गुरुवार, २९ मे, २०२५

 


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        " तुमच्या नेत्रांना केवळ परमेश्वर दृष्टीस पडला पाहिजे, अन्य काही नाही."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ५६
 
           दुःखामध्ये ज्याचे मन विचलित होत नाही सुखाच्या प्राप्तीची ज्याला अजिबात इच्छा नाही तसेच जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
           कान्हा, गरुडवाहना, मला द्वैतापासून विन्मुख कर. मला अचंचल मनाने दुःखे सहन करण्याची क्षमता दे. वाट्याला येणारी दुःखे तुझा प्रसाद म्हणून स्वीकारण्याची बुद्धी दे. तसेच सुखाचे क्षणही तुला प्रसाद म्हणून स्वीकारण्याची बुद्धी दे. मी सुखासीन होऊ नये. भीती काढून टाक. हरीचा मार्ग साहसी लोकांचा मार्ग आहे ना? मुरारी, मुकुंदा, या मूढालासुद्धा तुझा भक्त होऊ दे. त्याची भीती घालव. त्याला राग येऊ देऊ नकोस. हे गोविंदा, भीती पापाचे मूळ आहे याची मला जाणीव करून दे. त्याचं मन खंबीर बनव तूच माझा आसरा आहेस. शरणो शरणम्. 
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २५ मे, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        "तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे, अन्य कशालाही नाही."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ५५
 
           श्री भगवान म्हणाले," हे पार्था, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामनांचा पूर्णपणे त्याग करतो आणि आत्म्याने आत्म्यातच संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
           कान्हा, मणिवण्णा, हे करुणाघना, कृपया या अतिक्षुद्र जिवाला त्याच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व इच्छांचा त्याग करू दे व त्यास आत्म्यात आत्म्याने संतुष्ट राहू दे. मला ज्ञाननिष्ठ बनव. हे दिनरक्षका, देवा, मला सतत भगवद् भावात निमग्न असणारा भक्त बनव. स्थितप्रज्ञ कर. मुमुक्ष बनव. माझे मन निरंतर दैवी लक्ष्यावर केंद्रित असू दे. मला तुमचे कार्य करू दे. सर्व काही तूच आहेस असा विचार करणारा सेवक मला बनव. ज्ञानी बनव. नित्य आणि अनित्य जाणण्यासाठी विवेकबुद्धी दे. हे नीलवर्णा, नित्यानंदा, हे वेंकटेशा, तू माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्. 
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शुक्रवार, २३ मे, २०२५

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
           गीताच्या घरी आम्ही भगवानांना नैवैद्य दाखवला. त्या म्हणाल्या," अम्मा, स्वामींना प्रसाद भक्षण करायला सांगा ना. " नंतर आम्ही पाहिले तर स्वामींनी थोडासा प्रसाद खाल्ला होता.
          सायं ध्यान
वसंता : माझ्या मनात अनेक दिवसांपासून एक शंका आहे मी सदैव तुमच्या चिंतनात हरवून जाते, मग अजूनही माझा देह येथे कसा आहे ?
स्वामी : हा देह नव्हे, केवळ रूप आहे. लाकूड जळाल्यानांतर त्याचा आकार राहतो व त्याला स्पर्श केल्यावर तो आकार ढासळतो व केवळ राख उरते. तुझ्या देहाचेही तसेच आहे. केवळ आकार रूप राहिले आहे.
वसंता : स्वामी, सूक्ष्म देहातील कन्याकुमारी देवीने मला संन्यास घेण्यासाठी अनुमती दिली. भौतिक दृष्ट्या. मी कोणाकडून दूधभात घेऊ ? कोदाईंमध्ये आंडाळच्या मातेचा अंश आहे आणि एस. व्हीं. मध्ये मीनाक्षी देवीच्या पित्याचा अंश आहे. मी त्यांच्याकडून दूधभात घेऊ का ?
स्वामी :  एस. व्ही दूधभात कालवून कोदाईला देतील व कोदाई तुला देईल. तू विश्वामध्ये ज्ञानाला प्रसार करशील. तू ज्ञान दुर्गा आहेस.
१८ जानेवारी २००१
            मला बंगलुरच्या एका भक्तांचा फोन आला. व्हाईटफिल्डमध्ये १७ तारखेला सकाळच्या दर्शनाचे वेळी, ७ फेब्रुवारी २००१ रोजी वडक्कमपट्टीमध्ये होणाऱ्या समारंभास आशीर्वाद देण्यासाठी त्याने स्वामींना प्रार्थना केल्याचे सांगितले. स्वामी त्याच्या जवळ आले व म्हणाले," माझे आशीर्वाद आहेत, आशीर्वाद आहेत.  

 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

गुरुवार, २२ मे, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        "तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे, अन्य कशालाही नाही."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ५४ 
 
           अर्जुनाने विचारले, " हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झाला आहे अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय ? तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो ?

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
           हे कान्हा, तू मला स्थितप्रज्ञाची लक्षणे सांग आणि मला स्थितप्रज्ञ बनव. हे दीनरक्षका, दयाळा, वेंकटेशा, प्रभू, तू हत्तीवरही कृपा केलीस. कृपया या दुबळ्या दासाचे रक्षण कर. पुरुषोत्तमा, पुंडरिकक्षा, भुवनेश्वरा, मला तू भुईला भार बनवून का ठेवले आहेस. मला तुझे चरण प्राप्त होऊ देत. तूच माझे आश्रयस्थान आहेस. तुझा विचार करता करताच मला मृत्यू येऊ दे. मृत्यूसमयी माझ्या मनात तुझेच विचार असू देत. हे सर्वेश्वरा, कृपया मला आपले बनव.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १८ मे, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
           त्यांच्या हृदयात वास करण्यासाठी प्रार्थना करतात. ते म्हणतात," तू मला मार्ग दाखव. केवळ तूच या विश्वनाट्याचा सूत्रधार आहेस. तू मला निर्भय बनव. खंबीर बनव. आणि लवकरात लवकर मला तुझ्या चरणांप्रत घेऊन जा. माझ्या मनातील रावण बुद्धी नष्ट कर आणि सदगुणांची जोपासना कर." माझे वडील वारंवार म्हणत की त्यांना केवळ परमेश्वरप्राप्तीची इच्छा आहे. ते वयानी तरुण असूनही त्यांना परमेश्वराखेरीज अन्य कशाचीही इच्छा नव्हती. ते निद्रिस्त आत्म्याला कुंभकर्ण व बुद्धीला रावणबुद्धी म्हणत. पहिल्या अध्यायातील ३२ व्या श्लोकात इच्छांपासून मुक्ती देण्यासाठी त्यांनी ईश्वराच्या विनवण्या केल्या." मला फक्त तू हवास, मला फक्त तू हवास, मला फक्त तू हवास, मला फक्त तुझी तळमळ लागू दे. तुझ्या दर्शनाविना माझ्या जीवाची किती उलघाल होते आहे. मला लवकर घेऊन जा." तेव्हा माझे वडील तळमळत होते आणि आता मी तगमगते आहे. त्यांची डायरी वाचल्यावर मला हे समजले. माझी आई ही अशीच होती. तिने जीवनभर परमेश्वरासाठी अश्रू ढाळले. ती म्हणायची," हे कान्हा मला तुझी चरण कमल प्राप्त होवोत ' ती वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी हे जग सोडून गेली. पहिल्या अध्यायातल्या ३७ व्या श्लोका ते म्हणतात," नातेवाईकांची ताटातूट होऊ नये म्हणून मी इतस्ततः  भटकतो आहे. या सर्वांचा त्याग करून मला केवळ तुझे चरण धरून ठेवण्याची बुद्धी दे." तथापि त्यावेळी त्यांना कोणी नातेवाईक नव्हते. माझ्या आईचा मृत्यू झाला होता. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. आमच्या घरात आमच्याबरोबर त्यांचा मोठा भाऊ, एक बहीण, अजून एक भाऊ आणि माझे मामा हे सर्वजण राहत होते. या सर्व कुटुंबीयांकडे माझे वडील नात्याचे बंध या दृष्टिकोनातून पाहत होते. ते परमेश्वराला अनन्य भक्ती व ज्ञानचक्षु देण्यासाठी प्रार्थना करत. भक्तिमार्गावरून कधीही पाय घसरू नये यासाठी ते परमेश्वराकडे प्रार्थना करत.
           दुसऱ्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे ज्ञानामध्ये स्थिर झालेल्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणांबद्दल माझे वडील काय लिहितात ते आता आपण पाहूया.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १५ मे, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        " जन्म मृत्युच्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी परमेश्वर प्राप्ती हा एकमेव मार्ग आहे."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
            गीतेतेतील पहिल्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकावर माझे वडील म्हणतात की जिथे जिथे त्यांची दृष्टी पडेल तिथे त्यांना केवळ परमेश्वराचे दर्शन होऊ दे. ते आक्रोश करतात, ' तू ये आणि मला घेऊन जा .' पुढील श्लोकात भीष्मांच्या शंखध्वनीबद्दल सांगितले आहे. ' शंख, नगारे, ढोल, मृदुंग, रणशिंगे इ. वाद्ये एकदम वाजू लागली. त्याचा प्रचंड आवाज झाला. ' माझे वडील या प्रचंड आवाजाची नादब्रम्हाशी तुलना करतात. ते म्हणतात की त्यांना या नादब्रम्हाचा ध्वनी ऐकायचा आहे. ह्या प्रचंड ध्वनीच्या माध्यमातून त्यांना परमेश्वराची नादोपासना करायची आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा लोकांमध्ये मतभेद होतात, त्यातून वादविवाद होऊन भांडणांना सुरुवात होते. माझ्या वडिलांची मनोभूमिका अशी होती की त्यांना युद्धक्षेत्रावरील तो प्रचंड ध्वनी परमेश्वराचे संगीत म्हणून ऐकायचा होता. त्यांच्या या मनोवस्थेवर चिंतन करायला हवे. त्यांचा हा दृष्टिकोन सर्वस्वी नवीन आहे व अत्यंत उच्च आहे. त्यांच्यासारखा विचार कोण करू शकेल ? बॉंबस्फोटाचा प्रचंड आवाज म्हणजे कृष्णाच्या बासरीचे स्वर असा कोण विचार करेल ? ते म्हणतात, " मला सर्वांमध्ये तुला पाहायचे आहे आणि तुझ्यामध्ये सर्वांना. तो एकच आत्मा सर्वांना व्यापून राहिला आहे. तुझ्या शंखध्वनीने माझ्या हृदयाचे दरवाजे उघडू देत. या ध्वनीचे तुझ्या मधुर मुरलीच्या स्वरात कधी परिवर्तन होईल ? मला ते कधी ऐकायला मिळेल ? इथे माझे वडील ' कान्ट्रिनिले वरूम गीतम ' या गीताचा संदर्भ देतात. त्या ओळींचा अर्थ ' वारा आपल्याबरोबर गीत वाहून नेतो ' असा आहे. स्वामींनी शब्दांमध्ये थोडा फेरफार केला.' मला वाऱ्याच्या  झुळकीमध्ये तुझे गीत ऐकू येते.' मी दुसऱ्या एका प्रकरणात याविषयी लिहिले आहे. ते म्हणतात, त्यावेळी सर्वांची  मने शांत होतील. संगीताच्या माध्यमातून उन्मनी अवस्था प्राप्त होते. सत्ययुगात कोणालाही मन नसेल. सर्वजण दिव्यानंदामध्ये तल्लीन असतील. अशा तऱ्हेने माझ्या वडिलांची इच्छा सत्युगात पूर्ण होते आहे. 

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ११ मे, २०२५

 


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

         " योग्य म्हणजे परमेश्वराशी ऐक्य, दिवसाचे २४ तास ईशचिंतन."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
             कृष्णाने गीतेच्या पहिल्या अध्यायात सांगितले आहे की देहाद्वारेच तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकता. माझे वडील कृष्णाला म्हणतात की त्यांच्या मनामध्ये सदैव सद्गुण आणि दुर्गुण यांच्यामध्ये लढा चालू असतो. कृष्णाने त्यांच्या मनरूपी रथाचे सारथ्य करावे. मनुष्याच्या अंतर्यामीचा आवाज त्याला बरोबर काय, चूक काय हे सांगत असतो तरीही त्याचा अहंकार त्याला ते ऐकू देत नाही व त्याचे पालन करू देत नाही. हा अंतरात्म्याला आवाज म्हणजे परमेश्वर होय. तथापि मनुष्य त्याला थारा देत नाही अशा तऱ्हेने दुर्गुणांचा नेहमी विजय होतो. माझे वडील परमेश्वरालाच सारथ्य करण्याची विनंती करून सद्गुण आणि दुर्गुण यांच्या लढ्यात सद्गुणांचा जय करण्यास सांगतात. जर आपण परमेश्वालाच आपला सारथी बनवले आणि आपले जीवन त्याच्या चरणी समर्पित केले तर तो आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाईल. माझे वडील पुन्हा परमेश्वराला म्हणतात, ' मी केवळ तुझे साधन आहे. तुझा विचार करत असताना मला मृत्यू येईल, असा मला वर दे.' दररोज अशा तऱ्हेने लिहून त्यांना मृत्यूही तसाच आला. परमेश्वराच्या चिंतनातच त्यांनी हे जग सोडले .

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम