साधनेच्या मार्गावर जीवाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तो देवाकडे प्रार्थना करतो,"हे भगवंता! हे दुःख व यातना मला सहन होत नाहीयेत." यावेळी अंतर्यामी परमेश्वर भक्ताचं दुःख झेलणारा भर्ता ही अवस्था धारण करतो. 'भक्तविजयम्' ह्या पुस्तकात या अवस्थेतील परमेश्वर आणि साधक यांच्या अनेक गोष्टी आहेत.
गोरा कुंभाराचे हात कापले गेले. तेव्हा पांडुरंग त्याच्या भावाचं रूप धारण करून आला व त्यानं सर्व कामांमध्ये गोऱ्याला मदत केली. याच प्रमाणे सखूबाईची सासू तिला अति काम देत असे आणि तिचा विविध प्रकारे जाच करत असे. पांडुरंगानं एका लहान मुलीचं रूप धारण करून तिला तिच्या घरकामात सर्व मदत केली. ही उदाहरणं परमेश्वराच्या 'भर्ता' ह्या अवस्थेची आहेत. माझ्या लहानपणी मलाही असे अनेक अनुभव आले आहेत. या अनुभवांवर मी एक गाणंसुद्धा लिहिलं आहे.
यानंतर साधकाची अजून प्रगती होते. त्याचे विचार प्रगल्भ होतात. तो देवाला म्हणतो," माझ्या साधनेचे सर्व फळ मी तुला अर्पण करतो." आता भगवान 'भोक्ता ' होतो.साधक त्याच्या साधनेचे पूर्ण फळ देवास अर्पण करतो. अखेरशेवटी साधक अंतिम टप्प्याप्रत पोहोचतो. ही अवस्था आहे,' महेश्वर '. इथे साधकाचं जीवन नदीत वाहणाऱ्या लाकडी ओंडक्याप्रमाणे होते. या टप्प्यात साधकाला स्वतःचा संकल्प नसतो,वेगळ्या इच्छाही नसतात. माझे जीवन हे असे आहे. मी स्वामींना सर्वस्व अर्पण केलेय.
०२ / ७ / २०१६ प्रात: ध्यान
वसंता : स्वामी आज मला वाहत्या नदीत तरंगणाऱ्या ओंडक्याबद्दल लिहायचे आहे.
स्वामी : ही वल्हे नसलेल्या नावेसारखी तुझी अंतिम अवस्था आहे. इथे सर्व प्रयत्न संपतात.
वसंता : स्वामी, विनोबाजींनी सांगितलं आहे की, जेव्हा एखाद्याचे सर्व प्रयत्न संपतात आणि त्याची धावपळ थांबते तेव्हा तो नारायणाच्या पंखांवर गाठोड्यासारखा बसतो.
स्वामी : हे अगदी बरोबर आहे. तू सर्व अवस्था प्राप्त केल्या आहेस. रडू नकोस. धीर धर. नेहेमी शांत रहा.
वसंता : आता मला समजले स्वामी. मी शांत राहीन.
ध्यान समाप्त.
विनोबाजींनी त्यांच्या 'गीतेवरील प्रवचने' ह्या पुस्तकात लिहिलं आहे," साधकानं साधनेची शेवटली पायरी गाठली की तो, शांत होतो. त्याला उमजते की जे काही घडत आहे ते परमेश्वरी इच्छेनुसार घडत आहे. स्वामींनी मला ही अवस्था रूपेरी बेटावरील वल्ह्याविना नावेद्वारे दाखवली होती. त्यावेळी स्वामी मला वल्ह्याविना नावेमधून अनेक ठिकाणी घेऊन जात असत. माझ्या पहिल्या पुस्तकात मी त्या दिव्य अनुभवांसंबंधी लिहिलं आहे. ही नाव साधकाची साधनेतील अंतिम पायरी सूचित करते. त्या नावेत बसल्यानंतर मला आलेल्या अनुभवांबद्दल स्वामींनी मला लिहायला सांगितलं. त्या काळात अनेक देव देवतांनी मला दिव्य दर्शन दिलं होतं. स्वामींच्या उपस्थितीत त्यांनी मला त्यांच्या दिव्य शक्ती दिल्या. त्या दिवसांत स्वामी मला अनेक लोकांतही घेऊन गेले.तेथील प्रत्येक लोकात स्वामींचा आणि माझा विवाह संपन्न झाला. स्वामींच्या सूचनेनुसार मी सर्वकाही पुस्तकांमध्ये लेखनबद्ध केले आहे. आता स्वामींनी मला त्या शांत अवस्थेत राहण्यास सांगितले आहे. स्वामींनी माझ्या मनाची मानसरोवराशी तर हृदयाची कैलासाशी तुलना केलीय. माझ्या मनाच्या मानसरोवरात स्वामी सदैव स्थित आहेत. मला अखंड त्यांचं दर्शन घडत असतं. 'त्यांच्या'शिवाय तिथे दुसरं काहीही नाहीये. माझं हृदय 'कैलास ' आहे. हा कैलास विश्व ब्रह्म गर्भ कोट्टमचं रूप धारण करत बाह्यगामी झाला आहे. कैलासावर केवळ शिव आणि शक्ती उपस्थित असतात. येथून आमचे भाव बाहेर पडतात आणि सर्वांच्या ह्रदयांमध्ये प्रवेश करतात. ती हृदयेसुद्धा कैलास आहेत. या प्रक्रियेतून समस्त जन जीवनमुक्त अवस्था प्राप्त करतात. मी सर्व अवस्था प्राप्त करूनही स्वामींच्या भौतिक सान्निध्यासाठी अजूनही व्याकुळ आहे. राधाकृष्णाचा एकात्म भाव होता. स्वामी व मला शारीरिक सान्निध्याची इच्छा आहे. या इच्छेद्वारेच नवसृष्टीची निर्मिती होईल. स्वामी येतील. आम्ही एकमेकांना स्पर्श करू,एकमेकांशी बोलू; याद्वारे सृष्टीचं नूतनीकरण होईल. ही सत्य युगाची नांदी असेल.
जय साईराम