गुरुवार, १६ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " आपले मन शुद्ध झाल्यानंतरच आपण परमेश्वराचे स्पष्ट प्रतिबिंब पाहू शकतो व त्याचा खरा आवाज ऐकू शकतो." 
प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरू 

                   आमच्या घरी आम्ही खाण्याचे पदार्थ दुकानातून कधीही विकत आणत नव्हतो. चकल्या, बर्फी, लाडू  इ. जिन्नस आम्ही घरीच बनवत असू. माझ्या घरी माझी आजी, काका, मामा, वडील, पती, मुले या सर्वांसाठी खाण्याचे वाटे करून वेगवेगळ्या डब्यात ठेवले जात. प्रत्येकासाठी बरोबर मोजून मी ते डब्यात ठेवत असे. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत माझ्यासाठी सर्वजण सारखेच होते. 
                 माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझे वडील आणि मी एकटे पडलो. माझी मामी तिच्या दोन मुलांना घेऊन तिच्या वडिलांच्या घरी गेली. त्यामुळे मामा आमच्या घरी रहायला आले. माझ्या काकांच्या बाबतीतही तसेच घडले. काकी तिच्या वडिलांच्या घरी गेली म्हणून काका आमच्या घरी येऊन राहिले. ह्या सर्व घटनांचा माझ्या मनावर बराच परिणाम झाला. वैवाहिक जीवन असे का ? कुटुंबे विभक्त का बरे होतात ? प्रत्येक कुटुंबाला असे का भोगावे लागते ? हे सर्व दुःख कसे दूर करता येईल ? मला याचे खूप दुःख होत असे. मग माझ्या मनात विचार आला की अवतारांचे कुटुंबही असेच होते, यावर उपाय काय ? जगामध्ये बदल घडवण्यासाठी मी स्वामींची प्रार्थना केली. ज्याप्रमाणे खाद्यपदार्थांचे मी सर्वांसाठी समान वाटे करते, त्याप्रमाणे या जगात प्रत्येकाला आनंदही समान मात्रेत मिळावा, प्रत्येक कुटुंब आनंदाने व एकोप्याने रहावे,- माझे विचार हे असे होते. 

जय साईराम

रविवार, १२ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

            " सर्व इच्छा आकांक्षा यापासून मनाला रिक्त करून, साधक परमेश्वराशी संपूर्ण शरणागत झाल्यानंतर परमेश्वर त्याचे सत्य स्वरूप प्रकट करतो." 
प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु

                     प्रथम स्वामी म्हणाले, " तू राधा आहेस " नंतर त्यांनी मला दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणून संबोधले. नंतर ते म्हणाले," तू अवतार होशील तू  ब्रम्हावस्था प्राप्त केली आहेस." हे सर्व माझ्या कठोर तपश्चर्येचे व साधनेचे फळ म्हणून मला मिळणार होते. तथापि मी ते नाकारले. कारण माझ्या दृष्टीने ती निव्वळ मानांकित पदे होती. मला फक्त परमेश्वर हवा आहे. 
                     लहानपणी माझ्याकडे खण भरून बाहुल्या होत्या. एकदा मला कचकड्याची छोटीशी बाहुली हवी होती. त्यासाठी मी रडून रडून आकांत केला. माझ्या आईनी  आणि आजीनी खणातल्या सगळ्या बाहुल्या काढून माझ्यापुढे ठेवल्या व त्यातील प्रत्येक बाहुलीची गोष्ट सांगितली. त्यांनी माझी समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी हट्टाला पेटले होते. जेवणखाण सोडून मी नुसती रडत होते. ती बाहुली मिळाल्यावरच मी रडायची थांबले. 
                      मला फक्त स्वामी हवेत, असे मी म्हणाले; तरीही स्वामींनी मला बाहुल्यांच्या मालिकेसारख्या राधा, दुर्गा, लक्ष्मी, अवतारपद, ब्रम्ह आणि ब्रम्हअवस्था  या सर्व अवस्था दाखविल्या. मी म्हणत राहिले, " मला या बाहुल्या नकोत मला फक्त तुम्ही हवे आहात." शेवटी स्वामी म्हणाले, की ते केवळ माझ्यासाठी पुढील अवतार घेणार आहेत. मला जे हवे ते मिळेपर्यंत संतुष्ट न होण्याचा माझा हट्टी स्वभावच मला परमेश्वर प्राप्त करून देत आहे. या सर्व अवस्थाही जर मी बाहुल्यांप्रमाणे नाकारते आहे, तर मला भौतिक गोष्टींची गरजच काय ? मला हा आश्रम, नावलौकिक, गर्दी काहीही नको. स्वामींनी मला आश्रम बांधण्यास सांगितले. मुक्ती स्तूप आणि मुक्ती निलयम आश्रम स्वामींच्या संकल्पानुसार बांधले गेले आहेत. माझ्या दृष्टीने तेही सामान्य बाहुल्यांप्रमाणेच आहे. मला हे काहीही नको.

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ९ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " ज्याचे मन सदैव परमेश्वराच्या ठायी निमग्न असते तो खरा ब्रम्हचारी होय." 

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                  मी या जगाविषयी अज्ञानी आहे. मी फक्त परमेश्वरासाठी जगते आहे. लोक माझ्याकडे भौतिक दृष्टीकोनातून पाहतात आणि माझा अनादर करतात. सत्य काय आहे, जीवनाचे सार्थक कशात आहे हे जगाला अजून समजत नाहीय आणि म्हणूनच मी स्वतःला या संसारी कचऱ्यापासून  दूर ठेवले आहे. 
                  लहानपणी मी खूप हट्टी होते. एकदा का एखादी गोष्टी हवी असे वाटले की ती मिळेपर्यंत मला चैन नसे. मला बाहुल्या खूप आवडत असत आणि एखादी बाहुली मला आवडली की  माझे वडील आणि आजी ' एजंट ताता ' यांना ताबडतोब मदुराईला बाहुली आणण्यासाठी पाठवत. त्यासाठी त्यांना आमच्या आडगावापासून कालीगुडीला जावे लागे व तेथून आगगाडीने मदुराईला जावे लागे. ती बाहुली हातात पडेपर्यंत मी काहीही न खाता पिता रडून नुसता गोंधळ घालत असे. बाहुली मिळाल्यावर मी खुशीने तिच्याबरोबर खेळत असे. असा माझा हट्टी स्वभाव - मला जे पाहिजे ते मी मिळवतेच. याच माझ्या हट्टी स्वभावाने मागणी केली, " मला परमेश्वर पाहिजे, मला त्याला आत्ता याक्षणी पहायचे आहे. त्याच्याशी बोलायचे आहे, मला त्याच्याशी लग्न करायचे आहे, त्याच्याबरोबर रहायचे आहे. त्याच्यामध्ये विलिन व्हायचे आहे." 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साई राम

रविवार, ५ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " ज्ञानाने चित्तशुद्धी होते. आणि म्हणून आपले सर्व अनुभव सत्य असतात."

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                   माझ्याप्रमाणेच माझे काका, आजी आणि वडील मुलांना भक्तीरसाने ओथंबलेल्या कथा सांगत. आम्ही त्यांना भक्तीमार्गावर आणले. आम्ही त्यांना गीता, नारायणसूक्त आणि तिरुपावै, आंडाळचे महान भक्ती कार्य शिकवले. रोज सकाळी ६ वाजता आम्ही सर्वजण प्रार्थना, भजन आणि गीतेतील श्लोकांचे पठण करत असू. संध्याकाळी काही वृद्ध मंडळी आमच्या व्हरांड्यात येऊन बसत. तेव्हा मी त्यांना रामायण व भक्तविजय वाचून दाखवत असे. आमच्या आयुष्यात फक्त परमेश्वर होता. दुसरे काहीच नव्हते.  
                     जगाची रीत का बरे वेगळी आहे ? आमचे कुटुंब का इतरांहून वेगळे होते ? मी नेहमी यावर विचार करत असे. आम्ही कधीही कोणाशी बोललो ते सत्यच बोललो. गोष्टी जशा होत्या तशाच सांगितल्या. मला नवल वाटे ' लोक सत्य का लपवतात ? ते खोटं का बोलतात ? उत्तर न मिळाल्याने माझे मन भीतीने ग्रासून जात असे.'
                     या संसारी लोकांना पाहून मला भीती वाटे आणि म्हणून मी एकटीच रहात असे. माझा स्वभाव त्यांच्या स्वभावाशी मिळता जुळता नसल्याने मी माझ्या कृष्णाबरोबर एकटीच रहात असे.

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

             " अनेक जन्मांमध्ये साठवलेल्या टाकाऊ आणि अमंगल गोष्टींमुळे आपले मन अपवित्र आणि कलंकित झाले आहे. आपल्याला चित्तशुद्धी च्या सत्वपरिक्षेस उतरायलाच हवे."

प्रकरण दुसरे

अंकुर पुढे सुरु

भगवद्प्रीत्यर्थ जीवन
                     बालपणी माझ्या वडिलांनी मला त्यांच्याप्रमाणे आत्मपरिक्षणाची डायरी लिहायला शिकवली. आम्ही ती रोज लिहित असू. हीच सवय मी माझ्या तिन्ही मुलांना लावली. रात्री आम्ही दिवसभरात केलेल्या चुका लिहित असू.
* मी कोणाशी कठोर शब्दात बोलले का ?
* मी कोणाशी खोटं बोलले का ?
* मी क्रोधित झाले का ? 
* मी दुसऱ्यांमधील दोष काढले का ? 
* मी दुसऱ्यांना मदत केली का ? 
                    मुले या प्रश्नांची उत्तरे लिहित आणि स्वतःच्या वर्तणुकीचे परीक्षण करीत; याच्यामुळे दुसऱ्यांमधील दोष न काढता ती स्वतःचे परीक्षण करण्यास शिकली. मी त्यांना सांगितले, की हा जन्म आपल्याला आपल्यातील चुका सुधारण्यासाठी दिला गेला आहे.  
                  माझ्या वडिलांनी जसे मला शिकवले तसेच मी माझ्या मुलांना शिकवले. 
                 हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आदर्श हीच माझ्या कुटुंबाची धनदौलत होय. मुलांना वाढवताना स्वयंशिस्तीवर माझा भर होता. तसेच त्यांनी चांगल्या  सवयी अंगी बाणवाव्यात, यासाठी मी त्यांना प्रोत्साहन दिले. शिक्षणासाठी बाहेर राहिल्यावर याचा त्यांना खूप उपयोग झाला. कावेरीने फातिमा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अरविंदन आणि मणिवन्ननने विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे आध्यात्मिक, शिस्तबद्ध जीवन चालू राहिले. 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम
 

रविवार, २९ मे, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " आत्मसाक्षात्कार ही जीवनयात्रेची खरी सांगता आहे. जीवनमुक्त ही अंतिम अवस्था आहे."

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

मी याहून का बरं वेगळी आहे ? 
                    याचे कारण म्हणजे मी एका पद्धतीने लहानाची मोठी झाली आहे आणि तुम्ही दुसऱ्या पद्धतीने. सदेह भगवंत प्राप्ती हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्वांना जीवनमुक्त स्थिती प्राप्त व्हावी, अशी माझी इच्छा आहे. हाच माझा पूर्णवेळ आणि अर्धवेळ उद्योग आहे. माझे मन परमेश्वराच्या - फक्त परमेश्वराच्या विचारांनी भरून आणि भारून गेले आहे. मनात उद्भवलेल्या जरा, व्याधी आणि मृत्यू यांची भीती हेच माझ्या वर्तमान स्थितीचे कारण आहे. 
                     मी अगदी वेगळ्या वातावरणात लहानाची मोठी झाले. नवजात बालकाला दुध पाजले जाते. मला कृष्णभक्तीचे दुध पाजले गेले. माझा देह माझ्या आईच्या दुधावर पोसलेला नसून तिच्यामध्ये असलेल्या कृष्णभक्तीच्या दुधावर पोसलेला आहे. म्हणूनच कृष्णाने मला पूर्णतः व्यापून टाकले आहे. माझे वडील, काका, आजी आणि पणजी यांच्या अंगाखांद्यावर मी लहानाची मोठी झाले. तेच मला खाऊ घालत. त्यांनी माझे संगोपन केले, त्यांनी मला फक्त अन्न खाऊ घालून माझे पोषण केले का ? ते मला जेवण भरवत असत मी तोंडात घास घेऊन चावून खात असे. परंतु माझे लक्ष पूर्णपणे ते सांगत असलेल्या कथांकडे असे. माझ्या मुखाने कृष्ण अन्नाचे घास घेतले, माझ्या दातांनी कृष्णाचाच रवंथ केला. अंथरुणात पडल्यावर कृष्णाच्या कथा ऐकल्याशिवाय मला झोप येत नसे. मी खेळत असे ती फक्त कृष्णरूपी बाहुलीशीच. मी वाचत असे ते फक्त माझ्या वडिलांचे अत्यंत प्रिय पुस्तक, भगवद्गीता. त्यांनी मला अनेक मंत्र आणि श्लोक शिकवले. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २६ मे, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " शुद्ध सत्वामध्ये एकत्व पावलेला जीव पुन्हा माघारी येऊ शकत नाही."

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                 तुमचे बालपण आठवायचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचा बालपणीचा, दहाव्या वर्षापर्यंतचा काळ कसा घालवलात ? तुमची मुलं आता काय करत आहेत ? ती त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळतात. त्यांना विविध प्रकारचे रुचकर पदार्थ खायला हवे असतात. त्यांना जे हवे तेच ते खातात. ती शाळेत जातात. सिनेमाला जातात, मित्रांकडे तसेच नातेवाईकांकडे जातात. त्यांना नवीन नवीन कपडे हवे असतात. केवढ्या ह्या इच्छा वासना ! 
                    मला या गोष्टींमध्ये का बरं रुची नव्हती ? मला व्याधी, जरा, मृत्यू यांचे भय का वाटत असे ? त्यामधून सुटका करून घेण्याच्या वेगवेगळ्या मार्गांचा मी का बरे शोध घेत होते ? मी इतर मुलांपेक्षा वेगळी का होते ? माझे विचार वेगळे का होते ? आजही मी अशीच आहे. 
                    या जगामध्ये सर्वजण काय करत आहेत ? सर्वजण आपापल्या कुटुंबात रममाण झाले आहेत, बायकामुलांसाठी पैसा कमावण्याच्या मागे आहेत. ह्यांना घर, पद, प्रतिष्ठा, धन याविषयी आसक्ती आहे. या गोष्टी तुमचे मन व्यापून टाकतात. त्या गोष्टी मिळवणे हेच तुमचे मुख्य उद्दिष्ट बनते. त्यातून थोडासा वेळ काढून तुम्ही देवळात धावती भेट देता किंवा एखादी पूजा करता. साईभक्त समितीत जातात. भजने गातात. सेवेच्या उपक्रमात भाग घेतात. पुट्टपर्तीला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. हे सर्व अर्ध - वेळ उद्योग आहेत. 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम