रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५


   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

 " त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २७ 
 
         जो मनुष्य सर्व चराचर भूतात परमात्म्याला आणि परमात्मा हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असल्याचे जाणतो तोच यथार्थ रूपाने पाहतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            मला अशाश्वतातील शाश्वत पाहू दे.  तू सर्व जीवांमध्ये समभावाने स्थित आहेस. मी अडाणी आहे. हे अच्युता, मला तुझे विश्वरूप पाहू देत. मला तू परमानंद दे. हे कमलनयना, कान्हा, मी तुला शरण आलो आहे. तू मला आश्रय दे.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

 

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम, वैश्विक कर्मांचा संहार करून सर्वांना मोक्षपदास घेऊन जात आहे."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २६ 
 
          हे अर्जुना! जेवढे म्हणून चर आणि अचर प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात. हे जाण.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा! स्थावर असो वा जंगम, जन्मात येणारा प्रत्येक जीव क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून उत्पन्न झाला आहे. हे ज्ञान तू या मूढमतीला दे. तीन पावलात विश्व व्यापणाऱ्या. बामना गलोलाने मडकी फोडणाऱ्या बालकृष्णा, तू पांडवांचा दूत झालास. पद्मनाभा, करुणामया पाप्याला तुझा चरणपुष्पांवर स्वीकारून दुवा दे. तुझ्याविना मी अगतिक आहे. प्रभू! माय, बाप, गुरु, देव सर्व काही तूच! तुझाच भरवसा केला. कृपा कर कृष्णा.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

 

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम, वैश्विक कर्मांचा संहार करून सर्वांना मोक्षपदास घेऊन जात आहे."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २५ 
 
          अध्यात्मिक ज्ञानाविषयी अनभिज्ञ असणारे काहीजण तत्त्वज्ञानी पुरुषांकडून ऐकून तद्नुसार उपासना करतात. ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग खात्रीने पार करतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा, मला वेद माहित नाहीत. मी ते इतरांकडून ऐकले आहेत. तरीही त्यांची भक्ती भावाने आराधना करून मी मृत्यूवर विजय मिळवेन. हे सप्तगिरींच्या पल्याड वास करणाऱ्या व्यंकटेशा, तू नित्य नर्तन करतोस. मला क्षणोक्षणी तुझी भक्ती करावीशी वाटते. ती भावना माझ्यामध्ये निर्माण कर. हे ईश्वरा, मला तुझा भक्त बनव. या पाप्याच्या पापांचा संहार कर. प्रभू, कान्हा, परमेश्वरा, परमदयाळा, तू माझा आश्रयदाता आहेस.शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
             स्वामी म्हणाले," युधिष्ठिराखेरीज सर्व पांडवांनी स्वर्गाच्या वाटेवरच देह त्यागले. फक्त युधिष्ठिरच सदेह स्वर्गाला गेले. तू ही सदेह स्वर्गाला जाशील. धर्माचरण केल्यामुळेच त्याला हे शक्य झाले तू हे भक्तीने प्राप्त करत आहेस. धर्माचरण केल्याने विपुल प्रमाणात सुजनता प्राप्त होते. युधिष्ठिराने व्यक्तिगत जीवनात खूप दुःख सोसले. त्यांच्या दुःखाच्या तुलनेत आपले दुःख काहीच नाही. ते राजा असूनही त्यांना त्यांच्या बंधू व पत्नीसह वनात पाठवले. त्यांच्या बारा वर्षांचा वनवासानंतर त्यांना अजून एक वर्ष अज्ञातवासात राहावे लागले. जर त्या वर्षात कोणी त्यांना पाहिले असते तर पुन्हा बारा वर्षे त्यांना वनवास भोगाव लागला असता. एवढेच नव्हे तर जेव्हा हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नीची विटंबना करण्यात आली तेव्हाही त्यांनी क्रोध व्यक्त केला नाही. त्यांनी शांतपणे सर्व दुःख सोसली. ते धर्माशी एकनिष्ठ असल्यामुळेच ते सदेह स्वर्गाला जाऊ शकले."


२१ जानेवारी २००१ प्राप्त ध्यान.
             स्वामी आणि मी स्वर्गात गेलो. मी आत गेले. तेथे इंद्र, इंद्राणी व इतर काही देव होते. मी म्हणाले," हे देवांचे अधिपती, मी संन्यास घेणार आहे. मला आशीर्वाद द्या. भगवानांप्रत पोहोचणे हेच माझे एकमात्र ध्येय आहे. केवळ याच कारणासाठी मी संन्यास घेत आहे. मला अन्य काही नको. मला आशीर्वाद द्या." मी सर्वांना वंदन केले इंद्रानी मला आशीर्वाद दिले व म्हणाले," तुमची मनोकामना पूर्ण होईल." सर्व स्वर्गीय देवांनी माझ्यावर पुष्पवृष्टी केली. मी पुन्हा प्रार्थना केली." सर्वांना मुक्ती मिळायला हवी." स्वामी आले सर्वांनी स्वामींना नमन केले. त्यानंतर स्वामी आणि मी परतलो.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

 

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २४ 
 
          काहीजण परमात्माला आपल्या अंतरात ध्यानाद्वारे पाहतात. इतर काहीजण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे तर अन्य काहीजण निष्काम कर्मयोगाद्वारे पाहतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कृष्णा, याला आत्म्यातील आत्म्याची आत्म्याने जाणीव होण्यासाठी शक्ती दे. तूच परमात्मा होऊन याच्या आत्म्यास वास कर. या छोट्याश्या भिंतीवर तू येऊन रहा. कृष्णा, जर तू इथे आलास तर हे पडकं घर राजमहाल होईल. हे राजा, ये. तू वामन बनून आलास व त्रिविक्रमामध्ये वृद्धिंगत झालास. हे व्यंकटेश्वरा, मला सांख्य योगाचे आचरण करण्याची बुद्धी दे. माझ्या हातून सदैव तुझी कर्मे, सेवा घडू देत. तुझ्या भक्तीमध्ये रममाण होऊ दे. तू वेद आहेस. तू माझा आसरा आहेस.
 शरणो शरणम्.

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक   
 
           अशा रितीने जो मनुष्य पुरुष आणि प्रकृतीला त्रिगुणांसहित तत्त्वतः जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्म करत असला, त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी पुन्हा जन्माला येत नाही.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
             हे कान्हा, मला पुरुष, प्रकृती व त्यांचे गुण याबद्दलचे शिक्षण दे. हे अनाथरक्षका, तू अनाथांचा नाथ आहेस. हे बांधवा, तू सर्वांची आपत्तीतून सुटका करतोस. केवळ तूच या निराश्रिताचा आधार आहेस. हे प्रभू, तू माझा निवारा आहेस. तुला मी अनन्य शरण आलो आहे. तू मला अनासक्त बनव. तू मदुरैमध्ये पेरुमल म्हणून स्थित आहेस. श्रीरंगममध्ये रंगनाथ म्हणून पहुडला आहेस. तर तिरुपती मध्ये व्यंकटेश्वर होऊन उभा आहेस. वामन अवतार घेऊन तू अवकाश आणि पृथ्वी व्यापतोस. तूच श्रीराम, बलराम, परशुराम, पांडवांचा दूत आहेस. तू पुरुष आणि स्त्री दोन्ही आहेस. तू इथे आहेस आणि नाहीसही.  हे आदिनारायणा तू मला तुझ्या चरणांशी घे. शरणो शरणम्. 

             माझ्या वडिलांनी त्यांच्या डायरीची सुरुवात दि. १ जानेवारी १९५३ साली गीतेच्या १३ अध्यायातील २३ व्या श्लोकापासून केली. हा श्लोक पुरुष प्रकृती लक्षणांचे विवरण करतो. ज्याला हे माहित आहे, तो कोणत्याही पथावरून वाटचाल करत असला तरी पुनर्जन्मापासून मुक्त असतो. माझ्या वडिलांनी पुरुष प्रकृती तत्त्व जाणण्याचा तळमळीने आपले उभारून येणारे भाव व्यक्त केले. ते पुरुष आणि प्रकृती यांच्या समवेत वावरत होते यद्यपि पूर्णतः अजाण होते.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

 

गोकुळाष्टमी संदेश

 

              गोकुळामध्ये असताना कृष्ण आठ वर्षांचा होता आणि सर्व गोपी विवाहित असून त्या त्यांच्या पती आणि मुलांबरोबर कौटुंबिक जीवन जगत होत्या. सर्वजणी कृष्णाकडे आकर्षित झाल्याने सतत त्याच्या अवतीभवती फिरत असत. त्यावेळी कृष्ण त्यांच्याबरोबर रासलीला खेळत असे. रासलिलेच्या दरम्यान, प्रत्येकीला कृष्णाचे दर्शन, स्पर्शन आणि संभाषणाचा  लाभ होत असे.
             जरी कृष्ण बालक होता तरी त्या त्याच्या दिव्यत्वाकडे आकर्षित होऊन  स्वतःला विसरून जात असत. कृष्ण म्हणजे मूर्तिमंत्त  माधुर्य होय. हे माधुर्य मनाला भुरळ घालणारे होते.  त्याच्या रूपाची मोहिनी विलक्षण होती आणि त्याचे प्रेम अतुलनीय होते. या त्याच्या गुणांवर सर्व गोपी मोहित झाल्या होत्या. गोपगोपींच्या निष्पाप, निरागसतेमुळे त्यांना कृष्णाच्या स्पर्शातून  परमानंदाचा लाभ झाला जो की कृष्णाच्या राण्यांनाही  मिळू शकला नाही.गोपींना देहाचे आकर्षण नव्हते तर आत्म्याचे आकर्षण होते म्हणून त्यांनी कृष्णाला आत्मनिवेदन केले. ज्यांच्यासाठी देह केंद्रस्थानी असतो  त्यांना परमानंदाची अनुभूती होऊ शकत नाही. गोपगोपी कोणी सर्वसामान्य जीव नव्हते. त्यांनी पूर्वीच्या अनेक जन्मात अनेक सत्कर्म केल्यामुळे त्यांना हे सौभाग्य लाभले.
               कृष्णाने वृंदावनमधील ग्रामस्थ  गोपगोपींच्याद्वारे मोक्षप्राप्तीसाठी केवळ निष्पाप आणि विशुद्ध प्रेम पुरेसे आहे हे दर्शवले.  त्या भोळ्या भाबड्या  गोपगोपींसाठी मोक्षाची द्वारे खुली केली. राधेची मधुर भक्ती ही भक्तीच्या कोणत्याही प्रकाराहून अधिक श्रेष्ठ आहे  हे कृष्णाने दाखवून दिले.

श्री वसंतसाई अम्मांच्या आनंद सूत्र या पुस्तकातून

 

जय साईराम