गुरुवार, १० जुलै, २०२५

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


गुरुपौर्णिमा संदेश 

 
             स्वामी म्हणाले, " जेव्हा पशु वृत्ती दूर होते तेव्हा दिव्य भाव ओसंडून वाहू लागतात याउलट सर्वांची मनं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आसक्ती आणि तिरस्कार यासारख्या पशुवृत्तींनी व्यापलेली आहेत. हे असे हे अमानवी भाव दूर केले पाहिजेत. प्रेम, प्रेम आणि प्रेम हाच मनुष्याचा खरा गुण आहे. स्वामींनी जीवन जगण्याचा एक सोपा मार्ग शिकवला आहे - " सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा " सदैव सर्वांना मदत करा, कोणालाही कधीही दुखावू नका." हाच तो सोपा मार्ग आहे. जर तुम्ही स्वामींच्या ह्या  सोप्या शिकवणीचे अनुसरण केले तर तुमचे दुर्गुण तुमच्यामधून पलायन करतील.
             विनयशीलता हे खऱ्या शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे. खऱ्या शिक्षणाने मनुष्य विनयशील बनला पाहिजे अन्यथा ते निरर्थक आहे. पदव्या आणि ६४ कलांमध्ये प्राविण्य मिळवण्याचा काय उपयोग? यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला मोक्ष प्रदान करणार नाही. काल मी ६४ कलांमध्ये प्रवीण असणाऱ्या नारदांविषयी लिहिले. रावणाला हे सर्व  ज्ञान होते आणि तो कैलासाला उचलण्यासही सक्षम होता तथापि त्याचा ठायी अनेक दुर्गुण होते त्यामुळे त्याचे हे सर्व ज्ञान व्यर्थ ठरले. त्याच्या दुर्गुणांमुळे त्याचा आणि त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला म्हणून सर्वांनी सावध राहा, अहंकार, गर्व तुमचे पशुमध्ये परिवर्तन करेल. तुमच्यामधील दुर्गुणांचा नाश करण्याचा निकराने प्रयत्न करा आणि सर्वांप्रती विनम्रता बाळगा. परमेश्वर प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक वस्तूमध्ये विद्यमान आहे. तुमचे प्रेम सर्वांप्रती प्रवाहित होऊ दे. जर प्रत्येकामध्ये परमेश्वर वास करतो तर तुम्ही कोणाविषयी क्रोध वा तिरस्कार कसे दर्शवू शकता? जेव्हा तुम्ही एखाद्यावर क्रोधित होता तेव्हा तो क्रोध यांच्यामध्ये वास करणाऱ्या परमेश्वराकडे जातो. स्वामी भूतलावर आले आणि त्यांनी सर्वांना वेद, उपनिषद, गीता आणि धर्मग्रंथांमधील ज्ञानाची शिकवण सहज सोप्या पद्धतीने दिली त्यामुळे सर्वांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अध्यात्माचे अनुसरण करणे शक्य झाले.आपण सर्वांनी सत्य, धर्म, प्रेम आणि अहिंसेचा भाव विकसित केला पाहिजे त्यानंतर शांती आपोआप आपल्याकडे येईल.

- श्री वसंत साईंच्या सत्संगातून

 
 
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा