ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार - १९ जानेवारी
" मरणाच्या घटकेला तुमच्या मनात जे विचार असतात ते तुमच्या पुढच्या जन्माची बीजे तयार करतात. "
ह्या विषयावर मी आधीच्या अनेक अध्यायात लिहिलं आहे. 'अखेरच्या अणूची शक्ती' ह्या अध्यायात मी;अंतिम क्षणी तुमच्या मनात येणारा अणुइतका सूक्ष्म विचार तुमच्या पुढील जन्माचं बीजारोपण कसं करतो ; हे विस्तारानं लिहिलंय. म्हणून आपला विचार,उच्चार आणि आचार यांमध्ये सामंजस्य निर्माण होण्याकरिता स्वप्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामींनी सांगितलं, "चांगलं करा, चांगले व्हा, आणि चांगलं पाहा." गांधीजी सर्वाना सांगत असत की,"तुम्ही मला आताच महात्मा म्हणून बोलावू नका. जर माझा वध करणाऱ्याला मी क्षमा करून राम नाम जप करीत राहू शकलो तरच तुम्ही मला 'महात्मा' म्हणू शकता."
गांधीजींच्या जीवनातील अखेरची घटना अशी घडली. ते सायं प्रार्थनेकरिता काही जणांसोबत जात असताना एक माणूस त्यांच्या समोर उभा ठाकला,आणि त्यानं गांधीजींवर गोळी झाडली. गांधीजी जमिनीवर कोसळले. त्यांच्या जवळ असलेल्यांना," त्याला माफ करावे" असे सांगून त्यांनी, "हे राम"म्हणत प्राण सोडला. ह्यामुळे ते महात्मा झाले. अशीच काहीशी घटना विनोबाजींच्या जीवनातही घडली. ते खूप आजारी झाले, त्या नंतर त्यांनी खाणं सोडलं, व ते केवळ तुळशीचं पाणी पिऊन राहू लागले. सर्व भक्तगण त्यांच्या खोलीत जमले. ते सर्व भजनं म्हणत तसेच अखंड नाम जप करू लागले. अशा प्रकारे विनोबाजींनी स्वतःस मृत्यूसाठी तयार केले. त्यांनी अशा पवित्र वातावरणात देह सोडला. सर्व संतांनी स्वतः दिलेली शिकवण जीवनभर काटेकोरपणे अंमलात आणली म्हणून ते सर्व महात्मा झाले. ते आजीवन कसे जगले हे त्यांच्या अंतिम क्षणांनी दाखवून दिले.
माधवराव पेशवे ह्या महान राज्यकर्त्याने हे जग कसं सोडलं? ते आपण आता पाहू यात. त्यांना क्षय झाला होता. ते पूर्ण व्याधिग्रस्त झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांना सतत खोकल्याची उबळ इतक्या जोरात येत असे की, त्यांना बोलताही येत नव्हतं. तेव्हा त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की,"आयुर्वेदिक औषध देऊन माझा खोकला शांत करा , म्हणजे मी भगवंताबद्दल बोलू शकेन आणि त्याचं नामस्मरण करू शकेन." डॉक्टरांनी तसंच केलं, आणि पेशव्यांनी अशा रीतीनं देहत्याग केला.
आता आपण माझ्या वडिलांचं जीवन पाहू यात. माझे वडील दररोज त्यांच्या दैनंदिनीत लिहीत असत, "हे कृष्णा, तुझे नामोच्चारण करीत माझे प्राणोत्क्रमण झाले पाहिजे. माझ्या अंतिम घटकेला तू ये आणि मला मुक्त कर." मी माझ्या वडिलांच्या दैनंदिनीवर पुस्तक लिहावं असं स्वामींनी मला सांगितलं. दर दिवशी माझे वडील गीतेतील एक श्लोक, त्यांच्या जीवनाशी त्या श्लोकाची तुलना करीत लिहीत. ह्या पुस्तकाचं नाव 'जिती जागती गीता' ठेवावं असं स्वामींनी मला सांगितलं. मी माझ्या वडिलांची दैनंदिनी या आधी कधीच वाचली नव्हती, ना त्यांनी मला कधी दाखवली. स्वामींनी मला सांगितल्यानंतरच मी सर्व दैनंदिन्या वाचल्या. अखेरच्या दिवसात माझ्या वडिलांना अपघात झाला. त्यांना मदुराई मधील रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. ते ICU मध्ये होते. त्यांच्या शरीराला सर्वत्र नळ्या लावल्या होत्या, आणि त्यांना ऑक्सिजनवर ठेवलं होतं. ते अखेरच्या श्वासापर्यंत ' ॐ नमो नारायणाय' हा मंत्र जप करीत होते. त्यांच्या अखेरच्या घटका कशा असाव्यात ह्याचा ते आयुष्यभर सराव करीत होते. गांघीजींप्रमाणेच त्यांनीही जीवनभर सराव करीत गौरवशाली मृत्यू प्राप्त केला. त्यांनी सिद्ध केले की, ते स्वतःच 'जिवंत गीता ' होते. म्हणूनच स्वामींनी मला हे पुस्तक लिहायला सांगितले.
पूर्वी मी 'शेवटच्या अणूची शक्ती' ह्या अध्यायात सामान्य मनुष्य स्वतःचा पुढील जन्म कसा निर्माण करतो हे लिहिलंय. आता मी साक्षात्कारी आत्मे, साधू,संत हे सर्व त्यांचा शेवटचा अणू भगवंतामध्ये कसा विलीन करतात ; ह्याबद्दल लिहीत आहे. हा अखेरचा अणू काही असाच आकाशातून मानवी शरीरात पडत नाही. हे त्याच्या जीवनभराच्या प्रयत्नांचं फळ असतं.
जीव समाधी घेणारे म्हणजे स्वतःचा प्राण आत खेचून घेणारे साक्षात्कारी महान अनेक आहेत. ज्ञानेश्वरांना अल्प वयातच ही समाधी घेण्याची इच्छा निर्माण झाली होती. श्री राघवेंद्र ह्या महान संतांनी सुद्धा हेच केलं. इथे साधक साधारण आणि निरोगी जीवन जगत असताना अखंड भगवंताचा विचार करीत जीव सोडण्याचा निर्धार करतात. हा निर्णय घेण्यासाठी किती असामान्य धैर्य असायला हवं! अत्यंत उच्च पातळीवर असलेल्यांनाच हे शक्य आहे. त्यांच्या वैराग्याची पातळी वर्णन करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीयेत. रामानुज सुद्धा ह्या मार्गावरील एक उदाहरण आहेत. त्यांनी बसलेल्या अवस्थेत देह सोडला. आजतागायत श्रीरंगममध्ये त्यांचा देह त्याच स्थितीत आहे.
२८/जून /२०१६
मी थोडा पाल्कोवा घेतला, स्वामींना अर्पण करीत प्रार्थना केली,"आपण दोघेही क्षीरसागरातून आलो आहोत. कृपा करून तुम्ही ही दुधाची मिठाई घ्या." सत्संग झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही माझ्या खोलीत परत आलो. सवयीनुसार त्यांनी मला बॉर्नव्हिटा घातलेले दूध आणून दिले. मी कपाचे झाकण काढून विभुती घालणार,एवढ्यात मला दुधाच्या पुष्ठभागावर वैष्णवांच्या नामाचं चिन्ह दिसलं. आम्ही सर्वांनी पाहिलं. मी अमरला फोटो काढायला सांगितलं. आम्ही फोटो पाहिला, त्यात तो आकार बदलला होता. स्वामींचे दोन हात त्यांच्या कफनीमधून बाहेर आलेले दिसत होते. जणू काही त्यांनी हातात काहीतरी धरले होते.
२८/जून /२०१६ प्रात: ध्यान
वसंता : स्वामी, काल आम्ही दुधात दोन हातांचा आकार पाहिला. ह्याचा अर्थ काय होतो?
स्वामी :आपण दोघे क्षीरसागरातून आलो आहोत हे दाखविण्यासाठी तू मला पाल्कोवा खायला सांगितलंस; मी लगेचच दुधात दाखवलं.
वसंता : मी खूप खूप आनंदात आहे स्वामी. मी ते दोन हात बघितले; तेव्हा मला एक आठवण आली.
स्वामी : काय? सांग बरं.
वसंता :आंडाळने लिहिलेल्या स्वप्न गीतांमध्ये, एका कडव्यात ती म्हणते....
" ते माझे हात कृष्णाच्या हातात ठेवतात.
ते आमचे हात पोह्यांनी भरतात.
आम्ही ते पोहे यज्ञाच्या अग्नीत अर्पण करतो.
अगदी तसेच त्यांनी माझे हात तुमच्या हातात ठेवले,आपले हात फुलांनी भरले आणि आपण ती फुले अग्नीला अर्पण केली. "
स्वामी: हे खरंय. तो आपला पहिला स्पर्श होता.
वसंता : स्वामी, तुम्ही लवकर या. तुमच्या येण्याची खूण म्हणून काहीतरी दाखवा.
स्वामी: होय, मी नक्की येईन आणि तू कोण आहेस ; हे जगाला दाखवीन.
वसंता : स्वामी, आज न्हाणं आहे.
स्वामी: मीच तुझे केस धुवीन आणि ते विंचरीन सुद्धा.
वसंता : हे पुरेसं आहे. स्वामी. तुम्ही लवकर या.
ध्यान समाप्त ...
...आता आपण पाहू यात. आम्ही स्वामींचे हात दुधात पाहिले तेव्हा मला आंडाळच्या स्वप्नगीतांमधील एक कडवं आठवलं. ह्या गाण्यांमध्ये ती विवाहाच्या प्रत्येक विधीचं वर्णन करते. मी ते विधी माझ्या विवाहाशी जोडले. त्यावेळेस त्यांनी माझे हात स्वामींच्या हातात ठेवले आणि आमचे हात फुलांनी भरले. आम्ही ती फुलं यज्ञाच्या अग्नीला अर्पण केली. स्वामी म्हणाले की; तो आमचा पहिला स्पर्श होता.
मी ज्या ज्या दिवशी न्हाणं करते तेव्हा प्रत्येक वेळेस मला भीती वाटते कारण मला नंतर खूप दुखतं. दुसऱ्या दिवशी मी न्हाणं करणार होते, म्हणून स्वामींनी आदल्या रात्री मला त्यांचे दोन हात दुधात दाखवले. प्रत्येक वेळेस स्वामी माझ्याबरोबर आहेत ; हे सिद्ध करून ते माझी भीती दूर करतात.
२९ /जून / २०१६ मध्यान ध्यान
(मी स्वामींना बोलावत अखंड अश्रू ढाळत होते ...)
स्वामी: तू अशी का गं रडतेयस? ये, मला सांग.
वसंता : स्वामी, मला तुम्ही हवे आहात. तुम्ही या! नाहीतर मी जगाचा विध्वंस करीन. मला माझ्या सर्व शक्ती परत द्या.
स्वामी : असं बोलू नकोस. जगाचा विनाश करू नकोस. सगळं नक्की घडेल. मी येईन.
वसंता : स्वामी तुम्ही म्हणालात की तीन दिवसांत काहीतरी घडेल. पण काहीही घडलं नाहीये. मला जगायचं नाहीये. तुम्ही माझा जीव घ्या.
स्वामी : असं नको बोलूस. मी येईन. तुझं शरीर बदलेल. तू माझ्यात विलीन होशील.
ध्यान समाप्त.
आता आपण पाहू यात. आधी स्वामींनी सांगितलं की तीन दिवसांत काहीतरी घडेल. तथापि परत एकदा त्यांनी मला फसवलं. मला पूर्ण उमेद होती व मी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला, पण काहीसुद्धा घडलं नाही. पूर्वी जेव्हा मी 'उपनिषदांच्या पलीकडे ' हे पुस्तक लिहीत होते तेव्हा स्वामी म्हणाले होते की, माझ्या तपाची ताकद मला अवतार बनवेल. मला ही स्थिती नको होती. माझ्या सर्व शक्ती स्वामींनी घ्याव्यात आणि मला रिक्त करावे असे म्हणत मी स्वामींकडे आक्रंदन केले होते. मी माझ्या सर्व शक्ती त्यांना दिल्या. आता मी माझ्या सर्व शक्ती स्वामींकडे मागितल्या जेणेकरून मी ह्या जगाचा विध्वंस करीन. मी स्वामींकडे आक्रोश केला. मला इथे जगता येत नाहीये. मी माझी स्वतःची कामं स्वतः करू शकत नाही. मी सर्वाना त्रास देते. स्वामी आले नाहीत. ह्या जगात मी काय करू? अशा विचारात मी अखंड अश्रू ढाळते आहे, आता मला अगदी सहन होत नाहीये. ह्याला प्रतिसाद म्हणून स्वामी म्हणाले,"असं बोलू नकोस. मी येईन आणि तुझं शरीर बदलेल. "
जय साईराम