रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

 🕉️महाशिवरात्री संदेश🕉️


प्रत्येक मनुष्याने प्रत्येक पवित्र उत्सवाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे परंतु सर्व सणांमध्ये महाशिवरात्र हा सण विशेष का मानला जातो?

या दिवशी परमेश्वर तुमच्या अत्यंत जवळ असतो. माघ शुक्ल चतुर्दशीच्या मध्यरात्री दैवी स्पंदने मानवाच्या भोवती, अत्यंत समीप असतात. आपण हा दिवस अत्यंत पवित्र भावनेने व्यतीत केला तर दैवी शक्ती आपल्याला आकर्षित करते.

या जगात दैवी तत्त्वाइतके जवळचे काहीही नाही. कधी कधी आईदेखील काहीशी दूर असू शकते पण दैवी तत्त्व सदैव आपल्या जवळ असते. 

शिवरात्री म्हणजे रुद्रांवर विजय मिळवण्याची रात्र

‘रुद्र’ म्हणजे भयानक. अकरा रुद्रांची रूपं भयप्रद आहेत. ही भयप्रद तत्त्वं मानवामध्ये प्रवेश करून सर्व दुःख, क्लेश आणि चिंता यांस कारणीभूत ठरतात. या रुद्रांना वश करण्यासाठी महाशिवरात्रीची योजना करण्यात आली आहे.

रुद्रांवर नियंत्रण म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण. इंद्रिय निग्रह सोपा नाही. आंतरिक आसक्तीमुळे मनुष्य स्वतःच्या दुःखाला स्वतःच कारणीभूत ठरतो.

जर रुद्रांच्या बाह्य प्रभावांवर नियंत्रण ठेवले नाही, तर अंतर्गत रुद्रांच्या प्रभावांवरही नियंत्रण ठेवता येत नाही. ही अंतर्गत प्रवृत्तीच सर्व क्लेशांचे कारण ठरते. म्हणून इंद्रिय निग्रह साधणे अत्यंत कठीण आहे.

३६५ दिवसांपैकी किमान एक दिवस तरी मनुष्याने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्या एका दिवसातील निग्रहामुळे मानसिक शांती प्राप्त होते आणि मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न सुलभ होतात कारण एका दिवसाचेही इंद्रियसंयमन मनुष्याला मुक्तीच्या साम्राज्याकडे नेऊ शकते. म्हणूनच महाशिवरात्रीची योजना करण्यात आली आहे.

म्हणूनच, जेव्हा आपण संपूर्ण रात्र प्रभूचे नामस्मरण करतो, तेव्हा आपली दृष्टी, श्रवण, वाणी आणि सर्व इंद्रिये परमेश्वरामध्ये लीन होतात.

— सत्य साई बाबांनी ११ मार्च १९९४ दिवशी महाशिवरात्री निमित्त दिलेल्या दिव्य सत्संगातून....

  

 जय साईराम 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा