ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार - ११ जानेवारी
" यद भावं तद भवति "
' यद भावं तद भवति ', म्हणजे जसे तुमचे विचार तसे तुमचे जीवन. तुमचे जीवन तुमच्या भावतरंगांनुसार असते. ह्यासाठी माझं जीवनच उदाहरण आहे.
मी वयाच्या तिसऱ्या वर्षी आंडाळची गोष्ट ऐकली. माझं भावविश्व् अगदी तिच्या भाव विश्वासारखंच होतं. मलाही तिच्यासारखंच कृष्णाशी विवाह करून त्याच्यातच विलीन व्हायची इच्छा होती. त्या वयापासून ते आजपर्यंत हेच माझं जीवन होतं आणि आहे. बाल वयातच मी कृष्णाला माझा प्रियतम मानले. माझ्या अंतर्विश्वात मी त्याच्याबरोबर खेळत असे, नाचत, गात असे. तोच माझा सर्व काही होता. माझे हे कल्पना विश्व् माझ्या जीवनात सत्य घटना होऊन उतरले.
मी सतरा वर्षांची झाल्यावर साईकृष्णाने दुसऱ्या रूपात माझ्याशी विवाह केला. तेव्हा मला हे माहीत नव्हते. मी त्रेसष्ट वर्षांची झाल्यावरच हे सत्य मला सांगितले गेले. मी त्रेचाळीस वर्षांची असताना श्रीकृष्णाने मला ध्यानात सांगितले की, "मी पुट्टपर्थीला सत्यसाई म्हणून जन्मलो आहे. तू मला येऊन भेट." ह्यानंतर माझी भक्ती पूर्णपणे श्री सत्यसाई बाबांकडे वळली. मी पूर्वी ह्याविषयी पुष्कळ वेळा लिहिलं आहे. सध्या काय घडत आहे ते आपण पाहू.
२३ जून २०१६: ध्यान
वसंता : स्वामी मी तुमचा विचार का बरं करत नाहीये? मी फक्त डॉक्टरांचाच विचार करतेय . मी पापी आहे, म्हणून तुम्ही आला नाहीत .
स्वामी: तू माझी देवी आहेस. असं वेडं वाकडं बोलू नकोस गं . मी येईन . तू दुसरा कसलाही विचार करू नकोस .
वसंता : स्वामी आज मला नहाण करायचं आहे, पण माझे दोन्ही हात दुखतायत.
स्वामी: अगं तुला काहीही होणार नाही. तू नहाण कर. मी तुझ्याजवळच आहे.
वसंता : स्वामी, फक्त तुम्हीच माझे केस धुवा.
स्वामी: मी स्वतः तुझे केस स्वच्छ करीन, धुवीन आणि विंचरेनसुद्धा.
वसंता : हे पुरेसं आहे स्वामी. मला फक्त तुम्ही हवे आहात .
स्वामी: मी केवळ तुझ्यासाठीच आहे. मी येईन .
वसंता : मी तुमच्या ऐवजी इतर सर्वांचा विचार करत असते. अमर डॉक्टरकडे गेलाय . तो बरा व्हायला हवा .
स्वामी: काळजी करू नकोस. तो बरा होईल.
ध्यान समाप्त .
आता आपण विस्ताराने पाहुया . आज अमर डॉक्टर राजपांड्यांकडे गेला होता . माझ्या मणक्याचं ऑपेरेशन ह्याच डॉक्टरांनी केलं . आदल्या दिवशी अमरने मला हे सांगितलं, आणि अख्खी रात्र मला अजिबात झोप लागली नाही . अख्खी रात्र त्या दिवसांच्या आठवणी माझ्या मनात पिंगा घालू लागल्या . जणू काही मी सिनेमाच पाहत होते . तेव्हा घडलेलं सर्व काही मी पाहिलं . माझं हॉस्पिटलमध्ये जाणं, ऍडमिशन घेणं, ते सर्व डॉक्टर, त्या चाचण्या,ती इंजेक्शनं. मला बघायला कितीतरी डॉक्टर आले होते . अशा रीतीनं मी चलतचित्रंच पाहिलं . नंतर मला आम्ही डॉक्टर जयवेंकटेशना भेटायला गेलो ते आठवलं . ते सुद्धा खूप कठीण होतं बाई. सर्व आटपल्यावर आम्ही आश्रमात परत आलो . ह्या सर्व आठवणींनी मला रात्रभर सतावलं आणि म्हणून मला झोपच लागली नाही . सकाळी नहायला जाईपर्यंत मी खूप त्रस्त होते . नहाणं झाल्यानंतर श्रीलतांनी माझे केस विंचरले . दुपारी मी सवयीनुसार ध्यान केलं .
२३ जून २०१६ - मध्यान ध्यान
वसंता : माझं नहाण आज अगदी छान झालं. मला अजिबात दुखलं नाही .
स्वामी : मी सर्व केलं, म्हणून तुला दुखलं नाही.
वसंता : तुम्ही माझ्या जवळच आहात, हे नेहमी सिद्ध करता.
स्वामी : हो, मी नेहमी तुझ्या बरोबरच असतो.
वसंता : स्वामी, काहीतरी सांगा नं.
स्वामी : एकदा राधा आणि कृष्ण संभाषण करीत होते. राधेनं कृष्णाला विचारलं,'तू सर्वात जास्त प्रेम कुणावर करतोस ? ' कृष्ण उत्तरला, 'मी माझ्या आल्हादिनी शक्तीवर प्रेम करतो. ती मला आनंद देते . त्याप्रमाणे तू मला आनंद देणारी शक्ती आहेस . तू माझं कार्य पूर्ण करतेस . म्हणून मी केवळ तुझ्यावर प्रेम करतो .'
वसंता : ठीक आहे स्वामी.
ध्यान समाप्त
ध्यानानंतर मी पाऊण वाजता जेवायला म्हणून उठले . मी खुर्चीवर बसणार तोच,आम्ही खुर्चीवर डाव्या हाताचा ठसा पहिला. आम्ही सर्वानी बघितलं पण फोटो घ्यायला विसरलो .
२३ जून सायं ध्यान
वसंता : स्वामी खुर्चीवरचा हाताचा ठसा काय सुचवतो?
स्वामी : तो माझा हात आहे. मी तुला सांगितलं की मी तुझं नहाण आणि केस विंचरणे करीन. ह्या ठशातून मी हे दाखविलं
वसंता : स्वामी आम्ही फोटो घ्यायला विसरलो. आम्ही आमचे हात त्या ठशावर ठेऊन पहिले, पण कोणाचाही हात जुळला नाही .
स्वामी : तुमचे हात परमेश्वराच्या हाताशी कसे बरं जुळू शकतील?
वसंता : ठीक आहे स्वामी, पण तुम्ही डाव्या हाताचा ठसा का दिलात?
स्वामी : तुझा डावा हात जास्त दुखतो आणि तू काळजी करतेस नं म्हणून मी माझा डावा हात दाखवला.
वसंता : मला खूप आनंद झालाय. तुम्ही खूप दिवसांनी काहीतरी दाखवलंत.
स्वामी : आनंदात रहा. मी तुझ्यासोबतच आहे .
ध्यान समाप्त
आता आपण विस्तारानं पाहुयात . आज नहाण झाल्यानंतर मला अजिबात कुठेही दुखत नव्हतं . स्वामी म्हणाले,"होय, मीच सर्व काही केलं. मी सदोदित तुझ्या जवळच आहे ." मी स्वामींना हे सिद्ध करायला सांगितलं तर स्वामींनी ध्यानानंतर लगेचच त्यांच्या हाताचा ठसा खुर्चीवर उमटवला . ध्यानात स्वामींनी राधा, कृष्णाला एक प्रश्न विचारत असल्याचं दिव्य दृश्य दाखवलं. कृष्णानं सांगितलं की तो त्याच्या ल्हादिनी शक्तीवर म्हणजे राधावर प्रेम करतो . ल्हादिनी शक्ती म्हणजे जी कृष्णाला आनंद देते ती शक्ती . ती एकटीच त्याला आनंद देऊ शकते . कृष्णाला आठ राण्या होत्या तरीही त्यातील एकही त्याला आनंद देऊ शकली नाही, कारण तो कायम साक्षी अवस्थेत होता . राधा त्याची ल्हादिनी शक्ती त्याच्यामधूनच उद्भवली होती . अगदी तसंच मी स्वामींमधून उगम पावले आहे. मी त्यांची ल्हादिनी शक्ती आहे . मी त्यांचं अवतार कार्य पूर्णत्वास नेते . स्वामींनी स्वतःला आनंद देण्यासाठी स्वतःस विभक्त करून मला आणलं .
दुपारच्या ध्यानानंतर जेवण्याकरिता मी माझ्या खुर्चीजवळ गेले आणि चकित झाले . खुर्चीवर आम्ही स्वामींच्या डाव्या हाताचा ठसा पहिला . आनंदातिशयाने कुणालाही फोटो काढायची आठवण झाली नाही . आमच्यापैकी कुणाच्यातरी हाताचा हा ठसा आहे का हे पाहण्यासाठी आम्ही सर्वानी त्या ठशावर हात ठेऊन पाहिलं, पण व्यर्थ. मी स्वामींना विचारलं तर ते म्हणाले,"भगवंताच्या हाताशी कुणाचा हात जुळू शकणार? " सहसा माझा डावा हात जास्त दुखतो, म्हणून माझं सांत्वन करायला स्वामींनी आपल्या डाव्या हाताचा ठसा दाखवला. स्वामींनी खूप दिवसात काहीही संदेश दिला नव्हता, त्यामुळे मला खूप आनंद झाला . क्षणोक्षणी स्वामी माझ्या जवळच आहेत हे दाखवीत असतात .
वैश्विक कर्मांमुळे माझ्या शरीराला काही ना काही क्लेश होत असतात . माझे दंड आणि हात जास्त दुखतात, म्हणून स्वामींनी हाताचा ठसा दाखवला . स्वामींच्या हाताचा ठसा 'जागतिक हाताचे ठसे' नाहीसे करतो . म्हणजे जागतिक कर्मे आणि कुसंस्कार . आज व्हरांड्यात चालत होतो, स्वामींच्या फोटोकडे गेलो. तेथील कलशात ठेवलेल्या नारळाला चीर गेली होती . नारळ दोनात विभागला गेला होता . मी आताच मनावरील आठवणींचे खोल ठसे आणि कर्म संहार यांवर लिहिलं आणि लगेचच त्यासाठीचा पुरावा मिळाला .
२४ जून २०१६ : ध्यान
वसंता : स्वामी, माझे प्रभु . तुम्ही केव्हा येणार ? अजुन किती काळ वाट पाहायची ? मला नाही सहन होत .
स्वामी : रडू नकोस. धीर धर. मी येईन . मला विरहाचं दुःख नाहीये का ? मी तुला आता एक गोष्ट सांगतो . माझं ऐक . पूर्वी राधा कृष्णाच्या विरहानंतरच्या मीलनाचं एक चित्र मी तुला दिलं होतं . ते विरहात होते, तरीही त्यांनी आपापली कर्तव्ये केली.
राधेच्या अंतिम समयी तिचं कृष्णाशी मीलन झालं आणि ती त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन पहुडली . कृष्णानं तिच्याशी गांधर्व विवाह केला . नंतर तिनं हे जग सोडलं . त्यानंतर कृष्णानं त्याचं अवतार कार्य पुर्ण केलं . राधा जरी त्याच्यापासून दूर होती तरीही तो कायम आनंदी होता, कारण ती देहात होती . तिनं देह सोडल्यानंतर कृष्णाचा आनंद नाहीसा झाला . त्यानं दुष्टांच्या संहाराचं कार्य जारी ठेवलं .
आपला जीवनपटही असाच आहे. आपण विरहात जगलो, आपला विवाह झाला आणि नंतर मी देह सोडला . तू तुझं कर्मसंहाराचं कार्य जारी ठेवलं आहेस . आपण दूर राहत होतो तरीही मी पुट्टपर्थीत आहे हा दिलासा तुला होता . आता मी देहात नाही त्यामुळे तुझ्या शरीराला क्लेश होतात. तू आपले भाव लेखनात उतरवतेस आणि आपले अवतार कार्य चालू ठेवतेस. आपले भावतरंग बाह्यगामी होत जगात पसरतात आणि वाईटाचा विनाश करतात. आता मी परतलो की सर्व काही व्यवस्थित होईल. राधा कृष्णाचं आणि आपलं जीवन सारखंच आहे .
वसंता : हो, स्वामी. तुम्ही माझा हात बरा करा . मी हे सर्व लिहू का ?
स्वामी : हो, लिही.
ध्यान समाप्त .
आता आपण पाहुयात . स्वामी परत एकदा राधा कृष्णाच्या जीवनातील घटनेबद्दल सांगतात . राधा-कृष्णा सारखाच आमचा गांधर्व विवाह आहे . स्वामी आणि मी ध्यानात अखंड संवाद करत असतो . ह्या संवादामधून जे भावतरंग निर्माण होतात ते मी शब्दबद्ध करते, त्याचीच नंतर पुस्तकं होतात . स्वामींनी देह सोडल्यानंतर मी पूर्णपणे गलितगात्र झाले होते . मी अतोनात शारीरिक यातना सोसल्या .
आता जरी मी दिवसाचा बराचसा वेळ पलंगावर पडून असते, तरीही माझे भावतरंग सतत माझ्या लिखाणातून ओतले जातात. ते स्तूपात प्रवेश करत बाहेर पडतात आणि जग परिवर्तन करतात. माझ्याअश्रुपूर्ण तपश्चर्येमुळे स्वामी परत येतील, कली युग सत्ययुगात बदलेल. राधेची इच्छा माझ्याद्वारे पूर्ण होईल. जिथे जिथे स्वामी आहेत तेथे मी असेन . ही नवसृष्टी आहे .
राधेने देह सोडल्यावर कृष्णाने त्याची बासरी मोडून टाकली. बासरी त्याच्या आनंदावस्थेचं प्रतीक आहे. कृष्णानं बासरी वाजवली की सर्वांना ती आनंदावस्था प्राप्त होत असे. ही रासलीला होय. रासलीलेच्या वेळी सर्वांचा अंतर्यामी बाहेर प्रगट होऊन प्रत्येकीबरोबर नृत्य करीत असे. हयामुळे सर्वांवर सच्चिदानंदाचा वर्षाव होत असे. प्रत्येकासाठी स्वतःचा कृष्ण होता.
एकदा शिवाने त्याचा भक्त नरसी मेहताला दर्शन दिलं आणि विचारलं,"तुला काय हवंय? " नरसीने महादेवाला सांगितलं,"तुला जे आवडेल ते दे." महादेव त्याला जंगलात घेऊन गेले. ते दोघे एका झाडामागे उभे राहिले. शिवाने पौर्णिमेच्या चांदण्यात कृष्णाबरोबर नृत्य करणाऱ्या गोपींच्या समूहाकडे निर्देश केला. सर्वजण चिदानंदात होते. महादेवाचे हे अत्यंत आवडते दिव्य दृश्य .
आता हे कार्य साईशिवाचं आहे. माझ्या तपश्चर्येद्वारे साईमहादेव सर्वांमधील अंतर्यामी जागृत करतो. मूलाधारातील शक्ती वर चढू लागते आणि आज्ञा चक्रात शिवास जाऊन मिळते. सर्वांना चिदानंद अवस्था प्राप्त होते. नरसी मेहतांनी एक गीत लिहिलंय, ते खूप प्रसिद्ध झालं.
'वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीड परायि जाने रे ... '
ह्या गीतात नरसी विचारतात,"कोण खरा वैष्णव आहे , " आणि सांगतात की ' जो दुसऱ्यांची पीडा दूर करतो तो '. स्वतःला गर्वाचा स्पर्श होऊ न देता सतत दुसऱ्याचं भलं करतो तो. हे महात्मा गांधींचं अतिशय आवडतं गीत होतं आणि सामूहिक प्रार्थनेत ते हे गीत म्हणत. माझे वडील वडक्कमपट्टीतील गांधी खादी विद्यालयात सर्वांबरोबर हे गीत म्हणत. आम्ही सर्वजण अगदी बालवयापासून हे गीत म्हणू लागलो. आता मी सर्वांचा कर्मसंहार करून त्यांना मोक्ष प्रदान करत ह्या गीताच्या संदेशाचं प्रात्यक्षिक करते. मला 'मी ' नसल्याने, येथे गर्व नाहीय. ह्या गीतात नरसी म्हणतात की, काम, क्रोध, लोभ, मत्सर, आणि धुर्तपणा खऱ्या वैष्णवांच्या स्वप्नातही येत नाहीत . माझा स्वभाव असा आहे .
राधा मृत झाल्यानंतर कृष्णाने त्याची बासरी तोडली. त्याची आनंदावस्था नाहीशी झाली. स्वामी म्हणतात की माझी अवस्था तशीच आहे. एकदा एडी आणि निकोला जवळच्या गावात धोब्याकडे दिलेले कपडे घ्यायला गेले. तिच्या घराजवळ त्यांना एक तुटलेली बासरी मिळाली. मी तेव्हा ह्या घटनेबद्दल लिहिले. आपण आता त्या घटनेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहुयात.
मला प्रशांती निलायममध्ये प्रवेश नाकारल्यानंतर स्वामींची आनंदावस्था नाहीशी झाली. तथापि स्वामी व मी आमचं कार्य करीत राहिलो. आता स्वामी परत आले की ते आणि मी आनंदावस्था प्राप्त करू. पर्यायाने अखिल जगत आनंदावस्था प्राप्त करेल. ह्या नवयुगात अवघे जग गोकुळ होते. सर्वजण गोप गोपींसारखे नृत्य गान करतात. राधा आणि कृष्णा मध्ये शारीरिक संबंध नव्हते. स्वामी व माझ्याबाबतही असेच आहे. आमचा भावबंध आहे. ह्यासाठीच स्वामींनी मला त्यांच्या जवळ जाऊ दिले नाही तसेच ते माझ्याशी शारीरिक पातळीवर कधीही बोलले नाहीत अथवा मला त्यांनी स्पर्शही केला नाही.
२५ जून २०१६- ध्यान:
वसंता : स्वामी, राधा कृष्ण आणि आपल्यात काय संबंध आहे? मी काय लिहू ?
स्वामी: आपलं कार्य द्वापार युगात सुरु झालं. राधा कृष्णमध्ये शारीरिक संबंध नव्हता,त्याचप्रमाणे आपल्यातही नाहीये. आपला भावसंगम आहे. साधारणपणे मानव शरीर संबंधाद्वारे सृजन करतो. भगवंतांचं सृजन संकल्पाद्वारे होतं. आपण ह्याचं प्रात्यक्षिक करतो.
ध्यान समाप्त.
आता आपण पाहुयात. मनुष्य विवाह आणि शारीरिक संबंधाद्वारे वंशावळ निर्माण करतो. भगवान सृजनाचा संकल्प करतो. ह्यावेळी आदिस्तंभ उदभवतो. हा स्तंभ अणूंनी भरलेला असतो. हे अणू वेगाने बहूगुणित होतात आणि स्फोट होतो. मग सृष्टीची निर्मिती होते. स्वामी आणि मी ह्याचं प्रात्यक्षिक करतो. हे दाखविण्याकरिता माझी कुंडलिनी आदिस्तंभ (स्तूप) होऊन बाहेर आली. आता स्वामी आले की आमच्या भावस्पन्दनांचा स्फोट होत सर्वांमध्ये आमचे भाव प्रवेशित होतील. ही मूलस्तंभातून दृग्गोचर होणारी प्रथम सृष्टी असेल. युग परिवर्तन आणि नूतन सृष्टीच्या निर्मितीसाठी हे घडतं.
२६ जून २०१६; ध्यान :
वसंता : स्वामी मला नरसी मेहतांच्या गाण्यावर लिहायचं आहे.
स्वामी : त्याच्या गाण्यानुसार फक्त तू खरी वैष्णव आहेस.
वसंता : स्वामी, महात्मा गांधी, आणि इतर ऋषी आणि साक्षात्कारी आत्म्यांचं काय?
स्वामी : वैश्विक कर्म संहार करून वैश्विक मुक्ती कोणी दिली आहे का? म्हणून त्याच्या गाण्यानुसार केवळ तूच खरी वैष्णव आहेस.
ध्यान समाप्त.
आता आपण पाहुयात. कवी ह्या गाण्यात खरा वैष्णव कोण ह्याच्या बऱ्याच व्याख्या सांगतो. स्वामी म्हणतात त्याच्या व्याख्येनुसार मी एकटीच खरी वैष्णव आहे. मला कली युगातील लोकांचं दुःख माहीत आहे, मी त्यांचा कर्मसंहार करून त्यांना मुक्ती देते. माझं कौतुक होवो की माझ्यावर दोषारोपण होवो मी स्थिर चित्त असते. मी सर्वांची चरण रज आहे. मी कोणाचेही दोष काढत नाही. सर्वाना मी माझे गुरु मानते. ह्या मानसिकतेमधून मी सर्वांचा आदर करते. मी सतत माझे विचार,शब्द, आणि आचरण शुद्ध करीत असते त्यामुळे माझी माता सत्य साई मला आशीर्वदित करते.
सर्व शुद्ध केल्यामुळे मी स्वामींमध्ये विलीन होऊ शकते. मी कोणामध्येही भेदभाव करत नाही. माझे नाडीग्रंथ सांगतात की माझ्या तपस्येमुळे दुष्ट दारुडा सुद्धा मोक्षास प्राप्त होईल. ह्या जगातील सर्व माझी लेकरे आहेत. ह्या माझ्या मातृभावाने विश्व् ब्रह्म गर्भ कोट्टम अस्तित्वात आले. येथून नव निर्मितीची सुरुवात होते. येथे सर्व स्वामी आणि माझ्या पासून जन्म घेतात. मी मायेपासून मुक्त आहे आणि मला लोभ नाहीये. माझ्या तीव्र वैराग्यामुळे मी मायेवर विजय मिळविला.
मी अखंड नामस्मरण करते. ह्यामुळे पृथ्वीचा अक्ष बदलला. मी आयुष्यात कधी खोटं बोलले नाही; खरं तर खोटं म्हणजे काय हेच मला माहीत नाही. मी वयाच्या तेविसाव्या वर्षी सर्वत्याग केला. आमच्या मालमत्तेला स्पर्शही केला नाही. मी श्रीमंत घरात जन्मले तरीसुद्धा मी फक्त तीस रुपयांच्या साड्या नेसत होते. मी माझे दागिने त्यागले. माझ्याकडे काम, क्रोध, अथवा लबाडी नाहीये. मी माझी सर्व इंद्रियं शुद्ध केली आहेत.
इसवी सन २००२ साली वसिष्ठ गुहेत माझी नऊ तत्वे:पाच ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी,चित्त,आणि अहंकार भगवंतात पूर्णतः विलीन झाले. मी स्वतःस शुद्ध करत रिक्त केले. हे कृष्णाच्या बासरीचं प्रतीक आहे. बासरीला आपल्या शरीराप्रमाणे नऊ द्वारे असतात. मला माझं शरीर शुद्ध आणि पवित्र करून भगवान सत्य साई बाबांमध्ये ज्योती स्वरूपात विलीन करायचं आहे. मी सत्य साईमधून उगम पावले. मला माझे शरीर ज्योतिस्वरूप करून पुनः त्यांच्या देहात विलीन व्हायचे आहे.
काही वर्षांपूर्वी स्वामींनी हाताने चितारलेली तीन चित्रं मला दिली होती. पहिल्या चित्रात राधा तिच्या अंतिम क्षणी कृष्णाच्या मांडीवर मस्तक ठेऊन पहुडली होती. दुसऱ्या चित्रात स्वामी माझ्या मांडीवर मस्तक ठेऊन पहुडले होते. जणूकाही ते देह सोडणार होते. आणि ह्या चित्रात मी रडते आहे. तिसऱ्या चित्रात प्रेमसाई आणि प्रेमा ज्ञानरामाबरोबर आनंदाने एकत्र बसले आहेत. स्वामींनी ही चित्रे ते देहात असताना दिली होती. पूर्वी मी त्या चित्रांवर लिहिलं आहे. एका चित्रात स्वामी माझ्या मांडीवर डोकं ठेऊन पहुडलेले पाहून मी रडले होते. त्यांनी देह सोडल्यानंतरच मला कारण सांगितले.
राधा कृष्ण जन्मापासूनच विभक्त होते. कृष्ण आठ वर्षं गोकुळात राहिला. राधा आणि इतरांबरोबर तोआनंदानं अनेक खेळ खेळला. तदनंतर तो मथुरेला गेला. तिथे त्याच्या अवतार कार्याची सुरुवात झाली. कृष्णावर प्रेमाचा वर्षाव करत राधा गोकुळातच राहिली. तिला कृष्णाशी एकात्म होत, तो जेथे जेथे असेल तेथे त्याच्याशी विलीन होण्याची इच्छा होती. तिला सर्वव्याप्त परमेश्वराशी एकात्म व्हायचं होतं. राधाची देह सोडण्याची वेळ आली तेव्हा कृष्ण तिच्याजवळ आला . त्यानं तिला जवळ घेत तिचं मस्तक आपल्या मांडीवर ठेवलं. राधेनं तिचे नेत्र उघडले. कृष्णानं आपल्या बोटातील अंगठी काढून राधेच्या बोटात घातली. त्यानं तिला विचारलं,"तुला काय हवंय?" तिला फक्त त्याच्या बासरीची मधुर धून ऐकायची इच्छा होती. कृष्ण बासरी वाजवू लागला. ते मधुर स्वर ऐकत तिनं इहलोक सोडला. कृष्णानं बासरी मोडून तिचे दोन तुकडे केले आणि तो परत अवतार कार्यात मग्न झाला. महाभारत युद्धात दुष्ट राजांचा संहार झाल्यानंतर त्यानेसुद्धा भूलोक सोडला.
स्वामींचा आणि माझा जीवनपट सुद्धा असाच आहे. स्वामी आणि मी जन्मापासूनच विभक्त राहिलो. मी वडक्कमपट्टी ह्या कुग्रामात राहिले तर स्वामी पुट्टपर्थीला. मी सतरा वर्षांची असताना स्वामींनी माझ्याशी वेगळ्या रूपात विवाह केला. परंतु मी ह्याविषयी पूर्ण अजाण होते. नंतर त्रेसष्ठाव्या वर्षी स्वामींनी मांगल्य आशीर्वदित केले आणि माझ्याशी गांधर्व विवाह केला. स्वामी आणि मी शरीर पातळीवर कधीही बोललो नाही, ना आम्ही एकमेकांना स्पर्श केलाय अथवा पाहिलं आहे.
जय साईराम